क्रिकेटर नसता तर रवींद्र जडेजानं केलं असतं 'हे' काम, कसा बनला जगातील सर्वोत्तम ऑलराऊंडर?

फोटो स्रोत, ANI
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
'सर रवींद्र जडेजा'. आजघडीला हे नाव माहिती नसेल असा क्रिकेट चाहता भारतात काय जगभरात कोणी नसेल. अगदी लहान असो वा मोठा सगळ्यांचा हा लाडका क्रिकेटपटू.
कारणही तसंच आहे. क्रिकेटमधला सर्वात महत्त्वाचा आणि कस लावणाऱ्या फॉरमॅट असलेल्या कसोटी क्रिकेटमध्ये हा जगातला सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. तसं इतरही फॉरमॅटमध्ये तो उत्तमच आहे. पण ऑलराऊंडर्सच्या रँकिंगमध्ये सध्या कसोटीत त्यानं अव्वल स्थान मिळवलंय.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारतात सुरू असलेल्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात अशीच अष्टपैलू कामगिरी करत जडेजानं पुन्हा एकदा तो भारताचा हुकुमी एक्का असल्याचं सिद्ध केलं.
जडेजानं नाबाद शतकी खेळीसह दुसऱ्या डावात विंडिजच्या चार फलंदाजांना बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग आणखी सोपा केला. या सामन्यात जडेजा सामनावीर पुरस्काराचा मानकरीही ठरला.
पण कसोटी, वन डे आणि टी ट्वेंटी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये देशासाठी खास कामगिरी करणाऱ्या जडेजाला त्यासाठी चांगलेच परिश्रम घ्यावे लागले आहेत. त्या जोरावरच तो हे यश मिळवू शकला आहे.
त्याच्या याच प्रवासाची गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत. त्याची सुरुवात करुयात जडेजानं क्रिकेटमध्ये केलेल्या आजवरच्या कामगिरीनं.
300+ कसोटी विकेट
रवींद्र जडेजा कसोटीतील सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटू का आहे? याचं उत्तर त्याचे आकडे पाहता लगेचच लक्षात येतं. खरंतर टी 20 आणि वन डे क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर तीन वर्षांनंतर जडेजानं कसोटीत पदार्पण केलं. पण तरीही कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी त्यानं क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्येच केली आहे.
जडेजानं 86 कसोटी (अहमदाबाद कसोटी 2025 पर्यंत) सामने खेळले आहेत. या 86 कसोटींमध्ये जडेजानं 3990 धावा केल्या आहेत. त्यात 6 शतकं आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे.

तर गोलंदाजीचा विचार करता त्यानं 334 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत जडेजा 5 व्या स्थानी आहे.
वन डेतही त्याची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळते. 204 सामने खेळताना त्यानं 2806 धावा केल्या आहेत. तर गोलंदाजीचा विचार करता त्यानं 231 फलंदाजांना त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकवल्याचं पाहायला मिळालं आहे.
तर टी ट्वेंटीमध्ये त्यानं 515 धावा आणि 54 विकेट घेतल्या आहेत. भारतानं रोहितच्या नेतृत्वात 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जडेजानं या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली.

फोटो स्रोत, ANI
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही जडेजाची कामगिरी अत्यंत खास अशी राहिली आहे. त्यानं 8039 धावा आणि 561 विकेट घेतल्या आहेत.
आयपीएलचा विचार करता त्यानं 3260 धावा आणि 170 विकेट अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे.
2013 मध्ये भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय घेतला त्यावेळी त्या विजयात जडेजाचा मोठा वाटा होता. या मालिकेत त्यानं सर्वाधिक 12 विकेट घेतल्या होत्या. त्यापैकी अंतिम सामन्यात 2 विकेट आणि 33 धावा अशी त्याची कामगिरी होती.
2022 मध्ये श्रीलंकेच्या विरोधात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यानं नाबाद 175 धावांची खेळी केली होती.
एकाच सामन्यात शतक आणि 5 विकेट घेण्याची कामगिरी जडेजानं दोन वेळा केली आहे. 2022 मध्ये श्रीलंकेविरोधात मोहालीमध्ये आणि 2024 मध्ये राजकोट इथं इंग्लंडविरोधात त्यानं ही कामगिरी केली.
त्यानं आतापर्यंतच्या करिअरमध्ये 25 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला आहे.
वडिलांचा नकार
रवींद्र जडेजाचा जन्म सौराष्ट्रच्या खेडमध्ये 6 डिसेंबर 1988 साली झाला होता. त्याचं संपूर्ण जीवनच जामनगरमध्ये गेलं आहे. लहानपणापासून खेळण्याची आवड असल्याचं जडेजानं कायम वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.
पण क्रिकेटला करिअर म्हणून निवडण्याची त्याची गोष्ट रंजक आहे. रविचंद्रन अश्विनला दिलेल्या मुलाखतीत त्यानं त्याबाबत सांगितलं होतं. त्यानं त्याच्या प्रवासाबाबत माहिती यावेळी दिली होती.

फोटो स्रोत, ANI
जडेजानं अंदाजे 8 वर्षांचा असताना क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती असं तो सांगतो. सुरुवातीला तो गल्लीमध्ये टेनिस क्रिकेट खेळायचा. त्यावेळी घरी कुणालाही माहिती नव्हतं की त्याला क्रिकेट आवडतं.
पण जडेजाचा एक मित्र हरेंद्र जडेजा तेव्हा लेदर बॉलने क्रिकेट खेळायचा. रवींद्र जडेजाचा खेळ पाहून तो त्याला लेदर बॉलनं खेळ म्हणायचा. पण जडेजा त्यासाठी तयार नव्हता. मित्राचा आग्रह म्हणून तो काही काही दिवस पाहायला म्हणून त्याच्या सोबत गेला.
त्याठिकाणी ग्राऊंडवरचा खेळ शिस्त पाहून जडेजाला आपण हे करू शकणार नाही, असं वाटलं. त्यामुळं जडेजानं तेव्हा नकार दिला होता. पण मित्रानं खूप आग्रह केला तेव्हा जडेजानं घरी विचारलं.
पण त्यावर वडिलांनी थेट नकार दिला. क्रिकेटचं आणि ग्राऊंडचं नाव घेतलं तर खोलीत कोंडून ठेवेल असं रवींद्र जडेजाचे वडील म्हणाले. त्यानंतर जडेजानं आईला सांगितलं आणि वडिलांना न सांगता प्रॅक्टिसला जाऊ लागला. तेव्हा आई त्याच्या वडिलांना शाळेत गेला असं सांगून वेळ मारून न्यायची.
नंतर हळूहळू वडिलांना समजलं आणि त्यांनीही फार विचार न करता काही तरी करायचं तर हेच करू दे असं म्हणत होकार दिला. पण वडिलांना त्याबाबत फारसं काही माहिती नसायचं.
'क्रिकेटर नसतो तर...'
अंडर 14 नंतर खेळताना रवींद्र जडेजा चमकायला लागला होता. हळूहळू त्याच्या कामगिरीच्या बातम्या आणि फोटो पेपरमध्ये छापून यायला सुरुवात झाली, तेव्हा जडेजाच्या वडिलांना तो काहीतरी करू शकतो असं वाटलं.
खरं म्हणजे जडेजाच्या वडिलांचे काही मित्र आर्मीत होते. मित्रांकडे पाहून त्यांना आपल्या मुलानं आर्मीत जावं अशी इच्छा होती. पण जडेजानं मात्र बॅट आणि बॉल हाती घेत वेगळ्या प्रकारे देशाचं प्रतिनिधित्व केलं आणि देशाची मान उंचावण्यासाठीही हातभार लावला.

फोटो स्रोत, ANI
जडेजाला घोडेस्वारीची प्रचंड आवड आहे. वयाच्या 15 व्या वर्षी त्याला हा छंद लागला. त्यावेळी मित्राच्या फार्म हाऊसवर जायचा तेव्हा तिथं तो घोडेस्वारी करायचा. नंतर त्यानं स्वतःचे घोडे घेतले. सध्या त्याच्याकडं 5 घोडे आहेत.
क्रिकेटर नसतो तर जॉकी असतो असं जडेजा अगदी सहजपणे सांगतो.
फिटनेसचे रहस्य बालपणीच्या कोचिंगमध्ये
रवींद्र जडेजा म्हटलं की मैदानावर अत्यंत चपळपणे वावरणाऱ्या अत्यंत फिट क्रिकेटपटूची प्रतिमा आपसूकच आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.
याचं सगळं श्रेय कोचला असल्याचं रवींद्र जडेजा सांगतो. त्यानं 8 वर्षांचा असताना जामनगरमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. क्रिकेट बंग्लो नावाच्या ग्राऊंडवर तेव्हा तो खेळायला जायचा.
जडेजाच्या कोचचे नाव होते महेंद्रसिंग चौहान. तर क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनी याच्याशी त्याचं खास नातं राहिलं आहे. त्यामुळं माझा क्रिकेटचा प्रवास महेंद्रसिंग चौहान ते महेंद्रसिंग धोनी या दरम्यानच राहिला असल्याचं तो म्हणतो.

फोटो स्रोत, ANI
जडेजाचे कोच आधी पोलिसांत होते. त्यामुळं खेळाडू फिट असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी धावणं गरजेचं आहे, हे त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळंच ते त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांना खूप पळायला लावायचे.
त्यासाठी वयाच्या 10 ते 14 वर्षाच्या काळात 12, 15 किलोमीटर धावायचा सराव त्या मुलांना व्हायचा. त्यातूनच फिटनेस वाढलं आणि चांगल्या फिल्डिंगचं श्रेयही त्यातच असल्याचं जडेजा म्हणतो.
धावणं, उड्या मारायला लावणं, पावसात ग्राऊंडमध्ये पूर्ण चिखल करून डाईव्हचा सराव करणं अशा पद्धतीनं अत्यंत वेगळं ट्रेनिंग लहानपणी मिळालं आणि त्याचा करिअरमध्ये प्रचंड फायदा झाल्याचं जडेजा म्हणतो.
शेन वॉर्ननं वर्तवलं होतं भाकीत
रविंद्र जडेजा अंडर 19 खेळत असताना वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघात त्याचा समावेश होता. त्यावेळीही संघात जडेजाच्या कामगिरीची चर्चा असायची. त्याचा फायदा जडेजाला झाला आणि 2008 मध्ये आयपीएल सुरू झालं तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या संघानं त्याची निवड केली.
पण आयपीएलचं तेव्हाचं ग्लॅमर वेगळं होतं. जगभरातले मोठे क्रिकेटपटू आजूबाजूला होते. त्यामुळं सुरुवातीच्या दोन सिझनमध्ये काही कळतच नव्हतं असं तो म्हणाला.
पण त्याचा खेळ पाहून दिवंगत महान फिरकीपटू शेन वॉर्ननं तेव्हाच रवींद्र जडेजाला तू भारतासाठी खेळशील आणि चांगली कामगिरी करशील असं सांगितलं होतं. त्याचं भाकित अगदी खरं ठरलं.

फोटो स्रोत, ANI
शेन वॉर्नला पहिल्यांदा पाहून अचंभित झालो होतो, असं जडेजानं सांगितलं. शेनवॉर्न त्याला रॉकस्टार म्हणायचा अशी आठवणही त्यानं सांगितली.
धोनीसोबतच्या पहिल्या भेटीतही भीती वाटली होती, असं जडेजा सांगतो. धोनीला त्यानं चेन्नईत पहिल्यांदा धोनीला पाहिलं. चॅलेंजर्स ट्रॉफी होती. तेव्हा विमानात धोनीला पाहिलं. पण बोलायचं धाडस होत नव्हतं, असं तो म्हणतो.
सर म्हटलेलं आवडत नाही
रवींद्र जडेजाला आज सगळेच सर्रास सर रवींद्र जडेजा म्हणतात. पण हे नाव पडण्याचीही एक रंजक गोष्ट आहे.
एकदा टीमला प्रॅक्टिससाठी जायचं होतं. त्यावेळी बाहेर पाऊस पडत होता. त्यामुळं पाऊस येतोय तर प्रॅक्टिसला जायचं का? असं जडेजानं सहजपणे विचारलं. तेव्हा धोनीनं सर म्हणत जडेजाची गंमत केली होती.
पण धोनी तेव्हा तेवढ्यावरच थांबला नाही. त्यानं जडेजाचा सर असा उल्लेख करत काही ट्विटही केले होते. त्यामुळं त्याची चर्चा झाली आणि सगळे जडेजाला सर म्हणू लागले.
जडेजाला मात्र कोणी त्याला सर म्हटलेलं जराही आवडत नाही. सर म्हणून समोरचा आपली गंमत करतोय किंवा खिल्ली उडवतोय असं त्याला वाटतं, असं तो सांगतो.
जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा भाजप खासदार आहे. 2016 मध्ये जडेजा आणि रिवाबा यांचं लग्न झालं होतं.

फोटो स्रोत, ANI
रवींद्र जडेजाच्या नावावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्रिशतकही आहे. तरीही क्रिकेटमध्ये करिअर सुरू केलं तेव्हा आपण कसोटीत एवढी मोठी कामगिरी करू असं त्याला कधीही वाटलेलं नव्हतं.
त्यावेळी वन डे किंवा नवीन आलेल्या टी ट्वेंटीचे सामने टीव्हीवर फार पाहिले जायचे. रंगीत कपडे, ग्लॅमर यामुळं या फॉरमॅटकडे ओढा आणि स्वप्नंही तशीच होती, असं तो सांगतो.
पण हळू हळू त्यानं कसोटीत अतिशय खास अशी कामगिरी केली. शिवाय याच फॉरमॅटनं त्याला जगभरात ओळख मिळवून दिली.
बरं, रवींद्र जडेजाला स्वतःला कोणी 'सर' म्हटलेलं आवडत नाही. पण त्याची कामगिरी पाहता धोनीनं दिलेलं हे नाव आता चाहत्यांना असं काही आवडलंय की त्यापासून त्याचा पिच्छा सुटण्याची शक्यताच नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











