आशिया कप अंतिम सामन्यात भारताचा सामना करण्याबद्दल पाकिस्तानचे खेळाडू काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
आशिया कप आता आपल्या अंतिम टप्प्यात आला आहे. 28 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या अंतिम सामना रंगणार आहेत. तत्पूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात गुरुवारी (25 सप्टेंबर) अटीतटीचा सामना झाला.
या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशविरोधात रोमहर्षक विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानचा संघ आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे.
दरम्यान, अशा विजयामुळे आमचा संघ 'खास' असल्याचा विश्वास वाटतो, असं पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यानंतर म्हटलं आहे.
फायनलमध्ये भारतासह कोणत्याही संघाला हरवण्याची ताकद पाकिस्तानमध्ये आहे, असं आगाने यावेळी म्हटलं.
सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, "असे सामने आम्ही जिंकत गेलो तर नक्कीच आमची टीम खास आहे. सगळ्यांनी चांगला खेळ केला. फलंदाजीमध्ये अजून सुधारणेची गरज आहे, पण त्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत."
रविवारी (28 सप्टेंबर) दुबईत आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये आमनेसामने भिडणार आहेत.
या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान दोनवेळा आमनेसामने आले आहेत. एकदा ग्रुप सामन्यात आणि दुसऱ्यांदा सुपर 4 मध्ये.
दोन्ही सामन्यांत भारताचं पारडं जडच राहिलं. दोन्ही सामने भारताने जिंकले.
भारताविरुद्धच्या फायनल सामन्यावर पाकिस्तानच्या कर्णधार सलमान अली आगाने सांगितलं, "आम्ही खूप उत्साहित आहोत. आम्हाला काय करायचं हे माहीत आहे. आमची टीम इतकी मजबूत आहे की, आम्ही कोणालाही हरवू शकतो. रविवारी त्यांना पराभूत करण्यासाठी आम्ही मैदानात उतरू."
'आम्ही तयार आहोत'
सलमान अली आगाने शाहीन शाह आफ्रिदीचं खास कौतुक केलं. आफ्रिदीने आपला अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर 'प्लेयर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळवला.
आगाने सांगितलं, "शाहीन एक खास खेळाडू आहे. तो नेहमी टीमला जे हवं ते करतो. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. आम्ही 15 धावांनी मागे होतो, सुरुवातीला आम्ही चांगली गोलंदाजी करून दबाव निर्माण केला. नवीन बॉलने चांगली गोलंदाजी केली. जेव्हा तुम्ही अशी गोलंदाजी करता, तेव्हा सामना नक्की जिंकता येतो."
तो पुढे म्हणाला, "आम्ही फील्डिंगही चांगली करत आहोत. यासाठी अतिरिक्त सराव करतो आहोत. माइक हेसन यांनी म्हटलंय की, जर तुम्ही फील्डिंग करू शकत नसाल, तर टीममध्ये तुम्हाला स्थान नाही."

फोटो स्रोत, Getty Images
आफ्रिदीने आधी 13 चेंडूत 19 धावा केल्या आणि नंतर 17 धावा देत तीन विकेट घेतल्या.
आपल्या खेळावर आफ्रिदी म्हणाला, "सुरुवातीच्या विकेट्सनंतर टीमने मला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या षटकारांनी खेळाचं चित्रच बदललं, सामना आमच्या बाजूने झुकला."
भारताविरुद्धच्या फायनलसाठी 'आम्ही तयार आहोत', असं तो म्हणाला,
सामन्यानंतर पाकिस्तानचे प्रशिक्षक माइक हेसन यांनी भारतविरुद्धच्या रणनीतीबद्दल भाष्य केलं.
पाकिस्तान भारताविरोधात 'मेंटल ब्लॉक'सह खेळतो का असा प्रश्न हेसन यांना विचारला असतं, त्यांनी 'अजिबात नाही,' असं उत्तर दिलं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
ते म्हणाले की, "माझ्या मते भारतविरुद्ध दुसऱ्या सामन्यात आम्ही पहिल्या सामन्यापेक्षा खूप चांगली कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यात आम्ही फार सक्रिय नव्हतो आणि भारताला खेळावर नियंत्रण मिळू दिलं.
पण शेवटच्या सामन्यावर आमची चांगली पकड होती. अभिषेक शर्माच्या खेळीने सामना आमच्यापासून दूर नेला. त्या खेळीशिवाय आम्ही चांगला खेळ केला होता."
भारताला पराभूत करण्याच्या रणनीतीबद्दल हेसन यांनी सांगितलं, "आम्हाला भारताला दीर्घकाळ दबावाखाली ठेवण्याचा मार्ग शोधावा लागेल. मागच्या सामन्यात आम्ही बॅटिंग करताना पहिल्या 10 षटकांपर्यंत असंच केलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे म्हणाले, "आत्तापर्यंत आम्ही जितके सामने खेळले, ते फक्त ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशानेच खेळले होते. आम्ही प्रत्येक क्षणी याच गोष्टीबद्दल बोलत आलो आहोत. फायनल हा सर्वात महत्त्वाचा सामना आहे. आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करू."
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अलीकडील सामन्यांमधील तणावाबद्दल हेसन यांनी सांगितलं की, "माझा संदेश हा आहे की, क्रिकेटकडे लक्ष द्या आणि आम्हीही तसेच करणार आहोत. जे काही घडलं, त्याबद्दल तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. मी तर फक्त क्रिकेटकडेच लक्ष देतो."
बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदीने महत्त्वाची भूमिका निभावली.
आफ्रिदीचा फॉर्म
बीबीसी उर्दूसाठी क्रिकेट विश्लेषक समी चौधरी लिहितात, "ही खूप आनंदाची गोष्ट आहे की, पाकिस्तानला गोलंदाजीमध्ये जास्त ताकदीची गरज असतानाच शाहीन आफ्रिदी उत्तम फॉर्ममध्ये आला. विशेष म्हणजे, शाहीनचा हा फॉर्म त्यांच्या करिअरच्या सुरूवातीच्या टप्प्यापेक्षा खूपच 'धोकादायक' वाटत आहे."
समी लिहितात, "आता शाहीनकडे गोलंदाजीतील जास्त 'शस्त्रं' उपलब्ध आहेत. पूर्वी तो प्रामुख्याने एकाच प्रकारचा स्विंग आणि आपल्या गतीवर अवलंबून होता. पण आता तो चांगल्या गतीसह अनेक प्रकारच्या स्विंगचा प्रयत्न करत आहे."
समींच्या मते, या सामन्यात पाकिस्तानने दाखवलेली सांघिक कामगिरी फक्त 'अद्भुत' विजयच मिळवून देत नाही, तर टीमचा आत्मविश्वासही वाढवते. आता त्यांना वाटतं की, जर ते अशा कठीण परिस्थितीतून जिंकायला शिकले, तर ते चॅम्पियन टीममध्ये गणले जाऊ शकतात.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
आशिया कपमध्ये भारत आतापर्यंत चॅम्पियनप्रमाणेच खेळला आहे. भारताने आपल्या तीन ग्रूप सामन्यांसह सुपर 4 चे दोन सामने सहज जिंकले आहेत.
भारताची टीम सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.
एखाद्या सामन्यात जर गोलंदाजी चांगली झाली नाही, तर फलंदाजांनी ही कमतरता भरून काढली. आणि काही वेळा गोलंदाजानी विरोधी संघाला त्रास दिला.
भारतीय संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या सलामीच्या जोडीने जवळपास प्रत्येक सामन्यात भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे.
अभिषेक शर्माची स्फोटक फलंदाजी संपूर्ण आशिया कपमध्ये चर्चेचा विषय राहिली आहे.
या स्पर्धेत भारताच्या फिरकीपटूंनी विशेष कामगिरी केली आहे. कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या तिघांनी भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात जसप्रीत बुमराह महागडा ठरला होता, पण त्यानं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याची भरपाई केली.
या सामन्यात भारताची मधली फळी ढासळली होती. यामुळे टीम संकटातही आली होती. परंतु, योग्यवेळी हार्दिक पांड्याने चांगली फलंदाजी केली आणि भारताने हा सामना जिंकला.
भारतासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म निश्चितच चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानविरुद्धच्या ग्रुप सामन्यात त्याने 47 धावांची खेळी केली होती, पण त्याशिवाय या मालिकेमध्ये त्याला अद्याप काही खास करता आलेलं नाही.
दोन्ही संघामधली चुरस
जर पाच किंवा जास्त संघांच्या स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, तर भारत आणि पाकिस्तान पाच वेळा फायनलमध्ये एकमेकांविरोधात भिडले आहेत.
यापैकी दोन सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला तर तीनमध्ये पाकिस्तानच्या टीमने ती स्पर्धा जिकंली.
परंतु, अलीकडच्या काळात भारताची टीम, वनडे असो किंवा टी-20, दोन्ही प्रकारच्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.
वनडे क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत फायनलपर्यंत पोहोचला आणि टी-20 वर्ल्ड कप 2024 चं त्यांनी विजेतेपद पटकावलं.
त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्येही भारताने विजेतेपद आपल्या नावावर केलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने म्हटलं होतं की, भारत आणि पाकिस्तानमध्ये आता पूर्वीसारखी स्पर्धा राहिलेली नाही आणि याबद्दल आता प्रश्नं विचारणंही थांबवलं पाहिजे.
तो म्हणाला होता की,"भारत आणि पाकिस्तान यांच्यातील स्पर्धेबद्दल प्रश्न विचारणं आता थांबवावं. माझ्या मते, जर दोन संघ 15-20 सामने खेळले आणि त्यात एखाद्या संघाने 7-8 सामने जिंकले, तर ते चांगलं क्रिकेट म्हणता येईल. पण 13-0 किंवा 10-1 (मला अचूक आकडे माहीत नाहीत) असतील, तर ती स्पर्धा असू शकत नाही."
पाकिस्तानचे माजी कर्णधार वसीम अक्रम यांनीही मान्य केलं की, पाकिस्तानची टीम आता भारताला टक्कर देऊ शकत नाही. भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचंही काहीसं असंच मत आहे.
नुकतंच ते म्हणाले होते, "भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांची उगाच मोठी चर्चा केली जाते. परंतु, मागील चार-पाच वर्षांत काहीही विशेष झालेलं नाही सर्व निकाल एकतर्फीच लागले आहेत."
पण फायनलपूर्वी पाकिस्तानच्या टीमने ज्या पद्धतीने पुनरागमन केलं आहे, ते पाहता हा सामना अटीतटीचा आणि स्पर्धात्मक होऊ शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











