विदर्भात पावसाचं थैमान, जनजीवन विस्कळीत; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुसळधार पावसाने सोमवारी (9 सप्टेंबर) विदर्भाला चांगलच झोडपून काढलं. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत झालं असून शेतपिकांचंही मोठ नुकसान झालं आहे.
तर मंगळवारीही (10 सप्टेंबर) पावसाचा जोर कायम राहणार असून विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सोमवारपासून (9 सप्टेंबर) मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सलग दुसऱ्या दिवशीही भामरागड मधील पूरस्थिती कायम असून येथील जवळपास 50 हून अधिक कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
येथील बाजारपेठ पूर्णतः पाण्याखाली असून अनेक घरांमध्येही पाणी शिरले आहे. परिणामी साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मोठी नासधूस झाली आहे.
तर दुसरीकडे सिरोंचा तालुक्यातही पूरस्थिती उद्भवली असून करजेली गावातील 28 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
सोमनपल्ली गावात गोदावरी नदीचे बॅक वॉटर शिरल्याने येथील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी
गोंदिया जिल्ह्यात सोमवारी (9 सप्टेंबर) रात्रभर झालेल्या पावसामुळे देवरी, सालेकसा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली.
सालेकसा तालुक्यातील छत्तीसगढ सीमेवर असलेल्या धनेगांवात अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने लोकांनी रेल्वे स्थानकावर आसरा घेतला. या भागात अद्याप पाऊस सुरू असून लोकांचे धनधान्य, घरगुती साहित्याचं नुकसान झालं आहे.
गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील पूर परिस्थितीबाबत बोलताना तहसीलदार अमृता सुतार म्हणाल्या, “रात्रभर झालेल्या पावसामुळे देवारटोला डॅम परिसरात दरेकसा, नवाटोलाकडे जाणारे रस्ते बंद झाले आहेत. दरेकसा भागात पुरात अडकलेल्या 12-15 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. अनेक घरांत पाणी शिरलं असून काही घरांची पडझड झाली आहे.”
पाऊस अद्याप सुरुच असून छत्तीसगडला जाणारा रस्ताही पाण्याखाली गेला असल्याचं त्यांनी सांगितलं.
गोदावरी आणि वैनगंगा नदीही धोक्याच्या पातळीवर
गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सद्यस्थितीत पुरामुळे जिल्ह्यातील आल्लापल्ली-भामरागड, आल्लापल्ली-सिरोंचा, मुलचेरा-आष्टी, कोरची-बोटेकसा हे प्रमुख मार्ग बंद आहेत.


पावसाचा जोर मंगळवारीही (10 सप्टेंबर) कायम राहणार असून विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाचा अंदाज पाहता नागरिकांनी सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
विदर्भ, दक्षिण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे तर नागपूरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोंकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भ, दक्षिण कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्यासाठी (11 सप्टेंबर) 'यलो अलर्ट' जाहीर करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
हवामान खात्याने उद्या (11 सप्टेंबर) भंडारा जिल्ह्यामध्ये यलो अलर्ट घोषित केला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी जिल्ह्यातील 10 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते 11 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशामध्ये असे म्हटले आहे की, "भंडारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावित झाले असून भंडारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेया विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना 10 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून ते 11 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस सुट्टी असणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)












