आशिया कप : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतासमोर 'या' गोष्टींचं आव्हान, फायनलमध्ये काय होऊ शकतं?

फोटो स्रोत, FADEL SENNA/AFP via Getty Images
- Author, भरत शर्मा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
"अंतिम सामन्यात भारताचा पराभव कसा करायचा, हा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. पाकिस्तानचा संघ भारतासमोर मेंटल ब्लॉक आणि दबाबात येतो का?" एका पत्रकारानं पाकिस्तानी संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांना सुपर 4 पाकिस्तान आणि बांगलादेशमधील क्रिकेट सामना संपल्यानंतर हा प्रश्न विचारला.
त्यावर माइक हेसन यांनी उत्तर दिलं, "मला असं वाटत नाही. आशिया कपमध्ये भारताविरुद्ध आम्ही जो दुसरा सामना खेळलो होतो, त्यात आधीच्या तुलनेत आमची कामगिरी बरीच चांगली होती."
"आम्ही चांगली टक्कर देत होतो आणि आमचा पराभव करण्यासाठी अभिषेक शर्माला जबरदस्त खेळी करावी लागली."
ते म्हणाले, "भारताविरुद्ध जिंकायचं असेल तर आम्हाला त्यांना जास्त वेळ दबाबात ठेवावं लागेल. कारण असं न केल्यास ते सामन्यावर नियंत्रण मिळवू शकतात. या कारणामुळेच ते जगातील टॉप टीम आहेत. हेच आमच्यासमोरचं आव्हान आहे."
माइक हेसन याच्यापुढे आणखी एक वाक्य म्हणाले, जे सर्वांनाच पटेल.
"14 सप्टेंबरला आम्ही खेळलो आहोत आणि 21 सप्टेंबरलादेखील खेळलो आहोत. मात्र आता खेळला जाणारा सामना सर्वात महत्त्वाचा आहे. त्यावरच आमचा लक्ष केंद्रित आहे."
28 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान आशिया कपच्या अंतिम सामन्यात समोरा-समोर असतील, तेव्हा कोणताही संघ जिंको, इतिहास घडणार आहे, कारण याआधी हे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये कधीही अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळलेले नाहीत.
1984 मध्ये आशिया कपची सुरुवात झाली होती. त्यानंतरच्या या स्पर्धेच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होतं आहे.
भारतानं आतापर्यंत ही स्पर्धा सर्वाधिक म्हणजे आठ वेळा जिंकली आहे. तर श्रीलंकेनं सहा वेळा आशिया कप जिंकला आहे. पाकिस्तान दोनदा जिंकलं आहे. तर बांगलादेश आणि अफगाणिस्तानला मात्र आतापर्यंत एकदाही हा कप जिंकता आलेला नाही.
पाकिस्तानला एका सामन्यात हरवल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला होता की दोन्ही संघांमध्ये आथा कोणतीही स्पर्धा उरलेली नाही. त्यामुळे आता याबद्दल प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे.
अंतिम सामन्याचा दबाव वेगळा असतो
प्रसिद्ध क्रिकेट तज्ज्ञ अयाज मेमन यांना विचारण्यात आलं की या अंतिम सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानच्या संघाविषयी गाफील का राहू नये. त्यावर ते स्पष्टपणे म्हणाले, "कारण हा अंतिम सामना आहे!"
मेमन बीबीसीला म्हणाले, "टीम इंडिया टी20 चा चॅम्पियन आहे. त्यामुळे भारतावर जास्त दबाव असेल. कारण कागदावर पाहिलं तर भारतीय खेळाडू अधिक दमदार वाटतात. भारतीय संघ, पाकिस्तानपेक्षा वरचढ वाटतो."
"मात्र याचा अर्थ असा नाही की भारतीय संघ जिंकला आहे. सामना अद्याप खेळला जायचा आहे. आम्हाला माहित आहे की क्रिकेटमध्ये सामन्याचा निकाल बदलणं ही सामान्य बाब आहे. विशेषकरून टी20 क्रिकेट सामन्यात काहीही होऊ शकतं."
ते म्हणाले, "प्लेयर टू प्लेयर विचार केला तर, कागदावर तरी भारताचा संघ सरस वाटतो. मात्र सामना कागदावर नाही, तर खेळपट्टीवर जिंकला जातो."

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP via Getty Images
क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा वेगळाच दबाव असतो आणि या सामन्यात किरकोळ चुकांमुळे सुद्धा सामन्याचा निकाल बदलू शकतो, ही उघड बाब आहे.
वरिष्ठ क्रीडा पत्रकार आणि लेखक नीरू भाटिया म्हणतात की भारतीय क्रिकेट संघाला सतर्क राहावं लागेल. पाकिस्तानला दोनदा हरवल्याचा अर्थ असा होत नाही की त्या संघाला कमी लेखलं पाहिजे.
नीरू म्हणाल्या, "अंतिम सामना नेहमीच वेगळा असतो. स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये खेळण्यात आलेल्या दोन्ही सामन्यांकडे पाहिलं तर पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानची कामगिरी चांगली होती."
"भारतच नाही, इतर संघांच्या विरुद्धदेखील त्यांच्या कामगिरीत थोडी सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्यांना कमी लेखता येणार नाही. पाकिस्तानची फलंदाजी-गोलंदाजी चांगली दिसते आहे. मात्र हे देखील खरं आहे की भारतीय संघ एक मजबूत संघ म्हणूनच अंतिम सामन्यात उतरेल."

मेमन यांचं म्हणणं आहे की पाकिस्तानच्या कोणत्याही एका खेळाडूची चांगली कामगिरी झाली, तर भारतीय संघावर दबाव येऊ शकतो. कारण फेव्हरेट संघावर जास्त दबाव असतो.
पाकिस्तानचा संघ हरला तर काही विशेष बाब नसेल. मात्र ते जिंकले तर तो खूप मोठा विजय असेल.
दुसऱ्या बाजूला भारत जर कप जिंकला नाही, तर तो खूप मोठा धक्का असेल. कारण संघाची प्रतिष्ठा आणि खेळाडू, दोन्ही दृष्टीनं भारतीय संघ उजवा दिसतो.
टीम इंडियाला कशावर लक्ष द्यावं लागेल?
या स्पर्धेतील भारताच्या फलंदाजीबद्दल बोलायचं तर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी बहुतांश, विशेषकरून मोठ्या सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. त्यामुळे मधल्या फळीवर जास्त दबाव आला नाही.
मात्र संघाच्या इतर फलंदाजांना अंतिम सामन्यात कोणत्याही परिस्थितीत खेळण्यासाठी तयार राहावं लागेल.
वरिष्ठ क्रीडा पत्रकार धर्मेंद्र पंत म्हणतात की शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा इतकं चांगले खेळले आहेत की अजूनपर्यंत भारतीय संघाच्या मधल्या फळीचा परीक्षा झालेली नाही आणि जेव्हा झाली तेव्हा फलंदाज धडाक्यानं बाद झाले आहेत.
पंत बीबीसीला म्हणाले, "टीम इंडियानं ओमानविरुद्ध खेळताना संघात अनेक बदल केले. तो सामना ते सराव सामन्यासारखा खेळले. त्यामुळे किती फायदा झाला हे काळच ठरवेल."
"मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादवला खूप जबाबदारीनं खेळावं लागेल. त्यानं टिकून फलंदाजी करण्याची आवश्यकता आहे. सूर्यकुमार टिकला तर पाकिस्तानविरुद्ध भारताची स्थिती चांगली असेल."

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP via Getty Images
नीरू भाटिया यांनादेखील एक फलंदाज म्हणून सूर्यकुमारकडून अपेक्षा आहेत.
त्या म्हणाल्या, "सूर्यकुमार खेळतो आहे, मात्र संघर्ष करतो आहे. त्याचा नंबरदेखील निश्चित झाला पाहिजे. तो वारंवार क्रम वरखाली करू शकत नाही. असं केल्यानं मधल्या फळीत अडचण निर्माण होते. तो संघाचा प्रमुख फलंदाज आहे."
"मात्र अजूनपर्यंत फलंदाजीत फारशी कामगिरी झालेली नाही. त्याचा धावा होत नाहीयेत. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी चांगली आहे. मात्र अंतिम सामन्यात फलंदाज म्हणून त्याच्याकडून देखील अपेक्षा असतील."
याव्यतिरिक्त फलंदाजी आणि गोलंदाजीपेक्षा भारतीय संघाला जास्त टेंशन कॅचिंगमुळे येतं आहे.
मेमन म्हणाले, "दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघानं अनेक झेल सोडले आहेत. अंतिम सामन्यात असं होता कामा नये. कारण अशाच चुकांमुळे मोठे सामने हातचे जातात."
नीरूदेखील या मुद्द्याशी सहमत आहेत.
त्या म्हणाल्या, "भारतीय संघाबाबत काही समस्या आहेत. यात क्षेत्ररक्षण सर्वात आधी येतं. संघानं अनेक झेल सोडले आहेत. झेल पकडून सामने जिंकले जातात. विशेषकरून मोठे सामने. पाकिस्तान असो किंवा इतर कोणताही संघ असो, क्षेत्ररक्षण उत्तम असलं पाहिजे. मात्र सध्या ते तसं नाही."
पाकिस्तानचा संघ अंतिम सामन्यात बाजी मारू शकतो का?
काही जाणकारांचं म्हणणं आहे की पाकिस्तानचा संघ अनप्रेडिक्टेबल आहे. त्यामुळेच तो अधिक धोकादायक आहे.
पंत यांच्या मते, पाकिस्तानचा संघ अनपेक्षित खेळ करण्यासाठी ओळखला जातो. त्यांची कामगिरी केव्हा चांगली होईल आणि केव्हा खराब होईल हे सांगता येत नाही.
दोन्ही संघांवर अपेक्षांचं ओझं आहे. मात्र भारतावर जास्त दबाव आहे. त्यामुळे भारतानं फाजील आत्मविश्वास टाळला पाहिजे, तसंच पाकिस्तानला कमी लेखता कामा नये.
ते म्हणाले, "पाकिस्तानच्या संघाबद्दल बोलायचं तर त्यांचा रेकॉर्ड खराब राहिला आहे. असं म्हटलं जातं की ते भारताकडून हरत आले आहेत. अशावेळी पाकिस्तानवर दबाव नसेल, त्यामुळे ते अधिक मोकळेपणानं खेळू शकतात."

फोटो स्रोत, FADEL SENNA/AFP via Getty Images
याव्यतिरिक्त पाकिस्तानच्या संघाची गोलंदाजी कोणत्याही सामन्याचं चित्र बदलू शकते.
पंत म्हणाले, "रऊफ ज्याप्रकारची गोलंदाजी करतो आहे, ते लक्षात घेता त्याच्यापासून सावध राहावं लागेल. त्याशिवाय शाहीन शाह आफ्रिदी चांगली गोलंदाजी करतो आहे. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अभिषेक शर्मानं त्याची गोलंदाजी स्थिरावू दिली नव्हती."
"त्याचे शॉर्ट पिच चेंडू चांगल्या प्रकारे फटकावले होते. जर अंतिम सामन्यात असं झालं तर इतर गोलंदाजांवर देखील परिणाम होईल. अर्थात गेल्या दोन सामन्यांमध्ये आफ्रिदीनं चांगली गोलंदाजी केली आहे."

अयाज मेमन यांना वाटतं की भारतीय संघाचे दोन्ही सलामीवीर चांगली फलंदाजी करत आहेत. मात्र अभिषेक शर्माची विकेट सर्वात महत्त्वाची असेल.
ते म्हणाले, "भारताचे सलामीवर चांगले खेळत आहेत, विशेषकरून शर्मा. अंतिम सामन्यात सर्वात महत्त्वाची विकेट त्याचीच असेल. टीम इंडियानं अनेक पर्याय आजमावले आहेत. संजू सॅमसनला देखील वरच्या क्रमांकावर खेळवण्यात आलं आहे."
"सूर्यकुमारनं देखील क्रम बदलला आहे. मात्र अंतिम सामन्यात फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करता येणार नाही. फिरकी गोलंदाज चांगले खेळत आहेत. मात्र हार्दिक पंड्यादेखील महत्त्वाचा ठरू शकतो."
पाकिस्तानच्या संघाच्या फलंदाजीचं काय?
साहिबजादा फरहान हा असा फलंदाज आहे जो त्याच्या खेळींबरोबरच सेलिब्रेशनला धरूनदेखील वादात सापडला आहे.
मात्र या सेलिब्रेशनच्या नादात भारतीय संघाला त्याच्या फलंदाजीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करता येणार नाही. भारत-पाकिस्तान यांच्यातील दोन्ही सामन्यांमध्ये संपूर्ण फलंदाजीत तो सगळ्यात वेगळा दिसला.
लीगमधील सामन्यांमध्ये त्यानं भारताविरुद्ध 44 चेंडूंमध्ये 40 धावा केल्या. तर सुपर 4 मध्ये 45 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या.
पंत यांनीदेखील मान्य केलं की टीम इंडियासाठी तो धोकादायक ठरू शकतो.
ते म्हणाले, "टीम इंडियानं साहिबजादा फरहानला जास्त टिकू देता कामा नये. हाफ वॉली चेंडूंना तो उत्तम खेळतो आहे. त्यामुळे सुरुवातीलाच त्याच्यावर दबाव टाकावा लागेल. दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमराहला थोडा सूर गवसताना दिसतो आहे."
"मात्र फरहान मोठे शॉट खेळून त्याच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. फरहान लवकर बाद झाला तर इतर फलंदाजांवर परिणाम होईल."

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP via Getty Images
पंत यांच्या मते फरहानव्यतिरिक्त आणखी एका फलंदाजापासून टीम इंडियानं सावध राहिलं पाहिजे. तो म्हणजे फखर जमान.
ते म्हणाले, "फखर जमान धोकादायक खेळाडू आहे. तो मोठ्या सामन्यांचा खेळाडू मानला जातो. अशापरिस्थितीत भारतीय संघानं त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे."
त्याचबरोबर भारतीय संघाला गोलंदाजीबरोबरच फलंदाजीमध्ये देखील उत्तम कामगिरी करणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीला वेसण घालावी लागेल. कारण त्याचे कॅमियो अनेक संघांवर भारी पडत आहेत.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर जेव्हा आफ्रिदीला भारताविरुद्धच्या अंतिम सामन्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा तो म्हणाला होता, "आम्ही तयार आहोत!"
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











