You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'अन्यथा निवडणुका घेऊ देणार नाही'; नारायणगडावरून मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
मराठा आरक्षणाची मागणी आग्रहाने लावून धरणारे आंदोलक मनोज जरांगे यांनी आज नारायण गडावर दसरा मेळावा घेतला.
ते थेट दवाखान्यातून या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले होते. या भाषणात त्यांनी नेहमीप्रमाणे सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.
मराठवाड्यातील पुराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्जमुक्तीची मागणीही त्यांनी केली. त्याचप्रमाणे दिवाळीपर्यंत मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळायला हवं, अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊन देणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
नारायण गडावरील दसरा मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारकडे 8 मोठ्या मागण्या केल्या आहेत.
'ओला दुष्काळ जाहीर करुन संपूर्ण कर्जमाफी'
मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात आलेल्या पूराच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
यासोबतच, शेतकऱ्याला सरसकट सत्तर हजार रुपये हेक्टरी मदत करावी. तसेच, ज्यांची शेतं वाहून गेलं नाही त्यांना एक लाख तीस हजार रुपये मदत देण्यात यावी.
याशिवाय, ज्याचं जनावरं, कांदा, सोयाबीन इत्यादी गोष्टी वाहून गेल्या त्यांना शेतकरी सांगेल तसा पंचनामा करुन शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
यासाठी, सरकारी अधिकाऱ्यांच्या पगारातला एकचौथाई हिस्सा कापून तो शेतकऱ्यांना द्या, असा उपायही त्यांनी सुचवला.
ते म्हणाले की, "सरकारने शेतकऱ्याचे ऊसाचे पंधरा रुपये कापायचे ठरवले आहे. अजिबात एक रुपया सुद्धा कापायचा नाही. याला पर्याय म्हणून ज्या सरकारी कर्मचाऱ्याला दहा हजार रुपये पगार आहे. त्याचे अडीच हजार रुपये कापा. ज्याला वीस हजार रुपये पगार आहे त्याचे पाच हजार रुपये कापा. ज्याला एक लाख पगार आहे त्याचे 25 हजार रुपये कापा. ज्याला दोन लाख रुपये पगार आहे त्याचे 50 हजार रुपये कापा. चार-पाच लाख अधिकाऱ्यांचे पैसे कापले तर जवळपास हजार कोटी रुपये जमा होतील."
पुढे ते म्हणाले की, "एकेका पक्षाकडे एकेक हजार लोक आहेत. जेवढे व्यावसायिक, उद्योगपती, मंत्री-आमदार आहेत, त्यांच्याकडे हजार हजार कोटी रुपये आहेत. त्यांच्याकडचे पैसे काढून द्या."
यावेळी त्यांनी विविध मंत्र्यांची आणि राजकीय नेत्यांची खोचकपणे नावेही घेतली. यांच्याकडून पैसे वसूल करा, असंही विधान त्यांनी केलं.
शेतीला नोकरीचा दर्जा द्या, असं आवाहन सरकारला केलं तर शेती विकायची नाही, असं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केलं.
'दिवाळीपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा निवडणुका नाही'
आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी मराठा समाजाला काही आवाहनंही केली.
"महाराष्ट्रात तुमच्यासारखं आडनाव असणाऱ्या कुणाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल, तर त्याचा आधार घेऊन शपथपत्र दाखल करून अर्ज करा. कारण, ती तुमची भावकी आहे. तुमचे आणि त्याचे नातेसंबंध आहेत. तुमचं आणि त्याचं कूळ एकच आहे. या आधारावर कुणबी प्रमाणपत्र घ्या. हे अर्ज दिवाळीपर्यंत करा", असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं.
'तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेऊ देणार नाही'
संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी तसेच संपूर्ण आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक सरकारला घेऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
"जर सरकारने हैद्राबाद आणि सातारा गॅझेट लागू केलं नाही तर दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं. जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले, तर जिल्हापरिषदेला सरकारची एकही सीट निवडून येऊ द्यायची नाही," असंही ते म्हणाले.
"महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय शंभर टक्के नुकसान भरपाई केल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करू देणार नाही. मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ देणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.
पुढे त्यांनी "दिल्लीलाही जायचं आहे. तुम्हाला तारीख सांगतो," असं म्हणत आगामी आंदोलनाबाबत सुतोवाचही केलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)