गौतम गंभीरच्या नेतृत्वाने खरंच बदल घडवला? एक नजर टीम इंडियातील या परिवर्तनावर

Photo Caption- गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघानं टी-20 आणि वनडे सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघानं टी-20 आणि वनडे सामन्यांत चांगली कामगिरी केली आहे.
    • Author, प्रभात पांडेय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एका पुरस्कार सोहळ्यात सत्कार स्वीकारण्यासाठी रोहित शर्माला स्टेजवर बोलावण्यात आलं. रोहितनं 2025 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत विजयी ठरलेल्या भारतीय संघाचं नेतृत्व केलं. त्या वेळी गौतम गंभीर टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. पण त्या स्पर्धेतील विजयाबद्दल बोलताना रोहितनं भाषणात एकदाही गौतम गंभीर यांचं नाव घेतलं नाही.

त्यानं खेळाडूंच्या केमिस्ट्रीबद्दल, त्यांची लढाऊ वृत्ती, मानसिक ताकद आणि इतकंच काय स्वतःबद्दलही तो बोलला. त्याने माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही उल्लेख केला. पण गौतम गंभीरबद्दल तो काहीच बोलला नाही. हीच गोष्ट अनेक ठिकाणी हेडलाइनचा मुद्दा बनली आहे.

काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय संघाची निवड झाली होती. हा दौरा 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून भारत तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे.

वनडे संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना स्थान मिळालं, पण कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे देण्यात आली.

2023 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ फायनलपर्यंत पोहोचला होता. हाच संघ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजेता ठरला आणि 2025 मध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉफीही पटकावली.

इतका चांगला ट्रॅक रेकॉर्ड असूनही रोहितला संघात ठेवणं, पण त्याला कर्णधार न करणं, हे अनेक क्रिकेट चाहत्यांना आवडलं नाही.

त्याच वर्षाच्या सुरुवातीला भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर गौतम गंभीर यांनी कोहली आणि रोहितसारख्या खेळाडूंनाही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला.

त्याच मालिकेत पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाने (बीसीसीआय) एक नवा नियम केला. 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधी असलेल्या परदेश दौऱ्यावर खेळाडूंच्या कुटुंबीयांना त्यांच्यासोबत 14 दिवसांपेक्षा जास्त काळ राहता येणार नाही.

विराट कोहलीनं उघडपणे या नियमावर टीका केली आणि त्याला हा निर्णय फारसा आवडला नसल्याचं म्हटलं.

गौतम गंभीर यांनी या नियमाचं समर्थन करताना चेतेश्वर पुजारासोबतच्या एका मुलाखतीत म्हटलं की, "कुटुंब महत्त्वाचं आहेच, पण दौऱ्याचा एक उद्देश असतो. ही कोणती सुट्टी किंवा सहलीचं ठिकाण नाही."

हा दौरा सुरू असतानाच टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विनने अचानक निवृत्ती जाहीर केली.

Photo Caption- क्रिकेटचे चाहते म्हणतात की, गंभीरची 'कधीही हार न मानण्याची मानसिकता' आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्रिकेटचे चाहते म्हणतात की, गंभीरची 'कधीही हार न मानण्याची मानसिकता' आहे.

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

या मालिकेदरम्यान दोघांनीही असे कोणतेही संकेत दिले नव्हते. कोहलीला तर कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी केवळ 770 धावांची गरज होती.

अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, या संपूर्ण घटनाक्रमावरून दिसतं की, सीनियर खेळाडू गौतम गंभीर यांच्या 'स्कीम ऑफ थिंग्ज'मध्ये अजिबात नाहीत.

विराट, रोहित आणि अश्विनसारखे वरिष्ठ खेळाडू संघात बसत नाहीत? असं गौतम गंभीर यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून टीमची जबाबदारी घेतल्यापासूनच मनात ठरवलं होतं का?

राहुल द्रविड यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर आणि गौतम गंभीर यांनी ते पद स्वीकारल्यानंतर टीम इंडियामध्ये किती बदल झाला?

ग्राफिक्स

ज्या समारंभात रोहित शर्मानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयाबद्दल भाष्य केलं, पण गंभीर यांचा उल्लेख केला नाही, तिथे प्रख्यात क्रीडा पत्रकार अयाज मेमन हेही उपस्थित होते

मेमन म्हणतात, "या विषयाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. त्यानं फक्त त्या कार्यपद्धतीबद्दल सांगितलं, जी द्रविड आणि त्यांच्या टीमने टी-20 वर्ल्ड कपपासून सुरू केली होती.

त्यानुसारच टीमने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यामुळे त्यानं जाणूनबुजून गंभीरचं नाव टाळलं असं मला वाटत नाही."

मेमन यांच्या मते, कोहली आणि रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग आहेत. जर त्यांना 2027 चा वर्ल्ड कप खेळायचा असेल तर तोपर्यंत गंभीर हे कुठेही जाणार नाहीत हे निश्चित आहे. त्यामुळे दोघांनाही समजलं असेल की, संघात राहायचं असेल, तर गंभीर यांच्याशी जुळवून घ्यावं लागेल.

Photo Caption- गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियामध्ये अनेक बदल दिसून आले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर टीम इंडियामध्ये अनेक बदल दिसून आले.

प्रसिद्ध क्रीडा पत्रकार नीरू भाटिया यांचंही मत काहीसं असंच आहे.

त्या म्हणतात, "संघ निवडीतून बीसीसीआयने दाखवून दिलं आहे की गंभीर हेच बॉस आहेत. त्यामुळे रोहित आणि विराटला संघात ठेवायचं असेल, तर त्यांच्यासोबत डील करावं लागेल. यात कोणतीही शंका नाही."

ग्राफिक्स

रोहितला संघात घेऊन शुभमन गिलला कर्णधार करणं हे थोडंसं विचित्र वाटतं, असं नीरू भाटिया म्हणतात.

कदाचित टीम व्यवस्थापनकडून त्यांना थोडं अधिक पाठबळ मिळालं असतं, तर ते रोहित आणि विराटला चांगल्या प्रकारे हाताळू शकले असते, असं त्यांना वाटतं.

टी-20 आणि आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करूनही श्रेयस अय्यरचा आशिया कप संघात समावेश न करण्याच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित झाले.

हा एकदम विचित्र निर्णय असल्याचे नीरू भाटिया म्हणतात.

त्या म्हणतात, "आशिया कप भारताने जिंकला असला तरीही संघ पाहून असं वाटलं की अजून सुधारणा करण्याची भरपूर संधी आहे. श्रेयस अय्यरला संघात न ठेवणं समजण्यासारखं नाही. त्याच्यासारखा चागंला खेळाडू संघात का नाही घेतला, हे खरंच एक रहस्य आहे."

Photo Caption- भारतीय कसोटी आणि वनडे टीमचे नेतृत्त्व आता शुभमन गिलच्या हाती आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय कसोटी आणि वनडे टीमचे नेतृत्त्व आता शुभमन गिलच्या हाती आहे.

अयाज मेमन यांच्या मते, कदाचित श्रेयस अय्यरने स्वतःच मागच्या बाजूची जागा घेतली असेल.

ते म्हणतात, "श्रेयस अय्यरला आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपकर्णधार बनवलं गेलं आहे. तो संघात परतला आहे. त्यामुळे यात काही वाद दिसत नाही."

ग्राफिक्स

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका गमावण्यापूर्वी भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत 0-3 ने पराभूत झाला होता. या दोन्ही कसोटी मालिकांमध्ये वरिष्ठ खेळाडूंची कामगिरी चांगली नव्हती.

रोहित आणि कोहली बऱ्याच काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये फॉर्मात नव्हते. त्यामुळे त्यांचा कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय योग्य वाटतो, असं अयाज मेमन यांना वाटतं.

यासाठी मेमन हे गंभीर यांना जबाबदार ठरवत नाहीत.

मेमन म्हणतात, "रोहित आणि विराट दोघेही मालिकेत चालले नाहीत. त्यांना वाटलं की, त्यानंतर इंग्लंड दौऱ्यातही जर त्यांनी चांगली कामगिरी केली नाही, तर संघातून वगळलं जाण्याचा धोका आहे. कदाचित यामुळेच दोघांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणं योग्य मानलं."

परंतु, नीरू भाटिया म्हणतात की, गौतम गंभीर एक व्हिजन घेऊन आले आहेत. आणि त्यांच्या योजनेत वरिष्ठ खेळाडू फिट बसत नाहीत.

त्या म्हणतात, "गौतम गंभीर यांना भविष्यातील संघ तयार करायचा आहे. 2027 च्या वर्ल्ड कपसाठी युवा संघ हवा आहे. त्यांच्या योजनेत विराट आणि रोहितसाठी विशेष स्थान नाही."

गंभीर, रोहित आणि विराट

फोटो स्रोत, ANI

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून टी-20 आणि वनडेमध्ये भारताची कामगिरी चांगली झाली. परंतु, कसोटी सामन्यांमध्ये संघाचं प्रदर्शन सरासरीच राहिलं आहे.

गंभीर यांनी प्रशिक्षक पद स्वीकारल्यापासून भारताने 15 कसोटी सामने खेळले. त्यापैकी पाच सामन्यातच विजय मिळवता आला आहे. आठ सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.

तर 22 टी-20 सामन्यांत भारताने 20 मध्ये विजय मिळवला आणि दोन सामन्यांत पराभव झाला. याचदरम्यान भारताने 11 वनडे सामने खेळले. त्यातील 8 मध्ये विजय मिळवला.

जे 5 कसोटी सामने भारताने जिंकले, त्यात इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये जिंकलेल्या दोन कसोटींचा समावेश आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित आणि विराट नव्हते.

शुभमन गिलच्या नेतृत्त्वाखालील युवा भारतीय संघाच्या या कामगिरीचं मोठं कौतुक झालं होतं.

भारताने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. यामुळे संघाच्या कामगिरीबरोबरच गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षण कौशल्याचीही मोठी चर्चा झाली.

नीरू भाटिया म्हणतात, "गौतम गंभीर तरुणांना पाठिंबा देतात, त्यांच्या मागे उभे राहतात, त्यांना प्रोत्साहित करतात आणि संघात लढाऊ वृत्ती आणतात."

अयाज मेमन यांच्या मते, गौतम गंभीर आल्यापासून संघाचा दृष्टीकोन बदलला आहे. ते म्हणतात, "त्यांनी कधी हार न मानण्याची (नेव्हर गिव्ह अप) वृत्ती आणली आहे. तरुणांना पाठबळ देतात. याचे परिणाम आता मैदानावर दिसत आहेत."

ग्राफिक्स

आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात झालेल्या एका वादाचा व्हीडिओ खूप व्हायरल झाला होता.

कोहली आणि गंभीर यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेदही दिसून आले.

नीरू भाटिया म्हणतात, "गौतम गंभीर थेट बोलतात. जे सांगायचं आहे, ते सरळ सांगतात. विराटचं व्यक्तिमत्वही बऱ्यांच अंशी तसंच आहे. दोघांच व्यक्तिमत्त्व मजबूत आहे."

नीरू भाटिया म्हणतात की, गौतम कोणत्याही खेळाडूच्या प्रतिमेवर जाऊन निर्णय घेत नाहीत.

पण त्या असंही मानतात की, रोहित आणि विराटसारख्या दिग्गज खेळाडूंना अधिक चांगल्या पद्धतीने हाताळण्याची गरज होती.

राहुल द्रविड आणि रोहित शर्मा

फोटो स्रोत, ANI

गौतम गंभीर यांच्या आधी संघाचे प्रशिक्षक राहिलेले राहुल द्रविड यांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे वेगळं होतं.

शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे राहुल पडद्यामागे काम करणं पसंत करत. त्यानी तत्कालीन कर्णधार रोहित शर्माच्या साथीने भारतीय संघाला अनेक मालिकांमध्ये मोठं यश मिळवून दिलं.

अयाज मेमन म्हणतात, "सगळं निकालांवर अवलंबून असतं. प्रशिक्षक किती यशस्वी आहे हे निकालच सांगतील. संघ सतत जिंकत राहिला तर त्यांचा स्वभाव योग्य मानला जाईल, अन्यथा नाही."

अयाज मेमन हे गौतम गंभीर यांना एक सल्ला पण देतात.

"ते कमी हसतात. असं वाटतं की स्वतः हसणार नाहीत आणि इतरांनाही हसू देणार नाहीत. असं वाटतं की सगळ्यांचा ते 'बँड' वाजवतील. कदाचित ते डगआऊटमध्ये बसून हसत असतील, पण आपल्याला मात्र दिसत नाही."

"गंभीरला थोडं कमी 'गंभीर' व्हायला हवं," असं अयाज मेमन म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)