मुसळधार पावसामुळे तेलंगाना, आंध्र प्रदेशात गंभीर स्थिती; अनेक जण अन्न-पाण्याविना

- Author, बल्ला सतीश
- Role, बीबीसी न्यूज तेलगू
आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती अतिशय भीषण झाली आहे. विजयवाडा, गुंटुर, खम्माम या शहरांबरोबरच महबुबाबाद आणि कामारेड्डी भागात पावसाचा आणि पुराचा जोरदार फटका बसला आहे.
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक संकटामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणात मिळून एकूण 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
या दोन्ही राज्यात अजूनही पाऊस सुरू आहे. बीबीसी तेलुगुने पूरस्थिती असलेल्या ठिकाणांना भेट देऊन तेथील परिस्थिती समजून घेतली आहे.
बीबीसीच्या टीमनं पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी विजयवाड्यातील सिंह नगरला भेट दिली. त्यावेळेस ती कॉलनी पुराच्या पाण्याखाली गेली होती. सर्व घरं पाण्यानं वेढलेली होती. तेथील नागरिक घरांच्या छतावर किंवा वरच्या मजल्यांवर जाऊन मदतीची वाट पाहत होते.
रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी फक्त 15 मिनिटांत पुराचं पाणी घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत चढलं. पाणी आमच्या गळ्यापर्यंत आलं होतं, असं एका व्यक्तीनं बीबीसीला सांगितलं. विजयवाड्यातील पुराच्या पाण्यानं वेढलेल्या घरातून ती व्यक्ती बचावली होती.
"आम्ही सर्वकाही गमावलं आहे, अगदी आमचे कपडेसुद्धा," असं तेलंगानातील खम्ममच्या शेख फरझाना यांनी सांगितलं. तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांच्या घरात पुराचं पाणी शिरलं होतं.
शुक्रवारी (30 ऑगस्ट)पावसाला सुरूवात झाली. शनिवारी (31 ऑगस्ट) आणि रविवारी (1 सप्टेंबर) पावसाचा जोर वाढला होता. मात्र आता पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे. मात्र अजूनही पुराचं पाणी ओसरलेलं नाही. परिणामी दोन्ही राज्यांतील बहुतांश भागात जनजीवन ठप्प झालं आहे.

रस्ते आणि रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. 100 हून अधिक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. दोन्ही राज्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
विजयवाडात कृष्णा नदीवरील प्रकासम धरणाच्या परिसरात पुराचा दुसरा इशारा देण्यात आला आहे.
पुराचा फटका स्थानिकांबरोबरच बाहेरील लोकांना देखील बसला आहे. संघमित्रा सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये विक्रेत्यांचं काम करत असलेले बिहारमधील लोक तेलंगानातील काझिपेटा रेल्वे जंक्शनमध्ये अडकले आहेत.
"आम्ही जवळपास 15 जण आहोत. आमची ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली आहे. सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली आणि त्यांना बसमधून पाठवण्यात आलं."
"मात्र त्यांनी आम्हाला काझीपेटा रेल्वे स्टेशनवर आणलं. इथं आम्हाला कोणत्याही सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत. आम्ही कसे आहोत याची विचारपूस करायला देखील कोणीही आलेलं नाही," असं एका विक्रेत्यांनं सांगितलं.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील मुसळधार पावसामागचं कारण
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाचा तडाखा बसला आहे.
आंध्र प्रदेशातील आपत्ती व्यवस्थापन विभागानं हा कमी दाबाचा पट्टा आंध्र प्रदेशातील उत्तर किनारपट्टीवरील कलिंगापटनमच्या किनाऱ्याजवळ शनिवारी (31 ऑगस्ट) रात्री 12:30 ते 2:30 च्या दरम्यान पुढे सरकल्याचं जाहीर केलं आहे.
आंध्र प्रदेश सरकारनुसार, विजयवाडा शहरात 31 ऑगस्टला 136 मिमी पाऊस पडला. तर विजयवाडाच्या ग्रामीण भागात 131 मिमी पाऊस झाला आहे.
विजयवाडाच्या इब्राहिमपटनम या उपनगरात 120 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार तेलंगणातील कामारेड्डी शहरात 1 सप्टेंबरला 221 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


अतिवृष्टीमुळे नागरिकांना काय फटका बसतो आहे?
विजयवाडा हे आंध्र प्रदेशातील दुसरं मोठं शहर आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशच्या नव्या प्रस्तावित राजधानीचा ते एक भाग आहे. विजयवाडात दोन दिवस पाणी तुंबलं होतं. शहरातील अनेक कॉलन्यामध्ये पावसाचं पाणी होतं आणि त्याची पातळी एक फुटांपासून ते चार फुटांपर्यंत होती.
हजारो नागरिक पिण्याचं पाणी आणि अन्नाशिवाय पुराच्या पाण्यात अडकले होते. सरकारच्या टीम अनेक ठिकाणी बोट आणि ट्रॅक्टरद्वारे अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंची मदत पोहोचवत आहेत.
अनेकजण पावसाच्या पाण्यात वाहून जात आहेत. पावसाच्या पाण्याचा फटका न बसलेल्या सुरक्षित ठिकाणच्या आपल्या परिचितांच्या, नातेवाईकांच्या घरी पोहोचण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरील इतर जिल्ह्यांमध्ये देखील पुराचा आणि अतीवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी स्वत: विजयवाडातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. शहरातील विविध भागांमध्ये ते बोटीतून फिरले आणि पूरग्रस्तांना त्यांनी धीर दिला. त्याचबरोबर मदत कार्य वेगानं करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

राज्यातील गुंटुर, पालनंडू, प्रकासम, नंदियाल, गोदावरी आणि आंध्र प्रदेशची उत्तर किनारपट्टीला सुद्धा पुराचा लक्षणीय फटका बसला आहे.
विजयवाडाला पुराचा फटका बसण्यामागचं कारण सांगताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले की , "1998 नंतर आम्ही पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पाहत आहोत. कृष्णा नदीच्या खोऱ्यातील सर्व धरणं पूर्ण भरली आहेत."
"विजयवाडातून वाहणारा बुदामेरू या नाल्याच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होऊन पूर आला आहे. मागील पाच वर्षात कोल्लेरू तलावाकडे जाणाऱ्या जलप्रवाहांची योग्य देखभाल झाली नसल्यानं विजयवाडात पाणी शिरलं आहे."
तेलंगानात महबुबाबाद आणि खम्ममच्या आसपासच्या अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी साचलं आहे. त्याचबरोबर नालगोंडा, सुर्यापेट, महबुबानगर आणि कोथागुडेम जिल्ह्यांमध्येही पुराचा मोठा फटका बसला आहे.
तेलंगानातील अनेक भागात पुरामुळे आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

इतर काही महत्त्वाच्या बातम्या :

अनेक कॉलन्या, झोपडपट्ट्या आणि सरकारी कार्यालयांचा परिसर पाण्याखाली गेला आहे.
अनेक होस्टेलमध्ये पाणी साचलं आहे. परिणामी विद्यार्थ्यांना त्यांच्या सामानानिशी पाण्यातून वाट काढावी लागली. खम्माम आणि महबुबाबाद शहरातून येणारी आणि जाणारी वाहतूक अनेक दिशांनी ठप्प झाली आहे.
तेलंगानाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी हैदराबादमधील आपत्ती निवारण कक्षातून (कमांड कंट्रोल सेंटर) पावसाचा आढावा घेतला.
"ज्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला अशा ठिकाणी सरकारी यंत्रणेनं सज्ज असावं. पुराच्या पाण्यात ज्यांचा मृत्यू झाला अशांच्या कुटुंबीयांना देण्यात येणारी आर्थिक मदत आम्ही वाढवून 4 लाखांवरून 5 लाख रुपये करत आहोत."
"ज्या लोकांना पुराचा फटका बसला असेल, ज्यांचं नुकसान झालं असेल अशांना सरकारी यंत्रणेनं तत्काळ प्रतिसाद द्यावा," असं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी म्हणाले.

तेलंगानाचे मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी सांगितलं की राज्यातील पालेरूमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबांना ते वाचवू शकले नाहीत. सर्वप्रकारचे प्रयत्न करून देखील प्रतिकूल हवामानामुळे बचावकार्यात अडथळे आले.
या घटनेबद्दल सांगताना श्रीनिवास रेड्डी भावनाविवश झाले होते.
दोन्ही राज्यांमध्ये ज्या भागात तलाव आणि नाले फुटले आहेत तिथे परिस्थिती गंभीर झाली आहे. खासकरून ज्या भागात पाण्याच्या जोरदार प्रवाहांमुळे बंधारे तुटले तिथे इमारती पाण्यात वाहून गेल्या.
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी पूरग्रस्त त्यांच्या घराच्या छतावर बसून होते.
काही ठिकाणी लोक अतिशय धोकादायक स्थितीत दोराच्या साहाय्यानं रस्ते आणि नाले ओलांडत होते. त्याचबरोबर पुराच्या पाण्यात मोटरसायकल वाहून जात असल्याचं दृश्य दिसत होतं.
वाहतूक आणि कृषीवर काय परिणाम झाला?
आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या दोन्ही राज्यांमध्ये वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. खासकरून विजयवाडामध्ये ही बाब प्रकर्षानं दिसून येते आहे. उत्तर आणि दक्षिण भागांना जोडणारं हे महत्त्वाचं शहर आहे.
अनेक ठिकाणी महामार्ग पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक खोळंबली आहे किंवा ठप्प झाली आहे. काही ठिकाणी पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे रस्तेच वाहून गेले आहेत.
रेल्वे रुळांवर पाणी साचलं आहे. त्यामुळे अनेक ट्रेन रद्द कराव्या लागल्या तर अनेकांचे मार्ग बदलावे लागले. वारंगलमधील केसमुद्रमजवळ रेल्वेरुळांखालील वाळू, स्लीपर्स पूर्णपणे वाहून गेले आहेत.
अनेक पुलांवरून पाणी वाहतं आहे.
पूरग्रस्त भाग ओलांडण्यासाठी किंवा तिथून मार्ग काढण्यासाठी लोकांना दोर, क्रेन आणि जेसीबीचा वापर करावा लागतो आहे. विजयवाडा-हैदराबाद महामार्ग देखील विस्कळीत झाला आहे.
अनेक ठिकाणी रेल्वे प्रवाशांना बसमध्ये हलवण्यात आलं आहे. विजयवाडाच्या बाहेरच्या परिसरात रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्टेशन मधून बाहेर काढणं खूपच अवघड झालं होतं.

ज्या ठिकाणी ट्रेन ठप्प झाल्या होत्या आणि प्रवासी त्यात अडकले होते तिथे अन्नपदार्थांची मदत पोहोचवण्यात आली.
पूरस्थिती आणि मुसळधार पावसामुळे दक्षिण मध्य रेल्वेनं 100 हून अधिक ट्रेन रद्द केल्या. तेलंगाना आणि आंध्र प्रदेशातील राज्य वाहतूक परिवहन मंडळांनी त्यांची बहुतांश बस वाहतूक थांबवली आहे.
दोन्ही राज्यांमध्ये लाखो एकर पिकांचं नुकसान झालं आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेषकरून भात लावणीची वेळ असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
इतर नगदी पिकांचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. याशिवाय केळी सारख्या फळबागांना आणि भाजीपाला पिकांना देखील या पुराचा मोठाच फटका बसला आहे.
मृतांची संख्या किती आणि कितीजणांना वाचवण्यात आलं?
सरकारी आकडेवारीनुसार, आंध्र प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवार सकाळपर्यंत एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी आठ जण एनटीआर जिल्ह्यातील आहेत. तर उर्वरित मृत्यू गुंटुर आणि प्रकासम जिल्ह्यांमध्ये झाले आहेत.
तर सरकारी आकडेवारीनुसार, रविवारी दुपारपर्यंत पुरामुळे तेलंगानात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह पूरस्थितीबद्दल दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. दोन्ही राज्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

दोन्ही राज्यांतील बचाव पथकांना मदत करण्यासाठी केंद्रीय बचाव पथके पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दला (NDRF)च्या टीम देखील पूरग्रस्तांसाठीच्या बचावकार्यात मदत करत आहेत.
राज्य सरकारच्या टीमबरोबर तर राज्यांमधील राष्ट्रीय आपत्ती निवारण दला (NDRF)च्या टीम देखील तिथे पोहोचत आहेत.
तेलंगाना आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये आज आणि उद्या हलका ते मध्यम आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











