You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईचा धडपडत विजय; उंचपुऱ्या जोडीने राखली इभ्रत
एका क्षणी 25 चेंडूत 34 धावा आणि 9 विकेट्स हातात असणाऱ्या मुंबईची घसरगुंडी उडाली. इम्पॅक्ट प्लेयर टीम डेव्हिड आणि कॅमेरुन ग्रीन या उंचपुऱ्या खेळाडूंनी मुंबईला निसटता विजय मिळवून दिला.
अखेरच्या षटकात मुंबईला 6 चेंडूत 5 धावांची आवश्यकता होती. हे समीकरण एक चेंडू 2 धावा असं झालं. टीम डेव्हिड आणि कॅमेरुन ग्रीन जोडीने उंचीचा फायदा उठवत धावून 2 धावा पूर्ण केल्या आणि यंदाच्या हंगामातला पहिलावहिला विजय मिळवला.
विजयासाठी 173 धावांचं लक्ष्य मिळालेल्या मुंबईला रोहित शर्मा आणि इशान किशन जोडीने 71 धावांची सलामी दिली. 24 इनिंग्जनंतर, एप्रिल 2021 नंतर पहिल्यांदाच रोहितने अर्धशतक पूर्ण केलं.
चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात इशान किशन बाद झाला. त्याने 26 चेंडूत 31 धावांची खेळी केली. इशान बाद झाल्यामुळे युवा तिलक वर्मा खेळपट्टीवर आला.
उत्तम फॉर्मात असणाऱ्या तिलकने रोहितला चांगली साथ दिली. एकेरी-दुहेरी धावा आणि त्याच वेळी चौकार-षटकारांची सुरेख सांगड या जोडीने घातली.
16व्या षटकात तिलकने मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर 3 चेंडूत 16 धावा कुटल्या. चौथा चेंडू निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर आणखी एक मोठा फटका खेळण्याचा तिलकचा प्रयत्न मनीष पांडेच्या हातात जाऊन विसावला.
तिलकने 29 चेंडूत 41 धावांची खेळी केली. धावांसाठी झगडणारा सूर्यकुमार यादव पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला.
मुकेश कुमारचा लेगस्टंपवरचा चेंडू फाईनलेगच्या डोक्यावरून मारायचा सूर्यकुमारचा प्रयत्न कुलदीप यादवच्या हातात गेला.
रोहित शर्मा खेळपट्टीवर असल्यामुळे मुंबईला चिंता नव्हती पण अभिषेक पोरेलच्या अफलातून झेलमुळे रोहित तंबूत परतला. मुस्ताफिझूर रहमानने त्याला बाद केलं.
रोहितने 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली. 18व्या षटकात डेव्हिड-ग्रीन जोडीला फक्त 6 धावा करता आल्या. 19व्या षटकात मुस्ताफिझूरने 4 चेंडूवर डेव्हिड-ग्रीन जोडीला रोखलं पण दोन चेंडूंवर या जोडीने तडाखेबंद षटकार वसूल केले.
या षटकात मुंबईने 15 धावा वसूल केल्या. अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूवर एक धाव निघाली. दुसऱ्या चेंडूवर डेव्हिडचा मुकेश कुमारने झेल सोडला.
तिसऱ्या चेंडूवर पंचांनी वाईड दिला. दिल्लीने रिव्ह्यू घेतला. वाईडचा निर्णय बदलण्यात आला. चौथ्या चेंडूवर एक धाव निघाली.
पाचव्या चेंडूवर ग्रीनने एक धाव घेतली. यामुळे शेवटच्या चेंडूवर 2 धावा असं समीकरण झालं. डेव्हिडने चेंडू लाँगऑफच्या दिशेने खेळून काढला. वॉर्नरचा थ्रो विकेटकीपरच्या डोक्याच्या वर आला. तो पकडून बेल्स उडवेपर्यंत डेव्हिडने दुसरी धाव पूर्ण केली आणि मुंबईने विजय मिळवला.
दिल्लीचा विजयासाठी संघर्ष या सामन्यातही सुरुच राहिला. भारताचा U19 विश्वचषकविजेता कर्णधार यश धूलला दिल्ली कॅपिटल्स संघाने पदार्पणाची संधी दिली.
पृथ्वी शॉ या लढतीतही पॉवरप्ले षटकातच बाद होऊन तंबूत परतला. त्याने 15 धावा केल्या. मनीष पांडेने डेव्हिड वॉर्नरला चांगली साथ दिली.
पण अनुभवी पीयुष चावलाचा चेंडू सीमारेषेपलीकडे पाठवण्याचे मनीषचे मनसुबे यशस्वी होऊ शकले नाहीत. त्याने 26 धावा केल्या.
रायली मेरडिथने पदार्पणवीर यश धूलला झटपट बाद केलं. वादळी खेळींसाठी प्रसिद्ध रोव्हमन पॉवेलला या सामन्यातही फिरकीचं कोडं उलगडू शकलं नाही.
त्याला केवळ 4 धावा करता आल्या. पीयुष चावलाने ललित यादवला त्रिफळाचीत करत दिल्लीची अवस्था 98/5 अशी केली.
निम्मा संघ तंबूत परतलेला असताना वॉर्नरच्या साथीला अक्षर पटेल अवतरला. उत्तम फॉर्मात असलेल्या अक्षरला सातव्या क्रमांकावर का प्रतीक्षा करावी लागते हे कोडं अनुत्तरितच राहिलं.
अक्षर-वॉर्नर जोडीने सहाव्या विकेटसाठी 35 चेंडूत 67 धावांची दमदार भागीदारी केली. या जोडीने मुंबईची पकड सैल करत दिल्लीला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
उंचपुरा आणि डावखुऱ्या जेसन बेहनड्रॉफने अक्षरला बाद करत ही जोडी फोडली. अक्षरने 25 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 54 धावांची खेळी केली.
अक्षर बाद होताच दिल्लीची पुन्हा घसरगुंडी उडाली. त्याच षटकात वॉर्नरही तंबूत परतला. वॉर्नरने 47 चेंडूत 51 धावांची खेळी केली पण त्यात नेहमीचा सराईतपणा आणि आत्मविश्वास नव्हता.
कुलदीप यादव याच षटकात धावचीत झाला तर अभिषेक पोरेलने ग्रीनच्या हाती झेल दिला. शेवटच्या षटकात मेरडिथने अँनरिक नॉर्कियाला त्रिफळाचीत केलं. मुंबईतर्फे जेसन बेहनड्रॉफ आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. रायली मेरडिथने 2 विकेट्स घेतल्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)