काय आहेत लठ्ठपणाचे धोके, लठ्ठपणापासून स्वतःला कसं वाचवाल?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीयांसाठीही लठ्ठपणा एक गंभीर समस्या झाली आहे.
    • Author, प्रियंका जगताप
    • Role, बीबीसी मराठीसाठी

सध्या जगभरात प्रौढांसह लहान मुलांमध्ये वेगानं वाढत असणारा लठ्ठपणा हा आजार एक जागतिक आरोग्य संकट बनू लागला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नुकतंच 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाच्या 119 व्या भागात ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा यावर भाष्य केलं.

भारतीयांसाठीही लठ्ठपणा एक गंभीर समस्या झाली आहे. या आजाराविरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी एक मोहीम देखील सुरू केली आहे.

या मोहिमेचं नेतृत्व करण्यासाठी उद्योगपती आनंद महिंद्रा, नेमबाज मनू भाकर, मल्याळम अभिनेता मोहनलाल, बॉलीवूड अभिनेता आर. माधवन, गायिका श्रेया घोषाल, खासदार सुधा मूर्ती अशा एकूण 10 व्यक्तींची निवड देखील केली आहे.

मात्र ज्या ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा या आजाराची आत्ता सर्वत्र चर्चा सुरू आहे, त्याची नेमकी कारणं काय आहेत? त्याचे धोके काय आहेत? त्याचा सामना कसा करायचा? हे जाणून घेऊयात.

लठ्ठपणावर एवढी चर्चा का?

भारतात सुरुवातीच्या काळात शहरी भागात आणि मोठ्या महानगरांमध्ये लठ्ठपणाची वाढ दिसून आली होती, मात्र आता ग्रामीण भागातही याचं प्रमाण वाढू लागलं आहे. लठ्ठपणामुळे आरोग्याच्या इतर अनेक समस्या देखील उद्भवत आहेत.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि इम्पेरियल कॉलेज लंडन यांनी केलेल्या संशोधनानुसार, सध्या जगभरातील विकसनशील तसेच विकसित देशांमध्ये सुमारे 10 कोटी लोक लठ्ठ आहेत.

यामुळे वैयक्तिक आरोग्य, आरोग्य सेवा देणारी व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेवरील भार देखील वाढत चालला आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

लठ्ठपणा हा आजार आहाराची निवड, जीवनशैली आणि सामाजिक-आर्थिक घटकांमुळे होऊ शकतो असंही त्यांनी केलेल्या संशोधनात आढळून आलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लठ्ठपणा हा शरीरामध्ये अतिरिक्त चरबीच्या साठ्यामुळे होणारा आणि त्यामुळे आपल्या आरोग्याला विविध प्रकारे हानी पोहोचवणारा एक गुंतागुंतीचा आजार आहे.

'द लॅन्सेट' या वैद्यकीय नियतकालिकानं लठ्ठपणावर केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, 1990 ते 2022 दरम्यान 5-19 वयोगटातील मुलांमध्ये लठ्ठपणाच्या जागतिक प्रमाणात चार पटीनं वाढ झाली आहे. तर प्रौढांमध्ये लठ्ठपणाचं हे प्रमाण दुप्पट झाल्याचं दिसून आलं आहे.

तक्ता

2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील 7 कोटी प्रौढ लोक लठ्ठपणानं ग्रस्त आहेत. यामध्ये महिलांची संख्या 4.4 कोटी आणि पुरुषांची संख्या 2.6 कोटी होती.

शिवाय भारतासह जगभरात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे.

तसंच भारतात महिलांमध्ये लठ्ठपणाचा दर 1990 मध्ये 1.2 टक्के होता, जो 2022 मध्ये 9.8 टक्के इतका झाला आणि पुरुषांमध्ये 2022 मध्ये 0.5 टक्के होता, जो 2022 मध्ये 5.4 टक्के इतका झाला.

या अहवालानुसार, जगातील सर्वात जास्त लठ्ठ लोक असलेल्या देशांच्या यादीत अमेरिका आणि चीननंतर भारताचाच क्रमांक लागतो.

लठ्ठपणा कसा मोजला जातो?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नॅशनल डायबेटिस ओबेसिटी अँड कोलेस्ट्रॉल फाउंडेशन (एन-डॉक), एम्स दिल्ली आणि फोर्टिस हॉस्पिटल (सी-डीओसी) यांनी लठ्ठपणाची व्याख्या नव्यानं परिभाषित केली आहे.

'द लॅन्सेट डायबेटिस अँड एंडोक्रिनोलॉजी' या वैद्यकीय नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.

लठ्ठपणामुळे भारतीयांना सामना करावा लागणाऱ्या आरोग्याविषयीच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल असा या अभ्यासामागचा उद्देश होता.

या अभ्यासापूर्वी, 2009 च्या जुन्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बॉडी मास इंडेक्स(BMI)च्या म्हणजेच वजन-उंची गुणोत्तराच्या आधारावर लठ्ठपणा मोजला किंवा ठरवला जात होता.

25 पेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्स (BMI) म्हणजे जास्त वजन तर 30 पेक्षा जास्त बीएमआय म्हणजे लठ्ठपणा असं मानला जात होतं.

मात्र भारतीयांच्या आजाराचं अचूक निदान करण्यासाठी हा नियम अडचणीचा ठरत असल्यानं भारतीयांसाठी लठ्ठपणाची नवीन व्याख्या ठरवणं गरजेचं असल्याचं या अभ्यासात समोर आलं.

याबाबत मुंबईतील अपोलो रुग्णालयातील बॅरिएट्रिक सर्जन आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी बीबीसी मराठीशी चर्चा केली. त्या सांगतात, "या अहवालात सांगितल्याप्रमाणे लठ्ठपणा मोजण्यासाठी फक्त बॉडी मास इंडेक्स पुरेसा नाही.

"शरीरातील चरबी मोजण्यासाठी इतर पद्धतींचा वापर केला पाहिजे. कंबरचा घेर, कंबर-नितंब गुणोत्तर किंवा कंबर-ते-उंची गुणोत्तर यांसारख्या अतिरिक्त उपायांचा वापर करून लठ्ठपणाचं मोजमाप केलं पाहिजे," असं डॉ. अपर्णा सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2009 च्या जुन्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बॉडी मास इंडेक्स(BMI)च्या म्हणजेच वजन-उंची गुणोत्तराच्या आधारावर लठ्ठपणा मोजला किंवा ठरवला जात होता.

तसेच बायो-इम्पेडन्स किंवा डेक्सा स्कॅन सारखे थेट शरीरातील चरबीचं मोजमाप करणारे पर्याय 40 किलो/चौरस मीटरपेक्षा जास्त BMI असलेल्या व्यक्तींसाठी उपलब्ध आहेत."

पुढं त्या सांगतात, "भारतीय लोकांचं शरीरातील चरबीच्या वितरणाचं स्वरूप हे पाश्चात्य लोकांपेक्षा भिन्न असतं. भारतीयांना कमी BMI वर लठ्ठपणामुळे येणारे मधुमेह आणि हृदयरोगासारखे आजार होतात."

"म्हणून भारतीय लोकसंख्येतील लठ्ठपणा परिभाषित करण्यासाठी कमी BMI आणि कंबरेचा घेर तपासून लठ्ठपणा हा आजार आहे की नाही हे ठरवण्याचा निष्कर्ष या नव्या संशोधनात समोर आला आहे," असं डॉ. अपर्णा यांनी सांगितलं.

नवीन संशोधनात लठ्ठपणाचं दोन टप्प्यात वर्गीकरण केलं गेलं आहे. प्रीक्लिनिकल ओबेसिटी या पहिल्या टप्प्यात शरीरावर चरबीचं प्रमाण वाढतं. मात्र याचा शरीराच्या विविध अवयवांवर किंवा शारीरिक क्षमतेवर परिणाम होत नाही.

यामध्ये बीएमआय 23 किलो/चौरस मीटर निश्चित करण्यात आला आहे. परंतु, जर तो नियंत्रित केला नाही म्हणजेच बीएमआय 23 पेक्षा कमी केला नाही तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात.

क्लिनिकल ओबेसिटी या दुसऱ्या टप्प्यात बीएमआय 23 पेक्षा जास्त झाला तर पोटाभोवती अतिरिक्त चरबी जमा होते, त्यामुळे नितंब आणि कंबरेचा घेर वाढतो. या टप्प्यात व्यक्तीच्या शारीरिक क्षमतांवर परिणाम होतो.

या अहवालानुसार, केवळ बीएमआयच नव्हे तर पोटाभोवती साठलेल्या चरबीवरूनही लठ्ठपणाचं मूल्यमापन केल्यामुळे लठ्ठपणाचं नेमकं कारण शोधून त्यावर योग्य उपचार करणं सोपं होईल. कारण जी व्यक्ती लठ्ठ असते तिला अनेक आजारांचा धोका असतो.

लठ्ठपणाची कारणं काय?

डॉ. अपर्णा यांनी सांगितल्यानुसार, लठ्ठपणाची अनेक कारणं असू शकतात. या मध्ये अनेकदा आनुवंशिकता हे एक मजबूत कारण असल्याचं समोर येतं.

पर्यावरणाचे परिणाम आणि जीवनशैली, शहरीकरण, प्रक्रिया केलेले अन्न, बैठी जीवनशैली, हार्मोनल असंतुलन, मानसिक तणाव ही कारणंही आहेत.

काही लोकांमध्ये लठ्ठपणा येण्यामागचं कारण एखादा आजारही असू शकतो किंवा कधीकधी विशिष्ट प्रकारची औषधं देखील वजन वाढवू शकतात.

गरोदरपणात महिलांचं वजन वाढतं. त्यामुळे देखील लठ्ठपणा येण्याची शक्यता असते. पुरेशा झोपेच्या अभावामुळे देखील वजन वाढू शकतं. कारण त्यामुळे शरीरात हार्मोनल बदल होतात आणि भूक वाढते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लठ्ठपणाची अनेक कारणं असू शकतात.

भारतीय लोक खूप जास्त प्रमाणात भातासारखे स्टार्च असणारं अन्न खातात. त्यांच्या आहारात फार थोड्या प्रमाणात प्रथिनं असतात. त्याचबरोबर ते आरोग्यासाठी अपायकारक असं 'जंक फूड' खातात.

मद्यामध्ये पोषकद्रव्ये नसतात. मात्र त्यात खूप जास्त प्रमाणात कॅलरी असतात. यालाच एम्टी कॅलरीज असं म्हणतात. या कॅलरीज थेट यकृतात जातात आणि तिथे जाऊन चरबीच्या रूपात साठवल्या जातात.

पोट सुटणं (Abdominal Obesity) किती धोकादायक असतं?

डॉ. अपर्णा सांगतात, "लठ्ठपणामुळे हृदयरोग, पक्षाघात आणि उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यासंबंधी रोग होतात. फुफ्फुसाचे कार्य कमी होऊन श्वसनाच्या समस्या निर्माण होतात. पित्ताशयातील खडे आणि जीॲस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स असे पचनासंदर्भातील रोग होतात.

"आत्मविश्वास कमी होऊन, नैराश्य, चिंता यांमुळे मानसिक आजाराच्या शक्यता वाढतात. लठ्ठपणामुळे प्रजनन क्षमतेवर देखील नकारात्मक परिणाम होतो. कर्करोग, मधुमेह, संधिवात, यकृताचे आजार होतात."

यात जास्त धोका खालील आजारांचा असतो.

1) मधुमेह : मद्यासह अनेक गोष्टींमुळे यकृतात चरबी जमा होते. जर स्वादुपिंडात (pancreas)फक्त 1 ग्रॅम चरबी जरी जमा झाली तरी त्यातून मधुमेह होऊ शकतो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पोटावरील लठ्ठपणामुळे अनेक आजार होऊ शकतात.

2) हृदयविकाराचा झटका: चरबी जर ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठू लागली (atherosclerosis)तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.

3) स्ट्रोक (मेंदूच्या रक्तपुरवठ्यात अडथळा): मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये जर चरबी जमा होऊ लागली तर त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्यता असते.

4) उच्च रक्तदाब: रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठल्यानं रक्ताचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी अधिक दाबाची आवश्यकता पडते. यातूनच उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.

5) कर्करोग: अलीकडच्या काळात झालेल्या वैद्यकीय अभ्यासातून असं आढळून आलं की लठ्ठ लोकांमध्ये निरोगी वाढीच्या अभावामुळे कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.

6) झोपेशी निगडीत श्वसन विकार (Obstructive sleep apnea): लठ्ठ लोक जास्त घोरतात. ही देखील एक समस्या होऊ शकते.

लठ्ठपणाचा सामना कसा करायचा?

लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी दररोज नियमित व्यायाम करावा. दिवसातून तीन वेळा फळं, भाज्या यांचा समावेश असलेलं नियमित जेवण करावं.

गोड पदार्थ, अल्कोहोल आणि जंक फूड यांचं सेवन टाळावं. दररोज भरपूर पाणी प्यावं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी दररोज नियमित व्यायाम करावा.

डॉ. अपर्णा सांगतात, "संतुलित आहार, मानसशास्त्रीय समुपदेशन, वैद्यकीय सल्ल्यानुसार लठ्ठपणाविरोधी औषधं घेणं, बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक शस्त्रक्रिया यांच्या मदतीनं लठ्ठपणापासून स्वतःला वाचवता येतं."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.