शरद राजगुरु : महाराष्ट्राचा दोन लाख वर्षांचा इतिहास उलगडून सांगणारा अभ्यासक

फोटो स्रोत, Dr. Jayendra Joglekar
- Author, डॉ. चारुता कुलकर्णी
- Role, प्राचीन पर्यावरण अभ्यासक
(ज्येष्ठ भूवैज्ञानिक, जागतिक कीर्तीचे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि डेक्कन काॅलेजचे माजी प्राध्यापक आणि सहसंचालक डाॅ. शरद नरहर राजगुरू यांचे अलीकडे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगणारा डेक्कन कॉलेजच्या एका माजी विद्यार्थिनीचा हा लेख)
राजगुरू सर गेले…विश्वास बसणं कठीण आहे…वाटतं, आत्ता त्यांना फोन लावला तर म्हणतील, “कुठे चाललीस फील्डला?
अच्छा, तिथे का? अगं, तिथे हा हा अभ्यास करायचा राहिलाय अजून…तू करू शकशील!” मला वाटतं “तू करू शकशील!”
या त्यांनी दिलेल्या कानमंत्राच्या जोरावर त्यांचे असंख्य शिष्य, अर्थात पुरातत्त्व विषयातल्या त्यांनी घडवलेल्या आजवरच्या सर्व पिढ्या जोमाने आपापलं काम करताहेत.
भारतात भूशास्त्र (जिऑलॉजी) आणि पुरातत्त्व (आर्किओलॉजी) ही नावंही पुरेशी रुजली नव्हती तेव्हा त्यांनी “भूपुरातत्त्व (जिओआर्किऑलॉजी)” विषयाचा पाया रचायला घेतला.
भारतात जिथे अजूनही ज्ञानशाखांच्या भिंती जाडजूड आहेत, इंटरडिसिप्लिनरी कामाला हात घालणं कठीण आहे, त्याच भारतात त्यांनी 1960च्या दशकात हे काम उभं करायला घेतलं.
'हे सगळं डोकं एच. डी. सांकलियांचं, मी निमित्तमात्र झालो,' असं ते अनेकदा बोलताबोलता म्हणायचे.
पण असं फक्त निमित्तमात्र होऊन कुणी अगदी घरच्या मुळा-मुठेपासून सुरुवात करून महाराष्ट्राचाच नाही तर भारताचा कानाकोपरा धुंडाळू शकतं?
त्याच्या इतिहास-भूगोलाचे असंख्य पैलू अभ्यासू शकतं? त्या अभ्यासातून भारताच्या लिखित इतिहासाच्या पलीकडे जाणाऱ्या, प्रागैतिहासिक (प्रिहोस्टॉरीक) काळाचा उलगडा करू शकतं?
त्याचा लेखाजोखा मांडणारे काहीशे शोधनिबंध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संधोधनपत्रिकांमधे प्रकाशित करून जगापुढे हे ज्ञान आणू शकतं?
न सुटलेल्या पुरातत्त्वीय प्रश्नांचा 10, 20, 50 वर्षांनी पाठपुरावा करण्याचा विचार करू शकतं?
राजगुरू सरांनी हे सगळं केलं आणि एवढं करूनही अजून खूप करायचं हे लोभस असमाधान शेवटपर्यंत जपत राहिले.

फोटो स्रोत, Dr. Jayandra Joglekar
ज्यांना आवड आहे त्या सर्वांना पुरातत्त्व विषय अभ्यासता आला पाहिजे म्हणून ऍडमिशन घेणाऱ्यांसाठी विषयाचं, अमुकतमुक पदवीचं बंधन नसावं असा दूरदर्शी विचार करणाऱ्या, राबवणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी होते.
ते जेव्हा डेक्कन कॉलेजला रूजू झाले त्याच्या आसपास व्ही. एन. मिश्रा, म. के. ढवळीकर, शोभना गोखले, गुड्रून कॉर्विनस, के. पदय्या ही मंडळीही सांकलियाच्या पंखाखाली आली-येत होती.
साधारण 1934 च्या सुमारास पैशाअभावी डेक्कन कॉलेजला लागलेली टाळी फोडून ती संशोधन संस्था म्हणून नावारूपाला आणणाऱ्यांमध्ये सांकलिया मुख्य होते, ज्यांनी 1939पासून महत्प्रयासाने भारतात पुरातत्त्वाची पायाभरणी केली.
त्यामुळे 1960 च्या दशकात अशी अनेक दिग्गज मंडळी डेक्कन कॉलेजला पोहोचली तोवर सांकलियांनी या सगळ्यांसाठी मैदान तयार ठेवलं होतं.
मग भारतभर असंख्य ठिकाणी पद्धतशीर उत्खनने सुरु झाली, पुराश्मयुग (पॅलिओलिथिक) ते अगदी अलीकडच्या काळापर्यंतच्या पुरातत्त्वीय पुराव्यांची जोमाने छानदिन सुरु झाली आणि पुढील काही दशके चालू राहिली.
महाराष्ट्रातल्या नेवासात आढळलेले सार्वकालीन थर, मोरगांवमधल्या ज्वालामुखीच्या राखेचा अभ्यास, दक्षिण भारतातल्या नवाश्मयुगाचा शोध, थार वाळवंटात हडप्पा संस्कृतीची उकल हे सगळं काम एकाच वेळी चालू असताना कसलं भारलेलं वातावरण असेल असं मी एकदा सरांना म्हटलं होतं, तेव्हा ते म्हणाले होते “खरोखर धम्माल असायची!
मुळात कुणीही कुणाच्याही उत्खननाला जाऊ शकत असे. सगळे मिळून-मिसळून काम करत असत. मुळात पुरातत्त्व हा अनेक अंगांनी अभ्यास करायचा विषय आहे, जितकी जास्त डोकी तितकं कल्पनांचं वैविध्य अधिक.”

फोटो स्रोत, dr. charuta kulkarni
या कल्पनांचं वैविध्य राखलं जावं यासाठी शासकीय पातळीवर आवश्यक ते बदल होण्यासाठी राजगुरू सरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. असं करताना राजकारण कोणालाही चुकत नाही, ते सरांनाही चुकलं नसणार पण म्हणून त्यांनी मनात, कामात कटुता येऊ दिली नाही.
मला वाटतं कोणताही नकारात्मक विचार आला की, सरळ एखादा भूपुरातत्त्वीय प्रश्न सोडवायला घेत असतील. या कामाच्या वेडातून आणि झपाट्यातून सरांकडून असंख्य विद्यार्थी घडले, देशात-परदेशात, आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियापासून ते जर्मनीतल्या नावाजलेल्या मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूटपर्यंत अनेक ठिकाणी उत्तम काम करत राहिले.
2007 मध्ये फर्ग्युसन-पुणे विद्यापीठमार्गे मी एम.एससी. जिऑलॉजी होऊन डेक्कन कॉलेजला आर्किओलॉजीत वर्षभराचा पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा करायला आले.
दोन्ही विषयांची सांगड घालून जिओआर्किऑलॉजी करायचं हे डोक्यात पक्के होते आणि ती वाट तेव्हाही अनवटच होती. एकतर जिऑलॉजीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन आर्किओलॉजीकडे वळणारे क्वचितच कुणी होते आणि नेमके तेच राजगुरू सरांनी केलेले असल्याने, पुढे अनेक वर्षांनी त्या वाटेवर कुणी चालायचं म्हणतंय म्हटल्यावर त्यांना माझ्या निर्णयाचं विशेष कौतुक वाटलं होतं.
दुसरं म्हणजे जिऑलॉजी, आर्किओलॉजी ही (तेव्हा आणि अजूनही) अतिशय पुरुषप्रधान क्षेत्रे, तिथे मुलीबाळींनी घुसखोरी करायची म्हणजे…असे म्हणणारेही अस्तित्वात होते. याउलट, सर बारा गावचं म्हणावं तसं बारा देशाचं पाणी प्यायलेले, त्यांच्याच नाही तर त्यांच्या पुढच्या पिढीलाही न झेपेल इतका विचारांचा मोकळेपणा होता त्यांच्यात.
ज्या व्यक्तिला मनापासून काम, मेहनत करायला आवडते, ती माझ्या मदतीस पात्र आहे एवढा साधा विचार असायचा त्यांचा. त्यामुळे शीला मिश्रा, सुषमा देव, सविता घाटे, हेमा अच्युतन्, शांती पप्पू आदी स्त्री पुरातत्त्वशास्त्रज्ञांची मोठी फौज उभारण्याचं काम त्यांनी नकळत केलं.
त्यातल्या मिश्रा आणि देव डेक्कन कॉलेजमधेच प्राध्यापक म्हणून रुजू होऊन भूपुरातत्त्वाच्या कक्षा रुंदावत करत राहिल्या.

फोटो स्रोत, dr. charuta kulkarni
खरंतर मी डेक्कन कॉलेजला पोहोचले तोवर राजगुरू सर रिटायर होऊनही बरीच वर्षे होऊन गेली होती (पंच्याहत्तरी जवळ आली होती) पण त्यांना आठवड्यातून एकदा कॉलेजमध्ये डोकावल्याशिवाय, एखादी शास्त्रीय चर्चा झडल्याशिवाय चैन पडत नसे.
त्यांच्या मुलाचं नूमविसमोरच्या गल्लीच्या तोंडाशी रेडिमेड कपड्यांचं दुकान होतं, तिथला गल्ला सांभाळणं ही त्यांनी रिटायरमेंटनंतर घेतलेली जबाबदारी. सोमवारी ते दुकान बंद असायचं म्हणून त्यादिवशी “आर्किओलॉजीचं दुकान पूर्ण वेळ चालू” असं सर गंमतीने म्हणायचे.
त्यांनी केलेल्या संशोधनापैकी काही प्रकल्प आणि अनेक शोधनिबंध त्यांनी रिटायरमेंटनंतर प्रकाशित केले आहेत. त्यामुळे अनेक सोमवार आपल्याला लहानमोठे भूपुरातत्त्वीय शोध देऊन गेलेत असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही.
अशाच एका सोमवारी देव मॅडमच्या ऑफिसमधे चर्चा रंगली होती. यावेळी विषय होता कृष्णेचं खोरं किती जुनं-नवं आणि ते कसं बनलं असावं हा! तोवर माझं कोर्सवर्क जवळपास पूर्ण होऊन मी संशोधनासाठी विषय शोधण्याच्या मार्गावर होते.
बोलता बोलता सर म्हणाले “अगं, कृष्णेच्या खोऱ्यात ना क्लायमेटसोबत टेक्टॉनिक कंट्रोल आहे असा माझा पूर्वीपासून अंदाज आहे…वाईच्या आसपास नदीपात्रात बरेच निक-पॉइंट्स (गुडघ्यासारखे आकार) दिसतात, तो बहुदा त्याचाच पुरावा असावा...
आपल्या रमेश पप्पूचं मोठं काम होतं कृष्णेवर…पण त्यात हे हे करायचं राहिलंय, तू-सुषमा-मी जाऊया जरा तिकडे…फक्त सोमवारी प्लॅन करा आणि आमच्या घरी फील्डवर्कबद्दल बोलू नका!” असं म्हणून बोलता बोलता मला रिसर्च प्रोजेक्टचा विषय थेट बहालच करून टाकला!
"तुझं जिऑलॉजी ज्ञान नवं आहे, ते उपयोगी पडेल...माझं आता अपुरं पडतं…” असं म्हणून तत्कालीन भूशास्त्रीय संशोधनातले किमान दहाएक नवीन संदर्भ सांगून मोकळे झाले! मग हळूहळू देव मॅडमशी बोलून कामाचे तपशील पक्के झाले, मुख्य म्हणजे फील्डवर्क ठरलं..
वाईच्या पंचक्रोशीत कृष्णा नदीच्या पात्रात आढळणाऱ्या गाळाचा (तांत्रिक भाषेत, क्वाटर्नरी डिपॉझिटस्चा) अभ्यास करून तिथल्या भूभागाची जडणघडण जाणून घ्यायची होती, काही मानवी हत्यारे-अवजारे सापडतात का ते पाहायचे होते.

फोटो स्रोत, Prof. Dr. Sushma Deo
पहिल्या फील्डवर्कला सर अर्थातच हजर असणार होते. त्यांच्याबरोबर फील्डमध्ये जाणं ही पर्वणी असते असं अनेकांकडून ऐकलं होतं, का ते पहिल्या दिवसापासून लक्षात आलं!
एखाद्या लहान मुलाच्या उत्साहात ते कडेकपाऱ्यांतून, नदीनाल्यांतून हिंडायचे. वाटेत एखादा विलक्षण दगड मिळाला किंवा नदीच्या गाळात काहीतरी वेगळं दिसलं की आनंदातिशयाने ओरडायचे.
एरव्हीचं त्यांचं बोलणं अत्यंत मृदू आवाजात, समजावणंही शांतपणे, चिडणं तर दूरच, मी त्यांना इतक्या वर्षात आवाज चढवलेलाही ऐकलेलं नाही. त्यामुळे काहीतरी खास पाहून त्यांचं अति-एक्सायटेड बोलणं पाहून हसू आवरायचं नाही, त्यांना जरा दमानं घ्या म्हणावं लागायचं! बाकी संपूर्ण प्रवासात देव मॅडम आणि सरांच्या प्रीहिस्टरीच्या चर्चा ऐकाव्या फक्त…”
अगं सुषमा, आपल्याला जाऊन तो पाचवडचा लॅटेराइट ग्रॅव्हेल पाहायचा आहे बरं का, त्याच्या उत्तरेला पूर्वी एक साईट रिपोर्टेड आहे, कदाचित काहीतरी सापडेल तिकडे. कुळकर्णी, तिकडे पसरणी घाटाच्या रस्त्यावर मायक्रोलिथस् सापडू शकतात बरं का...
एवढी एवढी बोटाच्या पेराइतकी असतात ती…मलिकांच्या पी.एचडी. थेसीसमध्ये हा पोटेन्शिअल एरिया म्हणून लिहून ठेवलाय…बरं, सुषमा, आपल्याला एकदा मोरगावला जायचंय बरं का गं…एकदा जाऊन गावकऱ्यांशी बोलून येऊ…कुळकर्णी, चल तू पण वॉल्कनिक ऍश पाहायला मिळेल…” असे सगळे संवाद चालायचे आणि आम्ही बापडे जीवाचे कान करून सगळं मेंदूत भरून घ्यायचो.
त्यांच्या आणि देव मॅडमकडून मी पद्धतशीररित्या नदीचा गाळ कसा अभ्यासायचा, त्यांची निरीक्षणे कशी नोंदवायची, नमुने कसे घ्यायचे (किती घ्यायचे म्हणजे पुढे येणाऱ्याला नीट अभ्यास करता येतो!) असं विज्ञानाच्या कक्षेतले-कक्षेबाहेरचे खूप काही शिकले.
दोघांच्या अंदाजाप्रमाणे, आम्हाला पाचवडला आदिमानवाने बसाल्टवर तयार केलेले अवजार सापडले. त्याच्या खाचाखोचा अभ्यासल्यावर ते “अशुलियन/लोअर पॅलिओलिथिक” प्रकारचं अवजार आहे असं अनुमान निघालं.

फोटो स्रोत, Dr. Jayandra Joglekar
अशा अवजारांचा काळ साधारण प्लायस्टोसीन काळाच्या मध्यापाशी, 70 हजार-सव्वा लाख वर्षांच्या दरम्यान येऊन थांबतो, त्यामुळे कृष्णेच्या खोऱ्यात त्यादरम्यान मानवाची वस्ती होती निश्चित झालं.
शिवाय, सरांचा अंदाज होता त्याप्रमाणे कृष्णेतले एकंदरीत भूशास्त्रीय अवशेष पाहून तिथे टेक्टॉनिक घडामोडी झाल्यात, होताहेत हेही लक्षात आलं आणि असं सगळं असताना “कसली संथ वाहते कृष्णामाई!” असे विनोदही करून झाले!
अर्थात, माझे रिसर्च प्रोजेक्ट अवघ्या दीड वर्षाचे, त्याचा जीव तसा छोटा होता पण पुढे जयेंद्र जोगळेकरने देव मॅडमच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी.साठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातले २-३ लाख वर्षे जुने अश्मयुगीन अवशेष विस्ताराने अभ्यासले तेव्हा तिथेही सर हजर होतेच.
काळ बदलला, जगभरात इंटरडिसिप्लिनरी कामाचे वारे वाहायला लागले तरी भारतातलं आर्किओलॉजी काही फार बदललं नाही, काही अपवाद वगळता ते त्याच धोपटमार्गाने चालू राहिलं पण सर मात्र बदलत राहिले, दहा ठिकाणी कोलॅबोरेशन करत कामात राहिले.
पुणे विद्यापीठाबरोबरच आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी, फिसिकल रिसर्च लॅबॉरेटरी, इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिसम या भारतातल्या संशोधनक्षेत्रातल्या अग्रगण्य संस्थांतल्या शास्त्रज्ञांसोबत आणि अनेक परदेशस्थित संशोधकांसोबत वेगवेगळ्या अनुषंगाने भरतभरातले क्वाटर्नरी भूभाग आणि त्यांचा मानवाने केलेला वापर यावर काम करत राहिले.
तब्येतीची पर्वा न करता, घरच्यांचा विरोध पत्करून फील्डवरही जात राहिले. शेवटी एकदा काही वर्षांपूर्वी बंगालच्या एका भागांत हिंडताना उष्माघाताने चक्कर येऊन पडले तेव्हापासून फिरस्ती पूर्ण बंद झाली. अर्थात, त्यांची बौद्धिक मुशाफिरी काही थांबणारी नव्हतीच.

फोटो स्रोत, Dr. Jayandra Joglekar
राजगुरू सर वेगवेगळ्या ठिकाणी भूपुरातत्वातल्या संशोधनाबद्दल बोलत आणि लिहित राहायचे...मिळालेलं, समजलेलं सगळं वाटून टाकण्याची त्यांची वृत्ती होती.
असंच एकदा, 2009मधे “इंडिया-आर्ट गॅलरी”त ओढून घेऊन गेले. “तिकडे काय विशेष?” विचारलं तर म्हणाले, “अगं, विशेष म्हणजे तिथे प्रकाश बाळ जोशींचं नद्यांवरचं प्रदर्शन उघडतंय आज, नदी आणि संस्कृती यांचा पररस्परसंबंध रेखाटलाय त्यांनी.
मला जरा सरस्वतीच्या शोधाबद्दल, तिच्या भौगोलिक जडणघडणीबद्दल बोलायला बोलावलंय…काही वर्षे थारमधे जात राहिलो, काही गोष्टी समजल्यात, त्यातलं जमेल तेवढं सांगेन जरा.”
मी मनात म्हटलं, सरस्वती नदीच्या अनेक खाणाखुणा जगासमोर आणणाऱ्या या माणसाचं योगदान “जरा” कसं असू शकतं? त्यांचा हा विनय समजण्यापलीकडचा होता. सरांचं ते व्याख्यान अपेक्षेप्रमाणेच मनोरंजक झालं, ते अभ्यासपूर्ण असणार होतंच पण ओघवतं आणि नर्मविनोद करत बोलणं हा सरांचा हातखंडा.
पर्यावरण बदल, संस्कृती, इतिहास यांची सांगड घालून सरांनी अशी काही चित्रे रेखाटली की त्याची पुनर्नुभूती घ्यायला मंडळी लगोलग प्रदर्शनाकडे वळली. अत्यंत क्लिष्ट विषय अत्यंत सोपा करून सांगणे यात सरांचा हात धरू शकणारे फार थोडे असतील, मग पुढे कितीही वयाचा श्रोता असला तरी!
अगदी अलीकडचे उदाहरण द्यायचे झाले तर सर आणि देव मॅडमनी मिळून 2019मध्ये पुणे आकाशवाणीवर “खुले आकाश”मध्ये “महाराष्ट्राचा आद्य इतिहास” शालेय मुलांना समजेल अशा भाषेत उलगडून सांगितला.

फोटो स्रोत, dr. charuta kulkarni
माझ्या डेक्कन कॉलेजच्या कारकिर्दीनंतर अनेक खटपटी करूनही काही कारणांनी पुणे विद्यापीठातून पी.एचडी. करता येण्याची चिन्हे दिसेनात म्हणून मी शेवटी देशाबाहेर जाऊन पी.एचडी. करण्याचा निर्णय घेतला.
तोवर भावी नवराही अमेरिकेत पी.एचडी. करत होता हे कळल्यावर संशोधन वर्तुळातल्या कुणाहीपेक्षा जास्त पाठिंबा सरांचा, “तुम्ही एकदा ठरवलं आहे तर एकत्र राहून उत्तम काम कराल. बाहेरचा अनुभव मोलाचा आहे, तोही गाठीशी येईल.” म्हणाले.
त्यानंतर दरवेळी अमेरिकेतून आले की देव मॅडम-सरांशी फोन व्हायचा आणि किमान एकतरी भेट ठरायचीच. भेटले की विचारायचे, “काय काय शिकलीस नवीन?” आणि मला शिकव म्हणायचे.
आमची भेट एकतर देव मॅडमच्या तुळशीबागेतल्या घरी किंवा त्यासमोरच्या बोळातल्या “अगत्य”मध्ये
तिथे सर बऱ्याचदा थेट 'भारत इतिहास संशोधक' मंडळातून आलेले असायचे.
त्यावरून आम्ही त्यांना चिडवायचो “काय हो, सगळे म्हातारेकोतारे चर्चा करता ना तिकडे?” तर म्हणायचे, “अगं, आज अमुकअमुक तरुण मुलगा/मुलगी आला/आली होता/ती मंडळात…त्यांच्याशी गप्पा मारत बसलो…छान काय काय करतात हं ही मुलं!”
अशा असंख्य मुलांनी स्वतःच्या आवडीचं छान काम करत रहावं यासाठी ऐंशीच्या घरातला हा तरुण झटत असायचा! म्हणूनच त्यांच्या अशा जगभरातल्या अनेक मुलांच्या फेसबुक वॉल्स आणि ट्विटर पेजेस आज त्यांच्या आठवणींनी गदगदून गेलेत.
2018 मधे मला युरोपियन युनियनची मानाची समजली जाणारी 'मेरी क्यूरी शिष्यवृत्ती' मिळाली, त्या कामासाठी इंग्लंड गाठायचं होतं तेव्हा अमेरिका ते इंग्लंड या स्थलांतरापूर्वी भारतात एक फेरी झाली.
पुन्हा एकदा 'अगत्य'मधे भेट! यावेळी तर मेरी क्यूरी फेलोशिप मिळाली याबाबत माझ्याइतकेच सर एक्क्सायटेड…”प्राचीन पर्यावरणाचा शाश्वत विकासासाठी वापर” असा मध्यवर्ती विषय घेऊन मी काम करणार होते, त्याच्या आहे-नाही त्या सर्व तांत्रिक-अतांत्रिक बाजू सरांनी कुतूहलाने जाणून घेतल्या.
'अगत्य' मधून निघताना म्हटलं “मी घरी जायला रिक्षा घेतेच आहे, बसा तुम्हाला केसरी वाड्यावर सोडते.” म्हटलं. त्यांचं बिऱ्हाड केसरी वाड्याला लागून असलेल्या बिल्डिंगमध्ये होतं.
रिक्षात पूर्ण वेळ माझ्या भावी संशोधनातल्या तांत्रिक खाचाखोचा विचारत राहिले, “हा अॅनालिसिस शिकायचा राहूनच गेला बघ” म्हणत राहिले.
केसरी वाडा आला, उतरले आणि म्हणाले, “डू वेल! तू करशील!”…मनात म्हटलं, “सर, तुम्ही इतका भरभरून आशीर्वाद दिल्यावर, हाऊ कॅन आय नॉट?”
नंतरची दोन वर्षे प्रचंड कामात गेली आणि मग कोव्हिड आडवा आला…त्यामुळे जवळपास तीनेक वर्षे भारतात येताच आलं नाही. दरम्यान, देव मॅडमशी बोलून सरांची ख्यालीखुशाली कळत राहिली.
सरांची शेवटची भेट या सप्टेंबरमधली…या खेपेला आम्ही दोनाचे तीन होऊन कायमचे भारतात आलो होतो, भारतात राहून संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात नशीब आजमावण्याचा घाट घालणार होतो...अनेकांचं “का परत आलात?”
हे विचारणं सरांच्या भेटीत असणार नाही हे पक्के होतं, उलट त्यांचे चार सकारात्मक शब्द ऐकायला मिळतील म्हणून पुण्यात पोहोचल्या-पोहोचल्या त्यांच्याकडे जावंसं वाटलं. यावेळी मात्र देव मॅडम आणि मी भेटीसाठी सरांच्या घरी जायचे ठरवले.
एव्हाना वय वर्षे 88 गाठलेले, पचनसंस्थेचा विकारही बराच फोफावला होता आणि वजन 39 किलोवर येऊन ठेपले होते…गलितगात्र झालेले सर कसे बघवतील हा विचार करत करतच देव मॅडमना केसरी वाड्यापाशी भेटले.
त्याही एव्हाना डेक्कन कॉलेजमधून रिटायर होऊन भांडारकर इन्स्टिट्यूटला व्हिसीटींग म्हणून जात होत्या.
त्यांना म्हटलं “सरांच्याच शिष्या तुम्ही? शांत रहाल तर शप्पथ!” हसत हसत दोघी सरांच्या बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये चढलो तशा त्या म्हणाल्या “सरांना सांगितलं नाहीये तू आज येणारेस ते…surprise देऊ त्यांना!”
सरांच्या घरात शिरलो तर मला बघून त्यांचा डोळ्यावर विश्वास बसला नसावा, दोन मिनिटे स्तब्ध बसून राहिले…सर कुणालाही विसरले-बिसरले असणं शक्यच नव्हतं पण तरी...असे वाटेपर्यंत सरांचा एव्हर-एक्ससायटेड खणखणीत आवाज “अरे कुळकर्णी!!! कधी आलीस इंग्लंडहून? मेरी क्यूरीचं काम संपलं ना तुझं? माझं आणि सुषमाचं थोडं रिसर्च पेपरचं काम चाललंय, ते कसं चाललंय सांग आम्हाला.”
एका दमात माझा अख्खा रेकॉर्ड आणि पुढचा प्लॅन सगळं! माझी सरांच्या तब्येतीबद्दलची भीती या क्षणी तरी अनाठायी होती याचं बरं वाटलं. मग रिसर्च पेपरच्या संदर्भात चर्चा सुरु झाली.
सर कुठले कुठले जुने-नवे नोट्स घेऊन बसले होते, देव मॅडमना आपला हा मुद्दा राहिलाय…तो मी इथे ड्राफ्ट करून ठेवलाय वगैरे सांगत होते. यावेळी विषय होता मुळा-मुठेचा.
मी म्हटलं “सर, काय हो, आता फार लांब जाता येत नाही म्हणून होम पीच का?” तर म्हणाले “अगं, माझ्या पीएचडीचं काम होतं यावर..तेव्हापासून काही प्रश्न अनुत्तरित आहेत, सगळे सुटतील असं नाही पण जे सुटतील ते सोडवायला काय हरकत आहे?
पण तुला सांगतो हा रिसर्च पेपर नक्की शेवटचा”...मी त्यांना म्हणाले, “तुम्ही एवढ्या ठामपणे म्हणताय म्हणजे नक्कीच शेवटचा नसणारे हा!” त्यावर हसले आणि म्हणाले “येणाऱ्या शोधनिबंधाचा ऍबस्ट्रॅक्ट लिहून झालाय, तो वाचून दाखवतो तुला.
काही चुका असतील तर सांग, लगेच दुरुस्त करतो…” मी इकडे मनोमन त्यांना दंडवत घालत होते, चुका कुठल्या सांगणारा! “तुला सांगतो हे काम एकही पैसा खर्च न करता झालंय…पार पेठांपासून ते बंडगार्डनपर्यंत कुणी कुठेही रिकन्स्ट्रक्शन करायला घेतलं की आम्ही तिथे हजर..
पाया घालण्याआधी खोदाखोद केलेली असते त्यात अमुक अमुक ठिकाणी खोलीवर अमुक अमुक खोलीवर प्लायस्टोसीन डिपॉसिट्स बघायला मिळतात…अजून काय हवं! ज्याला आवड आहे अशा कुणालाही आर्किओलॉजी करता आलं पाहिजे, पैशाअभावी अभ्यास करता आला नाही असं नकोय व्हायला…”
मी आपले जीवाचे कान करून ऐकत होते. जाता जाता मला म्हणाले, “आता बंगालवर लिहायला घेतलंय…जो आहे तो बोनस वेळ आहे माझ्या हातात, पण आहे ना मग तेवढं पूर्ण करेन म्हणतो…तू तुझ्या मुलाचं नाव “अमर्त्य” ठेवलंयस ना म्हणून तुला खास हा बंगालचा संदर्भ सांगितला.”
मनात म्हटलं, बघा सर, तुम्ही थांबणाऱ्यातले नाहीच! या भेटीत का कोण जाणे पण वाटलं की एक एकत्र फोटो घ्यावा…या दोन्ही गुरुजनांसोबत वाईच्या दीड वर्षांच्या कामासकट इतरही फील्डवर्कस् करूनही, कॅमेरा जवळ असूनही बहुदा कामाच्या गडबडीत हे कधीच सुचलं नाही..
निदान सरांची ही शेवटची भेटतरी कॅमेऱ्यात बंदिस्त झाली याचं आता बरं वाटतंय.. सरांचं ते कायम झपाटून काम करणं, वयाचा मुलाहिजा न बाळगता कुणीही कुठेही फील्डवर निघालं की "अरे/अगं, तिथला अमुक अमुक भाग/प्रश्न अभ्यासायचा राहिलाच आहे अजून, मी येतो!" म्हणणं आणि प्रापंचिक गोष्टीत अडकले तरी मेंदूतल्या एका पेशीत सतत "पुरातत्त्व" चालू असणं हे सगळं आठवून वाटतं की यातलं १% वेड जरी आपल्याला उसनं घेता आलं तरी खूप झालं! आणि याठिकाणी त्यांच्याच मृदू आवाजात “तू करू शकशील!” ऐकू येतंय..
(लेखातील विचार हे लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








