You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल जश्न बोले... क्रिकेट वर्ल्ड कपचं अँथम लाँच, पण सोशल मीडियावर चर्चा 'दे घुमाके'ची
5 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे अधिकृत गाणं अर्थात ऑफिशियल अँथम 'दिल जश्न बोले...' बुधवारी (20 सप्टेंबर) प्रसिद्ध झालंय.
या गाण्यात मुख्य अभिनेता म्हणून रणवीर सिंगला कास्ट करण्यात आलंय, तर सुप्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार प्रीतम यांनी या गाण्यासाठी संगीत दिलं आहे.
हे गाणं प्रसिद्ध करताना आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटलंय की, जगभरातील सर्व क्रिकेट चाहत्यांना एकत्र जोडणं हा या गाण्याचा उद्देश आहे.
या गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये रणवीर सिंगने म्हटलं, की 'या गाण्याचा भाग बनणं खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या खेळाचा हा उत्सव आहे.'
संगीतकार प्रीतम यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलंय की, हे गाणं केवळ 1.4 अब्ज भारतीय चाहत्यांसाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी आहे.
आता रणवीर सिंग आणि प्रीतम यांच्या प्रतिक्रिया काहीही असो, पण सोशल मीडियावर ज्या काही प्रतिक्रिया आल्यात ते पाहता असं वाटत नाही की लोकांना हे गाणं आवडलं असावं.
सोशल मीडियावर फॅन्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर @Trendulkar नावाच्या युजरने लिहिलं आहे की, "हे स्वतःचं स्वतःची जाहिरात करण्यासारखं वाटतंय. मागच्या विश्वचषकाचे यात फुटेज दिसत नाहीत. ही एक स्पर्धा आहे असं वाटण्यासारखं यात काहीच नाहीये. हे गाणं डान्स इंडिया डान्सच्या प्रोमोसारखं आहे."
@CricketopiaCom या युजरने 2011 चं अधिकृत गाणं शेअर करताना लिहिलंय की, हेच खूप चांगलं होतं.
युजर अमरीश कुमार (@theamrishkumar) यांनी #DilJashnBole हा हॅशटॅग वापरून या गाण्याचं कौतुक केलंय.
त्यांनी लिहिलंय की, "क्रिकेटचा उत्सव आता अगदी जवळ आला आहे आणि प्रीतम दा यांचं गाणं त्यासाठी एकदम परफेक्ट मसाला आहे. पार्टी सुरू आहे."
सय्यद इरफान अहमद यांनी @Iam_SyedIrfan हँडलवरून लिहिलंय की, "हे गाणं 2011 च्या गाण्याच्या आसपास देखील नाहीये. 'दे घुमाके...' यापेक्षा खूप चांगलं होतं."
मुकुंद कुमार झा लिहितात, "रणवीर सिंगमुळे या गाण्यात जिवंतपणा आलाय. आजपर्यंत कधीच झाला नसेल अशा क्रिकेट कार्निव्हलसाठी तयार व्हा ..."
मोहम्मद उस्मान (@Mohd_Usman1) नावाच्या युजरने लिहिलंय की, "आयसीसी विश्वचषक 2023 चं गाणं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025 च्या गाण्याचं कंत्राट आता नसीबो लाल आणि अली जाफर यांना द्यावं."
विवेक कुमार सिंग (@vivekrajpoot47) लिहितात की, "दिल जश्न जश्न बोले... काहीपण... त्यापेक्षा 2011 चं गाणं रिक्रिएट केलं असतं तरी चाललं असतं."
अभिषेक चौधरी (@yea_im_abhi) लिहितात की, "ओटीटी वरील बिग बॉसचं गाणं देखील या गाण्यापेक्षा भारी आहे."
वर्ल्ड कपचे सामने कुठे आणि कधी खेळले जाणार?
5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे.
यजमान असलेल्या भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईत होणार आहे. यावेळी भारताची लढत ऑस्ट्रेलिया सोबत असणार आहे.
46 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेसाठी 10 शहरांमधील मैदानांची निवड करण्यात आली असून यात आंध्रप्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यातील मैदानांचा समावेश आहे.
दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या वेस्ट इंडिजच्या संघाला यावेळी विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणार नाही.
1975 आणि 1979 चा जगज्जेता संघ असलेल्या वेस्ट इंडिजला टॉप-8 मध्ये स्थान मिळवता आलं नसल्याने त्यांचा समावेश होऊ शकला नाही.
2023 च्या विश्वचषक पात्रता फेरीत त्यांना स्कॉटलंड, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे सारख्या संघांकडून पराभवाला सामोरं जावं लागलं.
खरं तर, विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या 10 संघांपैकी 8 संघ थेट विश्वचषकासाठी पात्र ठरले होते. उर्वरित दोन संघांसाठी यंदाच्या जून-जुलैमध्ये विश्वचषक पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)