भारत-पाकिस्तान सामन्यावर पहलगाम हल्ल्याचं सावट, दोन्ही देशांच्या खेळाडूंनी हस्तांदोलनही केलं नाही

फोटो स्रोत, Getty Images
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं आशिया चषकात पाकिस्तानवरचा विजय भारतीय सैनिकांना समर्पित केला आहे.
मुंबईकर सूर्यानं दुबईत उत्तुंग षटकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आणि आपला 35 वा वाढदिवसही दिमाखात साजरा केला.
त्यानं 37 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 47 धावांची खेळी केली. त्यामुळेच पाकिस्ताननं दिलेलं 128 धावांचं लक्ष्य भारताला आरामात गाठता आलं.
खरंतर टीम इंडियानं या सामन्यात खेळावं की नाही यावरून गेले काही दिवस भारतात चर्चा सुरू होती.
दोन्ही देशांमधल्या तणावाच्या सावटाखाली हा सामना सुरू झाला. मात्र त्यात भारतानं एकतर्फी वर्चस्व गाजवलेलं दिसलं.

फोटो स्रोत, Getty Images
सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये सूर्यकुमार बोलण्यासाठी आला, तेव्हा उपस्थित सर्वांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानं हा विजय म्हणजे भारतासाठी रिटर्न गिफ्ट असल्याचं सांगितलं.
त्यानंतर तो म्हणाला, 'आम्ही पहलगाममधल्या अतिरेकी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आम्ही आजचा हा विजय भारताच्या सैन्यदलांना समर्पित करू इच्छितो.'

दुबईतल्या विजयासोबतच भारतानं ट्वेन्टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानवरचं वर्चस्वही पुन्हा सिद्ध केलं आहे.
क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्य भारत आणि पाकिस्तान आजवर 14 वेळा आमने सामने आले आहेत, त्यात भारताचा हा अकरावा विजय ठरला आहे.
खेळाडूंनी हस्तांदोलनही केलं नाही
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं 15 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर विजयी षटकार खेचला. त्यानंतर तो लगेचच क्रिजवर असलेल्या शिवम दुबेसह थेट ड्रेसिंग रूममध्ये गेला.
साधारणपणे सामना जिंकल्यानंतर विरोधी संघाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याची परंपरा असते. पण रविवारी दुबईत ते चित्र पाहायला मिळालं नाही.
पाकिस्तानचा एकही क्रिकेटपटू भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढं आला नाही. तसंच भारतीय संघातील इतर क्रिकेटपटूही ड्रेसिंग रूममध्येच थांबले. सामना संपल्यानंतर ते मैदानात आले नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
टॉस दरम्यानही भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा परिणाम दिसला. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉसनंतरही पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगाशी हस्तांदोलन केलं नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची चाहत्यांना कायम उत्सुकताच नव्हे तर एक वेगळ्या प्रकारचा उत्साहदेखिल असायचा. पण यावेळी पहलगाम हल्ल्यामुळं सामन्यापूर्वी बहिष्कारासाठी एकप्रकारची मोहीम सुरू होती.
काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी पाकिस्तानविरोधात खेळण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते.
कदाचित त्यामुळंच मैदानात अनेक खुर्च्या रिकाम्या दिसत होता. भारत पाकिस्तान सामन्यात शक्यतो असं चित्र दिसत नाही.
भारतानं असा साजरा केला विजय
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 20 षटकांत 128 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं.
कुलदीप यादवने चार षटकांत तीन गडी बाद करून पाकिस्तानला 127 धावांवर रोखण्यात महत्वाची भूमिका बजावली.

जसप्रीत बुमरा आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन विकेट्स काढल्या. तर वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
मग विजयासाठीचं 128 धावांच लक्ष्य भारतानं 15.5 षटकांत तीन बळींच्या बदल्यात पार केलं.
सूर्यकुमारची कमाल
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलनं आश्वासक सुरुवात तर केली, पण दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर सैम अयुबने गिलला 10 धावांवर यष्टीचित केलं. तेव्हा भारताचा स्कोर 1 बाद 22 असा होता.
मग अभिषेक शर्माने आक्रमक खेळ करत 13 चेंडूत दोन षटकार आणि चार चौकार मारत 31 धावा केल्या. मात्र सैम अयुबनं त्याला झेलबाद केलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने तिलक वर्मासह डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली.
तिलक वर्माने 31 चेंडूत 31 धावांची खेळी केली. 13 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सैम अयुबनेच तिलक वर्माचा त्रिफळा उडवला.

सूर्यकुमारनं मग मुंबईच्याच शिवम दुबेसोबत 34 धावांची भागीदारी करत भारताला विजयापर्यंत नेलं.
सूर्यकुमार 47 धावांवर नाबाद राहिला, तर शिवम दुबेने 10 धावांची नाबाद खेळी केली.
पाकिस्तानच्या डावात काय घडलं?
सामन्यापूर्वी पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा सलामीवीर सैम अयुबला हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर माघारी धाडलं.
जसप्रीत बुमराहने दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद हारिसला बाद केले. 1.2 षटकांत पाकिस्तानने 6 धावांवर दोन गडी गमावले होते. त्यानंतर फरहानने फखर जमानसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला,
आठव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अक्षर पटेलने फखर जमानला बाद करून ती जोडी फोडली. मग अक्षरनेच 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याला बाद केले.

फोटो स्रोत, Getty Images
13व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर कुलदीप यादवने हसन नवाजला बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर त्याने मोहम्मद नवाजला खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.
सलामीवीर साहिबजादा फरहान 16 षटकांपर्यंत टिकून होता, मात्र 17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीप यादवने त्याला बाद केले. त्याने 44 चेंडूत 40 धावा केल्या.
वरुण चक्रवर्तीने फहीम अशरफची तर जसप्रीत बुमराहने सुफियान मकीमची विकेट काढली, तेव्हा पाकिस्तान शंभर धावाही गाठेल का अशी स्थिती होती.
मात्र शाहीन शाह आफ्रिदीने चार षटकारांच्या मदतीने 16 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी करत पाकिस्तानला 20 षटकांत 9 गडी गमावून 127 धावांपर्यत पोहोचवलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











