You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अॅपलच्या नव्या व्हिजन प्रो हेडसेट आणि IOS-17 मध्ये ही आहेत खास वैशिष्ट्यं...
- Author, टॉम गॅरकेन आणि जेम्स क्लेंटन
- Role, बीबीसी प्रतिनिधी, अॅपल पार्क कॅलिफोर्नियाहून
अॅपलने आपला बहुप्रतीक्षित ऑगमेन्टेड रिअॅलिटी हेडसेट व्हिजन प्रो लॉन्च केला आहे.
गेल्या दहा वर्षांत अॅपलने लॉन्च केलेलं हे पहिलं हार्डवेअर आहे.
अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी सांगितलं की, हा नवीन हेडसेट आभासी (व्हर्चुअल) आणि वास्तव जगाची सरमिसळ अतिशय सहजेतनं घालतो.
तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अॅपलने आयफोनसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आणि मॅकबुक एअर लॅपटॉपसाठीही नवीन अपडेट सादर केला आहे.
हा हेडसेट एकदा चार्ज झाल्यानंतर दोन तासांपर्यंत चालू शकतो. याची किंमत 3499 डॉलर म्हणजे जवळपास दोन लाख 80 हजार एवढी आहे. हा हेडसेट पुढच्या वर्षाच्या सुरूवातीला अमेरिकेतील बाजारपेठेतच उतरवला जाईल.
अॅपलच्या या हेडसेटची किंमत बाजारात आधीपासूनच असलेल्या हेडसेटपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.
गेल्या आठवड्यातच मेटाने आपला क्वेस्ट हा हेडसेट लॉन्च केला. त्याची किंमत 449 डॉलर्स ठेवण्यात आली आहे.
अॅपलने जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल जास्त माहिती दिली नाहीये. हे नवीन तंत्रज्ञान सिलिकॉन व्हॅलीमध्ये चर्चेचा विषय आहे.
कॅलिफोर्नियातल्या कूपाटिनो इथल्या कंपनीच्या अॅपल पार्क मुख्यालयातून या नवीन लॉन्चची घोषणा करण्यात आली. या घोषणेच्या वेळी कंपनीच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरणही पाहायला मिळाली.
ऑगमेन्टेड रिअॅलिटी हेडसेट व्हिजन प्रो लॉन्चच्या कार्यक्रमात बीबीसीची टीमही उपस्थित होती. मात्र, त्यांनी अजून या उपकरणाचं परीक्षण केलं नाहीये.
‘स्काय गॉगल्स’
अॅपलच्या व्हिजन प्रोमध्ये बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या इतर हेडसेटपेक्षा काही वेगळे फीचर्स आहेत. तसं पाहिलं तर व्हर्चुअल रिअॅलिटी हेडसेट कमी आणि स्कीइंगसाठी वापरले जाणारे गॉगल्सच अधिक वाटतात.
अॅपलने या नवीन डिव्हाईसचं वर्णन करताना ‘ऑगमेंटेड रिअॅलटी’ हा शब्दप्रयोग केला आहे.
ऑगमेंटेड रिअॅलिटी हे एक तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये आपल्या सभोवतालच्या जगात आभासी वस्तू ठेवल्या जातात. अशा परिस्थितीत, स्क्रीनवरून पाहिल्यानंतर संमिश्र वास्तव दिसतं. म्हणजे असं जग ज्यामध्ये वास्तविक गोष्टींव्यतिरिक्त आभासी गोष्टी देखील असतात.
युजर्स या आभासी जगात चित्रपट पाहू शकतात, अॅप्स वापरू शकतात किंवा अगदी कागदपत्रंही लिहू शकतात. परंतु आतापर्यंत अशा तंत्रज्ञानासाठी कोणतीही मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याचा कोणताही पुरावा नाही.
MacRumors च्या वरिष्ठ संपादक हार्टले चार्लटन यांना मात्र हा नवीन हेडसेट जनतेला किती आकर्षित करू शकेल, याची खात्री नाहीये.
ते म्हणतात, "सामान्य ग्राहकांना ते फारसे अपील करणार नाहीत. कारण त्याची किंमत खूप जास्त आहे आणि हे ‘फर्स्ट जनरेशन’ उपकरण आहे. त्याचे काही तोटेही आहेत. उदाहरणार्थ- याची बॅटरी पॅक स्वतंत्रपणे वायर्ड आहे.”
पण ते हेही आवर्जून नमूद करतात की, अॅपलने आपल्या उपकरणांबद्दलच्या शंका नेहमीच खोट्या ठरवल्या आहेत. त्यांची उपकरणं लोकांना आकर्षित करतात हे वेळोवेळी दिसून आलं आहे. लोक त्यांची उपकरणं पैसे खर्चून घेतात, अभिमानाने मिरवतात.
टीम कुक यांनी या उपकरणाबद्दल सांगितलं की, हा हेडसेट लोकांना डिजिटल कन्टेन्ट अशा पद्धतीने पाहण्याची, ऐकण्याची आणि संवाद साधण्याची अशी संधी देतो, जेणेकरून तो त्यांच्या वास्तविक जगाचाच एक भाग आहे.
हे उपकरण हात, डोळे आणि आवाजाद्वारे नियंत्रित केले जाते. उदाहरणार्थ- बोटांनी स्पर्श करून किंवा हलवून कन्टेन्ट स्क्रोल करता येऊ शकतो.
मेटा आणि लिनोव्होने त्यांच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटच्या नवीन आवृत्त्या सादर केल्यानंतर एका आठवड्यानंतर अॅपलने आपल्या उपकरणाची घोषणा केली आहे.
Meta आणि Lenovo चे हेडसेट कोणत्याही आभासी वस्तूंना वास्तविक जगाच्या दृश्यात मिसळत नाहीत.
मेटाने मिश्र वास्तविकतेच्या जगात वास्तविक गुंतवणूक केली आहे खरी, परंतु हे क्षेत्र सध्या झगडत आहे.
इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशननुसार, गेल्या वर्षी हेडसेट मार्केटमध्ये 54 टक्क्यांची घट झाली आहे.
अॅपलने यापूर्वी 2015 मध्ये त्यांचं फ्लॅगशिप हार्डवेअर उपकरण Apple Watch लाँच केलं होतं.
संशोधक थॉमस ह्यूसन यांचं म्हणणं आहे की, या नवीन उपकरणाला बाजारात आपले स्थान निर्माण करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.
ते म्हणतात, “गेल्या काही वर्षांमध्ये AR/VR स्पेसचा मेटाव्हर्स आणि त्यासारख्या अनुभवांमध्ये खूप प्रचार करण्यात आला आहे. यामुळे मला वाटते या उपकरणाला बाजारपेठेत त्याचं स्थान निर्माण करायला वेळ लागेल.
ते म्हणतात, "जर मी 10-15 वर्षांपूर्वी सांगितले असतं की, लोक मोबाईल फोनवर सुमारे $2000 खर्च करण्यास तयार आहेत, तर मला वाटतं की बऱ्याच लोकांनी आम्ही फोनवर एवढे पैसे खर्च करणार नाही, असंच सांगितलं असतं.”
आयओएस 17
व्हिजन प्रोच्या घोषणेसोबतच अॅपलने आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आयओएस 17 सादर केली आहे. ही आयफोनची सर्वांत नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
याच्या अपडेटमध्ये कॉन्टॅक्ट पोस्टरचाही समावेश आहे. म्हणजे तुम्ही कोणाला कॉल केला, तर त्याच्या स्क्रीवर तुमचा चेहरा दिसेल. या व्यतिरिक्त लाइव्ह व्हॉईसमेलही उपलब्ध असेल. यामध्ये तुमच्यासाठी ठेवण्यात आलेले ऑडिओ मेसेज रिअल टाइममध्ये ट्रान्सक्रिप्ट (शब्दांत लिहिणे) केले जातील. अॅपल मेसेजकडून पाठविण्यात आलेल्या ऑडिओ मेसेजसाठीही ही सुविधा उपलब्ध असेल.
अॅपल चेक-इन नावांची एक नवीन सिस्टीमही सादर करत आहेत. जर तुम्ही प्रवासाला निघाला असाल तर एखाद्या ठिकाणी पोहोचल्यावर तुमचे मित्र आणि नातेवाईकांना तुम्ही पोहोचल्याचा मेसेज या सिस्टीममुळे मिळेल. तुम्हाला खूप उशीर होत असेल, तर ही सिस्टीम तुमच्या नातेवाईक आणि मित्रांनी ही गोष्ट पण कळवेल.
ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम यावर्षी सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होऊ शकते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)