'डिअर BCCI, एक कारण सांगा', रोहितला हटवण्यावर चाहते आणि माजी क्रिकेटपटूंचे म्हणणे काय?

रोहित शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला भारतीय वनडे संघाचा कर्णधार नेमण्यात आलंय. गिल 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करेल.

रोहित शर्माची वनडे संघात निवड झालीय. त्याच्या सोबत विराट कोहलीही टीममध्ये असेल. मात्र, हे दोन्ही खेळाडू शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळतील.

मुख्य निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना जेव्हा रोहित शर्मा यांना कर्णधारपदावरून हटवण्याबाबत विचारले गेले, तेव्हा त्यांनी सांगितलं की, हा निर्णय 2027 च्या वनडे वर्ल्डकपचा विचार करून घेतला आहे.

रोहित शर्मानं अद्याप या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण सोशल मीडियावर या निर्णयावरून एकच गदारोळ पाहायला मिळतोय. कुणी बीसीसीआयच्या निर्णयावर टीका करतंय, तर कुणी रोहित शर्माचं समर्थन.

वनडेतील कर्णधारपद मिळाल्याबद्दल शुभमन गिलने आनंद व्यक्त करत म्हटलं की, "आमच्याकडे वर्ल्डकपपूर्वी सुमारे 20 वनडे सामने आहेत आणि आमचं सर्वात मोठे लक्ष्य म्हणजे 2027 साली दक्षिण आफ्रिकेत होणारा वनडे वर्ल्डकप जिंकणं."

ग्राफिक्स

अजित आगरकर यांना विचारले गेले की, हा निर्णय रोहित शर्माला अधिकृत घोषणेनंतर कळवला गेला का? त्यावर आगरकर म्हणाले की, हा निर्णय रोहितला आधीच सांगण्यात आला होता.

पण रोहितने काय प्रतिक्रिया दिली, असं अजित आगरकर यांना विचारलं तेव्हा त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. "माझी आणि रोहितमधली खासगी चर्चा आहे, मी ती सार्वजनिक करू इच्छित नाही," असं आगरकर म्हणाले.

आगरकर म्हणाले की, नव्या कर्णधाराला भविष्यासाठी तयारी करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि संघासोबत वेळ घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणं आवश्यक आहे.

अजित आगरकर

अजित आगरकर यांच्या मते, "पुढचा वनडे वर्ल्डकप आणखी दोन वर्षे दूर आहे. तोवर नव्या कर्णधाराला संघाशी जुळवून घेण्याची आणि तयारीची संधी मिळेल. म्हणूनच हा निर्णय आत्ताच घेतला आहे."

"तिन्ही फॉरमॅट्ससाठी (टेस्ट, वनडे, टी-20) वेगळे कर्णधार निवडणं सोपं नसतं. त्यामुळं संघाच्या व्यवस्थापनात अडचण येते. रोहित टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झालाय, त्यामुळं निवडकर्त्यांनी ठरवलं की, वनडे कर्णधारपदही एखाद्या तरुण खेळाडूला द्यावं."

आगरकर यांनी मान्य केलं की, "हा निर्णय सोपा नव्हता, कारण रोहितने भारताला 2023 च्या वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले आणि यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकवून दिली."

ग्राफिक्स

भारताचा माजी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगने रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधारपदावरून दूर केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत म्हटलं की, वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहितला ऑस्ट्रेलियात संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळायला हवी होती.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार हरभजनने जिओ हॉटस्टारशी बोलताना म्हटलं की, "शुभमन गिलला शुभेच्छा. निश्चितच तो टेस्ट क्रिकेटमध्ये चांगले नेतृत्व करत आहे आणि आता त्याला आणखी एक जबाबदारी देण्यात आलीय, वनडे कर्णधारपदाची. रोहितच्या जागी गिलला कर्णधार करण्यात आलं आहे. रोहितचा व्हाईट बॉल क्रिकेटमधील रेकॉर्ड खूपच चांगला आहे."

हरभजन पुढे म्हणाला की, "रोहित कर्णधार नसणं माझ्यासाठी थोडं धक्कादायक आहे. जर तुम्ही रोहित शर्माची निवड करत आहात, तर त्यालाच कर्णधार बनवा. कारण अलीकडेच त्याने तुम्हाला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून दिलीय. माझ्या मते, किमान या दौऱ्यात तरी त्याला संधी मिळायला हवी होती. 2027 चा वर्ल्डकप अजून खूप लांब आहे."

हरभजन सिंह

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा म्हणाला की, जसा वेळ रोहित शर्माला मोठ्या स्पर्धांपूर्वी दिला गेला होता, तसाच वेळ शुभमन गिललाही देणं योग्य आहे.

आकाश चोप्रा म्हणाला की, "रोहित शर्माने 2022 च्या वर्ल्डकपमध्ये नेतृत्व केलं आणि 2024 च्या वर्ल्डकपमध्येही कर्णधार होता. त्याला सांगण्यात आलं होतं की, तुमच्या मर्जीने संघ तयार करा. त्यावेळी चार फिरकीपटू घेऊन गेला आणि त्यानं सांगितलं की, मला हे करू द्या. परिणामी तो ट्रॉफी घेऊन आला. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. त्यामुळे जर रोहितला वेळ दिला असेल, तर शुभमन गिललाही वेळ दिला पाहिजे."

भारतीय क्रिकेट संघाचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं की, या निर्णयासाठी निवडकर्ते आणि रोहित शर्मा यांच्यात चर्चा होणे फार आवश्यक आहे.

अभिषेक नायर म्हणाले, "माझ्यासाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे, तुमची (निवडकर्त्यांची) रोहित शर्माशी चर्चा झाली आहे का? जर दोघे (निवडकर्ते आणि रोहित) या गोष्टीवर सहमत असतील की, आपण शुभमन गिलला संधी द्यावी, तर योग्य आहे.

खरं उत्तर रोहितच देऊ शकतो. माझ्या मते, कर्णधार म्हणून त्यांची तयारी 2027 च्या वर्ल्डकपसाठी होती. त्यामुळे मी अपेक्षा करतो की, संवाद झाला असेल आणि रोहितलाही तो मान्य असेल."

ग्राफिक्स

माजी खेळाडू आणि तज्ज्ञांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही या निर्णयावर जोरदार चर्चा होत आहे.

सोशल मीडिया यूझर विशालने लिहिले, "पाच आयपीएल ट्रॉफी आणि अनेक वर्षांच्या मेहनतीच्या बदल्यात मुंबई इंडियन्सने त्याला काय दिले? फक्त अपमान आणि धोका. सलग दोन आयसीसी ट्रॉफी आणि वर्षानुवर्षांच्या यशाच्या बदल्यात बीसीसीआयने काय दिले? फक्त अपमान आणि धोका."

तनयने लिहिलं, "डिअर बीसीसीआय, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यासाठीचं एक कारण मला सांगा."

शुभमन गिल

फोटो स्रोत, Getty Images

तर काही जण बीसीसीआयच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत.

'गिल द विल' नावाच्या अकाउंटवरून लिहिलं गेलं की, "मला माहिती आहे की, तुम्ही सर्व (रोहित शर्मा फॅन्स) नाराज आहात. कारण आता शुभमन गिल कर्णधार झाला आहे. पण गिलला ट्रोल करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की, जेव्हा रोहितने विराटची जागा घेतली होती, तेव्हा तुम्ही त्याला पूर्ण सपोर्ट केला होता ना?

तर आता तसाच सन्मान शुभमन गिललाही दिला पाहिजे. कर्णधार म्हणून इतक्या सुंदर आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद, रोहित शर्मा!"

भावना नावाच्या यूझरने लिहिलंय की, "शुभमन गिलला मनःपूर्वक शुभेच्छा. रोहितच्या जागी वनडेत नेतृत्व करणं सोपी गोष्ट नाही. त्याने एक मोठी परंपरा तयार केलीय, जिला पुढे नेणं ही आता गिलची मोठी जबाबदारी असेल."

भारतीय संघ 19, 23 आणि 25 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामने खेळेल. त्यानंतर 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)