पाकिस्तानची माजी क्रिकेटर सना मीर काश्मीरबद्दल असं काय म्हणाली की ज्यामुळे मोठा वाद झाला?

फोटो स्रोत, Getty Images
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या वादावर चर्चा होत असतानाच आता आयसीसीचा महिला विश्वचषक 2025 देखील वादाच्या भोवऱ्यात सापडतो आहे.
महिलांच्या विश्वचषकात निर्माण झालेला हा वादही भारत आणि पाकिस्तानसंदर्भातच आहे.
पाकिस्तानची माजी कर्णधार आणि आता समालोचक झालेली सना मीरनं महिला क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये होत असलेल्या सामन्याच्या वेळी पाकिस्तानच्या एका संघाचा परिचय करून देताना 'पाकिस्तान प्रशासित काश्मीर'ला 'आझाद काश्मीर' म्हटलं.
यानंतर भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर सना मीरवर टीका होत आहे.
अर्थात नंतर सना मीरनं 'एक्स'वर लिहिलं की, ज्याप्रकारे गोष्टी वाढवून सांगितल्या जात आहेत ते खूपच दुर्दैवी आहे.
यातून खेळाडूंवर विनाकारण दबाव निर्माण केला जातो आहे. हे दुखद आहे की, यावर सार्वजनिकरित्या स्पष्टीकरण देण्याची मागणी केली जात आहे.
पाकिस्तानचं काश्मीरच्या ज्या भागावर नियंत्रण आहे, त्याला पाकिस्तान 'आझाद काश्मीर म्हणतो.
भारत सरकारची भूमिका आहे की, हा भाग कायदेशीरदृष्ट्या भारताचा आहे. जम्मू-काश्मीरचे राजे, राजा हरी सिंह यांनी काश्मीरचं भारतात विलीनीकरण करण्याच्या करारावर सही केली होती. त्या दस्तावेजानुसार हा भारताचा भाग आहे.
सना मीर काय म्हणाली होती?

फोटो स्रोत, Getty Images
महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश या पहिल्या सामन्याच्या वेळी सना मीरनं 'आझाद काश्मीर'चं वक्तव्यं केलं.
सना मीर पाकिस्तानी फलंदाज नतालिया परवेजचा परिचय करून देत होती. त्यावेळेस सना म्हणाली, "तिनं अनेक युवा संघांचं कर्णधारपद भूषवलं आहे. या युवा संघानं क्वालिफायर सामने जिंकले आहेत. मात्र यातील बहुतांशजण नवीन आहेत."
"नतालिया आझाद काश्मीरची असून ती लाहोरमध्ये बरंच क्रिकेट खेळते. तिला क्रिकेट खेळण्यासाठी बहुतांशवेळा लाहोरला यावं लागतं."
सना मीरच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियामध्ये लगेचच प्रतिक्रिया उमटली.
अनेक भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर आयसीसी आणि बीसीसीआयला टॅग करून क्रिकेटचं राजकारण केल्याचे आरोप केला आणि सनाला समालोचनातून हटवण्याची मागणी केली.

सोशल मीडियावर चाहते काय म्हणाले?
सना मीर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एक्सवर अंकित भारोश या युजरनं म्हटलं, "क्रिकेटमध्ये राजकारण आणणं हे फक्त चुकीचंच नाही, तर ते आयसीसीच्या नियमांचं उल्लंघनदेखील आहे. खेळ देश जोडण्याचं साधन असलं पाहिजे. त्याचा वापर प्रोपगंडा पसरवण्यासाठी होता कामा नये."
राहुल रावत या युजरनं म्हटलं, "पाकिस्तानच्या माजी कर्णधार सना मीरनं आज लाईव्ह कॉमेंट्री करताना 'काश्मीर'चा मुद्दा उपस्थित करून वाद निर्माण केला. तिनं एका पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करून देताना ती खेळाडू 'आझाद काश्मीर'ची असल्याचं सांगितलं."
"भारत या महिला विश्वचषकाचं आयोजन करतो आहे आणि आशा आहे की, आयसीसी सना मीरच्या विरोधात कारवाई करेल."

फोटो स्रोत, Getty Images
अजय जांगिड या आणखी एका युजरनं एक्सवर सना मीरच्या विरोधात आयसीसी आणि बीसीसीआयच्या कारवाईची मागणी करत म्हटलं, "'आझाद काश्मीर' नावाची कोणतीही जागा नाही. जागतिक स्तरावर याप्रकारे बोलणं खूप आक्षेपार्ह आहे. यावर लगेचच आणि कठोर कारवाई करण्यात यावी."
"सना मीरवर बंदी घालण्यात यावी. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. क्रिकेटमध्ये याप्रकारचा भारतविरोधी प्रोपगंडा सहन करता येणार नाही!"
आणखी एका युजरनं म्हटलं, "जागतिक स्तरावर याप्रकारे अजिबात बोलता येणार नाही. सना मीरला याची जबाबदारी घ्यावी लागेल. 'आझाद काश्मीर' नावाची कोणतीही जागा नाही."
सना मीरनं दिलं स्पष्टीकरण
सना मीरच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्यानंतर सना मीरनं संपूर्ण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं.
सोशल मीडियावर पोस्ट करत सनानं म्हटलं, "ज्याप्रकारे गोष्टी वाढवून मांडल्या जात आहेत आणि खेळांशी संबंधित लोकांवर अनावश्यक दबाव टाकला जातो आह, हे दुर्दैवी आहे. यासाठी सार्वजनिकरित्या स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे ही दुखद बाब आहे."
"एका पाकिस्तानी खेळाडूच्या होमटाऊनवरील माझ्या वक्तव्याचा उद्देश फक्त इतकंच सांगण्याचा होता की पाकिस्तानच्या त्या भागातील असलेल्या तिला किती आव्हानांना तोंड द्यावं लागतं आहे, तिचा प्रवास किती खडतर होता."
"खेळाडू कुठल्या भागातील आहे, हे आम्ही समालोचक म्हणून सांगत असतो, हा त्याचा एक भाग आहे. मी आज दुसऱ्या भागातील दोन इतर खेळाडूंच्या बाबतीतदेखील असंच बोलले होते."

फोटो स्रोत, X
सना मीरनं पुढे म्हटलं, "कृपया याचं राजकारण करू नये. एक समालोचक म्हणून, आमचं काम, खेळ, संघ आणि खेळाडूंवर लक्ष केंद्रीत करण्याचं आहे. खेळाडूंची हिंमत आणि दृढनिश्चयाच्या प्रेरक कहाण्या समोर आणण्याचं आहे."
"माझ्या मनात कोणतीही वाईट भावना नाही किंवा भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही. मी खेळाडूंबद्दल बहुतेकवेळा जिथून माहिती घेते, त्याचे मी स्क्रीनशॉटदेखील देते आहे. मग ते पाकिस्तानचे खेळाडू असोत की इतर कोणत्याही देशाचे असोत."
"मला माहिती आहे की, आतापर्यंत त्यांनी यात बदल केला आहे, मात्र मी याबद्दलच बोलत होते."
महिला विश्वचषकदेखील वादाच्या सावटाखाली
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या पुरुष खेळाडूंनी हस्तांदोलन न करण्यावरून आणि भारतीय संघाला कथितरित्या ट्रॉफी न देण्यावरून वाद शिगेला पोहोचला असतानाच, सना मीरचं 'आझाद काश्मीर'बद्दलचं वक्तव्यं समोर आलं आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले होते की ज्यावेळेस महिला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ समोरा-समोर असतील, तेव्हा या गोष्टीची खात्री नाही की दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलन करतील की नाही, तेव्हापासूनच
या वादाचं सावट महिला विश्वचषकावर देखील पडू लागल्याचं दिसत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
सैकिया बीबीसच्या स्पंप्ड या कार्यक्रमात म्हणाले होते, "मी कोणतीही भविष्यवाणी करू शकत नाही. मात्र शत्रुत्व असणाऱ्या त्या देशाबद्दलचे आमचे संबंध तसेच आहेत. गेल्या आठवड्यात त्यात कोणताही बदल झालेला नाही."
ते म्हणाले होते, "भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोलंबोमध्ये होईल. त्यावेळेस क्रिकेटशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचं पालन केलं जाईल. क्रिकेटबद्दल एमसीसीचे जे नियम आहेत, त्यानुसार वागलं जाईल इतकाच विश्वास मी देऊ शकतो."
"हस्तांदोलन होईल की गळाभेट घेतील की नाही, याबद्दल सध्या मी कोणतंही आश्वासन देऊ शकत नाही."
मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष झाला होता. त्यानंतर दुबईत झालेल्या आशियात कपमध्ये पाकिस्तानचे प्रशिक्षक माइक हसन म्हणाले होते की भारतानं पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.

हस्तांदोलन न केल्यानं निर्माण झालेला तणाव संपूर्ण सामन्याच्या वेळेस होता. भारतानं विजेतेपदाची ट्रॉफी एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते स्वीकारली नाही, त्यानंतर हा तणाव शिगेला पोहोचला होता.
भारतीय खेळाडूंनी दावा केला की नकवी आशिया कपच्या ट्रॉफी त्यांच्यासोबत घेऊन गेले.
भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये काही बातम्या समोर आल्या होत्या. त्यात दावा करण्यात आला होता की पाकिस्ता क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी 28 सप्टेंबरला आशिया कपचा अंतिम सामना झाल्यानंतर झालेल्या वादासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) माफी मागितली आहे.
अर्थात बुधवारी (1 ऑक्टोबर) मोहसिन नकवी यांनी या सर्व बातम्या फेटाळल्या होत्या.
आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नकवी पुन्हा म्हणाले आहेत की जोपर्यंत टीम इंडिया स्वत: आशिया कपची ट्रॉफी त्यांच्याकडून घेत नाही तोपर्यंत भारताला ती ट्रॉफी दिली जाणार नाही.
इस्लामाबादमधून बीबीसीचे प्रतिनिधी फरहत जावेद यांनी सांगितलं की नकवी यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, "एसीसीचा अध्यक्ष म्हणून मी त्या दिवशी ट्रॉफी देण्यासाठी तयार होतो आणि अजूनही तयार आहे. जर त्यांना ट्रॉफी हवी असेल, तर ते एसीसी कार्यालयात येऊन माझ्या हस्ते ही ट्रॉफी घेऊ शकतात."
हस्तांदोलन आणि ट्रॉफीचा वाद
दुबई अलीकडचे नकवी यांच्या अध्यक्षतेखाली एसीसीची बैठक झाली, त्यानंतर मंगळवारी (30 सप्टेंबर) त्यांचं हे वक्तव्यं आलं आहे.
या बैठकीत बीसीसीआयकडून उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि माजी खजिनदार आशिष शेलार व्हर्च्युअल पद्धतीनं सहभागी झाले होते.
असं मानण्यात येतं आहे की सूर्यकुमार यादवच्या टीमला ट्रॉफी आणि विजेत्यांचं पदक दिलं जाईल की नाही यावर या बैठकीत कोणताही मार्ग निघू शकला नाही.
नकवी पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि गृह मंत्रीदेखील आहेत.
नकवी यांनी एक्सवर लिहिलं, "भारतीय प्रसारमाध्यमं सत्य मांडत नाही, तर खोटी वृत्तं देतं. मला स्पष्ट करायचं आहे की मी काहीही चुकीचं केलेलं नाही आणि बीसीसीआयची माफीदेखील मागितलेली नाही आणि कधी मागणारदेखील नाही."

फोटो स्रोत, Getty Images
मोहसिन नकवी यांनी भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांचं खंडन केलं.
ते म्हणाले, "या खोट्या बातम्या म्हणजे स्वस्त प्रचार आहे. त्यांचा एकमेव उद्देश भारतातील लोकांची दिशाभूल करणं हा आहे. दुर्दैवानं भारत क्रिकेटमध्ये राजकारण आणत आला आहे आणि त्यातून खऱ्या खिलाडूवृत्तीच्या भावनेचं नुकसान करतो आहे."
नकवी यांनी पुढे लिहिलं आहे, "एसीसीचा अध्यक्ष म्हणून मी त्या दिवशी ट्रॉफी देण्यास तयार होतो आणि आजदेखील तयार आहे. जर भारतीय क्रिकेट संघाला खरोखरंच ट्रॉफी हवी असेल, तर त्यांनी आनंदानं एसीसीच्या कार्यालयात यावं आणि माझ्याकडून ट्रॉफी घ्यावी."
क्रिकेटमध्येच हे वाद का होतात?
दरम्यान अनेकजण हा प्रश्नदेखील उपस्थित करत आहेत की शेवटी भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटवरूनच अशाप्रकारचं राजकीय तणाव किंवा वाद का निर्माण होतो. इतर खेळांच्या बाबतीत तसं का होत नाही.
मे महिन्यात 'ऑपरेशन सिंदूर' झाल्यानंतर जून 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ एशियन स्क्वॅश डबल्स चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात समोरा-समोर आले होते.
सप्टेंबर महिन्यात दोन्ही देशांच्या अंडर-17 फुटबॉल संघांमध्ये सॅफ चॅम्पियनशिपमध्ये सामना झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
या स्पर्धा कोणत्याही वादाशिवाय किंवा गदारोळाशिवाय झाल्या. कोणत्याही राजकीय पक्षानं काहीही वक्तव्यं केलं नाही, तसंच बहिष्काराचं आवाहनदेखील केलं नाही.
सोशल मीडियादेखील तेव्हा जवळपास शांतच होता. कोणीही मीम्स टाकले नाहीत किंवा बंदी घालण्याचीही मागणी केली नाही. कारण उघड आहे की स्क्वॅश आणि फुटबॉल या खेळांमध्ये क्रिकेटसारखं राजकारण करण्याची संधी आणि प्रसिद्धी मिळत नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











