गांधीहत्येतील नऊ आरोपी कोण होते? ते एकमेकांना कसे भेटले?

30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या करण्यात आली.

महात्मा गांधींची हत्या म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर 'नथुराम गोडसे' हे एकच नाव उभं राहतं.

स्वत: नथुराम गोडसेनेही आपण एकट्यानेच कट रचून महात्मा गांधींचा खून केल्याचा कबुलीजबाब या खून खटल्यावेळी न्यायालयात दिला होता.

गांधीजींच्या हत्येप्रकरणाच्या सुनावणीत दोषी नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे या दोघांना 15 नोव्हेंबर 1949ला फाशी देण्यात आली.

मात्र, गांधी खून खटल्यात एकूण 9 आरोपी होते.

नारायण दत्तात्रय आपटे, नथुराम विनायक गोडसे, विष्णू रामचंद्र करकरे, विनायक दामोदर सावरकर, दिगंबर रामचंद्र बडगे, शंकर किस्तय्या, मदनलाल काश्मिरीलाल पाहवा, गोपाळ विनायक गोडसे आणि डॉ. दत्तात्रय सदाशिव परचुरे अशी या 9 आरोपींची नावे होती.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी देशभर सुरू असलेल्या चळवळीचं नेतृत्व ज्या व्यक्तीनं केलं, त्या महात्मा गांधींच्या हत्येचा कट नेमका कुणी रचला?

या खून खटल्यातील आरोपी कोण होते? त्यांची पार्श्वभूमी काय होती? ते कोणता व्यवसाय करायचे आणि ते एकमेकांना कसे भेटले? ते कोणत्या संघटनांमध्ये कार्यरत होते?

या आणि अशा प्रश्नांची माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

आरोपी क्रमांक एक असलेल्या नथुराम गोडसेबद्दलची माहिती सर्वांत शेवटी पाहू. सुरुवात नारायण आपटेपासून करू.

गांधीहत्या प्रकरणात ज्या दोन जणांना फाशी झाली, त्यातला एक महत्त्वाचा आरोपी म्हणजे नारायण आपटे होय. तो नथुराम गोडसे इतकाच महत्त्वाचा आरोपी होता.

खरंतर गांधी हत्येचा शेवटचा प्रयत्न यशस्वी होण्याआधी जे काही प्रयत्न या टोळीने केले होते, त्याचं नेतृत्व आपटेकडेच होतं. मात्र, 20 जानेवारी रोजी करण्यात आलेला गांधीहत्येचा प्रयत्न फसला आणि या हत्येची सगळी जबाबदारी नथुरामने आपल्या खांद्यावर घेतली.

या नारायण आपटेविषयी माहिती देताना महात्मा गांधींचे पणतू आणि 'लेट्स किल गांधी' या पुस्तकाचे लेखक तुषार गांधी म्हणतात की, "या सर्व काळामध्ये बहुतांशी नारायण आपटेच या टोळीचा म्होरक्या होता. गांधीजींचा अंतिम हल्लेखोर नथुराम गोडसे या टोळीचा एकनिष्ठ सदस्य होता. एक आदर्श सहाय्यक असे त्याचे आपटेशी फार घनिष्ठ संबंध होते."

नारायण आपटेचे चंपा फडतरे या मुलीशी लग्न झालं होतं. अहमदनगरमध्ये असताना नारायणने एक रायफल क्लब स्थापन केला होता. 1939 मध्ये त्याने हिंदू महासभेच्या अहमदनगर शाखेत प्रवेश केला. याच काळात त्याची नथुराम गोडसेशी गाठ पडली.

पुढे तुषार गांधी आपल्या पुस्तकात म्हणतात की, "तो (नारायण आपटे) अत्यंत बहिर्मुख, आत्मविश्वासपूर्ण आणि स्त्रियांवर मोहिनी घालणारा होता. स्त्रिया, दारू आणि जीवनातील अनेक भौतिक सुखे यांचे त्याला प्रचंड आकर्षण होते. तो धूम्रपान करायचा, दारू प्यायचा आणि ब्राह्मणांप्रमाणे न वागता मांस-मटणही खायचा."

अहमदनगरमधील ज्या ख्रिश्चन शाळेत नारायण आपटे शिकवायचा, त्याच शाळेतील विद्यार्थिनी असलेल्या मनोरमा साळवी नावाच्या एका ख्रिश्चन मुलीशी त्याचे विवाहबाह्य संबंधही होते. या मनोरमा साळवीलाही गांधी हत्या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागलं होतं.

नारायण दत्तात्रय आपटेला भारतीय दंड संहितेच्या 302, कलम 120-ब आणि कलम 19 (क) अंतर्गत दोषी मानण्यात आलं. त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

विष्णू रामचंद्र करकरे हा एका हॉटेलचा मालक होता आणि तो हिंदू महासभेचा अहमदनगर शाखेचा प्रमुख होता.

लहानपणीच वडिलांचं छत्र गमावलेला विष्णू करकरे सुरुवातीला मुंबईच्या नॉर्थकोट अनाथाश्रमात वाढला. दहा वर्षांचा असताना तो अनाथाश्रमातून पळाला आणि चहाच्या दुकानात चहा नेणारा 'पोऱ्या' म्हणून काम करू लागला.

अशीच सटरफटर कामे करून गुजराण करणारा हा तरुण या वयात अतिरेकी हिंदुत्वाचा खंदा पुरस्कर्ता बनला.

त्याच्याविषयी तुषार गांधी म्हणतात, "आयुष्याच्या आतापर्यंतच्या प्रवासात निराश्रित म्हणून रस्त्यावर वाढलेल्या मुलाला खडतर जीवनाविषयी तीव्र घृणा निर्माण झाली असावी. वाढीच्या वयात समाजाने त्याला कदाचित निर्दयीपणाने वागवले असावे. लहानपणीच्या व्यथा कोणत्याही असोत, विष्णु पुढे भडक माथ्याचा तरुण झाला. त्याच्या रागाचं मुख्य लक्ष्य होतं मुसलमान."

नंतर अहमदनगरला छोटं हॉटेल काढून शेठ बनलेला करकरेकडे आर्थिक संपन्नता आली.

त्याच्याविषयी तुषार गांधी म्हणतात की, "पैसा उपलब्ध असल्याने आणि हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांवर प्रभाव असल्याने, करकरेच्या मुसलमानविरोधी कारवाया वाढतच गेल्या."

अशोक कुमार पांडेय यांनी आपल्या 'त्याने गांधीला का मारलं?' या पुस्तकात करकरेविषयी माहिती देताना म्हटलंय की, "फाळणीनंतर अहमदनगरला निर्वासित येऊ लागल्यानंतर करकरेनं अतिशय उत्साहानं मदतकार्य सुरु केलं. त्याने तिथे सुमारे दहा हजार निर्वासितांसाठी सोय केली. याचवेळी त्याने अहमदनगरमध्ये मुसलमानांच्या विरोधात मोहिम उघडली. मुंबईतून आलेला एक निर्वासित मदनलाल पहावा त्याचा खास सहकारी बनला आणि त्याच्या मदतीनं त्याने मुस्लीम फळवाल्यांवर हल्ले करुन फळांचा व्यवसाय सुरु केला. गांधी हत्येच्या योजनेत करकरेनं आपल्या गटाकडे हत्यारं आणि स्फोटकं यांच्यासह रोख रक्कम पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली होती."

विष्णू करकरेला भारतीय दंड संहितेच्या 120-ब, कलम 302 आणि कलम 114 अंतर्गत दोषी असल्याचं मानून तहहयात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

मदनलाल पहावा वगळता गांधी हत्येतील उर्वरित सर्व शिक्षा झालेले आरोपी हे महाराष्ट्रातील होते आणि ते जातीने चित्पावन ब्राह्मण होते, अशी माहिती तुषार गांधी आपल्या पुस्तकात देतात.

मदनलाल पहावा हा एकटाच आताच्या पाकिस्तानातील पश्चिम पंजाबच्या माँटगॉमेरी जिल्ह्यातील पाकपट्टण या गावातून भारतात आलेला निर्वासित होता.

भारतात शिरणाऱ्या निर्वासितांच्या पहिल्या लोंढ्यातून मदनलाल प्रथम ग्वाल्हेरला आला. तिथून नगरला आलेला मदनलाल विष्णू करकरेच्या संपर्कात आला. करकरेने मदनलालला तिथे फळांचं दुकान चालवण्यासाठी पैसे दिले. करकरेशेटच्या उपकाराखाली असलेला मदनलाल त्याच्यासाठी काहीही करायला तयार होता.

त्याच्याविषयी अशोक कुमार पांडेय आपल्या पुस्तकात लिहितात, "करकरेच्या माध्यमातूनच मदनलाल 1947 च्या डिसेंबरमध्ये गोडसेला आणि आपटेला पुण्यात भेटला. त्यानंतर तो गांधीहत्येच्या कटाचा एक भाग बनला."

मदनलाल पहावाला भारतीय दंड संहितेच्या 120-ब आणि कलम 320 अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं. त्याला तहहयात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

दिगंबर बडगे हा या गांधीहत्या खटल्यातील माफीचा साक्षीदार ठरला. त्याच्या साक्षीमुळे या खटल्यातील अनेक गोष्टी उजेडात आल्या. दिगंबर बडगे हा पुण्यात शस्त्रास्त्रे विकत असे. करकरेने त्याच्याकडून बरेचदा शस्त्रे विकत घेतली होती.

तुषार गांधी म्हणतात की, "बडगे फारच उत्साही आणि तत्पर विक्रेता होता. त्याच्याकडे आलेले ग्राहक रिक्त हस्ताने कधीच परत जात नसत. त्याच्या व्यवसायाचं मुख्य रहस्य म्हणजे आपल्या ग्राहकाला हवं ते, तो लगेच पुरवायचा."

गांधीहत्येच्या अनेक प्रयत्नातील बरीचशी शस्त्रं बडगेनं पुरवलेली होती.

शंकर किस्तय्याच्या पूर्वायुष्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शंकर हा बडगेचा नोकर होता. अनावधानाने या साऱ्या कटात तो सामील झाला होता.

त्याच्याविषयी अशोक कुमार पांडेय सांगतात की, "तो एक गरीब घरचा मुलगा होता आणि शस्त्र भांडारचा संचालक असलेल्या बडगेनं त्याला सोलापूरहून पगार देण्याचं वचन देऊन आणलं होतं. पण मान मोडून काम केल्यानंतरही त्याला पगार देण्यात आला नाही. त्यावेळी त्यानं एकदा पळून जाण्यचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर बडगेनं त्याला पकडलं आणि आपल्या ओळखीचा फायदा घेऊन पोलिसी खटल्यात अडकवलं. त्यानंतर बडगेची गुलामगिरी करण्याखेरीज त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता."

खरं तर शंकर किस्तय्याला हिंदी किंवा मराठीही नीटशी समजत नव्हती. तो ज्या कटात अनावधानाने सामील झाला आहे, तो कुणाच्या हत्येचा आहे, हे देखील त्याला दिल्लीला जाऊपर्यंत ठाऊक नव्हतं. याच आधारावर नंतर त्याला सोडून देण्यात आलं.

शंकर किस्तया कलम 120-ब आणि कलम 302 अंतर्गत दोषी असल्याचं सिद्ध झालं. त्याला तहहयात जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.

या टोळीचा शेवटचा सदस्य म्हणजे नथुराम गोडसेचा धाकटा भाऊ गोपाळ गोडसे.

खुनाच्या वेळी गोपाळ 27 वर्षांचा होता. नथुराम अविवाहित असला तरी गोपाळचे लग्न झालेले होते. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर गोपाळ सैनिकी सेनेच्या शस्त्रास्त्र विभागात कारकून म्हणून नोकरीस लागला.

दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान तो ब्रिटीश तुकडीबरोबर इराण आणि इराकमध्येही गेला होता. आपल्या भावाच्या विचारण्यानंतर तो कटात सहभागी झाला.

अशोक कुमार पांडेय त्याच्याविषयी लिहितात की, "त्याने गांधीहत्येच्या कटासाठी कार्यालयातून रितसर किरकोळ रजा घेतली होती आणि ती मिळाल्यानंतरच तो कार्यालयातून बाहेर पडला होता. त्याच्यापेक्षा सुमारे दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या त्याच्या भावाच्या जातिवादाच्या वेडसरपणाचा त्याच्यावर प्रभाव होता, पण त्याआधी तो त्याच्याबरोबर कधीच सक्रिय काम करत नव्हता."

गोपाळ गोडसे कलम 120 ब आणि कलम 302 अंतर्गत दोषी असल्याचं सिद्ध झालं. त्याला तहहयात जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.

गांधींच्या हत्येच्या दोन दिवस आधी हल्ल्यासाठी अत्यावश्यक असे साधन आपटे आणि गोडसे यांच्याकडे नव्हते.

या हत्येसाठीचं बरेटा पिस्तूल त्यांना ग्वाल्हेरच्या दत्तात्रय एस. परचुरे यांनी मिळवून दिलं.

दत्तात्रय परचुरेचं आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारांचा दवाखाना होता.

त्याच्याविषयी अशोक कुमार पांडेय सांगतात की, "प्रत्यक्षात पाटणकर बाजारातील त्याच्या घराचा वापर हिंदू महासभेच्या कार्यालय असल्याप्रमाणेच केला जात होता. त्याने एक 'हिंदू राष्ट्र सेना'ही तयार केली होती आणि तिचा तो स्वयंघोषित सेनापती होता."

पुढे ते सांगतात की, "अलवारमधील हिंदू महासभेच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोपनीय प्रशिक्षण शिबिरात त्याची गोडसेशी भेट झाली होती."

त्यांच्याबद्दल तुषार गांधी यांनी म्हटलंय की, "परचुरे फारच बडबड्या स्वभावाचे होते. गांधींच्या हत्येची बातमी ग्वाल्हेरमध्ये येताच परचुरेंनी आपला त्या कटात हात असल्याचे जाहीरपणे सांगितले. ही बढाई प्रशासनापर्यंत पोहोचताच परचुरेंना अटक करण्यात आली."

महासभेचा पदाधिकारी या नात्याने परचुरेंचा गोडसेशी बऱ्याच वेळेला संबंध आला होता.

दत्तात्रय परचुरे 120-ब, कलम 109 आणि कलम 302 अंतर्गत दोषी असल्याचं सिद्ध झालं. त्याला तहहयात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

विनायक दामोदर सावरकर यांचा गांधी हत्या प्रकरणातील सहभाग सिद्ध होऊ शकला नाही.

त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त केलं.

1924 साली रत्नागिरीत स्थानबद्ध झाल्यानंतर 1929 साली नथुराम गोडसेचं कुटुंब त्यांच्या घराच्या जवळच राहायला स्थायिक झालं होतं.

स्थायिक होण्याच्या तिसऱ्याच दिवशी नथुराम सावरकरांना भेटायला गेला होता, अशी माहिती गोपाळ गोडसे आपल्या 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकात देतात.

या भेटीबद्दल 'गांधीज् असॅसिन : द मेकिंग ऑफ नथुराम गोडसे अँड हिज् आयडीया ऑफ इंडिया' या पुस्तकात लेखक धीरेंद्र झा लिहितात की, "गोडसे सावरकरांना भेटायला का गेला याची स्पष्ट नोंद नाही. त्यांची पहिली भेट कुणी आयोजित केली, हे देखील माहित नाही. गोडसेचा भाऊ गोपाळ गोडसे यांच्या मते, 1929 मध्ये जेव्हा गोडसे कुटुंब रत्नागिरीला राहायला गेलं तेव्हा सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यामध्ये एक मूक दुवा निर्माण झाला असावा. योगायोगाने, गोडसे कुटुंब ज्या घरात राहू लागले ते घर तेच होतं, जिथं सावरकर पहिल्यांदा रत्नागिरीला आले तेव्हा राहिले होते."

तुषार गांधी सांगतात की, "नथुराम नियमितपणे सावरकरांच्या घरी जाऊ लागला. नथुरामला गुरू लाभला व त्याचं राजकीय प्रशिक्षण चालू झालं. वडील सतत दूर असल्यामुळे न लाभलेली पितृछाया त्याला सावरकरांच्या रूपात मिळाली. हिंदू समाजाची जागृती आणि हिंदुत्वाची आक्रमक भूमिका याबद्दल सावरकरांचा आग्रह नथुरामच्या तरुण मनास भावला आणि तो सावरकरांचा निस्सीम भक्त झाला."

टपाल खात्यात नोकरीला असलेल्या विनायक गोडसे यांच्या घरी 19 मे 1910 साली मुलाचा जन्म झाला, तेव्हा फारच आनंदाचं वातावरण होतं. कारण, या मुलाच्या आधी जन्मलेली तिन्ही मुलं जन्मानंतर मरण पावली होती. त्यामुळे असा नवस करण्यात आला होता की, जर मुलगा झाला तर त्याला मुलीसारखंच वाढवण्यात येईल.

म्हणून पाळण्यातलं नाव रामचंद्र असलं तरीही या मुलाच्या नाकात नथ घालण्यात आल्यामुळे त्याचं नाव पुढे नथुराम असं पडलं. गोपाळ गोडसे स्वत: ही माहिती देतात.

त्याच्या वाढत्या वयाविषयी माहिती देताना अशोक कुमार पांडेय लिहितात की, "नथुरामनं मॅट्रिक पास होऊन सरकारी खात्यात क्लर्कची नोकरी धरावी आणि घरच्या जबाबदाऱ्या उचलाव्यात, असं त्याच्या वडलांना वाटत होतं. परंतु नथुरामला अभ्यासाची गोडी नव्हती."

त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी माहिती देताना 'गांधीज् असॅसिन : द मेकिंग ऑफ नथुराम गोडसे अँड हिज् आयडीया ऑफ इंडिया' या पुस्तकात लेखक धीरेंद्र झा सांगतात की, "वेळ निघून गेला आणि परीक्षा जवळ आल्या. गोडसेची तयारी नीट झालेली नव्हती. 1929 च्या सुरुवातीला तो मॅट्रिक (हायस्कूल) परीक्षेत नापास झाला. त्याचे इंग्रजीतील गुण खूपच कमी होते. यामुळे त्याला मॅट्रिकचे प्रमाणपत्र मिळाले नाही. गोडसे नंतर म्हणाला की, या अपयशामुळे त्याला कायमची शाळा सोडावी लागली. निराशा आणि अचानक घेतलेल्या निर्णयामुळे (लहरीपणामुळे) तो शालेय शिक्षणातून बाहेर पडला. या अपयशामुळे तो पुन्हा एकदा कठीण आणि अनिश्चित परिस्थितीत सापडला."

पुढे उदरनिर्वाहासाठी कर्जतला आपल्या वडलांकडे गेलेल्या नथुरामनं सुतारकाम शिकून घेतलं आणि तो सुतारकाम करु लागला. पुढे वडिलांची बदली झाल्यानंतर तो रत्नागिरीला गेला आणि इथेच त्याची भेट विनायक दामोदर सावरकर यांच्याशी झाली. ब्रिटीशांनी तेव्हा सावरकरांना अंदमानच्या तुरुंगातून बाहेर काढून कोणत्याही राजकीय कामकाजात सहभागी न होण्याच्या अटीवर रत्नागिरीला स्थानबद्ध केलं होतं. इथेच नथुरामवर विनायक दामोदर सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडला.

त्यानंतर दोन वर्षांनी त्याचे वडील निवृत्त झाल्यानंतर त्यांचं कुटुंब सांगलीला स्थायिक झालं.

अशोक कुमार पांडेय लिहितात की, "सांगलीला गेल्यावर नथुरामनं शिवणकाम शिकून घेतलं आणि स्वत:चं दुकान सुरु केलं. त्यानंतर काही दिवस त्याने तिथेच फळविक्रीचा व्यवसायही सुरु केला. कुटुंबाकडून त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला जात होता, पण नथुरामला त्यात फारसं स्वारस्य नव्हतं."

तुषार गांधी म्हणतात की, "नकार आणि अपयश यांची भीती नथुरामला सतत डाचत असे. गांधींना मारण्यात बऱ्याच वेळा आणि विशेषत: 20 जानेवारी, 1948 रोजी अपयशी ठरल्यानंतर आपल्या टीककारांचे तोंड बंद करण्यासाठी आणि एकदा तरी यशस्वी होऊन दाखवण्यासाठी नथुरामला निर्वाणीचा प्रयत्न करावयाचा होता आणि याच मनोवृत्तीतून त्याने गांधींवरील अंतिम हल्ल्या पुढाकार घेतला. अखेर 30 जानेवारी, 1948 रोजी त्याने गांधींना गोळ्या घातल्या, तेव्हा विनायक गोडसेंच्या या सर्वांत मोठ्या मुलाला काहीतरी करून दाखवण्यात पहिल्यांदा यश मिळालं."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)