हॅरी ब्रूकचं शतक रिंकू सिंग आणि कोलकातावर भारी

हॅरी ब्रूकच्या तडाखेबंद शतकाच्या बळावर हैदराबादने 228 धावांचा डोंगर उभारला. नितीश राणा आणि रिंकू सिंग यांनी विजयासाठी अतोनात प्रयत्न केले पण अखेर हैदराबादने 23 धावांनी बाजी मारली.

प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची अवस्था 20/3 अशी झाली. रहमनुल्ला गुरबाझ, वेंकटेश अय्यर आणि सुनील नरिन झटपट माघारी परतले. पण यानंतर कर्णधार नितीश राणा आणि एन.जगदीशन यांनी चौथ्या विकेटसाठी 29 चेंडूत 62 धावांची भागादारी केली. या जोडीने सहाव्या षटकात उमरान मलिकच्या गोलंदाजीवर 28 धावा वसूल केल्या.

मयांक मार्कंडेयने जगदीशनला बाद करत ही जोडी फोडली. त्याने 36 धावा केल्या. अत्यंत धोकादायक आंद्रे रसेलला मार्कंडयेने तंबूत परतावलं. पण रसेल बाद झाल्यावर रिंकूने कर्णधाराला साथ दिली. या दोघांनी सातत्याने चौकार, षटकार वसूल करत धावगतीचं आव्हान आटोक्यात राहील याची काळजी घेतली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 39 चेंडूत 69 धावांची वेगवान भागादारी केली. नटराजनने राणाला वॉशिंग्टन सुंदरकडे झेल देण्यास भाग पाडलं. त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांसह 75 धावांची दमदार खेळी केली.

गुजरातविरुद्ध शेवटच्या षटकात पाच षटकारांसह सनसनाटी विजय मिळवून देणारा रिंकू सिंग मैदानात असल्यामुळे हैदराबादला काळजी होती. शेवटच्या षटकात कोलकाताला 32 धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर शार्दूल ठाकूर बाद झाला. उमेश यादवने एक धाव घेत रिंकूला स्ट्राईक दिला. पण त्यापुढचे दोन चेंडू निर्धाव गेल्याने कोलकाताच्या विजयाच्या आशा मावळल्या. कोलकाताने 205 धावांची मजल मारली. रिंकूने 31 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 58 धावांची खेळी केली. हैदराबादतर्फे मार्को यान्सन आणि मयांक मार्कंडेय यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

यंदाच्या आयपीएल हंगामातला पहिला शतकवीर होण्याचा मान सनरायझर्स हैदराबादच्या हॅरी ब्रूकने मिळवला. 24वर्षीय हॅरी ब्रूकसाठी हैदराबाद संघव्यवस्थापनाने 13.25 कोटी रुपये खर्च केले होते. 2022 कॅलेंडर वर्षात ब्रूकने ट्वेन्टी, टेस्ट आणि वनडे अशा तिन्ही प्रकारात अचंबित स्ट्राईकरेटने धावा केल्या होत्या.

शुक्रवारी इडन गार्डन्सवर भरगच्च चाहत्यांच्या उपस्थितीत ब्रुकने कोलकाता संघाविरुद्ध 55 चेंडूत 12 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 100 धावांची तडाखेबंद खेळी केली.

आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघासाठी डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी शतक केलं आहे. आयपीएलमध्ये शतक झळकावणारा ब्रूक हा इंग्लंडचा चौथा खेळाडू ठरला आहे. ब्रूकआधी केव्हिन पीटरसन, बेन स्टोक्स, जोस बटलर यांनी आयपीएलमध्ये शतक झळकावलं आहे.

ब्रूकच्या दिमाखदार शतकी खेळीच्या बळावर हैदराबादने 228 धावांचा डोंगर उभारला. कर्णधार एडन मारक्रमने 26 चेंडूत 50 तर अभिषेक शर्माने 17 चेंडूत 32 धावा करत ब्रूकला चांगली साथ दिली. हेनरिच लासेनने शेवटच्या षटकात 6 चेंडूत 16 धावा फटकावल्या. कोलकातातर्फे आंद्रे रसेलने 3 विकेट्स पटकावल्या पण तो दुखापतग्रस्त झाल्याने कोलकाताच्या चिंता वाढल्या आहेत.

टेस्ट क्रिकेटमध्ये धुमाकूळ

ब्रुकने कसोटी क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्याने इंग्लंडसाठी ६ कसोटी सामन्यांच्या 10 डावात 809 धावा केल्या आहेत. अल्प कारकीर्दीत त्याने कसोटी प्रकारात 4 शतके आणि ३ अर्धशतके केली आहेत. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 80 आहे तर स्ट्राईकरेट 98 आहे. पाकिस्तानात पहिल्याच कसोटी मालिकेत ब्रूकला मालिकावीर पुरस्कारने गौरवण्यात आलं होतं. या मालिकेत ब्रूकने तीन सामन्यात 468 धावा केल्या. यामध्ये तीन शतकांचा समावेश होता.

इंग्लंडचे कसोटी प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी कसोटी प्रकारातही आक्रमक पद्धतीने खेळण्याची पद्धत अंगीकारली आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वात खेळणारा इंग्लंडचा संघ कसोटी प्रकारातही अतिशय वेगवान पद्धतीने धावा करण्यावर भर देत आहे. रटाळ अनिर्णित सामन्यापेक्षा धोका पत्करुन सामना जिंकण्याकडे त्यांचा कल आहे. ब्रूक या प्रणालीचा आद्य शिलेदार आहे.

कोटीच्या कोटी उड्डाणं

आयपीएल लिलावात हॅरी ब्रूकची बेस प्राइस 1.5 कोटी रुपये होती. मात्र त्याची बोली 13.25 कोटींपर्यंत गेली. राजस्थान रॉयल्सने लिलावात ब्रूकसाठी पहिली बोली लावली. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) देखील या शर्यतीत सामील झाला, परंतु हा संघ 4.80 कोटींच्या पुढे जाऊ शकला नाही.

आरसीबीने माघार घेतल्यानंतर हैदराबादचा संघ या बोलीत सामील झाला. हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात बराच काळ बोली युद्ध चालले. ब्रुकला राजस्थान विकत घेईल असे एकवेळ वाटत होते. पण हैदराबादने हार मानली नाही आणि अखेर ब्रुकला 13.25 कोटी रुपयांना विकत घेतले.

मोडला कांबळीचा विक्रम

पहिल्या 9 कसोटी डावात सर्वाधिक धावा करण्याचा 30 वर्ष जुना विनोद कांबळीचा विक्रम हॅरी ब्रूकने यंदा मोडला होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत ब्रूकने कांबळीचा विक्रम मागे टाकत आगेकूच केली. कांबळीने कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या 9 डावात 798 धावा केल्या होत्या. ब्रूकने 9 डावात 807 धावा करत नवा विक्रम रचला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)