कट्टरपंथी धर्मगुरू ते इराणचे राष्ट्राध्यक्ष, इब्राहिम रईसी यांचा राजकीय प्रवास कसा होता?

इब्राहीम रईसी

फोटो स्रोत, Getty Images

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याची बातमी इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेनी दिली आहे. 19 मे रोजी रईसी आणि इराणचे परराष्ट्र मंत्री हेलिकॉप्टरमधून जात होते. त्यावेळी खराब हवामानामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला हार्ड लँडिंग करावे लागले होते. त्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकला नव्हता.

सोमवारी बचावपथक घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हेलिकॉप्टर पूर्णपणे जळालेले त्यांना दिसले.

रईसी हे इराणचे महत्त्वाचे नेते गणले जात. त्यांच्या राजकीय प्रवासावर टाकलेली एक नजर.

रईसी यांनी जून 2021 मध्ये इराणमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता आणि या देशाचे ते 13 वे राष्ट्राध्यक्ष बनले.

त्याआधी रईसी इराणच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख होते. रईसी यांची राजकीय मते 'अती कट्टरपंथी' मानली जातात.

1980 मध्ये मोठ्या संख्येने राजकीय कैद्यांना फाशी देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती, जी इराणी मानवाधिकार कार्यकर्त्यांना चिंतेची गोष्ट वाटली.

काळी पगडी परिधान करणारे रईसी

इब्राहिम रईसी यांचा जन्म 14 डिसेंबर 1960 रोजी इराणचे दुसरे सर्वात मोठे शहर मशहाद येथे झाला होता. याच शहरात शिया इस्लामचे इमाम अली रझा यांची दरगाह आहे. इथे इराणची एक समृद्ध सामाजिक संस्थाही आहे.

रईसी यांचे वडील मौलवी होते आणि त्यांचं निधन झालं तेव्हा रईसी पाच वर्षांचे होते.

इब्राहिम रईसी फोटोंमध्ये नेहमीच शिया परंपरेनुसार काळी पगडी घालताना दिसतात. हे सैय्यद असण्याचं आणि पैगंबर मोहम्मद यांचे वंशज असल्याचं प्रतीक मानलं जातं.

Raisi

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वयाच्या 15 व्या वर्षांपासून त्यांनी कोम शहरातील धर्मशिक्षण देणाऱ्या संस्थेत शिक्षण सुरू केले.

विद्यार्थी जीवनात त्यांनी पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा असलेले इराणचे शाह मोहम्मद रेझा पहलवी यांच्याविरोधात निदर्शनं केली होती. 1979 मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या नेतृत्वातील इस्लामी क्रांतीदरम्यान शहा रेझा पहलवींना सत्तेवरून काढून टाकण्यात आलं होतं..

'डेथ कमिटी'चे सदस्य आणि राजकीय कैद्यांना फाशी

इस्लामिक क्रांतीनंतर इब्राहिम रईसी यांनी न्यायपालिकेत काम करायला सुरुवात केली आणि अनेक शहरांमध्ये वकील म्हणून काम केलं.

या सगळ्या दरम्यान त्यांना इराणच्या प्रजासत्ताकाचे संस्थापक आणि 1981मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष झालेल्या अयातुल्ला खामेनींकडून प्रशिक्षण मिळत होतं.

रईसी

फोटो स्रोत, ANADOLU AGENCY

वयाच्या 25व्या वर्षी रईसी इराणचे डेप्युटी प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारचे दुसऱ्या क्रमांकाचे वकील झाले.

त्यानंतर ते न्यायाधीश झाले आणि 'डेथ कमिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुप्त समितीमध्ये (ट्रायब्युनल) 1988 साली त्यांचा समावेश झाला.

आपल्या राजकीय कारवायांसाठी आधीपासूनच तुरुंगात असलेल्या हजारो राजकीय कैद्यांवर या ट्रायब्युनलच्या मार्फत पुन्हा खटला चालवला जात असे.

या राजकीय कैद्यांपैकी बहुतेकजण इराणमधील डाव्या विचारसरणीच्या आणि विरोधी पक्ष असणाऱ्या मुजाहिदीन - ए - खल्का (MEK) किंवा पीपल्स मुजाहिदीन ऑर्गनायझेशन ऑफ इराण (PMO) चे सदस्य होते.

या ट्रायब्युनलने एकूण किती राजकीय कैद्यांना मृत्यूदंड दिला याबद्दल खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. पण यामध्ये जवळपास 5,000 स्त्रीपुरुषांचा समावेश असल्याचं मानवाधिकार संघटनांचं म्हणणं आहे.

इराणमधली इस्लामिक क्रांती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इराणमधली इस्लामिक क्रांती

फाशी दिल्यानंतर या सगळ्यांचं अज्ञात कबरींमध्ये सामूहिक दफन केलं जायचं. हे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचं मानवाधिकार संघटनांचं म्हणणं आहे.

रईसींच्या मते फाशी देणं योग्य

इराणचे नेते हे सगळं प्रकरण फेटाळत नसले तरी ते याबद्दल तपशीलात बोलतही नाहीत किंवा ज्या लोकांना शिक्षा देण्यात आली, त्यांच्याबद्दलही काही सांगत नाहीत.

पण सगळ्यात आपला काही सहभाग असल्याचं इब्राहिम रईसींनी वेळोवेळी नाकारलं आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या फतव्यानुसार ही शिक्षा 'योग्य' होती, असंही त्यांनी एकदा बोलून दाखवलं होतं.

1988मधली एक ऑडिओ टेप पाच वर्षांपूर्वी लीक झाली. इब्राहिम रईसी, न्यायालयाचे इतर सदस्य आणि तत्कालीन दुसऱ्या क्रमांकाचे धार्मिक नेते अयातुल्ला हुसैन अली मोतांजेरी यांच्या दरम्यानचं हे संभाषण होतं.

राजकीय कैद्यांना फाशी देणं योग्य होतं, असं रईसींनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, राजकीय कैद्यांना फाशी देणं योग्य होतं, असं रईसींनी म्हटलं होतं.

राजकीय कैद्यांना फाशी देणं ही घटना हा 'इराणच्या इतिहासातला सगळ्यांत मोठा गुन्हा' असल्याचं मोतांजेरी म्हणत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येतं.

यानंतर वर्षभरातच अयातुल्ला खामेनींचे उत्तराधिकारी म्हणून मोतांजेरी यांची करण्यात आलेली नेमणूक रद्द झाली.

रईसींचं वर्चस्व

यानंतर रईसी इराणच्या प्रॉसिक्युटर पदावर कायम राहिले. इतकंच नाही तर यानंतर ते स्टेट इंस्पेक्टरेट ऑर्गनाझेशनचे प्रमुख आणि न्यायपालिकेतले पहिले उपप्रमुख बनले.

2014 साली त्यांची इराणचे प्रॉसिक्युटर जनरल (सरकारचे प्रमुख वकील) या पदावर नियुक्ती झाली.

यानंतर 2 वर्षांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्लाह खामेनी यांनी रईसी यांची इराणच्या सर्वात महत्त्वाच्या आणि समृद्ध धार्मिक संस्थापैकी एक असणाऱ्या अस्तन-कुद्स-ए-रजावीचे संरक्षक म्हणून नेमणूक केली.

ही संस्था मशहद शहराक शिया मुस्लिमांच्या मशिदी आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या इतर संस्थांची जबाबदारी सांभाळते.

Getts

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिकेनुसार या संस्थेच्या अनेक बांधकाम, कृषी, ऊर्जा, टेलीकम्युनिकेशन आणि वित्तीय संस्थांमध्ये गुंतवणुकी आहेत.

सन 2017 मध्ये इब्राहिम रईसी यांनी राष्ट्रपदी पदासाठी आपली उमेदवारी घोषित करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

तेव्हा हसन रूहानी यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांची पहिली फेरी 57 टक्के मतांसह जिंकली होती. स्वतःला भ्रष्टाचारविरोधी नेते म्हणणारे रईसी तेव्हा 38 टक्के मतांनी दुसऱ्या क्रमांकावर होते.

पराजयानंतरही वाढत राहिलं महत्त्व

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराजय झाल्यानंतरही रईसी यांचं महत्त्व कमी झालं नाही आणि सन 2019 मध्ये त्यांना अयातोल्ला अली खामेनी यांनी न्यायपालिकेच्या प्रमुखपदी नेमलं.

यानंतर काही आठवड्यातच रईसी यांनी पुढचा सर्वोच्च धार्मिक नेता निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या 88 मौलवींच्या समितीचं उपाध्यक्ष बनवलं गेलं.

न्यायपालिकेचे प्रमुख म्हणून इब्राहिम रईसी यांनी काही धोरणात्मक सुधारणा केल्या. यामुळे इराणमध्ये ड्रग्सशी संबंधित गुन्ह्यांमुळे मृत्यूदंड मिळणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली.

Raisi

फोटो स्रोत, AFP

पण असं असतानाही इराण, चीन वगळता, जगभरात सगळ्यांत जास्त मृत्यूदंड देणारा देश म्हणून कायम राहिला.

रईसींच्या काळात विरोधी मतांच्या अनेक नागरिकांना (विशेषतः दुहेरी नागरिकत्व असणाऱ्या आणि दुसऱ्या देशांचे स्थायी रहिवासी असणाऱ्या लोकांना) गुप्तहेर ठरवून शिक्षा देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांबरोबर काम करणं चालू ठेवलं.

2021 च्या निवडणुकीत रईसी यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरताना 'इराणला गरिबी, भ्रष्टाचार, भेदभाव आणि अपमानाच्या वागणुकीतून मुक्त करणारा स्वतंत्र उमेदवार' अशी आपली प्रतिमा बनवली.

त्यांच्या पत्नी तेहरानच्या शाहिद बेहश्ती विद्यापीठात शिकवतात आणि त्यांना दोन मुलं आहेत याव्यतिरिक्त त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी फारशी माहिती नाहीये. रईसींचे सासरे अयातोल्ला अहमद अलामोलहोदा मशहदमध्ये दर शुक्रवारच्या नमाजचं आयोजन करतात.