चार गावातल्या 37 जणांची अचानक नखं तुटू लागली, बुलढाण्यात नेमकं काय सुरू आहे?

केसगळतीनंतर आता बुलढाण्यात नखगळतीची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
फोटो कॅप्शन, केसगळतीनंतर आता बुलढाण्यात नखगळतीची प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

बुलढाणा जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये केसगळती होऊन लोकांना टक्कल पडलं होतं, त्याच गावात आता नखं तुटण्याचीही समस्या उद्भवली आहे.

विशेष म्हणजे, ज्या लोकांचे केस गळत होते त्यांचीच आता नखंही गळत आहेत.

शेगाव तालुक्यातील कोलवड, बोंडगाव, कठोरा, मच्छिंद्रखेड या चार गावात आतापर्यंत या समस्येनं बाधित असलेले 37 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या नेमकं काय घडतंय?

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला नखं कोरडी पडतात. त्यानंतर त्यावर पिवळसर डाग पडायला लागतात आणि सरतेशेवटी ती गळून पडू लागतात. ज्या रुग्णांना केसगळतीच्या समस्येला सामोरं जावं लागलं होतं, त्यांना आता या नव्या समस्येला सामोरं जावं लागतंय.

बुलढाणा नखगळती

यासंदर्भात आम्ही बुलढाण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्याशी चर्चा केली.

ते म्हणाले, "ICMR ने अजूनपर्यंत केसगळतीच्या समस्येची कारणीमीमांसा करणारा अहवाल दिलेला नाही. त्यामुळे हा नखं तुटण्याचा प्रकार नेमका कशामुळे होत आहे, हे सांगता येणार नाही."

याआधी केसगळतीची समस्या

याआधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा तालुक्यात अचानक केसगळती सुरू होऊन टक्कल पडण्याची समस्या निर्माण झाली होती.

शेगाव तालुक्यातील 12 गावं, तर नांदुरा तालुक्यातील एका गावात केसगळतीचे रुग्ण आढळून आले होते.

आयसीएमआर, होमिओपॅथी, युनानी यांच्यासह अनेक मेडीकल संस्थानी इथं येऊन संशोधन केलं आहे. पण, केस का गळतात याचं कारण समजू शकलेलं नाही.

बुलढाण्यातील केसगळतीचं कारण शोधण्याचा प्रयत्न पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनीही केला आहे. या भागातील रुग्णांवर संशोधन करून केसगळतीचं कारण शोधून काढलं असल्याचाही दावा केला आहे.

हिम्मतराव बावस्कर यांनी याआधीही विंचूदंशावरील औषध शोधून काढलं होतं. त्यांना पद्श्री पुरस्कारानं देखील सन्मानित करण्यात आलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील केसगळतीनं बाधित गावांना डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी 17 जानेवारीला भेट दिली. त्यांनी रुग्णांचं रक्त, केस, लघवी, या भागातला कोळसा, माती, पाणी आणि राखेचे नमुने गोळा केले.

तसेच या भागात उगवणाऱ्या तूर, गहू, ज्वारीसारख्या धान्याचे नमुने आणि त्यासोबतच भाजीपाल्याचे नमुने सुद्धा गोळा केले. त्यांनी या सगळ्या नमुन्यांची खासगी लेबोरेटरीमध्ये तपासणी केली असता त्यांना रुग्णांचे केस का गळतात याचं कारण सापडलं.

केसगळतीनं बाधित रुग्णांच्या लघवी, रक्त आणि केसांमध्ये सेलेनियमचं प्रमाण दहापटीनं जास्त आढळून आलं आहे, तर त्यांच्या रक्तातलं झिंकचं प्रमाण कमी झालं आहे.

रक्तातील झिंकचं प्रमाण एकदम कमी झाल्यानं आणि सेलेनियमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे अचानक केसगळती होत असल्याचं डॉ. बावस्कर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

व्हीडिओ कॅप्शन, बुलडाण्यात जिथे लोकांचे केस गळायचे, तिथेच आता नखं तुटण्याची प्रकरणं?

शरीरात सेलेनियम इतक्या मोठ्या प्रमाणात कुठून आलं?

पण, शरीरात सेलेनियम इतक्या मोठ्या प्रमाणात कुठून आलं? याचाही शोध घेणं महत्त्वाचं आहे.

त्यासाठी त्यांनी या भागातील धान्याची तपासणी केली. मात्र, त्यांना या धान्यांमध्ये सेलेनियमचं प्रमाण अधिक आढळलं नाही. पण, या धान्यात झिंकचं प्रमाण मात्र कमी दिसलं.

जमिनीतही फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे. यामुळे धान्यातील झिंकचं प्रमाण कमी होतं. हा भाग खारपान पट्टा आहे. त्यामुळे, या भागातली माती अल्कलाईन आहे.

त्यातच इथे मोठ्या प्रमाणात फॉस्फेटसारख्या खतांचा वापर होतो. त्यामुळे धान्यात झिंक न वाढता ते मातीत विरघळून जाते.

त्यामुळे धान्यातील झिंकचं प्रमाण कमी होते. या धान्यामधून शरीराला पाहिजे तितकं झिंक मिळत नाही, असंही डॉ. बावस्कर यांनी सांगितलं.

लाल रेष

या बातम्याही वाचा:

लाल रेष

यावर उपाय काय?

इतकंच नाहीतर माती, कोळसा आणि राखेत फॉस्फरसचं प्रमाण जास्त आढळून आलं आहे. या भागातील बोअरवेलच्या पाण्याची सुद्धा तपासणी करण्यात आली.

केसगळतीनं बाधित रुग्णांच्या लघवी, रक्त आणि केसांमध्ये सेलनियमचं प्रमाण दहापटीनं जास्त आढळून आलं आहे, तर त्यांच्या रक्तातलं झिंकचं प्रमाण कमी झालं आहे.
फोटो कॅप्शन, केसगळतीनं बाधित रुग्णांच्या लघवी, रक्त आणि केसांमध्ये सेलनियमचं प्रमाण दहापटीनं जास्त आढळून आलं आहे, तर त्यांच्या रक्तातलं झिंकचं प्रमाण कमी झालं आहे.

यामध्ये सुद्धा झिंकंचं प्रमाण कमी आढळून आलं. त्यामुळे लोकांनी या पाण्याचा वापर करू नये. तसेच सरकारनं सुद्धा या लोकांना पिण्यासाठी चांगलं पाणी द्यावं, असाही सल्ला त्यांनी दिला.

पण, जे सेलेनियम केसगळतीसाठी कारणीभूत ठरत आहे ते रुग्णांच्या शरीरात इतक्या मोठ्या प्रमाणात आलं कुठून? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

डॉ. हिम्मतराव बावस्कर

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, डॉ. हिम्मतराव बावस्कर

इथं उगवणाऱ्या धान्यात सेलेनियम वाढलेलं नाही. मग ते आलं कुठून? त्याचा स्त्रोत शोधून काढण्याची गरज आहे. सेलेनियम शरीरात वाढल्यामुळे मृत्यू होतो असं नाही. पण, यामुळे हृदयरोगाचा त्रास होऊ शकतो, असंही ते सांगतात.

तसेच लोकांनी शेतजमिनीत फॉस्फेटचा जास्त वापर करू नये. फॉस्फेटचा वापर कमी करून जिप्समचा वापर वाढवावा. त्यामुळे धान्यात झिंकचं प्रमाण वाढेल.

डॉ. बावस्कर यांनी स्वखर्चानं हे संशोधन केलं असून यासाठी त्यांना 82 हजार रुपये खर्च आला आहे.

आयसीएमआरच्या अहवालाची अजूनही प्रतिक्षाच

पण, रुग्णांच्या केसगळतीबद्दल आयसीएमआरचा अहवाल अद्याप प्रकाशित झालेला नाही. तज्ज्ञांनी अहवाल तयार करून आयसीएमआरकडे सोपवला आहे.

गळती झालेले केस आजीने जमा करून ठेवले आहेत.
फोटो कॅप्शन, गळती झालेले केस आजीने जमा करून ठेवले आहेत.

पण, आयसीएमआर तो अहवाल कधी प्रकाशित करणार आणि केसगळती का होत आहे, याचं कारण कधी समोर येणार याची प्रतीक्षा सगळेच करत आहेत.

आतापर्यंत रुग्णसंख्या 222 वर पोहोचली

बुलढाण्यात केसगळतीचं पहिलं प्रकरण 31 डिसेंबरला समोर आलं होतं. शेगाव तालुक्यातील बोंडगावात एका घरातील महिलेचे आणि दोन मुलींचे केस अचानक गळायला सुरुवात झाली. पण, शाम्पूमुळे केस गळत असेल असं त्यांना वाटलं.

त्यामुळे सुरुवातीचे तीन दिवस त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. पण, चौथ्या दिवशी अर्ध्यापेक्षा कमी केस डोक्यावर शिल्लक राहिले. त्यामुळे त्यांनी खासगी डॉक्टरांना दाखवलं. चुकीचा शाम्पू वापरल्यामुळे ही केसगळती होत असल्याचं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं.

पण, दुसऱ्याच दिवशी गावात केसगळतीचं आणखी एक प्रकरण समोर आलं. या व्यक्तीनं कधीही शाम्पूचा वापर केला नव्हता. त्यामुळे हा काहीतरी गंभीर प्रकार असल्याचं निष्पन्न झालं. ही बाब कळताच बोंडगावचे सरपंच रामा पाटील थारकर यांनी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या लक्षात ही गोष्ट आणून दिली.

बुलढाण्यात केसगळतीचं पहिलं प्रकरण 31 डिसेंबरला समोर आलं.
फोटो कॅप्शन, बुलढाण्यात केसगळतीचं पहिलं प्रकरण 31 डिसेंबरला समोर आलं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जिल्हा प्रशासनानं पाण्याचे, रक्ताचे नमुने तपासले. तरीही केसगळती का होत आहे याचं कारण त्यात समजू शकलं नव्हतं. त्यानंतर या प्रकरणाची केंद्रानं दखल घेत आयुष मंत्रालय, आयसीएमआर यांच्या शास्त्रज्ञांच्या टीम या गावात संशोधनासाठी पाठवल्या होत्या.

त्यांनीही रुग्णांचे लघवी, केस, रक्ताचे नमुने गोळा करून नेले. तसेच गावातल्या पाणवठ्यातून पाण्याचे नमुने, मातीचे नमुने सुद्धा आयसीएमआरच्या टीमनं गोळा केले होते. त्याचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे.

सध्या बुलढाणा जिल्ह्यात केसगळतीचे 222 रुग्ण आहेत, तर केसगळती होऊन टक्कल पडलेल्या रुग्णांच्या डोक्यावर पुन्हा केस येऊ लागले आहेत. पण, काही लोकांचे केस पुन्हा गळत आहेत.

या केसगळतीच्या प्रकरणाचा परिणाम या गावातल्या तरुण-तरुणीवर होत असल्याचं गावात फिरताना दिसलं होतं. या प्रकरणावर बोलायला तरुण मंडळी घाबरत होती.

कारण, आपला फोटो मीडियावर गेला तर आपल्याला लग्नासाठी कोणी मुलगी देणार नाही, अशी भीती इथले तरुण बोलून दाखवत होते. तसेच टक्कल पडलेल्या महिला सुद्धा पुढे येऊन बोलायला घाबरत होत्या.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)