डोक्यात उवा कशामुळे होतात? त्यांचा प्रसार कसा रोखावा?

डोक्यात उवा होण्याच्या समस्येचा प्रत्येकाला कधी ना कधी त्रास सहन करावा लागला आहे. विशेषतः मुलींना तर या समस्येने जास्त छळलेलं असतं.
डोक्यात उवा झाल्या, केसांत उवांनी प्रवेश केला, असं नेहमी बोललं जातं. उवा झाल्या म्हणून त्या हटवण्यासाठी विविध उपायही केले जातात.
पण, डोक्यात उवा होतातच कसे, किंवा त्यांचा प्रसार कसा होतो, याविषयी आपल्याला फारसं माहीत नसतं.
या बातमीत आपण उवांचा प्रसार आणि त्यांना रोखण्यासाठीच्या काही उपायांवर चर्चा करूया –
डोक्यात उवा कशा येतात?
डोक्यामध्ये उवा तयार होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इतरांच्या डोक्यातून त्यांचा होणारा प्रवेश.
उवा डोक्यात शिरताच अंडी घालून प्रजनन सुरू करतात.
मानवी रक्त हे उवांचं अन्न आहे. उवा आपल्या केसांमध्ये दिवसभर लपून राहतात. डोक्यात चावा घेऊन ते रक्त शोषतात.
उवा डोक्यात येतातच कशा?
उवा डोक्यात आपोआप तयार होत नाहीत. इतरांच्या डोक्यातूनच ते आपल्या डोक्यात प्रवेश करतात.
जेव्हा आपल्या डोक्यांचा एकमेकांना स्पर्श होतो, त्यावेळी उवांचा इतर व्यक्तीकडे प्रसार होतो.
अनेकजण लहान मुलांसोबत खेळत असतात. त्यावेळी त्यांना उचलून घेताना कडेवर बसवल्यानंतर त्यांच्या डोक्याचा आपल्याला स्पर्श होतो. अशा वेळी उवांना इतरांकडे जाण्याची संधी मिळते.
शिवाय, मुले एकमेकांशी खेटून बरेच खेळ खेळत असतात. त्यामुळे, प्रौढांपेक्षाही लहान मुलांच्या डोक्यात उवांचा प्रादुर्भाव होण्याची अधिक शक्यता असते.
लांब केस असलेल्या लोकांमध्ये उवा फार काळ लपून राहतात. तेसुद्धा उवांचा प्रसार होण्याचं आणखी एक कारण ठरतं.
स्मार्टफोन आणि उवांचं कनेक्शन
सध्याच्या काळातील स्मार्टफोन आणि उवांचा प्रसार यांच्यात एक कनेक्शन आहे, असं तुम्हाला सांगितलं तर..
यामध्ये एक स्पष्ट करावं लागेल की उवा स्मार्टफोनद्वारे प्रत्यक्ष पसरत नाहीत.
पण किशोरवयीन मुले स्मार्टफोनच्या मदतीने सेल्फी काढतात, अशा वेळी उवांचा प्रसार होण्याची जास्त शक्यता निर्माण होते.

कारण, सेल्फी काढताना, फनी व्हिडिओ आणि फोटो पाहताना तरुण-तरुणी एकाच फोनसमोर डोकं जवळ आणून बसतात.
अशा स्थितीत उवांना इतर डोक्यात प्रवेश करण्याची चांगली संधी मिळते.
‘उडता येत नाही, उडी मारू शकत नाही’
पण, डोक्यातील उवांना उडता येत नाही, किंवा उडीही मारता येत नाही, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे.
म्हणजे, उवा या केसांना केसांचा स्पर्श झालेला असतानाच स्थलांतर करू शकतात. त्याव्यतिरिक्त उडी मारून किंवा उडून इतरांकडे जाणं त्यांना शक्य नाही.
रुळणाऱ्या केसांवरून त्या मुळापर्यंत जातात. त्यानंतर डोक्यात अंडी घालून प्रजननास सुरुवात करतात.
उवांचा डोक्यात प्रवेश होऊन त्यांची वाढ होईपर्यंत त्या आपल्या डोक्यात असल्याचं लक्षात येत नाही. काही लोकांना उवांच्या चाव्याने अलर्जी होते, पण त्याची जाणीवही काही दिवसांनी होत असल्याने उवांचा प्रवेश नेमका कधी झाला, हे आपल्याला सांगता येत नाही.
फार काळ टिकत नाहीत
उवा या मानवी डोक्यावर फार काळ टिकू शकत नाही, असं अभ्यासात समोर आलं आहे.
उवा उडू किंवा उडी मारू शकत नसल्याने त्यांना रोखणं शक्य होऊ शकतं. एकदा का त्यांचं डोक्यातील अस्तित्व लक्षात आल्यानंतर तातडीने उपाय केल्यास त्या नाहीशा होऊ शकतात.
माणसाच्या डोक्यावर त्या अल्प काळासाठीच टिकू शकतात.
कारण मानवी डोक्यावर त्यांना मांजर किंवा कुत्र्यांच्या केसांप्रमाणे अनुकूल वातावरण मिळत नाही.
तिथे दाट केसांमुळे त्यांना लपून राहणं, प्रजनन करणं सोपं होतं, पण मानवाच्या डोक्यात अशी स्थिती त्यांना मिळू शकत नाही. त्यामुळे डोक्यात शिरतात काही दिवसांनी त्यांचा नायनाट होतो. पण त्यासाठी लहान मुलांच्या डोक्याचं निरीक्षण आणि देखरेख करणंही महत्त्वाचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात.
काही लोकांना उवांच्या चाव्यानंतर गंभीर समस्या आढळून येतात. अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास त्यावर उपाययोजना केली जाऊ शकते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








