भारतानं पाकिस्तानला हरवलं, पण साहिबजादा फरहानच्या सेलिब्रेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित

फोटो स्रोत, Getty Images
आशिया चषक 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सहज पराभव केला आहे.
पाकिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं हे आव्हान 6 विकेट राखून पूर्ण केलं
दुबईत झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 5 विकेट गमावत 171 धावा केल्या.
तर प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनीही आक्रमक सुरुवात करत पॉवरप्लेच्या 6ओव्हरमध्ये बिनबाद 69 धावा केल्या.
त्यानंतर भारतानं सामन्यात घेतलेली आघाडी कायम ठेवत विजय साकारला. अभिषेक शर्मानं सामन्यात 74 धावांची तडाखेबाज खेळी केली आहे.

फोटो स्रोत, ANI
दरम्यान, पहिल्या सामन्यात हात मिळवण्यावरून झालेल्या वादामुळं या सामन्याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. पण या सामन्यातही 'हँडशेक' झालं नसल्याचं पाहायला मिळालं.
शिवाय, अर्धशतक ठोकल्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान ज्या पद्धतीने सेलिब्रेशन करत होता त्यावरून बरीच चर्चा झाली. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केल्या.
साहिबजादा फरहानच्या सेलिब्रेशनवर प्रश्न उपस्थित
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहानच्या अर्धशतकानंतरच्या सेलिब्रेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, "शाब्बास मोदीजी! एवढेच पाहायचे होते, म्हणूनच तुम्ही क्रिकेट खेळवत आहात का? त्याची हे करण्याची हिंमत कशी झाली? नरेंद्र मोदी एक कमकुवत पंतप्रधान आहेत."
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, "बीसीसीआयचे अभिनंदन. मला आशा आहे की, हे फोटो तुम्हाला पुरेसे समाधान देतील आणि दोन्ही देशांमधील 'ऑलिंपिक' भावनेवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. हे त्रासदायक आहे, परंतु रक्ताच्या थारोळ्यात पैसे कमवण्यात व्यग्र असलेल्यांसाठी नाही."
राजकारण्यांव्यतिरिक्त, इतर सोशल मिडिया युजर्सही फरहानच्या सेलिब्रेशनवर बोलताना दिसले. जितेश नावाच्या युजरने लिहिले, "साहिबजादा फरहानने त्याचे अर्धशतक अशा प्रकारे साजरे केले. मोदीजी, जर हे युद्ध नाही, तर मग काय आहे?"
अशा पद्धतीचे हावभाव करणारा तो पहिलाच खेळाडू नाही
साहिबझादा फरहाननं बॅट बंदुकीसारखी फिरवत केलेल्या सेलिब्रेशनची चर्चा होते आहे. पण क्रिकेटमध्ये किंवा खेळात अशा पद्धतीचे हावभाव करणारा तो पहिलाच खेळाडू नाही.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं 2006 साली श्रीलंकेविरुद्ध जयपूरमधल्या सामन्यात शतक झळकावल्यावर बॅटनं गनशॉट मारल्यासारखं केलं होतं.
त्यानंतर पाकिस्तानच्या आसिफ अलीनंही 2021 च्या ट्वेन्टी20 विश्वचषकात अफगाणिस्तानवरील विजयानंतर गनशॉट सेलिब्रेशन केलं होतं.
तर 2024 सालच्या आयपीएलमध्ये बंगळुरूचा विराट कोहली आणि पंजाबचा रिली रुसो यांनी बंदुकीसारखे हातवारे केले होते.
आता फरहाननं केलेल्या गनशॉट सेलिब्रेशनची जास्त चर्चा होते आहे, कारण त्याला भारत-पाकिस्तान संघर्षाची पार्श्वभूमी आहेत.
खेळात असं गनशॉट सेलीब्रेशन हा काही देशांमध्ये एक संवेदनशील मुद्दा ठरला आहे. अमेरिकेत गन व्हायलन्स म्हणजे बंदुकीनं हिंसाचाराच्या घटना सातत्यानं घडत असतात. त्यामुळे तिथे कुणा खेळाडूंनी असे हातवारे करण्यावरून याआधी वाद झाले आहेत.
यंदा जा मोरँट या बास्केटबॉलपटवर त्यासाठी कारवाईही झाली होती.
पाकिस्तानची फलंदाजी
पाकिस्ताननं पॉवरप्लेमध्ये एक विकेट गमावत 55 धावा केल्या. पण भारतानं दोन महत्त्वाचे आणि अगदी सोपे झेल सोडल्याचं पाहायला मिळालं.
दुसऱ्याच चेंडूवर अभिषेक शर्मानं साहिबजादा फरहानचा झेल सोडला. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी आक्रमक होत फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. बुमराच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाकिस्ताननं 11 धावा केल्या. झमाननं दोन चौकार लगावले.
पण हार्दिक पांड्यानंतर पुढच्या ओव्हरमध्ये फखर झमानला बाद केलं. सॅमसननं त्याचा झेल घेतला. तो 15 धावा करून परतला. त्यानंतर सायम अयूब फलंदाजीसाठी आला.
पाचव्या ओव्हरमध्येही कुलदीप यादवनं आणखी एक झेल सोडला. सायम अयूबचा अगदी सोपा झेप त्यानं सोडला.
बुमराच्या सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये पाकिस्ताननं 34 धावा केल्या.

फोटो स्रोत, ANI
त्यांनंतर अभिषेकनं पुन्हा एकदा वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर फरहानचा झेल सोडला. दोन जीवदान मिळालेल्या फरहाननं 37 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
त्या जोरावर पाकिस्ताननं 10 ओव्हरमध्ये 91 धावा केल्या.
ब्रेकनंतर सूर्यकुमार यादवनं शिवम दुबेला गोलंदाजीला बोलावलं आणि त्यानं भारताला विकेट मिळवून दिली.
त्यानंतर पाकिस्तानच्या धावांचा वेग कमी झाला आणि त्यानंतर 14व्या ओव्हरमध्ये कुलदीपनं हुसैनला बाद करत भारताला तिसरी विकेट मिळवून दिली.
त्यानंतर शिवम दुबेनं अर्धशतकी खेळी केलेल्या साहीबजादा फरहानलाही बाद करत भारताला चौथी विकेट मिळवून दिली.
शिवमनं भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करत पाकिस्तानचे दोन फलंदाज बाद केले, तेही अगदी मोक्याच्या क्षणी.
त्यानंतर पाकिस्तानचा खेळ मंदावला. त्यामुळं 10 ओव्हरमध्ये 91 धावांवर एक विकेटवरून 15 ओव्हरमध्ये 4 बाद 119 अशी पाकिस्तानची अवस्था झाली.
त्यानंतर सूर्यानं मोहम्मद नवाजला धावबाद केलं.
20 ओव्हरमध्ये पाकिस्ताननं 5 बाद 171 धावा केल्या. त्यामुळं भारताला विजयासाठी 172 धावांचं आव्हान मिळालं.
भारताची आक्रमक सुरुवात
पाकिस्ताननं दिलेलं 172 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली.
अभिषेकनं डावाच्या पहिल्याच चेंडूवर शाहीन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर षटकार खेचत इरादे स्पष्ट केलं. त्यानंतर त्याच्या दमदार फटकेबाजीला शुभमन गिलच्या क्लास दर्शवणाऱ्या फटक्यांची साथ मिळाली.
दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारतानं पॉवरप्लेमध्ये बिनबाद 69 धावा केल्या.

त्यानंतरही अभिषेक शर्मा आणि शुभमननं फटकेबाजी सुरू ठेवली. त्यामुळं 8 व्या ओव्हरमध्ये 24 चेंडूंमध्ये अभिषेक शर्मानं अर्धशतक पूर्ण केलं.
त्यानं चार चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ही कामगिरी केली.
नवव्या ओव्हरमध्ये बिनबाद शतकी भागिदारी करण्याची कामगिरी भारताच्या या सलामीवीरांनी केली.
अभिषेकनं या मालिकेत आधीही फटकेबाजी केली होती. पण त्याला अर्धशतकापर्यंत पोहोचता आलेलं नव्हतं. या सामन्यात मात्र त्यानं हा टप्पा ओलांडला.
त्यानं सामन्यात 74 धावा केल्या.

तर शुभमन गिलची बॅट मालिकेत प्रथमच तळपल्याचं पाहायला मिळालं.
पण ड्रिंक्स ब्रेकनंतर भारताला एका पाठोपाठ दोन धक्के बसले. शुभमन गिल 28 चेंडूंमध्ये 47 धावा करून तो बाद झाला.
त्यानंतर आलेला कर्णधार सूर्यकुमार यादव अवघे तीन चेंडू खेळून शून्यावर बाद झाला.
अभिषेक शर्मा मोठ्या खेळीच्या मार्गावर होता. पण एक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. पण तोपर्यंत त्यानं त्याची कामगिरी चोखपणे बजावली होती.
त्यानंतर सॅमसन, तिलक आणि हार्दिकनं औपचारिकता पूर्ण करत भारताला 6 विकेट आणि 7 चेंडू राखत सहज विजय मिळवून दिला.
हस्तांदोलनाचा वाद
या मागील सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं 15 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर विजयी षटकार खेचला.
त्यानंतर तो लगेचच क्रिजवर असलेल्या शिवम दुबेसह थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला.
साधारणपणे सामना जिंकल्यानंतर विरोधी संघाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याची परंपरा असते. पण 14 सप्टेंबर रोजी दुबईत झालेल्या सामन्यात ते चित्र पाहायला मिळालं नाही.
पाकिस्तानचा एकही क्रिकेटपटू भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढं आला नाही.
तसंच भारतीय संघातील इतर क्रिकेटपटूही ड्रेसिंग रूममध्येच थांबले. सामना संपल्यानंतर ते मैदानात आले नव्हते.

फोटो स्रोत, Getty Images
टॉस दरम्यानही भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम दिसला होता. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉसनंतरही पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगाशी हस्तांदोलन केलं नव्हतं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची चाहत्यांना कायम उत्सुकताच नव्हे तर एक वेगळ्या प्रकारचा उत्साहदेखिल असायचा.
पण यावेळी पहलगाम हल्ल्यामुळं सामन्यापूर्वी बहिष्कारासाठी एकप्रकारची मोहीम सुरू होती. काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी पाकिस्तानविरोधात खेळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते.
या सामन्यातही हँडशेक झालं नसल्याचं दिसून आलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











