You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऋषभ पंत रिटायर्ड आऊट, क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याच्या 'या' आहेत 11 पद्धती
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
टीम इंडियाचा फलंदाज ऋषभ पंतमुळे 'रिटायर्ड आऊट' (निवृत्त) हा बाद होण्याचा प्रकार चर्चेत आहे.
अमेरिकेत ट्वेन्टी20 विश्वचषक 2024 आधीच्या सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध सामन्यात ऋषभ पंतनं रिटायर्ड आऊट होण्याचा निर्णय घेतला.
अनेकदा सराव सामन्यांमध्ये फलंदाज रिटायर्ड आऊट होताना दिसतात.
रिटायर्ड आऊट हा प्रकार काय आहे? तुम्हाला क्रिकेटमध्ये फलंदाज बाद होण्याच्या 11 पद्धती माहिती आहेत का? जाणून घ्या.
या अकरा पद्धतींपैकी पाच प्रकार बहुतांश सर्वांना माहिती असतात. पण, उर्वरित पाच पद्धतीनं फलंदाज बाद होण्याचा प्रकार सहसा घडत नाही.
1) क्लीन बोल्ड : गोलंदाजानं टाकलेला चेंडू फलंदाजाचा बचाव भेदून थेट स्टम्पवर आदळतो आणि स्टम्प पडतात. त्याला क्लीन बोल्ड किंवा त्रिफळाचीत म्हणतात.
2) झेलबाद : फलंदाजानं हवेत मारलेला बॉल क्षेत्ररक्षक पकडतो. त्याला कॅच आऊट किंवा झेलबाद असं म्हंटलं जातं.
3) लेग बिफोर विकेट (LBW) : गोलंदाजाचा स्टम्पच्या दिशेनं सरळ येणारा चेंडू हा फलंदाजाच्या बॅटला न लागता त्याच्या पायाला लागतो, त्याला लेग बिफोर विकेट म्हणजे LBW असे म्हणतात.
4) स्टम्प्ड आऊट : फलंदाज बॉल खेळण्यासाठी क्रिझ सोडून पुढे जातो. पण, बॉल हा बॅटला न लागता विकेटकिपरच्या हातात विसावतो. त्यावेळी विकेटकिपर फलंदाज क्रिझमध्ये परत येण्याच्या आधीच चपळाईनं बॉलनं स्टम्प उडवतो त्याला स्टम्प्ड आऊट असं म्हंटलं जातं.
5) रन आऊट : फलंदाजानं धाव पूर्ण करण्याच्या आधीच क्षेत्ररक्षकानं बॉल स्टम्पवर मारल्यास त्याला रन आऊट दिलं जातं.
6) मंकडिंग : हा रन आऊटचाच एक प्रकार आहे. या प्रकारात गोलंदाजानं बॉल टाकण्याच्या आधीच नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजानं क्रिझ सोडले असेल तर गोलंदाजाला बॉल स्टम्पला लावून फलंदाजाला बाद करता येते.
यावेळी गोलंदाजाला नॉन स्ट्रायकरला रन-आऊट करण्यात अपयश आले तर अंपायर तो ‘डेड बॉल’ घोषित करतात.
माजी भारतीय खेळाडू विनू मंकड यांच्या नावावरून हा शब्द तयार झाला आहे.
भारतीय क्रिकेट संघ 1947 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी मंकड यांनी या पद्धतीनं ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊनला सर्वप्रथम बाद केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियन माध्यमांनी हा शब्द तयार केला.
या पद्धतीनं गोलंदाजानं नॉन स्ट्रायकरला बाद करणे हे खेळ भावनेला धरुन नाही, अशी नेहमी टीका करण्यात आली आहे.
काही प्रसंगात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधारानं अपिल मागं घेत बाद फलंदाजाला पुढं खेळू देण्याचे औदार्य दाखवले आहे.
न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात विश्वचषकापूर्वी एकदिवसीय सामन्यांची मालिका झाली होती. त्यावेळी न्यूझीलंडचा इश सोढी या पद्धतीनं बाद झाला. पण, बांगलादेशचा त्या सामन्यातील कर्णधार लिटन दासनं सोढी विरुद्धचं अपिल मागं घेतलं होतं.
7) हिट विकेट : फलंदाजी करताना फलंदाजी बॅट किंवा शरीराचा कोणता भाग स्टम्पला लागून बेल्स किंवा स्टम्प खाली पडले तर त्याला हिट विकेट घोषित केले जाते.
8) डबल हिट : फलंदाजानं बॅटनं बॉल दोन वेळा टोलावले तर त्याला डबल हिट आऊट दिलं जातं.
माल्टा विरुद्ध रोमानिया यांच्या ऑगस्ट 2023 मध्ये झालेल्या टी 20 सामन्यात माल्टचा सलामीवीर फनयान मुगल या पद्धतीनं बाद झाला होता.
9) ऑबस्ट्राक्टिंग द फिल्ड : एखादा फलंदाज क्षेत्ररक्षणात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत असेल तर त्याला या पद्धतीनं बाद दिले जाते.
10) टाईम आऊट : एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर नवा फलंदाज निर्धारित वेळेत मैदानात आला नाही तर त्याला टाईम आऊट दिले जाते.
आयसीसी वन-डे विश्वचषक 2023 मध्ये श्रीलंका विरुद्ध बांगलादेश हा सामना ‘टाईम आऊट’मुळे गाजला होता.
स्पर्धेमधील नियमानुसार एखादा फलंदाज बाद किंवा निवृत्त झाल्यानंतर पुढील फलंदाजानं 2 मिनिटाच्या आत बॅटिंगसाठी सज्ज असणं आवश्यक होतं. पण मॅथ्यूजनं तसं केलं नाही आणि त्याला टाईम आऊट देण्यात आलं.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 146 वर्षांच्या इतिहासात या पद्धतीनं बाद झालेला मॅथ्यूज हा पहिलाच फलंदाज ठरला.
11) रिटायर्ड आऊट : जेव्हा एखादा फलंदाज पुन्हा परत येण्याचा उद्देश न ठेवता स्वतःहून माघार घेत मैदानातून परततो, तेव्हा त्याला रिटायर्ड आऊट असं म्हणतात. अंपायरना सांगून फलंदाज अशी माघार घेऊ शकतात.
रिटायर्ड हर्ट पेक्षा हा रिटायर्ड आऊट प्रकार वेगळा असतो. रिटायर्ड हर्ट झालेला फलंदाज दुखापतीमुळे किंवा एखादा त्रास होत असल्यानं तात्पुरता मैदानाबाहेर जातो/जाते. रिटायर्ड हर्ट फलंदाजाला पुन्हा परत येऊन बॅटिंग करता येते, पण रिटायर्ड आऊटमध्ये तसं नसतं.
साधारणपणे एखाद्या मोठ्या मालिकेआधी सराव सामन्यांत फलंदाज असं रिटायर्ड आऊट होतात, जेणेकरून टीममधल्या इतरांनाही फलंदाजीचा सराव करण्याची संधी मिळते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता, कसोटीत केवळ एकदाच दोन फलंदाज एकाच सामन्यात रिटायर्ड आऊट झाले आहेत.
श्रीलंकेच्या मार्वन अटापट्टू आणि महेला जयवर्धनेनं 2001 साली नवख्या बांगलादेशविरुद्ध कसोटीत रिटायर्ड हर्ट होण्याचा निर्णय घेतला, ज्यावरून वाद झाला. अनेकांना तो निर्णय खेळभावनेला धरून नाही असं वाटलं.
साधारणपणे दुखापतीशिवाय अन्य कारणांनी माघार घेणाऱ्या फलंदाजाला विरोधी कर्णधार पुन्हा खेळण्याची सहमती देताना दिसत नाहीत. अपवाद 1982-83 मध्ये भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यादरम्यानच्या पाचव्या कसोटीचा.
त्या सामन्यात गॉर्डन ग्रीनीज दिवसअखेर नाबाद 154 रन्सवर खेळत होते. पण त्यांची दोन वर्षांची मुलगी गंभीररित्या आजारी असल्यानं त्यांना सामना सोडून जावं लागलं. तिचा दोन दिवसांनी मृत्यू झाला, पण ग्रीनीज मैदानात परतू शकले नाहीत. तेव्हा आदरांजली म्हणून त्या विकेटची नोंद रिटायर्ड नॉट आऊट अशी करण्यात आली.