बंगळुरूमधल्या चिन्नास्वामी स्टेडियमला 'बॉलर्सचा कत्तलखाना' का म्हटलं जातं?

बंगळुरू शहरातलं एम.चिन्नास्वामी स्टेडियम हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं घरचं मैदान. विराट कोहली चेहरा असणाऱ्या या संघाचे हजारो चाहते या स्टेडियममध्ये संघाला साथ देण्यासाठी उपस्थित असतात. पण या मैदानाला 'गोलंदाजांचा कत्तलखाना' असं म्हटलं जातं.

सोमवारी (10 एप्रिल) बंगळुरूने संघाने या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना 212 धावांचा डोंगर उभारला. विराट कोहलीने 61 तर कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाबाद 79 धावांची खेळी केली.

ग्लेन मॅक्सवेलने 29 चेंडूत 59 धावांची तडाखेबंद खेळी केली. कोहलीने 4, प्लेसिसने 5 तर मॅक्सवेलने 6 षटकारांची आतषबाजी केली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लखनौने निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनस यांच्या वादळी खेळींच्या बळावर हे लक्ष्य गाठलं. लखनौच्या फलंदाजांनी मिळून 12 षटकार लगावले.

बंगळुरूच्या डावानंतर बोलताना दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी 212 या धावसंख्येचा पाठलाग करता येईल असं म्हटलं होतं. 212 ही या मैदानावर सरासरी स्वरुपाची धावसंख्या आहे. बंगळुरूचं चिन्न्नास्वामी स्टेडियम हे कुंबळे यांचं घरचं मैदान.

चिन्नास्वामीवर सामना म्हणजे षटकारांची खैरात होते. एखाद्या फलंदाज धावांसाठी झगडत असेल आणि त्याला या मैदानावर खेळायची संधी मिळाली तर त्याला लय गवसू शकते.

चिन्नास्वामीचं मैदान खूप लहान आहे म्हणून षटकारांची लयलूट होते हे कारण नाही. खेळपट्टीपासून दोन्ही बाजूंना साधारण 70-71 मीटरवर बाऊंड्री आहे. साईड बाऊंड्री 55-60 मीटर अंतरावर आहे. ज्या दिशेला बाऊंड्री कमी अंतरावर आहे तिथे चेंडू मारला तर चौकार-षटकारांची संख्या वाढते.

समुद्रसपाटीपासूनची उंची आणि काळी माती या दोन घटकांमुळे इथे चेंडू वेगळ्या पद्धतीने बॅटवर येतो.

दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्गमधल्या वाँडरर्स मैदानावर 2006 मध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने 434 धावा करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी चारशेची वेस ओलांडणं अशक्य मानलं जात असे. पण अवघ्या तीन तासात दक्षिण आफ्रिकेने हे प्रचंड लक्ष्य पारही केलं.

हाय अल्टिट्यूड परिस्थितीमुळे चेंडू सुरेखपणे बॅटवर येतो. फटका लगावल्यानंतर त्वरेने दूरवर जातो. चिन्नास्वामी स्टेडियमची समुद्रसपाटीपासून उंची साधारणत: 900 मीटर आहे.

भारतात वेगवेगळ्या भागांमध्ये मातीचा पोत विभिन्न पाहायला मिळतो. बंगळुरूत काळी माती आहे. खेळपट्टी दिवसभरासाठी नीट आकारात राहते. ट्वेन्टी20 सामना सर्वसाधारणपणे तीन साडेतीन तासात आटोपतो. तेवढ्या कालावधीसाठी काळ्या मातीपासून तयार केलेली खेळपट्टी उत्तम राहते आणि फलंदाजांसाठी अनुकूल असते.

चिन्नास्वामी मैदानावर प्रेक्षक आणि बाऊंड्री यांच्यातलं अंतर अतिशय कमी आहे. देशातल्या अन्य मैदानांमध्ये बाऊंड्रीनंतर जागा मोकळी सोडलेली असते.

सुरक्षेच्या कारणास्तव तसंच लॉजिस्टिक कारणांसाठी मोकळी जागा सोडली जाते. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रेक्षक बाऊंड्रीच्या अगदी समीप असतात.

ऐतिहासिक घटनांचं, खेळीचं साक्षीदार

या मैदानाचं मूळ नाव कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन स्टेडियम असं होतं. कर्नाटक क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ कार्यरत एम. चिन्नास्वामी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मैदानाचं नाव बदलण्यात आलं. एम. चिन्नास्वामी 1977 ते 1980 या कालावधीत बीसीसीआयचे अध्यक्षही होते.

1974-75 मध्ये या मैदानाला कसोटी सामने आयोजित करण्याची संधी मिळाली. महान फलंदाज व्हिव्हिअन रिचर्ड्स आणि गॉर्डन ग्रीनिज यांनी पदार्पण केलं. सार्वकालीन महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी या मैदानावर शेवटचा सामना खेळला.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने याच मैदानावर कसोटी पदार्पण शतकासह साजरं केलं होतं.

पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने याच मैदानावर 100व्या कसोटीत शतकी खेळी केली होती. भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने याच मैदानावर 400 कसोटी विकेट घेतली होती.

याच मैदानावर रोहित शर्माने द्विशतकी खेळी साकारली होती. 2013 मध्ये रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चिन्नास्वामी स्टेडियमवर 12 चौकार आणि तब्बल 16 षटकारांसह 209 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती.

आयपीएल स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या याच मैदानावर नोंदवली गेली आहे. 23 एप्रिल 2013 रोजी बंगळुरू संघाने 20 षटकात 263 धावांचा डोंगर उभारला होता. त्या सामन्यात ख्रिस गेलने 13 चौकार आणि 17 षटकारांसह 66 चेंडूत 175 धावांची अविश्वसनीय खेळी साकारली होती.

पुणे वॉरियर्स संघातर्फे 7 गोलंदाजांनी गेलचं वादळ रोखायचा प्रयत्न केला पण तो व्यर्थच ठरला.

आयपीएल स्पर्धेतली दुसरी सर्वोच्च धावसंख्याही याच मैदानावर नोंदवली गेली आहे. 14 मे 2016 रोजी बंगळुरूने गुजरात लायन्स संघाविरुद्ध 248 धावांची मजल मारली होती. विराट कोहलीने 109 तर एबी डीव्हिलियर्सने 129 धावांची खेळी केली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)