IND vs IRE : रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट, पण T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय, पिचवर प्रश्नचिन्ह

पुरुषांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकात भारतीय संघानं विजयी सलामी दिली, पण कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीमुळे काही काळ चाहत्यांना चिंतेत टाकलं.

अमेरिकेत न्यूयॉर्कच्या नासॉ कौंटी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारतानं आयर्लंडला 8 विकेट्स आणि 46 चेंडू राखून हरवलं आणि गुणतालिकेत खातं उघडलं.

ग्रुप एच्या या सामन्यात आयर्लंडनं भारतासमोर विजयासाठी 97 रन्सचं माफक लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय फलंदाजांनी अगदी आरामात त्याचा पाठलाग केला.

अवघ्या सहा रन्समध्ये दोन विकेट्स काढणारा जसप्रीत बुमरा सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरला.

या सामन्यात रोहितनं टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडच्या फदाजांना डोकं वर काढायची संधीही दिली नाही.

बुमराशिवाय हार्दिक पंड्यानं तीन विकेट्स काढल्या अर्शदीपनं दोन विकेट्स काढल्या. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.

मग रोहित शर्मा आणि ऋषभ पंतच्या 75 रन्सच्या भागीदारीनं भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. रोहितनं 52 रन्सची खेळी केली तर ऋषभनं 36 रन्स केल्या.

रोहितचं अर्धशतक पण रिटायर्ड हर्ट

रोहितनं सलामीला खेळताना 37 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांसह 52 रन्सची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रोहितचं हे तिसावं अर्धशतक.

पण या अर्धशतकानंतर रोहितला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.

भारतीय इनिंगच्या नवव्या षटकात आयर्लंडच्या जॉश लिटलनं टाकलेला चेंडू उसळून रोहितच्या हातावर आदळला होता. पुढच्या दोन चेंडूंवर त्यानं षटकार ठोकले.

पण दहाव्या षटकात अखेरचा चेंडू खेळल्यावर रोहितनं खांद्याकडे बोट दाखवत माघारी परतायचा निर्णय घेतला.

रोहितला अचानक मैदानातून परतावं लागल्यानं चाहत्यांना चिंता वाटत होती. पण दुखापत फारशी गंभीर नसल्याचं त्यानं सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरिमनीदरम्यान सांगितलं.

रोहितच्या दुखापतीमुळे न्यूयॉर्कच्या स्टेडियमचं पिच मात्र चर्चेत आहे.

न्यूयॉर्कचं पिच चर्चेत

टॉस झाला, तेव्हाच रोहितनं न्यूयॉर्कच्या पिचविषयी टिप्पणी केली होती, की हे नवं मैदान आणि तात्पुरतं पिच असल्यानं इथे अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. सामना संपल्यावरही रोहितनं याचा उल्लेख केला.

"जेमतेम पाच महिने जुनं असलेल्या पिचवर खेळणं कसं असेल याची आम्हाला खात्री नव्हती. या परिस्थितीशी जुळवून घ्यायचा आम्ही प्रयत्न करत होतो, म्हणूनच प्रथम क्षेत्ररक्षण केलं. पण आम्ही दुसऱ्या डावात बॅटिंग केली तोवर देखील पिच सुधारल्यासारखं मला वाटलं नाही. बोलर्सना मात्र पिचपासून मदत मिळाली. आम्हाला दोन गुण मिळाले याचा आनंद आहे. ते सर्वात महत्त्वाचं होतं," असं रोहितनं सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरिमनीदरम्यान सांगितलं.

नासॉ कौंटी स्टेडियमवर काही दिवसांपूर्वीच झालेल्या सराव सामन्यात भारतानं बांगलादेशला हरवलं होतं, तेव्हा इथून खोऱ्यानं धावा निघतील असं चित्र होतं.

पण त्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका संघांमध्ये झालेल्या सामन्यात मात्र गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं दिसलं.

न्यूयॉर्क राज्यात लाँग आयलंड इथे आयसेनहॉवर पार्कमध्ये असलेलं हे स्टेडियम म्हणजे एक तात्पुरतं स्टेडियम आहे म्हणजे स्पर्धेनंतर इथल्या बसण्याच्या जागा काढून टाकता येतील. या मैदानातलं पिचही ऑस्ट्रेलियातून इथे आणलं होतं.

पण तात्पुरत्या स्टेडियमच्या या प्रयोगाविषयी काहींनी साशंकता व्यक्त केली आहे. भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडनंही इथल्या सरावाच्या सुविधांवर भाष्य केलं होतं.

विराटकडून निराशा

भारतीय चाहत्यांना जितकी उत्सुकता न्यूयॉर्कच्या या पिचविषयी होती, तेवढीच विराट-रोहित या जोडीविषयी होती.

एकेकाळी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग ही सलामीवीरांची जोडी भारतासाठी सलामीला उतरायची, तशीच अपेक्षा विराट आणि कोहलीकडून होती.

आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात हे दोघं सलामीला उतरतील अशी चर्चा होती आणि झालंही तसंच. पण विराट डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये अवघी एक रन काढून माघारी परतला.

सूर्यकुमार यादवही केवळ दोन धावा करून माघारी परतला.

पुढचा सामना

या स्पर्धेच्या ग्रुप ए मध्ये साखळी फेरीत भारताचा पुढचा मुकाबला आता पाकिस्तानशी होणार आहे. 9 जून रोजी न्यूयॉर्कच्या नासॉ कौंटी क्रिकेट स्टेडियममध्येच ही लढत रंगेल.