दोन्ही शिवसेनेंचा दसरा मेळावा: काय म्हणाले एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे?

महाराष्ट्रामध्ये असलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) यांचे दसरे मेळावे कसे होतील याकडे मराठी माणसाचे लक्ष लागले होते. सौम्य पाऊस सुरू असतानाच दोन्ही शिवसेनेंचे दसरा मेळावे पार पडले.

या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केलं.

उद्धव ठाकरेंचे भाषण दादर, शिवतीर्थावरुन झाले तर एकनाथ शिंदेंनी गोरेगावच्या नेस्को सेंटरहून आपल्या समर्थकांना संबोधित केले.

दोघांच्या भाषणात पूरस्थितीबद्दल उल्लेख झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात टीका केली. या दोन्ही नेत्यांनी काय म्हटले ते आपण पाहू.

उद्धव ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जे मुद्दे मांडले ते खोडून काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी भाषणातून केला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

यंदाचा दसरा मेळावा आपण केवळ मुंबई आणि ठाण्यातील शिवसैनिकांपुरता मर्यादित केला आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. माझा बळीराजा संकटात आहे.

त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यामुळे यावेळी आपण त्या त्या ठिकाणच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्या शेतकरीबंधूंना मदत करण्यासाठी तिकडेच थांबायला सांगितलं. त्यांचा दसरा तुम्ही साजरा करा, असं त्यांना सांगितलं आहे.

बळीराजाचं दुःख मोठं आहे. त्यांची शेती वाहून गेली आहे, पशुधन गेलं आहे, घरं पडली आहेत, मी बांधा-बांधावर जाऊन आलोय. त्यांचं दुःख मी डोळ्यात पाहिलं आहे. अशावेळी त्यांना मदत केली पाहिजे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण

बाळासाहेब ठाकरेंनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्याचा मूलमंत्र दिला होता. तो मूलमंत्र मी कधीच सोडणार नाही. अनेक शिवसैनिक तिथं मदत करत आहेत. तिथे मदतीच्या गाड्या जात आहेत.

जिथे आपत्ती तिथे शिवसेना आहे. जिथे संकट तिथे तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही. मदतीचं धोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे. जेव्हा-जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा शिवसेना धावून जाते. ही आपली जबाबदारी आहे. महापुरामुळे बळीराजा कोलमडून गेला आहे.

पण आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. सरकार त्यांच्या मागे आहे. कोणत्याही अटी-शर्थीशिवाय कुठल्याही परिस्थिती बळीराजाला मदत केली पाहिजे, हे महायुती सरकारने ठरवलं आहे.

संकट मोठं आहे. अशी परिस्थिती कधी पाहिली नव्हती. यंदाच्या दसऱ्यावर पुराचं मोठं सावट आहे. या संकटात बळीराजाच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना करत आहे. बाळासाहेब असते तर त्यांनी पाठ थोपटली असती. पाऊस वैऱ्यासारखा कोसळला आहे. अशा परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.

पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही

आयाबहिणींनो धीर सोडू नका, मी देखील शेतकरी आहे. शेतकऱ्यांचं दुःख मला माहीत आहे. पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीपूर्वीच त्यांना मदत दिली जाईल, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.

कपड्यांची इस्त्री न मोडता, व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि वर्क फ्रॉम होम काम करणारा एकनाथ शिंदे नाही. आपत्ती काळात घरात बसून काम करणारा शिवसैनिक असूच शकत नाही.

बाळासाहेब म्हणायचे संकटात शिवसैनिक घरात नव्हे तर लोकांच्या दारात पाहिजे. त्यामुळे आपला शिवसैनिक घरोदारी मदत घेऊन फिरतोय. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे कट्टर शिवसैनिक आहोत याचा मला सार्थ अभिमान आहे.

मदतीचं किट देताना त्यावरील फोटो दिसतात पण त्यातील सामान त्यांना दिसत नाही. त्या किटमध्ये 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू आम्ही दिल्या आहेत. तुम्ही एकतरी बिस्किटचा पुडा घेऊन दिला आहे का? तेवढी तरी दानत दाखवायची. फोटोग्राफरला फोटोशिवाय काय दिसणार? फोटोच दिसणार ना...

आधी आम्ही कार्यकर्ते तुमचे फोटो लावून मदत करत होतो, तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं.

काही लोकं गेले, फक्त नौटंकी करून आले. पण आम्ही जायच्या आधी तिथे मदतीचे ट्रक गेले आणि मग हा एकनाथ शिंदे तिथे गेला. ही आमची पद्धत आहे.

मी फक्त एवढंच सांगतो की, यांचे दौरे म्हणजे...'खुद को चाहिए काजू-बदाम, पानी में उतरो तो सर्दी जुकाम'.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले, कुठंही गेलं की माझ्या हातात काय आहे असं म्हणतात. जेव्हा हातात होतं, तेव्हाही दिलं नाही, आताही देत नाही आणि उद्याही देणार नाही. द्यायला दानत लागते.

शिवसैनिक हीच माझी संपत्ती

मी मुख्यमंत्री असताना सीएम म्हणजे कॉमन मॅन होतो. मी आता उपमुख्यमंत्री म्हणजे डीसीएम आहे. याचा अर्थ डेडिकेटेड टू कॉमनमॅन आहे. माझी सर्वसामान्य माणसांशी बांधिलकी आहे.

एकनाथ शिंदेचे हात देणारे आहेत. त्यानं कधीच म्हटलं नाही की माझे हात रिकामे आहेत. हे शिवसैनिक माझे ऐश्वर्य आहे, ही माझी संपत्ती आहे. संपत्तीचा मोह मला नाही. प्रॉपर्टीचाही नाही. प्रॉपर्टी तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या. बाळासाहेबांचे विचार हीच माझी संपत्ती आहे. एकनाथ शिंदेनं दिलेलं या हाताचं त्या हाताला सांगितलं नाही.

यांनी 30 वर्षे मुंबई महापालिका ओरबडून घेतली. कुठं गेली एवढी माया? लंडनला का?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल विरोधक खोट्या अफवा पसरवत आहेत. पण ही योजना कधीही बंद होणार नाही. हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे.

अडीच वर्षाच्या कारकीर्दीमध्ये एवढं काम केलं म्हणूनच महायुतीचे तब्बल 232 आमदार विजयी झाले. आता बळीराजाला सर्व निकष बाजूला ठेऊन मदत केली जाईल.

मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्राला भरीव निधी

2014 ला मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्राला भरीव निधी मिळाला. आपल्या राज्याला इतका निधी यापूर्वी कधीच मिळाला नव्हता. पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी सन्मान योजनेतून महाराष्ट्राला 46 हजार कोटी रुपये दिले. राज्यानेही वर्षाला यासाठी पैसे दिले. ऊस उत्पादक शेतकरी संकटात होता. त्यावेळी अमित शहा यांनी 10 हजार कोटींचा इन्कम टॅक्स माफकेला.

मोदी सरकारने 2014 पासून महाराष्ट्राला 10 लाख कोटी रुपये दिले आहेत. वाढवण बंदर, अटल सेतू योजना, नवी मुंबईचं विमानतळ, मेट्रो 3 प्रकल्प. त्याला केंद्रानेच मदत केली आहे.

महाबिघाडीचं सरकार असतं आणि हे मुख्यमंत्री (उद्धव ठाकरे) तर यातील कोणतीच योजना सुरू झाली नसती. सर्व ठप्प झालं असतं. हे स्थगित सरकार नाही तर प्रगती सरकार आहे.

मोदी महाराष्ट्राच्या मागे खंबीरपणे उभे

मी पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा सर्व स्थगिती हटवली. त्यावेळी सर्व प्रकल्प बंद होते, मंदिरं बंद होती ते आधी सुरू केलं. विकास प्रकल्प सुरू केले. अडीच वर्षात इतकं काम केलं की दुसरी इनिंगही सुरू झाली. आता फडणवीस यांची टीमही तितक्याच जोमानं काम करत आहे.

पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्राच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरनंतर विदेशात जे शिष्टमंडळ पाठवलं त्याचं नेतृत्त्व करण्याचं काम मोदींनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिलं. तामिळनाडूमध्ये जेव्हा दुर्घटना घडली तेव्हाही त्यांनी श्रींकात शिंदे यांना पाठवलं. मिलिंद देवरा यांनाही परदेशात पाठवलं होतं. आपल्या देशाची सेवा करण्याची संधी देखील पंतप्रधान मोदी देतात.

तुम्ही पाकिस्तानमध्ये घ्या दसरा मेळावा

राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतात. हे देशप्रेम आहे का? हीच देशभक्ती आहे का? सावरकरांवर जे टीका करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि हिंदुत्त्वाबद्दल बोलता. तुमचं हिंदुत्त्व बेगडी आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबद्दल मूग गिळून गप्प बसता. तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

हिंदुत्त्व हा काही टी शर्ट नाही. 2019 ला तुम्ही काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली तेव्हाच तुमचं हिंदुत्त्व सुटलं. जेव्हा मुख्यमंत्री पदाची खूर्ची पाहिजे होती तेव्हा तुम्ही त्यांचे विचार सोडले. एका खुर्चीसाठी सगळं घालवलं.

आम्हाला कोणीतरी सांगितलं की, आमचा दसरा मेळावा सूरतला घ्या. पण सूरत तर भारतात आहे. पण तुम्ही तुमचा दसरा मेळावा पाकिस्तानला घ्या आणि असिम मुनीरला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवा.

पक्षप्रमुख नव्हे कटप्रमुख

पक्षाचा प्रमुखच पक्षातील लोक संपवण्यासाठी काम करणारा हा जगातील पहिला पक्षप्रमुख असेल अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला.

त्यांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना संपवण्यासाठी कारस्थान केलं. ते कधीच आत्मपरीक्षण करणार नाहीत. हजारो-लाखो लोकं चुकीचे आणि एकच माणूस कसा बरोबर, असा सवाल त्यांनी केला.

आता पक्षाची परिस्थिती काय आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांची सावली देखील त्यांच्याबरोबर राहिल की नाही याची शंका वाटते.

मुंबईला आम्ही पुढं नेतोय

मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाला तोडणार अशा चर्चा हे सुरू करतात. पण कोणाच्याही सात पिढ्या खाली आल्यातरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही. मुंबई महाराष्ट्राची आणि मराठी माणसाचीच राहणार आहे.

आता निवडणुकीसाठी यांचं प्रेम ऊतू चाललंय. पण तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. बाहेर गेलेला मुंबईकर मराठी माणूस पुन्हा इकडं आणण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे.

मुंबईत अनेक प्रकल्प पुढे नेत आहोत. रमाबाई आंबेडकर नगर प्रकल्प पुढे नेतोय, सर्व रस्ते क्राँकिट करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र विकासात क्रमांक एकवर आहे. परदेशी गुंतवणुकीत आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. इथल्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे.

मोदी हे बेदाग पंतप्रधान

यूपीए सरकारने 10 वर्षांत भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. 2014 नंतर मोदींनी सत्तेवर येताच घोटाळेबाजांना तुरुंगात टाकलं. देश पुढे चालला आहे. जगात आता चौथ्या क्रमांकावर आहे.

मोंदीवर आतापर्यंत एकही आरोप झालेला नाही. ते 'बेदाग' पंतप्रधान आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

मी राज्याच्या विकासासाठी पैसे आणायला दिल्लीला जातो. 10 जनपथला मुजरा करायला जात नाही. मोदींनी धडाकेबाज निर्णय घेतले. मोदींनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं.

शिवसेना-मनसे युतीवरही भाष्य

मुंबईतील 40 लाख झोपडपट्टी धारकांना घर देण्याचं बाळासाहेबांचचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करणार आहे. गिरणी कामगारांना घर देण्याचं काम महायुती करणार आहे. लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली आता स्थानिक स्वराज संस्था देखील महायुती जिंकल्याशिवाय राहणार नाही.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीची सत्ता आणणं आवश्यक आहे, नाहीतर जी मुंबई पुढे जात आहे, ती पुन्हा 25 वर्षे मागे जाईल. अडीच वर्षात मुंबईसाठी जे आपण काम केलं आहे, ते पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. महायुतीचा भगवा फडकला पाहिजे. कोण कोणाशी युती करतो, कोणाचं मनोमिलन होतंय याकडे लक्ष देऊ नका. त्यांचा हिशोब मी बघतो.

संघाने राष्ट्रभक्ती जागृत केली

त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. संघाचे हेच लोक संकटात मदतीला धावून येतात. ते समर्पित भावनेनं का करतात. त्यांच्या संघटनेला 100 वर्षे झालीत. राष्ट्रभक्ती, देशभक्ती जागृत करण्याचं काम संघानं केलं आहे. शिवसेनेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.

शिवसेना साजरा करणारा बाळासाहेबांची जन्मशताब्दी

यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीबाबतही भाष्य केलं. त्यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर मतभेद विसरून स्थानिक स्वराज निवडणुकीत भगवा महायुतीची सत्ता येण्यासाठी कष्ट करण्याचा सल्ला दिला.

त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भात ज्यांच्या आयुष्यात आता नैसर्गिक संकट आलं आहे. त्यांच्या मुलांची लग्नं ठरली असतील तर त्यांची सर्व जबाबदारी शिवसेना घेईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. माझ्याकडे देण्यासाठी दोन हात आहेत, ते रिकामे नाहीत. बांधिलकी म्हणून ही जबाबदारी घेतल असल्याचे त्यांनी यावेळी म्हटलं.

पुढील वर्ष हे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. शिवसेना हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून साजरा करणार असल्याची त्यांनी घोषणा केली.

असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचे भाषण

आज विजयादशमीनिमित्ताने शिवाजी पार्कवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा झाला. या मेळाव्यात भर पावसात त्यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? यावर देखील त्यांनी भाष्य केले आहे.

सोबतच त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही काही प्रश्न विचारले आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करण्यावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

'पळवलं ते पितळ, सोनं माझ्याकडेच'

जे पळवलं ते पितळ होतं, सोनं माझ्याकडेच आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.

उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूराच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर न करण्यावरून सरकारवर टीका केली.

ते म्हणाले की, "शेतकरी विचारतोय आम्ही खायचं काय... अशी परिस्थिती यापूर्वी कधी आली नव्हती. सर्व शिवसैनिकांना आवाहन करतोय, हे संकट फार मोठं आहे. फुल नाही फुलाची पाकळी देऊ. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करू. आजचे जे मुख्यमंत्री आहेत. ते आमचं सरकार होतं तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगत होते आणि आता म्हणत आहेत की ही संज्ञाच नाहीये. मी आजही सांगतोय की सगळे निकष बाजूला ठेवा आणि ज्यांचं नुकसान झालंय, त्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत केलीच पाहिजे. मी माझ्या सरकारमध्ये कर्जमुक्ती केली होती. निवडणुकीच्या तोंडावर नाही."

'सोनम वांगचुक देशद्रोही कसे?'

उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांना झालेल्या अटकेवरूनही सरकारवर टीका केली.

ते म्हणाले की, "सोनम वांगचुक एक चांगला देशभक्त या माणसाने अतिशय दूर्गम भागात त्यांनी न्यायहक्कासाठी आंदोलन सुरू केलं. न्यायहक्क ही लोकशाहीतील मुलभूत गरज आहे. या लढाईसाठी उपोषण सुरु ठेवलं होतं पण सरकार ढुंकून बघायला तयार नाही. जेनझी लेह-लडाखमध्ये रस्त्यावर आले. तेव्हा त्यांना मोदी सरकारने रासुका कायद्याखाली आतमध्ये टाकलं. कारण मोदींची स्तुती करत होते, तोपर्यंत वांगचुक देशद्रोही नव्हते. आता त्यांना देशद्रोही ठरवलं जातंय. नवाज शरीफचा केक गुपचूप खाऊन येणाऱ्या मोदींना काय म्हणावं?"

पुढे ते म्हणाले की, "तीन वर्ष मणिपूर जळतंय. मणिपूरला गेल्यावर मोदींनी भाषण केलं की, मणिपूरच्या नावातच मणी आहे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणी दिसला पण जनतेच्या डोळ्यातलं पाणी दिसलं नाही?"

देवेंद्र फडणवीसांवर टीका

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

इंडिया टुडेच्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा क्रमांक दहावा आहे, हा मुद्दा मांडत त्यांनी फडणवीसांवर टीका केली.

ते म्हणाले की, "इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये सगळ्यात प्रसिद्ध योगी आदित्यनाथ, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू, नितीश कुमार, स्टॅलिन, पिनारायी विजयन, रेवंथा रेड्डी, मोहन यादव, हेमंता बिस्वा सरमा आणि दहाव्या क्रमांकावर फडणवीस आहेत. हे पहिले येणार कसे, सगळी बजबजपुरी करुन ठेवली आहे."

पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, "सगळीकडे चिखल झालेला आहे. याचं कारण कमळाबाई. कमळाबाईच्या कारभाराने कमळाबाईनं स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. पण जनतेच्या आयुष्याचा चिखल करून टाकला आहे. शेतकऱ्यांच्या घरादाराचा चिखल झाला आहे. शेती वाहून गेली आहे. राहायचं कुठे? शेतकरी विचारतोय की आम्ही खायचं काय? अशी परिस्थिती यापूर्वी कधी आली नव्हती. आजपर्यंत मराठवाडा दुष्काळग्रस्त झाला होता. आता तिथे अतिवृष्टी झाली आहे."

मोहन भागवतांना प्रश्न

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनाही प्रश्न विचारले.

भाषणाच्या सुरुवातीलाच ते म्हणाले की, "संघाच्या दसरा मेळाव्याबद्दल मी जरूर बोलणार आहे. शंभर वर्षे ही थोडीथोडकी नाहीयेत. संघाची शंभर वर्षे पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधीजयंती आहे, हा योगायोग म्हणावा की कळत नाही."

"मोहन भागवत मुस्लीम संघटनांच्या बैठकीत जात आहेत. आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांची हिंमत आहे का की मोहन भागवतांना देशद्रोही म्हणायची?" असा सवालही त्यांनी केला.

"हिंदूत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका," असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का?

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं.

या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मग पाच जुलैला काय केलं आम्ही? आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मातृभाषेचा अपमान होऊ देणार नाही. आमचा हिंदीला विरोध नाही, पण आमच्यावर सक्ती करायची नाही."

"दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का, उद्धव ठाकरे जाणार का, अशा कंड्या पिकवणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही मराठीला हात लावून बघा. हात जागेवर राहणार नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)