कमी काळामध्ये धो-धो पाऊस पडण्याचं प्रमाण का वाढलंय?

पावसाचं साठलेलं पाणी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जान्हवी मुळे आणि अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी

26 जुलै 2005 - मुंबईत अतिवृष्टी झाली तेव्हा 24 तासांत 944 पाऊस पडला.

23 जुलै 2021 ला महाबळेश्वरमध्ये 24 तासांत 594.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे साताऱ्यात दरड कोसळली, चिपळूण - महाडला पूर आला.

तर काल 31 जुलैला राजधानी दिल्लीमध्ये काही तासांत 228 मिलीमीटर पाऊस पडला.

त्याच्या दहाच दिवसांपूर्वी मुंबईच्या अनेक भागांत 21 जुलैला दोन तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आणि पाणी साचलं.

कमी काळामध्ये असा धो-धो पाऊस पडण्याचं प्रमाण का वाढलंय?

Extreme rainfall म्हणजे अतितीव्र पाऊस. जेव्हा 100 मिलीमीटरपर्यंतचा पाऊस एका तासात पडतो तेव्हा त्याला ढगफुटी झाल्याचं मानलं जातं. अशा पद्धतीच्या घटना गेल्या 50 वर्षांत वाढल्याचं IITM (Indian Institute of Tropical Meteorology) चा अभ्यास सांगतो.

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: अतिवृष्टी पाऊस? कमी काळात धो धो पाऊस का पडतो?

अतितीव्र पाऊस कशामुळे होतो?

पहिलं कारण - Weather Pattern म्हणजेच हवामानाची प्रणाली. कुठे कमी दाबाचा पट्टा अचानक तयार झाला, वादळ तयार झालं तर यामुळे किनारी भागांतल्या प्रदेशामध्ये किंवा डोंगराळ भागांमध्ये असणाऱ्या भौगोलिक स्थितीमुळे जास्त पाऊस पडू शकतो.

हे सगळं जागतिक हवामान बदलामुळे होतंय. आपल्या हिंदी महासागराचं तापमान वाढतंय. तापमान वाढल्याने वाफ आणि आर्द्रताही वाढते, जी अतिवृष्टीला पोषक ठरते. हिंदी महासागर हा सर्वाधिक वेगाने तापत जाणारा महासागर असल्याचं IPCC च्या (Intergovernmental Panel on Climate Change) 2021च्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्याहून अधिक वेगाने अरबी समुद्राचा पश्चिमेकडील एक भाग तापतोय. अरबी समुद्रात काही भागात 1.2 - 1.4 डिग्री सेल्शियसने तापमान वाढलंय. आधी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळं यायची आणि अरबी समुद्र तुलनेनं थंड होता. पण आता तापमान वाढीमुळे तो चक्रीवादळांसाठी पोषक बनत चाललाय.

कारण हवा जितकी गरम होते, तितकी तिची आर्द्रता (ओलावा पकडून ठेवण्याची क्षमता) वाढते. आणि ज्यावेळी एखाद्या हवामान प्रणालीमुळे ती अचानक थंड होते तेव्हा या आर्द्रतेचं - ओलाव्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि पाऊस पडतो. बहुतेकदा असा पाऊस तुलनेनं छोट्या भूभागावर पडतो.

IITM चे हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी कोल सांगतात, "जागतिक तापमानवाढीचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे जेव्हा हवा तापते, तेव्हा ती अधिक आर्द्रता धरून ठेवते. पण ती आर्द्रता अधिक काळ धरून ठेवू शकत नाही. त्यामुळे पाऊस अधिक काळ पडत नाही.

"जेव्हा पडतो, तेव्हा थोड्या वेळासाठी पडतो पण जोरात पडतो. अतिवृष्टी होते. यामुळे या अशा घटना वारंवार पहायला मिळतात. जिथे खूप काळ पाऊस पडत नाही, कोरडा काळ जातो आणि मग एकदम तीन-चार दिवस अतिवृष्टी होते. या घटना देशभर पहायला मिळतात. विशेषतः महाराष्ट्र आणि पश्चिम घाट क्षेत्रात या घडतायत," डॉ. कोल सांगतात.

दिल्लीचं रडार चित्र

फोटो स्रोत, IMD

फोटो कॅप्शन, 31 जुलैला दिल्लीमध्ये काही तासांमध्ये 228 मिमी पावसाची नोंद झाली.

अतितीव्र पावसामुळे जास्त नुकसान का होतं?

शहरीकरणामुळे आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे पावसाने होणाऱ्या नुकसानाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

डोंगराळ भागात अतितीव्र पाऊस पडतो किंवा बराच काळ सतत पाऊस पडत राहतो, त्यावेळी मातीची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता संपते आणि ती माती वाहू लागते. त्यातूनच भूस्खलन होते.

पण डोंगरांमधली ही माती जर खोदून ठेवली असेल, मोकळी झाली असेल, त्या भागात बांधकामं - विकासकामं मोठ्या प्रमाणात झाली असतील, तर अशा प्रकारच्या मातीला धरून ठेवण्यासाठीचा आधार राहत नाही, आणि ती आणखीन वेगाने खाली येते. यामुळेच भूस्खलनाच्या घटना आणखी वाढतात.

वायनाड दरड दुर्घटना

फोटो स्रोत, AICC

फोटो कॅप्शन, केरळच्या वायनाडमध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 200 जणांचा बळी गेलाय.

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शहरांमध्ये वा वस्त्यांमध्ये झालेलं काँक्रिटीकरण. त्यामुळे तिथली मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेली आहे.

म्हणूनच कमी वेळात भरपूर पाऊस पडला तर ते पाणी वाहून जाऊ शकत नाही. ते साठून राहतं. आणि त्यातून शहरं तुंबतात, पूर येतात.

2021च्या अहवालात IPCC ने काय इशारा दिला होता?

हवामानात होणारे बदल आणि परिणामांसाठी मानव जबाबदार असल्याचंने त्यांच्या 2021च्या अहवालात म्हटलं होतं. तापमान वाढ करणाऱ्या वायूंचं उत्सर्जन ज्या पद्धतीने सुरू आहे ते बघता अवघ्या दशकभरातच तापमानवाढीची मर्यादा ओलांडलेली असेल, असंही हा अहवाल सांगतो. या शतकाच्या अखेरपर्यंत दक्षिण आशियात पाऊस खूप वाढेल, सोबतच

उन्हाळ्यातही पाऊस पडेल आणि पावसाचं एकूण चक्र बदलेल असा निष्कर्ष या अहवालात मांडण्यात आला होता.

पृथ्वीचं तापमान वाढल्याने जमिनीतील आर्द्रता कमी होऊन दुष्काळ वाढतील, उन्हाळ्यात तापमान आणखी वाढेल आणि पूर्वीसारखी कडक थंडी पडणार नाही. तर समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे चक्रीवादळं, समुद्री वादळं यासारख्या घटना वाढतील अशा धोक्याच्या घंटाही या अहवालात होत्या.