'तू नाही खेळलास, पण तुझा मुलगा भारतासाठी नक्कीच खेळेल...' अभिषेक शर्माची गोष्ट

अभिषेक शर्मा वडिलांसोबत

फोटो स्रोत, RAJ KUMAR SHARMA

फोटो कॅप्शन, सध्याच्या या सीरिजमध्ये अभिषेक शर्माच्या आक्रमक फलंदाजीची मोठी चर्चा होताना दिसत आहे.
    • Author, भरत शर्मा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"मी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलो आहे. मी माझ्या आईला म्हणायचो की, माझे सगळे सहकारी भारतासाठी खेळले, पण मी नाही खेळू शकलो, माहीत नाही की मी का खेळू शकलो नाही. कदाचित ही देवाचीच इच्छा असेल. त्यावर माझी आई म्हणायची, काही हरकत नाही बाळा, तू नाही खेळलास, पण तुझा मुलगा नक्की एक दिवस भारतासाठी खेळेल."

त्या दिवसांची आठवण काढताना राजकुमार शर्मा भावूक होतात. आणि ते स्वाभाविकच आहे, कारण त्यांच्या आईनं जे सांगितलं होते, ते आता खरं ठरलं आहे.

ते पुढे म्हणतात, "हा खूप आनंदाचा आणि माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की मुलगा असो वा मुलगी, त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि ते ज्या क्षेत्रात आहेत तिथं त्यांनी चांगलं करावं."

"माझ्या मुलानं अनेक वर्षांपूर्वी बॅट हातात घेतली, संघर्ष केला, खूप मेहनत केली. आज तो फक्त भारतासाठी खेळत नाही, तर सामनेही जिंकून देतो आहे. हे पाहून मन आनंदानं भरून जातं."

वडील राजकुमार शर्मा यांच्याबरोबर अभिषेक

फोटो स्रोत, RAJ KUMAR SHARMA

फोटो कॅप्शन, वडील राजकुमार शर्मा यांच्याबरोबर अभिषेक

राजकुमार शर्मा हे फक्त आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध आक्रमक खेळी करणाऱ्या अभिषेक शर्माचे वडील नाहीत, तर ते त्याचे प्रशिक्षकही आहेत, संघर्षातील त्याचे साथीदार आहेत आणि आता आपल्या मुलाच्या यशाचे साक्षीदारही आहेत.

अभिषेक शर्माच्या आक्रमक फलंदाजीची मोठी चर्चा होताना दिसत आहे. फलंदाजीसाठी जेव्हा तो विकेटवर असतो त्यावेळी विरोधी संघ दबावात असल्याचे या मालिकेत दिसून आलं आहे. आज आपण अभिषेक शर्माबद्दल आणि त्याच्या क्रिकेटच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.

तीन–चार वर्षांचा असतानाच वडिलांनी दिली प्लास्टिकची बॅट

ही यशोगाथा सुमारे 22 वर्षांपूर्वी पंजाबमधील अमृतसरपासून सुरू झाली, जेव्हा तीन ते चार वर्षांच्या अभिषेकने वडिलांचा जड बॅट उचलण्याचा प्रयत्न केला होता.

राजकुमार शर्मा बीबीसीला म्हणाले की, "मी स्वतः क्रिकेट खेळत होतो, त्यामुळे घरात माझं क्रिकेटचं साहित्य आणि किट इकडे-तिकडे पसरलेलं असायचं. अभिषेकचं त्यावेळी वय साधारण तीन–चार वर्षे असावं, तेव्हा तो माझी बॅट उचलण्याचा प्रयत्न करत असत. बॅट जड असल्यामुळे त्याला ती उचलता येत नव्हती. मग मी त्याला प्लास्टिकची बॅट आणून दिली."

वडील राजकुमार शर्मा यांच्याबरोबर अभिषेक

फोटो स्रोत, RAJ KUMAR SHARMA

फोटो कॅप्शन, अभिषेक शर्माचे वडील हे त्याचे प्रशिक्षकही आहेत.

ते म्हणतात, "त्या बॅटसह तो खूप शॉट मारत असे. त्याचा आवाजही नीट निघत नसला तरी तो म्हणायचा, 'पप्पा, बॉल टाका'. आपल्या बहिणींना सांगायचा, 'बॉल फेका,' आणि रात्री माझ्या पत्नीला सांगायचा, 'बॉलिंग कर.' अशा प्रकारे तो सतत बॅटिंग करत करत, त्याच्या क्रिकेटबद्दलच्या आवडीने त्याला इथंपर्यंत पोहोचवलं."

क्रिकेटची प्रचंड आवड, मेहनत आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावर आता अभिषेक शर्मा जगातील अव्वल फलंदाजांमध्ये गणला जात आहे.

अभिषेक शर्माचं आतापर्यंतचं करिअर

आपल्या छोट्या, पण प्रभावी टी20 आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये अभिषेक शर्माने आतापर्यंत 21 सामने खेळले आहेत आणि 708 धावा केल्या आहेत. या धावांमागे त्याच्या आक्रमक खेळीची कहाणी आहे. त्याने या धावा 35.40 सरासरीने केल्या आहेत, जी टी20 मध्ये चांगली सरासरी आहे, आणि स्ट्राइक रेट 197.21 आहे, जो कोणत्याही सलामी फलंदाजासाठी उत्तम आहे.

तो टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूमध्ये 50 षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. फक्त 331 चेंडूमध्ये त्यानं हा टप्पा गाठला आहे. यापूर्वी हा विक्रम 366 चेंडूमध्ये वेस्ट इंडिजच्या एव्हिन लुइसने केला होता. लुइसचा विक्रम अभिषेकने मोडला आहे.

क्रिकेट तज्ज्ञांना अभिषेक शर्मामध्ये वीरेंद्र सेहवागची आक्रमकता आणि युवराज सिंगच्या फटकेबाजीची शैली दिसते.

अभिषेक शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, क्रिकेट तज्ज्ञांना अभिषेक शर्मामध्ये वीरेंद्र सेहवागची आक्रमकता आणि युवराज सिंगच्या फटकेबाजीची सुंदर शैली दिसते.

पाकिस्तानविरुद्ध सामन्यानंतर वीरेंद्र सेहवाग एका चर्चेत अभिषेकला समजावून सांगत होता की, जेव्हा तू 70 धावांपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्या धावसंख्येचं शतकात रुपांतर कर.

सेहवाग म्हणाला होता की, " या गोष्टी नंतर लक्षात येतात, कारण अशी संधी वारंवार मिळत नाही. मी काय सांगतोय, काही वेळात तुला युवराज सिंगचा फोन येईल, आणि तोही तुला हेच समजावून सांगेल."

सेहवागचा सल्ला ऐकल्यानंतर अभिषेक म्हणतो, "हो, तुम्ही बरोबर म्हणत आहात. मीही यावर काम करत आहे. हो, तेही (युवराज) हेच समजावून सांगतील."

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अभिषेकने फक्त 39 चेंडूमध्ये 74 धावांची खेळी केली होती. तो मोठे शॉट मारत होता, आणि ज्या चेंडूवर तो बाद झाला, त्यात फार ताकद नव्हती, तो मिसहिट झाला.

सेहवागने युवराज सिंगचा उल्लेख का केला, याबाबत आपण नंतर बोलू. आधी अभिषेक शर्माचं बालपण, टीनएज आणि तरुणपणातील प्रवासाकडे पाहू.

अभिषेक शर्माचा प्रवास

अभिषेक शर्माचे वडील बँकेत काम करायचे आणि क्रिकेटही खेळायचे. त्याच्या घरात आईशिवाय दोन मोठ्या बहिणी आहेत. एक बहीण शिक्षिका आहे, तर दुसरी डॉक्टर.

शर्मा जुने दिवस आठवतात, "मी जेव्हा मैदानावर जायचो, तेव्हा तो माझ्यासोबतच यायचा. मी मोठ्या मुलांना ट्रेनिंग देत असत, कोचिंग देत असत. मोठी मुलं अभिषेककडे पाहून म्हणायचे, 'तुमच्या मुलामध्ये खूप टॅलेंट आहे."

"त्याचा बॅट सरळ येते, तो सरळ शॉट मारतो आणि जोरात मारतो. असं वाटतं की तो मोठा खेळाडू होऊ शकतो. जेव्हा मी त्याचा जोश आणि त्याची आवड पाहिली, तेव्हा ठरवलं की त्याला क्रिकेटमध्ये घालायचं. मी सिलेक्टर होतो, रेफ्री होतो, कोच होतो, पण जेव्हा त्याला पाहिलं, तेव्हा ठरवलं की मीच त्याला कोचिंग देईन."

ग्राफिक कार्ड

अभिषेक फक्त क्रिकेटच खेळत नसत, तर अभ्यासही करत. तो दिल्ली पब्लिक स्कूल, अमृतसरमध्ये शिकत आणि प्रत्येक वेळी वर्गात 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवायचा.

राजकुमार शर्मा यांनी बीबीसीला सांगितलं की, "तो अभ्यासात खूप हुशार होता. तो स्पर्धा किंवा टूर्नामेंटमध्ये असला तरीही पेपर द्यायचा आणि उत्तम गुण मिळवायचा. कोणत्याही वर्गात त्याला कमी गुण मिळाले नाहीत. त्याने बीएपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे."

अभिषेकच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अभिषेकच्या आयुष्यात तो टर्निंग पॉइंट कधी आला, तो प्रोफेशनल सेटअपमध्ये कधी आला आणि शुभमन गिलशी त्याची मैत्री इतकी घट्ट कशी झाली?

खरं म्हणजे, काही वर्षांपूर्वी पंजाब क्रिकेट असोसिएशनने अंडर-12 आणि अंडर-14 संघ तयार केले होते आणि एक प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. नवीन मुलांना पुढं आणायचा उद्देश होता. त्याचे प्रमुख होते डी. पी. आजाद. ते कपिल देव यांचे गुरू होते. पंजाब क्रिकेटमध्ये त्यांना खूप आदर होता.

यासाठी संपूर्ण पंजाबमधून 30 मुलं निवडली गेली. त्या वेळी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल अजून लहान होते.

राजकुमार शर्मा म्हणतात, "हे दोघे खूप लहान होते. आजाद यांनीही सांगितलं की या दोघांमध्ये नैसर्गिक प्रतिभा आहे. मी मुलांना भेटायला गेलो, त्यांचा सामना पाहिला, तेव्हा आजाद आणि अरुण बेदीही तिथे होते. बेदी हे मला बाजूला घेऊन म्हणाले की, '30 मुलांमध्ये हे दोघे खास आहेत. लिहून ठेव, हे दोघं भारतासाठी खेळतील आणि ओपनिंगही करतील.'"

"यानंतर आजाद हेही आले. ते माझे गुरु आहेत, मी त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि ते म्हणाले, 'तुझ्या मुलामध्ये खूप टॅलेंट आहे, तो जेव्हा बॅटिंगसाठी येतो, मी पाहतच राहतो. ही असामान्य मुलं आहेत. आयुष्यभर माझी ही गोष्ट लक्षात ठेव, हे दोघंही भारताच्या टीमकडून खेळतील."

या दोन प्रशिक्षकांच्या बोलण्यामुळे राजकुमार शर्मांचा निर्धार आणखी मजबूत झाला. त्यांनी आणि अभिषेकने रात्रंदिवस मेहनत केली. ते बँकेत काम करत होते, पण सुटी घेऊन अभिषेकला ट्रेनिंग देत होते.

जेव्हा अभिषेक अंडर-14 संघात होता, तेव्हा त्याचे वडील 130 ते 140 किलोमीटर प्रती तास वेगाने बॉल टाकायचे. इतर प्रशिक्षक म्हणायचे, 'इतक्या वेगानं का टाकतोयस?' तर अभिषेक त्याच्या वडिलांना म्हणायचा, 'आणखी वेगाने बॉल टाका, मी खेळायला तयार आहे.'

अभिषेक शर्मा अंडर-16 मध्ये पंजाबचा कर्णधार होता. एका सत्रात त्यानं 1200 धावा केल्या आणि 57 विकेट घेतल्या, ज्यामुळे बीसीसीआयने त्याला नमन पुरस्कारानं सन्मानित केलं होतं.

यानंतर त्याला अंडर-19 नॉर्थ झोनचा कर्णधार करण्यात आलं आणि त्याचा संघ जिंकला. त्यानंतर तो नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये गेला, जिथे राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या प्रतिभेत आणखी सुधारणा झाली.

पुढे जाऊन अभिषेक अंडर-19 भारताचा कर्णधार झाला आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने श्रीलंकामध्ये झालेला आशिया कप जिंकला.

अभिषेकच्या खेळातील ही सुधारणा त्याला भारतीय क्रिकेटचा स्टार युवराज सिंगच्या जवळ घेऊन जात होती.

अभिषेकची युवराज सिंगशी भेट

दोघांची भेट रणजी ट्रॉफीमुळे झाली. पंजाब क्रिकेट असोसिएशनला अभिषेक आणि शुभमनला रणजीमध्ये संधी द्यायची होती. तेव्हा युवराज सिंग आपल्या आजारावर मात करून भारतीय संघात परत येण्याचा प्रयत्न करत होता आणि बीसीसीआयच्या सूचनेनुसार रणजी खेळण्यासाठी परत आला होता.

युवराज सिंगला सांगितलं गेलं की, अंडर-19 मधून दोन मुलं येत आहेत. त्यातील एक सलामीचा फलंदाज आहे आणि दुसरा लेफ्ट आर्म स्पिनर आहे, असं सांगण्यात आलं.

राज कुमार शर्मा आठवणींना उजाळा देताना सांगतात की, "युवराज म्हणाला की मला फलंदाज हवा आहे. कारण बॉलर माझ्याकडे आहेत. सिलेक्टर्स म्हणाले की, नाही, दोघांनाही संधी द्यावी.

एका सामन्यात तीन-चार खेळाडू लवकर बाद झाले. युवराज बॅटिंग करत होता. तो म्हणाला की, अभिषेकला पॅड घालवून पाठवा. मग तो आला आणि युवराज पाहतच राहिला. तो 40 धावांवर खेळत होता, अभिषेक आला आणि त्यानं झटपट 100 धावा केल्या."

अभिषेक शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजकुमार शर्मा सांगतात की, युवराज सिंग अभिषेकला ट्रेनिंग देत आहेत.

शर्मा म्हणाले की, युवराज सिंगने मैदानावरच अभिषेकला त्याच्याकडे ट्रेनिंग करायला येशील का असं विचारलं. त्यावर अभिषेकने उत्तर दिलं की, तो युवराजला आपला आयडल आणि देव मानतो आणि त्यांना पाहूनच खेळायला शिकला आहे. त्यानंतर ते आजपर्यंत युवराज अभिषेकला ट्रेनिंग देत आहे.

दोघांचे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हीडिओत युवराज सिंग अभिषेक शर्माला म्हणतो की, "तू ना सुधारी, बस सिक्स मारी जायें, थले ना खेलें." (तू काही सुधरत नाहीस, फक्त षटकार मारत राहतोस, ग्राऊंड शॉटही खेळत जा)."

राजकुमार शर्मा सांगतात, "युवराजच त्याला ट्रेनिंग देत आहे. तो माझ्या मुलाची पूर्ण काळजी घेत आहे. त्याला मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या ताकदवान बनवलं आहे. त्याचा एकही दिवस रिकामा जाऊ नये, म्हणून त्याच्या मागे संपूर्ण टीम लावली आहे. जर जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू त्याला ट्रेनिंग देतो, तर विचार करा की खेळाडू किती पुढे जाऊ शकतो. आता तर ही फक्त सुरुवात आहे!"

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)