मुंबई महापालिकेच्या 89 हजार कोटींच्या ठेवी का वापरल्या जात नाहीत?

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठी
    • Reporting from, मुंबई

मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी आणि जवळपास 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प हा नेहमीच राजकीय नेत्यांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू राहिला आहे.

"मुंबईकडे पैश्यांची कमी नाही. पण मुंबईचा पैसा योग्य जागी वापरला जाईल, तेव्हाच प्रकल्पाद्वारे विकास होईल. जर तो पैसा तिजोरीत पडून राहिला तर मुंबईचा विकास कसा होईल?" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या सभेत हे वक्तव्य केले.

या वक्तव्यानंतर मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवीवर केंद्राचा डोळा असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.

शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याला उत्तर दिले. ते म्हणाले, "मोदी जे बोलले ते भयानक आहे. भक्त अंध समजू शकतो पण गुरू सुध्दा? 2002 पर्यंत मुंबई मनपा तुटीत होती. तेव्हाचे आयुक्त सुबोधकुमार आणि आपल्या लोकांनी ती सशक्त केली.

"मनपाचे अनेक उपक्रम त्या ठेवींमधून होतात. कोस्टल रोड आपण विना-टोल देतोय. 30-40% रक्कम ही कामगारांसाठी आणि इतर कामांसाठी आहे. यांना मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी वाटते," ठाकरे म्हणाले.

या राजकीय आरोप प्रत्यारोपांवरून मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी चर्चेत आल्या आहेत. या ठेवी किती कोटींच्या आहेत? याचा काय उपयोग केला जातो? पंतप्रधानांनी म्हटल्यानुसार हा पैसा फक्त तिजोरीत पडून असतो का? असे अनेक प्रश्न समोर येतात.

मुंबई महापालिकेच्या किती ठेवी आहेत?

सध्या मुंबई महापालिकेच्या 88,304 कोटींच्या मुदत ठेवी आहेत. त्यापैकी 37,156.69 कोटी रूपये ही रक्कम बांधील दायित्वापोटी विश्वासार्हता म्हणून आहे.

तर 51,147. 36 कोटी रूपये हे मुंबईसाठीचे पायाभूत प्रकल्प, इतर सोईसुविधा यांच्यासाठी ठेवली गेली आहे. पण इतके पैसे फक्त विश्वासार्हता किंवा पायाभूत सुविधांसाठी वापरले जातात म्हणजे कशामध्ये विभागले जातात?

37,156.69 कोटी रूपये ही कामगारांसाठी आणि कंत्राटदार मुदत ठेवीसाठीची रक्कम आहे. ही रक्कम कोणत्याही इतर खर्चासाठी वापरता येत नाही.

मुंबई महापालिकेत काम करणारे कर्मचार्‍यांचे निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी, उपदान निधी (Gratuity) यासाठी मुदत ठेवींमधून सुरक्षित करण्यात आली आहे. त्याचबरोबर कंत्राटदार काम करण्याआधी मुंबई महापालिकेकडे एक रक्कम ही महापालिकेकडे जमा करतो.

ते काम पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम मुंबई महापालिका त्या कंत्राटदाराला परत करते. कंत्राटदाराकडून मिळणारी ही रक्कम मुंबई महापालिका ठेवीच्या स्वरूपात सुरक्षित करते.

37,156.69 कोटी रूपये हा राखीव निधी असल्यामुळे तो नियमानुसार कोणत्याही इतर विकास कामांसाठी वापरता येत नाही.

मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या या राखीव रक्कमेचा तपशील

1. भविष्य निर्वाह निधी - 6024.81 कोटी

2. निवृत्ती वेतन निधी - 6230.78 कोटी

3. उपदान निधी - 6.94 कोटी

4. परिभाषीत अंशदान निवृत्ती वेतन योजना 1

- 3441.14 कोटी

5. इतर विशेष निधी - 1585.30 कोटी

6. कंत्राटदारांकडून ठेव रक्कम - 16902.21 कोटी

7. खंदक ठेव आणि इतर अनुदान - 2965.51 कोटी

एकूण - 37,156.69 कोटी

उर्वरित 51,147.36 कोटींच्या ठेवी या मुंबईतील पायाभूत सुविधा आणि इतर विकास कामांसाठी ठेवण्यात आलेली आहे.

विकास कामांसाठी या रकमेचा वापर केला जातो. त्यामध्ये कोणकोणत्या पायाभूत सुविधा आहेत?

1. पायाभूत सुविधा विकास निधी (फंजिबल एफएसआय) - 15,657.73 कोटी

2. मालमत्ता पुर्नस्थापना निधी - 1974.12 कोटी

3. मालमत्ता पुर्नस्थापना आणि पुर्नवसन निधी - 10,630.15 कोटी

4. घसारा निधी (Depreciation) - 2527.02 कोटी

5. रस्ते आणि पूल बांधकाम निधी - 0.56 कोटी

6.भूमिसंपादन आणि विकास निधी - 776.69 कोटी

7. प्राथमिक शाळा इमारत बांधकाम निधी - 286.46 कोटी

8. प्राथमिक शाळा परिक्षण निधी - 357.30 कोटी

9. विकास निधी, एमआरटीपी ACT - 65.24 कोटी

10. विकास निधी डीसीआर - 7113 कोटी

11. माध्यमिक शाळा विकास निधी - 81.33 कोटी

12. विशेष प्रकल्प निधी - 1401.45 कोटी

13. संचित वर्ताळा (Accumulated working capital) - 10276. 31 कोटी

एकूण - 51,147.36 कोटी

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारसू सांगतात, "या मुदत ठेवी एका दिवसात बनल्या नाहीत. 1999 साली मुंबई महापालिका तोट्यात होती. तो तोटा भरून काढण्यासाठी विविध सुविधा देऊन महापालिकेने महसूल जमा करायला सुरुवात केली.

"त्यातून गेल्या 20 वर्षात इतक्या मुदत ठेवी तयार झाल्या आहेत. या ठेवीवर सरासरी 5.5% व्याज मुंबई महापालिकेला मिळतं. या रकमेची विविध कामांसाठी विभागणी केली आहे. त्याचबरोबर बरीचशी रक्कम ही राखीव आहे. त्यामुळे या ठेवी तोडायच्या असं ठरवून कोणी त्या लगेच तोडू शकत नाही.

"मुंबई महापालिकेला कर्ज घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे 'क्रेडिट रेटींग' केलेलं नाही. पण भविष्यात एखाद्या प्रकल्पासाठी कर्ज घेण्याची वेळ आली तर या मुदत ठेवींमधून मिळणार असणार्‍या 'क्रेडिट रेटींचा' निश्चितपणे फायदा होईल," वेलारसू सांगतात.

मुंबई महापालिका तोट्यात होती तेव्हा...

1994-95 मध्ये मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती ही ठीक होती. पण त्यानंतर ढासळू लागली. हळूहळू मुंबई महापालिका तोट्यात जाऊ लागली. पहिल्या वर्षी मुंबई महापालिका ही 8 कोटी तोट्यात होती. तीन वर्षांनंतर साधारण 450 कोटींच्या घरात महापालिकेला तोटा झाला.

1999 साली मुंबई महापालिकेच्या 2000 कोटींच्या अर्थसंकल्पात 646 कोटींच्या महसूली तूट आली होती. याचा अर्थ नेहमीच्या खर्चासाठी लागणारे पैसे म्हणजेच कामगार निधी, कंत्राटदारांच्या ठेवी, पाण्याचा निधी यासाठी राखीव असलेले सर्व पैसे वापरण्यात आले होते.

त्यावेळी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुबोधकुमार यांनी आर्थिक बाबींवर काम करून ही तूट कमी करण्याचा प्रयत्न केला. 2000 साली महसूली तूट 646 वरून 215 कोटींपर्यंत आली होती. त्यानंतर 2001-2002 मध्ये ही तूट शून्यावर आली आणि मुंबई महापालिका 50 कोटी नफ्यात होती.

त्यानंतर बिल्डरांकडून दिल्या जाणार्‍या मोकळ्या जागांवरचा एफएसआय, विविध गोष्टींवरचे कर यातून मुंबई महापालिकेचा महसूल वाढत गेला आणि मुंबई महापालिका सर्वात श्रीमंत महापालिकेच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर पोहचली.

मुंबईचे माजी आयुक्त सुबोधकुमार सांगतात, "महापालिकेतील रक्कम ज्यासाठी मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवण्यात आली आहे. नियमानुसार ती त्याच कामासाठी वापरता येते. विकास प्रकल्पाचा निधी हा एखाद्या प्रकल्पासाठीच वापरावा लागतो. तो निधी इतर कॉस्मेटिक काम म्हणजेच दुरूस्ती, रंगकाम यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे काही रक्कम काढून दुसरीकडे वापरली असं होत नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)