सद्दाम हुसैनची फाशी, जल्लादाला थांबवत काळा कपडा चेहऱ्यावर घ्यायला नकार आणि जमावाला म्हटलं...

    • Author, सना आसिफ दार
    • Role, बीबीसी उर्दू डॉट कॉम, इस्लामाबाद

"30 डिसेंबर 2006 ला सद्दाम हुसैनला पहाटे तीन वाजता उठवण्यात आलं. काही वेळानंतर त्याला फाशी दिली जाणार असल्याचं सांगितलं. सद्दाम निराश झाला. त्याने शांतपणे जाऊन अंघोळ केली आणि फाशीसाठी स्वतःला तयार करू लागला."

इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसैनच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अमेरिकेच्या 12 सुरक्षा रक्षकांपैकी एक विल बार्डनवर्पर यांनी त्यांच्या 'द प्रिझन इन हिज पॅलेस' पुस्तकात सद्दामच्या जीवनातील अखेरच्या दिवसांबाबत लिहिलं आहे.

विल बार्डनवर्पर यांच्या मते, 'अखेरच्या दिवसांमध्ये इराकचा माजी हुकूमशहा सद्दाम हुसैनला आपल्याला फाशी दिली जाणार नाही, अशी आशा होती.'

दोन दशकांपेक्षा जास्त काळ इराकवर राज्य केल्यानंतर 2003 मध्ये सद्दाम यांच्या सत्तेचा अंत झाला होता आणि 2006 मध्ये सद्दामला फाशी देण्यात आली.

सद्दाम हुसैनला फाशी का देण्यात आली?

इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसैनला 1982 मध्ये दुजैल शहरात त्यांच्या 148 विरोधकांची हत्या केल्याच्या गुन्ह्यात एका न्यायालयानं नोव्हेंबर 2006 मध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.

न्यायालयीन दस्तऐवजांनुसार मारले गेलेले सर्वजण शिया समुदायातील होते. सद्दाम याच्यावर एक अपयशी जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली होती.

सद्दाम हुसैन याच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीचा काळ आणि ठिकाण अत्यंत गोपनीय ठेवण्यात आलं होतं.

इराकची राजधानी बगदादच्या जवळ असलेल्या 'खादमिया' मध्ये एक इराकी कंपाऊंडमध्ये काँक्रिटच्या चेंबरमध्ये सद्दामला फाशी देण्यात आली. या कंपाऊंडला अमेरिकन्स 'कॅम्प जस्टिस' म्हणायचे.

यावेळी इराकमधील नागरिकांचा एक लहानसा गटही त्याठिकाणी उपस्थित होता.

त्या लोकांच्या मते, जेव्हा सद्दाम हुसैनना फाशीची शिक्षा देण्याच्या काही काळापूर्वी जज शिक्षा वाचून दाखवत होते, तेव्हा सद्दामने कुराण हातात धरलं होतं.

सद्दामने कुराणची ती प्रत नंतर एका मित्राला द्यायला सांगितलं होतं.

फाशीच्या वेळी कैद्यांचे कपडे परिधान करण्याऐवजी 69 वर्षीय सद्दाम हुसैनने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डार्क रंगाचा कोट परिधान केलेला होता.

इराकच्या सरकारी टीव्हीवर दाखवण्यात आलेल्या फुटेजमध्ये मास्क परिधान केलेल्या काही जणांनी सद्दाम यांना फाशीच्या ठिकाणी नेल्याचं दाखवण्यात आलं. पण फाशी देण्याची दृश्ये टीव्हीवर दाखवण्यात आली नाहीत.

जल्लादाला थांबवले आणि...

फाशीच्या ठिकाणी नेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचा कपडा (जो कपडा साधारणपणे फाशी देण्यापूर्वी सर्व गुन्हेगारांच्या चेहऱ्यावर टाकण्यात येतो) टाकण्यासाठी पुढं सरकला तेव्हा सद्दामने त्याला तसं करू दिलं नाही. कारण त्यांना त्या कपड्याशिवायच फासावर जायचं होतं.

सद्दाम यांच्या फाशीनंतर एक लीक झालेला व्हिडिओ समोर आला होता.

या व्हिडिओमध्ये सद्दाम यांच्या गळ्यात जेव्हा फास टाकण्यात आला तेव्हा ते हसताना दिसत होते.

त्यानंतर त्यांनी ओरडून विचारलं होतं की,"तुम्ही याला शौर्य समजता का?"

त्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांपैकी एकानं त्यांना ‘नरकात जा…’ असं म्हटलं होतं.

ज्या शत्रूंना ते देश उद्ध्वस्त करण्यासाठी जबाबदार ठरवत होते त्यांना उत्तर देताना सद्दाम यांनी ‘तो नरक म्हणजे इराक आहे का?’ असं उत्तर दिलं होतं.

बीबीसी वर्ल्डचे प्रतिनिधी जॉन सिंपसन यांच्या मते, सद्दामच्या फाशीचा जो व्हीडिओ समोर आला आहे, "त्यात ते अत्यंत शांत दिसले आणि त्यांनी माफीची भीकही मागितली नाही."

त्या व्हिडिओमध्ये सद्दाम कुराणमधील आयत म्हणताना फासावर जात असल्याचं पाहायला मिळालं होतं.

त्यावेळी इराकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मव वाफिक अल रिबाई हे देखील फाशीच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यानंतर बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, सद्दाम अगदी शांतपणे फासावर गेले होते.

"आम्ही त्यांना फाशीच्या ठिकाणापर्यंत घेऊन गेलो. ते काही घोषणा देत होते. आतून पूर्णपणे तुटलेले होते."

मव वाफिक अल रिबाई यांचा 2013 मध्ये एक फोटो समोर आला होता. त्यात त्यांच्या घरामध्ये सद्दाम यांची ब्राँझची एक मूर्ती आणि मूर्तीच्या गळ्यात सद्दाम यांना फाशी दिलेला तो दोर असल्याचं पाहायला मिळालं होतं.

तो फोटो समोर आल्यानंतर विविध देशांच्या लोकांनी तो दोर घेण्यासाठी बोलीही लावली. मात्र, मव वाफिक अल रिबाई यांनी, त्यांना सद्दामची ती मूर्ती आणि तो दोर संग्रहालयात ठेवायचा असल्याचं सांगितलं होतं.

हा खटला म्हणजे गंमत

सद्दामच्या फाशीनंतर त्याच्या पार्थिवाचे फोटोही इराकच्या टीव्हीवर प्रसिद्ध करण्यात आले. त्यात त्याच्या शरीरावर कफन नव्हतं तर त्याने कोट परिधान केलेला होता आणि मृतदेह पांढऱ्या रंगाच्या चादरीत गुंडाळलेला होता.

सद्दामला फाशी देण्यात आली आणि त्याचा मृतदेह बाहेर आणण्यात आला तेव्हा त्यावेळी बाहेरच्या गर्दीतील लोकांनी त्याच्यावर थुंकायला आणि शिव्या द्यायला सुरुवात केली.

'द प्रिझन इन पॅलेस' या पुस्तकात बार्डनवर्पर म्हणतात की, सद्दामच्या 12 सुरक्षारक्षकांपैकी एकानं गर्दीला तसं करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला सहकाऱ्यांनी परत मागे ओढलं.

त्या 12 सुरक्षा रक्षकांपैकीच एक असलेल्या अॅडम रोथर्सन यांनी बार्डनवर्पर यांना सांगितलं होतं की, "जेव्हा सद्दामला फाशी देण्यात आली तेव्हा आम्हाला वाटलं होतं की, आम्ही त्यांना धोका दिला. आम्ही स्वतःला मारेकरी समजत होतो. आम्हाला असं वाटलं जणू आम्ही अशा व्यक्तीची हत्या केली जो आमच्या अगदी जवळचा होता."

13 डिसेंबर 2003 ला इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसैनला अटक केल्यानंतर त्याच्यावर तीन वर्ष खटला चालला होता. त्यानंतर 5 नोव्हेंबर 2006 ला त्यांना न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.

सद्दाम हुसैन यांच्या विरोधात खटल्याचा निकाल देण्यापूर्वी अमेरिकेचे माजी अॅटर्नी जनरल रिम्से क्लार्क यांना न्यायालयानं तिथून निघून जाण्याचा आदेश दिला होता. त्याचं कारण म्हणजे त्यांनी जजच्या हातात एक चिठ्टी दिली होती, त्यावर ‘हा खटला म्हणजे एक गंमत आहे…’ असं लिहिलेलं होतं.

(सद्दाम हुसेन यांच्या फाशीशी संबंधित हा रिपोर्ट बीबीसीच्या 2006 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टच्या मदतीनं तयार केला आहे.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)