लठ्ठपणामुळं मानसिक ताण, सख्ख्या भाऊ-बहिणीनं घेतला जीवन संपवण्याचा निर्णय

फोटो स्रोत, Getty Images
- Author, झेवियर सेल्वाकुमार
- Role, बीबीसी तमिळ
(महत्त्वाची सूचना: या बातमीत आत्महत्येचा संदर्भ आहे. यातील माहिती विचलित करणारी असू शकते.)
लठ्ठपणा संपूर्ण जगात चिंतेचा विषय बनला आहे. तो आता केवळ वाढत्या वजनाशी संबंधित राहिला नसून लोकांच्या मानसिक आजाराचेही कारण बनत चालला आहे.
पाश्चिमात्य देशांप्रमाणं भारतातही ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
"वडिलांनी आयुष्यभर काम करून पै न् पै वाचवली, मी परदेशात जाऊन रात्रंदिवस काम करून पैसे साठवले. हे सगळे पैसे आमच्या उपचारावर खर्च झाले."
"आमच्याकडे कोणत्याच सुविधा नव्हत्या. पाठदुखीचा उपचार महाग असतो. यावर भरपूर पैसा खर्च केला, कर्ज काढलं. आयुष्यभर साठवलेले पैसे कर्ज फेडण्यातच संपले."
"2023 मध्ये चेन्नईत आलेल्या पुरात जेव्हा घरातलं सामान वाहून गेलं, तेव्हा जीवनातील उरलीसुरली आशाही संपुष्टात आली," हे उद्गार आहेत, 46 वर्षीय इब्राहिम बाशा यांचे.
इब्राहिम यांनी आपल्या लहान बहिणीसह आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्यांच्या बहिणीचा मृत्यू झाला असून इब्राहिम यांच्यावर कोईम्बतूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
इब्राहिम बाशा आणि त्यांची धाकटी बहीण शमशाद बेगम (वय 33) हे कांचीपुरममधील दुराई पक्कम सचिवालय कॉलनीतील रहिवाशी आहेत.
दोघेही कोईम्बतूरमधील रामनगर येथील हॉटेलमध्ये उतरले होते.
14 फेब्रुवारी रोजी इब्राहिम हॉटेलमधून बाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशीपर्यंत ते परतले नाहीत. रुममधील त्यांची बहीण शमशाद याही त्यांच्या रुममधून बाहेर आल्या नव्हत्या.


"आम्हाला एकत्रित दफन करा"
संशय आल्याने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्या दोघांनी मुक्काम केलेल्या रुमचा दरवाजा तोडला. त्यावेळी शमशाद बेगम या मृतावस्थेत आढळून आल्या.
पोलिसांना रुममध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यात लठ्ठपणाला कंटाळून आम्ही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. मला आणि माझ्या भावाला एकत्रित दफन करावं, अशी इच्छाही त्या पत्रात व्यक्त करण्यात आली होती.
त्यानंतर पोलिसांना इब्राहिम हे कोईम्बतूर रेल्वे स्टेशनजवळ रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
पोलिसांनी लगचेच त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.
बीबीसी तमिळशी बोलताना कत्तूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक थेलाथ निशा यांनी इब्राहिम हे परदेशात ड्रायव्हर म्हणून काम करत होते, अशी माहिती दिली.

फोटो स्रोत, Getty Images
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोघे भाऊ-बहीण एकत्र राहत होते. लठ्ठपणामुळे दोघांनी विवाह केला नव्हता.
शमशाद बेगम यांचा छोटासा अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांच्या हालचालीवर मर्यादा आल्या होत्या. इब्राहिम यांनाच त्यांची देखभाल करावी लागत असत.
त्यामुळं इब्राहिम यांना कामावरही जाता येत नव्हतं. बचत केलेले सर्व पैसे संपल्यानंतर त्यांनी नातेवाईक, मित्रांची मदत घेण्याचा प्रयत्न केला.
परंतु, सर्वांकडून त्यांना नकार मिळत गेला. अखेरीस त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
शमशाद बेगम यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीच पुढं आलं नाही. त्यामुळं बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारी 'जीवनशांती' नावाच्या संस्थेनं कोईम्बतूरमध्ये ही जबाबदारी पार पाडली.
ही संस्थाच सध्या इब्राहिम यांना मदत करत आहे. इब्राहिम हे बरे झाल्यावर पोलीस आणि इतरांच्या मदतीने त्यांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार असल्याचे या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेले इब्राहिम बाशा हे आपल्या धाकट्या बहिणीच्या मृत्यूमुळे अत्यंत व्यथित झाल्याचे दिसून आले. बीबीसी तमिळला त्यांनी सर्व माहिती दिली.
"आमचे वडील हे मुळचे त्रिची येथील, तर आईचं गाव पेराम्बूर. परंतु, कामानिमित्त आम्ही चेन्नईत स्थायिक झालो."
"लहानपणी आम्हा दोघा भाऊ-बहिणीचं वजन सामान्य होतं. वडीलही लठ्ठ नव्हते. आमचा जन्म झाल्यावर आईचं वजन वाढल्याचं आम्हाला सांगितलं जातं."
"2017 मध्ये वडिलांचं निधन झालं. त्याच्या दुसऱ्याच वर्षी आईही आम्हाला सोडून गेली. तेव्हापासून आम्हाला लठ्ठपणाची समस्या जाणवू लागली."

मानसिक आरोग्यासंदर्भातील या बातम्याही वाचा:

"अचानकच आमच्या दोघांचं वजन वाढू लागलं. वाढत्या वजनामुळं आम्ही दोघांनी लग्नही केलं नाही," असं इब्राहीम बाशा म्हणाले.
दहावी पास असलेले इब्राहीम बाशा, सौदी अरेबियामध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होते. तिथं काम करण्यासाठी गेल्यानंतर दोन वर्षांतच त्यांचे वजन हळूहळू वाढू लागलं.
एका क्षणी त्यांना कामावर जाणं कठीण झालं होतं. आपल्या लहान बहिणीची काळजी घेणंही गरजेचं असल्यामुळे ते तिथून परत आले, असं त्यांनी सांगितलं.
"माझ्या बहिणीनं बी.कॉमनंतर एमबीए केलं. कॉलेज संपल्यानंतर काही दिवसांतच तिचं वजन वाढायला लागलं. त्यामुळं तिला कामावर जाणं कठीण होऊन गेलं."
"तिला पाठीचं दुखणं सुरू झालं. तीव्र वेदनांमुळं ती त्रस्त होती. त्यासाठी तिने खूप औषधं घेतली. नंतर तर तिला माझ्या मदतीशिवाय चालणं पण शक्य होईना," असं इब्राहिम म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
'लठ्ठपणाचा पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त परिणाम'
सध्या 178 किलो वजन असलेल्या इब्राहिम यांनी उठून चालायला सुरुवात केली आहे. ते धोक्याबाहेर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
''आतापर्यंतची आमची सर्व बचत संपली. खूप जणांकडून आम्ही कर्ज घेतलं आहे. आमच्याकडील इतर वस्तू आणि मोबाइल फोनसुद्धा आम्ही विकले. शेवटी काहीच उरलं नाही म्हणून आम्ही आत्महत्येचा निर्णय घेतला.''
"कोईम्बतूरमधील काही लोक मला मदत करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. उपचारानंतरच काय करायचं ते ठरवणार आहे," असं इब्राहिम बाशा म्हणाले.
शमशाद, इब्राहिम यांच्याप्रमाणेच, भारतात लठ्ठपणामुळं मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्रिक अँड न्यूरोलॉजीच्या (NIMHANS) अभ्यासात दिसून आलं आहे.
न्यूरोसायंटिस्ट्सच्या अभ्यासानुसार, भारतात लठ्ठपणाचे प्रमाण 40.3 टक्के असल्याचं दिसून आलं आहे.
तसेच पुरुषांच्या (38.67 टक्के) तुलनेत महिलांमध्ये (41.88 टक्के) लठ्ठपणाचे प्रमाण जास्त आहे.
ग्रामीण भागात लठ्ठपणाची समस्या 36.08 टक्के आहे, तर शहरी भागात ही समस्या 44.17 टक्के नोंदवण्यात आली आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांना, तसेच ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत शहरी भागातील लोकांना लठ्ठपणाचा त्रास जास्त असल्याचे संशोधन सांगते.
उच्चवर्गीय लोकांच्या तुलनेत मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना लठ्ठपणाचा त्रास अधिक असल्याचे बॅरिएट्रिक सर्जन सरवनकुमार यांनी सांगितलं.
या दाव्याची बीबीसीने पडताळणी केलेली नाही.

फोटो स्रोत, Saravanakumar
कोईम्बतूरमधील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असणारे सरवणकुमार म्हणाले, "मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांमध्ये उदरनिर्वाहासाठी संघर्ष सुरू असतो. त्यामुळं अशा लोकांना आपल्या शरीराची काळजी घेता येत नाही."
"योग्य वेळेत आहार घेणं, चालणं किंवा व्यायाम करणं यासारख्या गोष्टींच्या वेळा पाळणं त्यांना शक्य होत नाही. त्यामुळं ते लठ्ठपणाच्या समस्यांना जास्त तोंड देत आहेत."
"भारतामध्ये अनुवांशिकदृष्ट्या लठ्ठपणाचा धोका असलेल्या लोकांपेक्षा, शहरीकरण, जीवनशैली, खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव यांसारख्या कारणांमुळे याचा फटका बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळंच भारतात मधुमेह आणि लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे," असं डॉ. सरवणकुमार सांगतात.
डॉ. सरवणकुमार यांना तामिळनाडू सरकारनं सरकारी डॉक्टरांना लठ्ठपणावर उपचार करण्याचे प्रशिक्षण देण्यास मान्यता दिली आहे.
यासंदर्भात त्यांनी चेन्नई वैद्यकीय महाविद्यालय, स्टॅन्ली वैद्यकीय महाविद्यालय, कोईम्बतूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना दोन आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं आहे.
"प्रत्येक व्यक्तीवर त्यांच्या बीएमआयनुसार (बॉडी मास इंडेक्स) उपचार केले जातात. याद्वारे लठ्ठपणा कमी करण्यास मदत होऊ शकते," असं ते म्हणाले.
परंतु, ही उपचारपद्धती सर्वांसाठी यशस्वी होईल का, याबद्दल वेगवेगळी मतं आहेत.
गेल्या वर्षी पुद्दुचेरी येथील 26 वर्षीय हेमचंद्रन यांच्यावर पम्मल येथील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू असताना मृत्यू झाला होता.
'मानसिक आधाराची गरज'
"लठ्ठपणा कोणत्या कारणांमुळे आला आहे यानुसार त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम होतो," असं मनोचिकित्सक डॉ. व्यंकटेश्वरन यांनी बीबीसी तमिळशी बोलताना म्हटलं.
"आनुवंशिकतेपेक्षा हार्मोन्सच्या कमतरतेमुळे लठ्ठपणा येतो, तेव्हा मानसिक ताण देखील वाढतो. काही लोकांमध्ये मानसिक ताणामुळं देखील लठ्ठपणा येऊ शकतो. चालण्यात अडचण आणि काम करता न येणं, यामुळंही तणाव वाढतो," असं ते म्हणाले.
विवाह न होणे, मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे विकार यांसारख्या समस्यांमुळे लठ्ठपणा वाढणाऱ्यांना मानसिक ताण अधिक जाणवतो, असं डॉ. व्यंकटेश्वरन सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"शारीरिक व्यंगावरुन मारण्यात येणारे टोमणे आणि चेष्टा यामुळंही नैराश्य येऊ शकतं, " असं ते म्हणतात.
ते म्हणाले, "लठ्ठपणाबद्दलच्या चिंतेमुळं आणि त्यांना कोणताच आधार न मिळाल्याची निराशा हे इब्राहिम आणि शमशाद यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचं कारण असू शकतं."
"आत्महत्येतून बचावलेल्या इब्राहिम यांना सध्या मानसिक दिलासा आणि भविष्यासाठी आशा देणाऱ्या शब्दांची गरज आहे," असंही व्यंकटेश्वरन यांनी नमूद केलं.
महत्वाची नोंद
मानसिक आरोग्याच्या समस्यांवर औषधोपचार आणि थेरपीनं सहज उपचार करता येतात. यासाठी संबंधित हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधून तुम्ही सहाय्य मिळवू शकता.
राज्य आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन – 104 (24 तास)
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हेल्पलाइन - 1800-599-0019
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











