You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
T20 वर्ल्ड कप हिटमॅन रोहितसाठी का महत्त्वाचा आहे? भारत 17 वर्षांनी वर्ल्ड कप जिंकेल का?
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी प्रतिनिधी
हार-जित याबाबत आपण फार विचार करत नाही, असं खेळाडू अनेकदा सांगतात. तरीही आपल्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचाही त्याला अपवाद नाही.
आपल्या फटेकबाजीमुळे 'हिटमॅन' म्हणून लौकिक मिळवणाऱ्या रोहितनं फलंदाज म्हणून 2007 मध्ये झालेला पहिला वहिला ट्वेन्टी20 विश्वचषक जिंकला होता, पण कर्णधार म्हणून आयसीसी स्पर्धांमध्ये जेतेपदाची ट्रॉफी मिळवण्याचं त्याचं स्वप्न अधूरंच आहे.
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून विजेतेपदांची लूट करणाऱ्या रोहितला पुन्हा एकदा वर्ल्ड कप खुणावतो आहे.
आयपीएल सुरू असतानाच ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या संघ निवडीची चर्चा सुरू होती, त्यावेळी रोहित, कोहलीसारख्या सिनियर्सऐवजी पूर्ण तरुण संघ मैदानात उतरवावा असाही एक सूर होता. पण तसं झालं नाही. कदाचित नियतीलाही रोहितला एक संधी द्यायची होती आणि ती निवडकर्त्यांच्या माध्यमातून त्याला मिळाली.
टी 20 विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली. यंदा प्रथमच 20 देश टी 20 विश्वचषकात सहभागी होत आहे. आयसीसीच्या टी 20 रँकिंगमध्ये अव्वल असलेला भारत अर्थातच विजतेपदाचाही प्रबळ दावेदार आहे. त्यामुळं भारतीयांच्या संघाकडं नजरा आहेतच, पण यंदाचा वर्ल्डकप रोहितसाठीही अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या या संघात सर्वात अनुभवी सदस्य म्हणजे संघाची कमान हाती असलेला रोहित शर्मा.
टी 20 विश्वचषकाच्या शुभारंभाच्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावून भारतीय संघानं इतिहास रचला. पण त्यानंतर गेल्या 17 वर्षांमध्ये झालेल्या 10 स्पर्धांत भारतीय संघाला टी 20 विश्वचषकात विजेतपदाची चव चाखता आलेली नाही.
पण भारतीय संघासाठी जसा हा 17 वर्षांचा दुष्काळ बोचणारा आहे, तेवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक रोहित शर्मासाठी वैयक्तिक दृष्टीनं ही कामगिरी कुठंतरी त्रासदायक आहे.
विशेषतः 2023 च्या वन डे विश्वचषकात विजेतेपद अगदी खिशात आहे असं वाटत असतनाच तो गमावल्याच्या जखमेवर या विश्वचषकात विजेतेपद मिळवून फुंकर घालण्याचा निर्धार त्यानं नक्कीच केला असेल.
पदार्पणातच विश्वविजेतेपद
विश्वचषक आणि रोहितच्या कारकिर्दीचा अत्यंच जवळचा संबंध राहिला आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे रोहितचं पदार्पणच मुळात विश्वचषक स्पर्धेत झालं आहे.
टी 20 विश्वचषकाची सुरुवात झाली त्या पहिल्या म्हणजे 2007 च्या स्पर्धेत रोहित शर्माचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झालं. सुरुवातही स्वप्नवत अशी म्हणता येईल. कारण हा पहिलाच विश्वचषक जिंकत भारतीय संघानं इतिहास रचला होता आणि रोहित त्या संघाचा सदस्य होता.
पण रोहितची कामगिरी तशी फार काही चर्चा होण्यासारखी नव्हती. पहिल्या तीन सामन्यांमध्ये तर रोहितला संघात स्थानही मिळालं नव्हतं. संपूर्ण स्पर्धेत त्याला फक्त एक अर्धशतकी खेळी करण्यात यश आलं होतं.
फायनलमध्ये रोहितनं 30 धावांची मौल्यवान खेळी केली होती. पण त्याशिवाय फारशी रोहितची चर्चा तेव्हा झाली नाही. महेंद्रसिंह धोनी आणि तेव्हाचा स्टार युवराज सिंग यांचाच तेव्हा बोलबाला होता.
त्यानंतर दुसऱ्याच वर्ल्डकपमध्ये 2009 मध्ये रोहित सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. तोपर्यंत त्याच्या फलंदाजी कौशल्याची सर्वांनाच चांगली माहिती झाली होती.
त्यानंतरचे सगळे आठही टी 20 वर्ल्डकप रोहित शर्मानं खेळले. पण भारतीय संघाला पुन्हा विजयाचा जल्लोष करता आलेला नाही. आता 17 वर्षांनंतर सगळ्यांना याबाबत आशा आहे.
'कर्णधार' म्हणून कौतुक, पण आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ
रोहित शर्मा उत्तम फलंदाज तर आहेच पण कर्णधार म्हणूनही रोहित शर्माचं कायमच कौतुक केलं जातं. त्याचे डावपेच अनेकदा प्रतिस्पर्धा संघाला मैदानावर नामोहरम करणारे असतात.
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून तसा रोहितचा अनुभव गेल्या 2-3 वर्षांचाच असला तरीही आयपीएलमध्ये त्यानं दाखलेल्या नेतृत्व कौशल्याचं कायम क्रिकेट समीक्षकांनी कौतुक केलं आहे.
आयपीएलमध्ये रोहित सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याचं कारण म्हणजे सर्वाधिक आयपीएल विजेतेपदं पटकावण्याची कामगिरी त्याच्या नावावर आहे.
रोहित शर्मानं आयपीएलमध्ये मुंबईला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. त्याच्यानंतर चार विजेतेपदं मिळवणाऱ्या धोनीचा क्रमांक लागतो.
2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेल्या संघातही रोहित होता. पण त्यानंतर भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये ट्रॉफी जिंकता आलेली नाही.
वन डे विश्वचषकात त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ ऐतिहासिक कामगिरीच्या मार्गावर होता. पण फायनलमध्ये हाराकिरी झाली. त्यामुळं रोहितला प्रचंड वाईट वाटलं होतं.
आता तरी कर्णधार म्हणून देशाला आयसीसी ट्रॉफी मिळवून देण्याची त्याची इच्छा या विश्वचषकात पूर्ण व्हावी असं चाहत्यांना वा़टत आहे.
वर्ल्डकप आणि रोहित कनेक्शन
रोहित शर्मानं आतापर्यंत 11 वर्ल्ड कप स्पर्धा खेळल्या आहेत. 8 टी 20 वर्ल्डकप आणि 3 वन डे वर्ल्डकपचा यात समावेश आहे.
रोहित आणि क्रिकेट वर्ल्डकपचं आणखी एक कनेक्शन पाहायला मिळतं. पहिलं कनेक्शन म्हणजे त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणच वर्ल्डकपमधून झालं. तर दुसरं कनेक्शन 2011 वर्ल्डकपशी.
आता तुम्ही म्हणाल 2011 मध्ये तर रोहित वर्ल्डकपच्या संघातच नव्हता. तर हे खरं आहे. पण त्याची न झालेली निवडही रोहिचच्या क्रिकेट कारकिर्दीला एक महत्त्वाचं वळण देऊन गेली.
2011 मध्ये रोहितला कामगिरीत सातत्य नसल्यामुळं संघात स्थान मिळालं नाही. त्याचं कौशल्य सर्वांना माहिती होतं, तरीही निवडकर्त्यांना तसा निर्णय घ्यावा लागला होता.
रोहितची या निवडीच्या आधीची कामगिरी फारशी चांगली नसल्यानं त्याची संघात निवड झाली नव्हती. त्यात भारतीय संघानं हा विश्वचषक जिंकला. त्यामुळं ऐतिहासिक कामगिरीमध्ये नाव समाविष्ट होण्याची संधी चुकल्यानं ते रोहितच्या मनाला चांगलंच बोचलं.
त्यानंतर रोहितनं त्याच्या फिटनेस आणि खेळावर प्रचंड मेहनत घेतली. रोज तासनतास सराव करत त्यानं प्रचंड सुधारणा केली आणि त्यानंतर त्याच्या खेळात झालेला फरकही त्यामुळं पाहायला मिळाला.
उत्तुंग षटकारांनी गोलंदाजांना पळता भुई थोडी करणाऱ्या रोहितनं त्यामुळं वन डे सामन्यात तीन द्विशतकं ठोकत काहीही अशक्य नसल्याचं दाखवून दिलं.
2011 नंतरच्या तिन्ही वर्ल्डकपमध्ये रोहितची कामगिरी पाहता, 2011 मध्ये हुकलेली संधी त्याच्या किती जिव्हारी लागली होती, हे लक्षात येतं. 2019 च्या वर्ल्डकपध्ये तर त्यानं वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर 2023 च्या स्पर्धेतही तो सर्वाधिक धावांच्या यादीत दुसऱ्या स्थानी होता.
टी 20 कारकिर्दीचा विचार करता रोहितनं आतापर्यंत 151 सामन्यांत 3974 धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यांत 4000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त 26 धावा हव्या आहेत. या स्पर्धेत रोहित हा टप्पा गाठू शकतो. फक्त बाबर आझम आणि विराट कोहली हे दोनत फलंदाजच रोहितपेक्षा पुढं आहेत.
रोहितनं आजवर त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांना अमर्याद आनंद दिला आहे. वन डे क्रिकेटमध्ये एक दोन नव्हे तर तीनवेळा द्विशतकी करत त्यांनं अक्षरशः पराक्रम केला आहे.
त्यानं खेचलेले षटकार पाहणं हे चाहत्यांसाठी पर्वणीपेक्षा कमी नसतं. रोहतसारखा फलंदाज षटकार खेचतोय म्हटल्यावर अनेकदा कदाचित गोलंदाजांनाही त्याचं फारसं वाईट वाटत नसणार.
त्यामुळं अभूतपूर्व अशी कामगिरी करत देशाला विश्वचषक जिंकवून द्यावा अशी इच्छा किंवा विचार रोहितच्या मनात असेल किंवा नसेलही. पण हिटमॅनच्या लाखो चाहत्यांच्या मनात मात्र हा विचार असणार यात शंका नाही.
रोहितसाठी आता सिद्ध करण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. तरीही अधिकृतपणे जेव्हा त्याच्या यशाचा आलेख मांडण्याचा प्रयत्न होईल, त्यातील नोंदीसाठी अशी स्पर्धा त्यानं जिंकवून देणं गरजेचं आहे.
त्यामुळं जितक्या सहजपणे रोहित पुल शॉट खेळतो, तितक्याच सहजपणे त्याच्या नेतृत्वात भारतानं हा वर्ल्डकप खेचून आणावा, हीच हिटमॅनच्या सगळ्याच चाहत्यांची इच्छा आहे.