जेवणात वापरल्या जाणाऱ्या तेलाचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, साजिद हुसैन
- Role, बीबीसी
एकेकाळी लठ्ठपणा ही फक्त पाश्चात्य देशांची समस्या मानली जात असे. परंतु, अलिकडच्या काळात ती भारतासारख्या मध्यम उत्पन्न असलेल्या देशांचीही समस्या बनली आहे.
याला तोंड देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लठ्ठपणाविरुद्ध एक देशव्यापी मोहीम सुरू करण्याबाबत भाष्य केलं आहे.
23 फेब्रुवारीच्या 'मन की बात' या कार्यक्रमात त्यांनी लोकांना खाद्यतेलाचा वापर 10 टक्क्यांनी कमी करण्याचं आवाहन केलं आहे. लठ्ठपणा कमी करण्याच्या दिशेनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
या कार्यक्रमात त्यांनी असंही म्हटलंय की, "एक निरोगी देश बनवण्यासाठी आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावाच लागेल. जास्त वजन आणि लठ्ठपणा अनेक समस्या आणि आजारांना जन्म देतात".


लठ्ठपणाची समस्या किती मोठी?
'मन की बात' या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, "एका अभ्यासानुसार, दर आठपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येनं ग्रस्त आहे. गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाची प्रकरणं दुप्पट झाली आहेत."
पुढे ते म्हणाले, "लहान मुलांमध्येही लठ्ठपणाची समस्या चार पटीनं वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरून असं दिसून येतंय की, 2022 मध्ये जगभरातील सुमारे 250 कोटी लोक अतिवजनाचे होते, याचाच अर्थ त्यांचं वजन आवश्यकतेपेक्षाही जास्त होतं."
2024 मध्ये 'द लॅन्सेट'नं एक संशोधन केलं आहे. त्यानुसार, 2022 मध्ये देशातील पाच ते एकोणीस वर्षे वयोगटातील 1 कोटी 25 लाख मुलं खूप जास्त वजनाची होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामध्ये 73 लाख मुलं आणि 52 लाख मुली यांचा समावेश होता. 1990 मध्ये ही संख्या फक्त 4 लाख होती. लठ्ठपणा हा प्रौढांसोबतच मुलांमध्येही चिंतेचा विषय ठरत आहे.
या अहवालानुसार, 2022 मध्ये भारतात 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 4.4 कोटी महिला आणि 2.6 कोटी पुरुष लठ्ठपणानं ग्रस्त होते. 1990 मध्ये ही संख्या 24 लाख महिला आणि 11 लाख पुरुष इतकी होती.
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) नुसार, भारतात 15 ते 49 वयोगटातील सुमारे 23 टक्के पुरुष आणि 24 टक्के महिला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत आहेत.
तर 2015-16 मध्ये 20.6 टक्के महिला आणि 18.9 टक्के पुरुष या समस्येनं त्रस्त होते.
जेवणात वापरलं जाणारं तेल लठ्ठपणा वाढवतं का?
लठ्ठपणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांबद्दल बोललं जातं, तेव्हा जंक फूड आणि बैठी जीवनशैली यावर खूप टीका केली जाते. परंतु, लठ्ठपणा वाढवण्यास कारणभूत ठरणाऱ्या आणि आपल्या दिवसभराच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलांकडे आपण दुर्लक्ष करतो.
ऑल इंडिया असोसिएशन फॉर अॅडव्हान्सिंग रिसर्च अँड ओबेसिटीचे अध्यक्ष डॉ. महेंद्र नरवारिया म्हणतात, "आपल्या भारतीय आहारात कार्बोहायड्रेट्स आणि तेल मोठ्या प्रमाणात असतं. कोणताही अन्नपदार्थ चविष्ट बनवण्यासाठी तेल आणि तूप यासारख्या गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतं. आपण जास्त व्यायाम करत नसल्यामुळे या चरबीचा वापर केला जात नाही.
"आपल्या अन्नात कार्बोहायड्रेट्स देखील असतात. ते आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि नंतर चरबीमध्ये रूपांतरित होतात. ही चरबी शरीरात जमा होते. यामुळे लठ्ठपणाचा धोका जास्त वाढतो."
ते म्हणतात, "आपल्या शरीराच्या रचनेत चरबीचं प्रमाण नेहमीच जास्त असतं. एखादी व्यक्ती जरी बारीक दिसत असली तरी तिच्या शरीरातही 30 ते 40 टक्के चरबी असते, जी खूप जास्त असते. दुसरीकडं खेळाडूंच्या शरीरात चरबीचं प्रमाण सुमारे 7 ते 8 टक्के असतं."
"आपल्या शरीरात जर चरबीचं प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे आपले चयापचय मंदावेल. त्यामुळे आपलं वजन वाढेल आणि आपला लठ्ठपणा वाढतच राहील".

फोटो स्रोत, Getty Images
नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथील मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. परमीत कौर म्हणतात, "जर आपण निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त तेलाचं सेवन केलं तर आपल्या शरीरातील चयापचय मंदावू शकतो. यामुळे आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढेल आणि आपला लठ्ठपणा वाढेल. यामुळे आपल्याला फक्त अतिरिक्त कॅलरीज मिळतील. मात्र आपल्याला फायबर, आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळणार नाहीत."
मुंबईतील वोकहार्ट हॉस्पिटलमधील बॅरिएट्रिक सर्जन डॉ. रमन गोयल म्हणतात, "तेलामध्ये सामान्यतः चरबीचं प्रमाण जास्त असतं.
"आपल्या शरीराला बहुतेक कॅलरीज चरबीपासून मिळतात. जर आपल्याला प्रथिनांपासून चार कॅलरीज मिळतात तर आपल्याला चरबीपासून 9 कॅलरीज मिळतात. म्हणून आपण जास्त कॅलरीज असलेलं जे काही खातो ते लठ्ठपणाला कारणीभूत ठरू शकतं, विशेषतः जे लोक आधीच लठ्ठ आहेत त्यांच्यावर याचा जास्त परिणाम होतो."
आपल्या शरीराला किती तेलाची गरज असते?
डॉ. महेंद्र नरवारिया यांच्या मते, तेलाचा वापर कमी करून लठ्ठपणा नियंत्रित केला जाऊ शकतो. लोक खाद्यतेल जास्त वापरतात. जास्त तेल सेवन केल्यानं आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढतं.
डॉ. परमीत कौर म्हणतात, "आपल्या शरीरातील ए, डी, ई आणि के यासारखी जीवनसत्त्वं पचवण्यास चरबीची मदत होते. म्हणून आपल्या शरीराला विशिष्ट प्रमाणात चरबीची आवश्यकता असते."
त्या म्हणतात, "लोकांनी त्यांच्या वयानुसार तेलाचं सेवन करावं. पण ज्या व्यक्तीची शारीरिक हालचाल कमी असते तिला दिवसाला सुमारे 4 ते 5 चमचे म्हणजेच 20-25 ग्रॅम तेलाची आवश्यकता असते. इतक्या प्रमाणात तेलाचं सेवन एखाद्या व्यक्तीसाठी पुरेसं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, लठ्ठपणा वाढवण्याचं एकमेव कारण हे तेल नाही. डॉ. रमन गोयल म्हणतात, "लठ्ठपणामागे इतरही अनेक कारण आहेत. भारतात किती गोड पदार्थांचं सेवन केलं जातं हे आपल्याला माहिती आहे. गोड पदार्थांमुळेही लठ्ठपणा वाढतो."
कोणत्या प्रकराच्या तेलाचं सेवन करायला हवं?
डॉ. परमीत कौर म्हणतात, "भारतातील विविध भागात उपलब्ध असलेल्या तेलांचा आपण अदलाबदली करून तसंच एकत्रित करून वापर केला पाहिजे.
उदाहरणार्थ, दक्षिण भारतात तीळ तेल आणि तांदळाच्या कोंड्याचं तेल उपलब्ध आहे, तर गुजरातमध्ये शेंगदाण्याचं तेल आणि अनेक राज्यांमध्ये मोहरीचं तेल मिळतं."
त्यांच्या मते, आपण वारंवार तळण्यासाठी वापरलेल्या तेलाचा वापरू नये. शिवाय हायड्रोजनेटेड वनस्पती तेलापासून बनवलेल्या गोष्टी देखील टाळल्या पाहिजेत.
शिवाय, तेलाची गुणवत्ता देखील महत्त्वाची असते. जर आपण स्वयंपाकाचं तेल जास्त गरम केलं तर ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
FSSAI च्या मते, आपण तळलेल्या तेलाचा वारंवार वापर करणं टाळलं पाहिजे. अशाप्रकारे तेलाचा वारंवार वापर केल्यानं त्यातील ट्रान्स फॅट्सचं प्रमाण वाढतं.
हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ वेबसाइटनुसार, ट्रान्स फॅट्स शरीरासाठी धोकादायक असतात.
ट्रान्स फॅट्स धोकादायक कोलेस्ट्रॉल म्हणजेच एलडीएल वाढवतात आणि चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल कमी करतात.
यामुळे शरीरात जळजळ होऊ शकते आणि हृदयरोग, स्ट्रोक, टाइप २ मधुमेह, इन्सुलिन प्रतिरोध आणि रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











