सुनीता विल्यम्सना घेऊन बोईंग स्टारलायनर अवकाशात झेपावलं, अशी असेल मोहीम

बोईंग स्टारलायनर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बोईंग स्टारलायनर
    • Author, पल्लब घोष, विज्ञान प्रतिनिधी
    • Role, बीबीसी

भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सना घेऊन बोईंग स्पेस कंपनीचं 'स्टारलायनर' अंतराळ यान आज अखेर अवकाशात झेपावलं.

सुनीता यांची ही तिसरी अंतराळ मोहीम आहे. सुनीता यांच्यासोबत अंतराळवीर बॅरी विलमोरही या यानात आहेत.

बोईंगच्या या स्टारलायनरचं उड्डाण याआधी दोनदा ऐनवेळी रद्द करावं लागलं होतं. पण अखेर 5 जून रोजी अमेरिकेत फ्लोरिडाच्या केप कॅनावराल येथील केनेडी स्पेस सेंटरमधून स्टारलायनरनं उड्डाण केलं.

त्यामुळे 'बोईंग' ही अशी कामगिरी बजावणारी दुसरी खासगी कंपनी ठरली आहे.

अमेरिकन अंतराळसंस्था नासानं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजे ISS मध्ये माणसं तसंच सामानाची ने-आण करता यावी, यासाठी खासगी कंपन्यांची मदत घ्यायला सुरुवात केली आहे.

ISS हे अंतराळात असलेलं पृथ्वीला घिरट्या घालणारं एक तरंगतं अंतराळ केंद्र आहे. इथे राहून वेगवेगळ्या देशांचे अंतराळवीर वेगवेगळे प्रयोग आणि निरीक्षणं करतात.

इलॉन मस्क यांची 'स्पेस एक्स' ही अशी ISS ला घेऊन जाणारी बजावणाी पहिली खासगी कंपनी ठरली होती. आता बोईंग स्टारलायनरकडून नासाला तीच अपेक्षा आहे.

स्टारलायनर मोहीम अशी आहे

मागच्या बाजूला सर्व्हिस मॉड्यूल लावल्यानंतर स्टारलायनर अंतराळयान 5 मीटर उंच आणि 4.6 मीटर रुंद (16.5*15 फूट) अशा आकाराचं आहे. अपोलो मोहीमांसाठी वापरण्यात आलेल्या कॅप्सूल्सपेक्षा (यानापेक्षा) स्टारलायनर रुंद आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

यामध्ये 7 अंतराळवीरांना बसता येईल इतकी जागा आहे. 10 वेळा या कॅप्सूलचा वापर केला जाऊ शकतो.

या मोहिमेदरम्यान अनेक गोष्टींची चाचणी घेतली जाणार आहे.

सुनीता आणि बॅरी या यानामधील आसनव्यवस्था, इतर जीवनावश्यक प्रणाली आणि नेव्हिगेशन म्हणजे मार्गदर्शक यंत्रणा, ISS मध्ये सामान नेणारी यंत्रणा यांची पाहणी करतील.

शिवाय हे अंतराळवीर बोईंगचे नवीन निळ्या रंगाचे स्पेससूट स्पेससूट वापरून पाहतील. अमेरिकेच्या याधीच्या अंतराळवीरांनी वापरलेल्या स्पेससूट्सपेक्षा या नवीन स्पेससूट्सचं वजन 40% कमी आहे आणि ते अधिक फ्लेक्झिबल - ताणता येण्याजोगे आहेत.

या सूटचे ग्लोव्हज टचस्क्रीन वापरण्यासाठी योग्य आहेत. त्यामुळे अंतराळयानातील टॅब्लेट्स अंतराळवीरांना वापरता येतील.

स्टारलायनर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला 10 दिवस Docked म्हणजे जोडलेलं असेल आणि त्यानंतर ते पृथ्वीवर परतेल. अमेरिकेची यापूर्वीची अंतराळवीरांना परत घेऊन येणारी कॅप्सूल्स समुद्रात कोसळत असे. पण स्टारलायनर मात्र नैऋत्य अमेरिकेत कुठेतरी जमिनीवर लँडिंग करेल.

या यानाला असलेलं Heatshield - उष्णता कवच आणि पॅराशूट त्याचा जमिनीकडे झेपावण्याचा वेग कमी करतील आणि जमिनीवर यानाची कॅप्सूल आदळू नये म्हणून एअरबॅग्सही उघडतील.

बोईंग स्टारलायनर

फोटो स्रोत, Getty Images

सर्वकाही व्यवस्थित झाल्यास स्टारलायनर यानाला नियमितपणे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला अंतराळवीर घेऊन जाण्याचं काम करण्याचं प्रमाणपत्रं मिळेल.

याचा पुढचा लाँच 2025च्या सुरुवातीला नियोजित असून या फेरीद्वारे 4 अंतराळवीर, यंत्र आणि सामान ISS ला नेण्यात येईल.

1998मध्ये हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन बांधायला सुरुवात करण्यात आली तेव्हापासून आजवर शंभराहून अधिक मानवी मोहिमा इथे आलेल्या आहेत. पण असं असलं तर स्टारलायनरने अंतराळवीरांना घेऊन झेपावणं हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं क्वालिटी या अमेरिका स्थित स्पेस कन्सलटन्सी फर्मचे कॅलेब हेन्री सांगतात.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "आपण आता मानवाद्वारे करण्यात येत असलेल्या संशोधनाच्या एका नवीन पर्वात प्रवेश करत आहोत. खासगी क्षेत्राची वाढती भूमिका उत्साहवर्धक आहे. यामुळे अंतराळप्रवास वाढेल, ज्यामुळे नवीन संधी तयार होतील."

स्पेस एक्स आणि बोईंगमधली स्पर्धा

अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याचं काम आता जुन्या अंतराळयानांच्या ऐवजी स्पेस एक्स आणि बोईंग या कंपन्या करतील असं जाहीर करत नासाने या दोन्ही कंपन्यांसोबत समान काँट्रक्ट केले होते. यानुसार या कंपन्यांची यानं वापरण्यात येतील आणि सहा मिशन्ससाठीचा हा करार आहे.

स्पेस एक्स (Space X) सोबतचा करार 2.6 अब्ज डॉलर्सचा होता तर बोईंगसोबतच 4.2 अब्ज डॉलर्सचा. स्पेस एक्स कंपनीने मानवी क्रू सह 2020 मध्ये चाचणी केली. याचा अर्थ बोईंग 4 वर्षं मागे आहे. कंपनीने गोष्टी सुधारण्यासाठी खूप पैसा खर्च केला आहे.

बोईंग स्टारलायनर

फोटो स्रोत, Getty Images

बोईंगचं यान सेवेत आल्याने स्पेस एक्सला स्पर्धा मिळेल आणि परिणामी या प्रक्रियेसाठीचा खर्च कमी होईलं असं युकेच्या अंतराळ संस्थेच्या प्रमुख लिबी जॅक्सन यांना वाटतं.

"हे फक्त नासाच नाही तर युकेसह इतरही अंतराळ संस्थांसाठी महत्त्वाचं आहे. कारण अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला नेण्या-आणण्यासाठी करदातयांचा पैसा वापरला जातो आणि तो योग्यरीतीने वापरला जाणं गरजेचं आहे," त्या सांगतात.

स्टारलायनरचा अडचणींवर मात करत प्रवास

खरंतर बोईंग ही विमाननिर्मितीच्या क्षेत्रात जगातल्या आघाडीच्या दोन कंपन्यांपैकी एक आहे. पण सध्या एकामागोमाग एक झालेल्या अपघातांमुळे बोईंगच्या विमान उद्योगावर टीका होतेय.

शिवाय या स्टारलायनरचा विकास करताना बोईंगला लागलेला वेळ आणि टेस्ट फ्लाईटमध्ये आलेल्या अडचणींमुळेही बोईंगच्या अंतराळ शाखेवरही टीका होतेय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

स्टारलायनरची पहिली 'Uncrewed' म्हणजे मानवरहित चाचणी ही 2015 मध्ये होणार होती. पण त्याला उशीर होता होता 2019 उजाडलं. चाचणीसाठीचं हे उड्डाण झालं त्यावेळी सॉफ्टवेअरमध्ये अडचण आली आणि त्यामुळे आतलं घड्याळ योग्य चाललं नाही. परिणामी थर्टर्स्टनी जास्त इंधन वापरलं आणि ही कॅप्सूल स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचू शकली नाही.

त्यानंतर ऑगस्ट 2021मध्ये पुन्हा चाचणी करण्याचं ठरवण्यात आलं, पण ही देखील मे 2022 पर्यंत पुढे ढकलली गेली.

स्टारलायनरने पृथ्वीवरून उड्डाण करून मिशन पूर्ण केलं खरं पण तरीही या यानाच्या तांत्रिक परफॉर्मन्सबद्दल काही शंका नंतर उपस्थित करण्यात आल्या.

याच अडचणी आणि इतर काही सुरक्षेशी निगडीत गोष्टी निस्तराव्या लागल्याने या यानाची मानवी क्रू सह चाचणी पुढे ढकलली गेली. 7 मे रोजी हे उड्डाण होणार होतं. अंतराळवीरांनी त्यासाठी यानाच्या आत जाऊन आपली जागाही घेतली, पण आकाशात झेपावण्याच्या दोन तास आधी हा लाँच 'Scrubbed' म्हणजे पुढे ढकलण्यात आला.

बोईंग स्टारलायनर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्टारलायनरच्या कॅप्टन असतील सुनीता विल्यम्स आणि त्यांच्यासोबत अंतराळवीर बॅरी विल्मोर असतील.

या यानाच्या चाचण्यांमध्ये इतक्या अडचणी आल्या, त्यामुळे तुमचं हे उड्डाण तुमचे कुटुंबीय आणि जिवलगांसाठी काळजीचं नाही का, असा प्रश्न पत्रकार परिषदेदरम्यान अंतराळवीरांना विचारण्यात आला.

त्यावर उत्तर देताना बॅरी 'बुच' विल्मोर यांनी सांगितलं, "तांत्रिक अडचणींना - सेटबॅक म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांना आम्ही एक पाऊल पुढे मानतो. आम्ही चूक शोधून ती सोडवली. आणि हे आम्ही आमच्या कुटुंबीयांनाही समजावून सांगितलं आहे.

या स्पेसक्राफ्टच्या पायलट सुनीता विल्यम्स म्हणाल्या, "आम्ही सगळे इथे आहोत कारण आम्ही सगळे सज्ज आहोत. आमचे कुटुंबीय आणि जिवलगांना याबद्दल माहिती आहे आणि आम्ही याबद्दल बोललो आहोत. आम्ही या सगळ्या गोष्टींवर मात करत या प्रक्रियेचा भाग असल्याचा त्यांना आनंद आणि अभिमान आहे."

सुनीता विल्यम्स कोण आहेत?

1998 मध्ये सुनीता विल्यम्स यांची नासामध्ये अंतराळवीर - Astronaut म्हणून निवड करण्यात आली. नासासोबत यापूर्वी त्यांनी 14/15 आणि 32/33 क्रमांकाच्या मोहिमा केल्या आहेत.

सुनीता विल्यम्स

फोटो स्रोत, Getty Images

एक्सपिडीशन 14/15 साठी त्या डिसेंबर 2006 ते जून 2007 अंतराळात होत्या.

या काळात फ्लाईट इंजिनियर म्हणून काम करताना त्यांनी कोणत्याही महिला अंतराळवीराकडून करण्यात आलेल्या सर्वाधिक स्पेसवॉक्सचा विक्रम केला होता. तब्बल 29 तास 17 मिनिटांच्या कालावधीचे 4 स्पेस वॉक्स सुनीता विल्यम्य यांच्या नावावर आहेत. त्यांचा हा विक्रम नंतर अॅस्टॉनॉट पेगी व्हिटसन यांनी मोडला.

त्यानंतर जुलै 2012 मध्ये सुनीता विल्यम्स पुन्ह अंतराळात झेपावल्या. यावेळी त्या 4 महिने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये होत्या.

एकूण दोन मिशन्ससाठी सुनीता विल्यम्स यांनी 322 दिवसांचा काळ अंतराळात घालवला आहे.