भारतीय मुलगी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेली आणि रस्त्यावर विपन्नावस्थेत सापडली, नक्की काय घडलं?

    • Author, अमरेंद्र यार्लागड्डा
    • Role, बीबीसी तेलुगूसाठी

अमेरिकेतल्या शिकागो शहरातल्या एका तरुण मुलीचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ही मुलगी रस्त्यावर झोपलेली यात दिसते आहे. हैदराबादचे भारत राष्ट्र समितीचे नेते खालिद रहमान यांनी हा व्हीडिओ ट्वीट केला आहे.

या व्हीडिओत दिसणाऱ्या तरुण मुलीचं नाव मिनाज झैदी आहे. तिचे डोळे खोल गेलेत जणूकाही अनेक दिवस तिने काही खाल्लं-प्यायलं नाहीये, झोपली नाहीये.

ती पार गळपटून गेलेली दिसते आणि बोलू शकत नाहीये. तिचं नाव विचारल्यानंतर तिला तेही नीट सांगता येत नाहीये. तिचे केसही विस्कटलेले दिसत आहेत.

मिनाजने एक काळं जॅकेट घातलं आहे आणि तिच्या अंगावर एक काळं ब्लँकेट आहे. तिच्याशी एक व्यक्ती बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण तिला बोलताही येत नाहीये. तिचे उच्चार स्पष्ट नाहीयेत.

कोण आहे ही तरुण मुलगी?

ही 37-वर्षीय तरुणी हैदराबादच्या माऊलाली भागात राहायची. तिचं पूर्ण नाव सईदा लुलू मिनाज झैदी असं आहे.

तिच्या आईचं नाव आहे सईदा वहाज फातिमा. त्या एक निवृत्त शिक्षिका आहेत. त्या IICT च्या कँपस स्कूलमध्ये विज्ञान आणि इंग्लिश हे विषय शिकवायच्या. त्या 35 वर्षं शिक्षिका होत्या. सध्या त्या घरी विद्यार्थ्यांची शिकवणी घेतात.

मिनाज झैदीने 2017 साली शादान कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेकची पदवी घेतली. नंतर याच कॉलेजमध्ये दोन वर्षं कंत्राटी तत्वावर सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलं.

पण कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात तिची नोकरी गेली. त्यामुळे मिनाजने उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मिनाजच्या आई फातिमा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

तिला वाटलं की जर तिने परदेशात उच्च शिक्षण घेतलं तर तिला चांगली नोकरी मिळेल. त्यामुळे तिने अनेक विद्यापीठांकडे अर्ज केले आणि लॉकडाऊनच्या काळात अनेक ऑनलाईन परीक्षाही दिल्या.

फातिमा म्हणतात, “ती मला म्हणायची की तिने एमएसची डिग्री घेतली तर तिला चांगल्या नोकऱ्या मिळतील.”

2021 साली मिनाज झैदीला डेट्रॉईडच्या ट्रेन विद्यापीठात प्रवेश मिळाला. ती अमेरिकेत F1 प्रकारच्या व्हीसावर ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिकेत गेली. तिचा व्हीसा पाच वर्षांच्या कालावधीसाठी निर्धारित होता.

फातिमा म्हणतात की मिनाज लहानपणापासून अभ्यासू होती आणि तिला एक चांगली नोकरी मिळवायची होती आणि आयुष्यात स्थैर्य हवं होतं.

फातिमा म्हणतात की, “तिची परिस्थिती अगदी दोन महिन्यांपूर्वी पर्यंत अगदी व्यवस्थित होती. तिच्याबाबतीत काय घडलंय हे मला काहीच कळत नाहीये.”

आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून फातिमा खूपच दुःखी आणि अस्वस्थ झाल्यात.

त्या म्हणतात, “मी दोन महिन्यांपासून तिच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करतेय. पण मी कितीही चौकशी केली तरी मला काहीच कळत नव्हतं. ती कुठे गेली, तिच्याबाबतीत काय झालं. मी भारतीय दुतावासाशी गेले दोन महिने संपर्क साधतेय.”

फातिमा पुढे म्हणतात, “मला त्यांनी सांगितलं की तिच्या सगळ्या वस्तू कोणीतरी घेऊन गेलंय. तिचे सर्टिफिकेट्स आणि इतर कागदपत्रं नाहीयेत. तिचा फोनही तिच्याजवळ नाहीये. तिची प्रकृती खालावलीये आणि भारतीय दुतावासाने तिच्या उपचारासाठी मदत करायला हवी. तिच्याकडे तिचं इन्शुरन्स कार्डही असायला हवं होतं.”

आतापर्यंत काय काय झालंय?

फातिमा म्हणतात की दोन महिन्यापूर्वी पर्यंत मिनाज अगदी ठीक होती. पण अमेरिकेत असणाऱ्या तेलुगू समुदायाचे प्रतिनिधी म्हणतात की कदाचित आर्थिक परिस्थिती नसल्याने ती तिचं शिक्षण चालू ठेवू शकली नाही आणि त्यामुळे डिप्रेशनमध्ये गेली असावी.

बीबीसीने शिकागोत स्थायिक असलेले सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अख्तर यांच्याशीही संवाद साधला.

त्यांनी सांगितलं, “जे विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी येतात त्यांना स्वतःचा खर्च उचलण्यासाठी लहानमोठी कामं करावी लागतात. दर सेमिस्टरला खर्च वाढत चालला आहे. मुलं कोणतीही कामं करतात पण मुलींना काही ठराविक कामंच करता येतात. त्यामुळे त्यांना इकडे जास्त त्रास होतो. मग शिक्षण पूर्ण न करू शकल्याच्या दुःखात त्या डिप्रेशनमध्ये जातात.”

ते पुढे म्हणतात, “जेव्हा मिनाज मागच्या वर्षी आमच्याकडे आली होती तेव्हा तिला काही आर्थिक अडचणी होत्या. ती तिच्या F1 व्हीसावर इकडे काम करू शकत नव्हती. पण तिची परिस्थिती इतकी बिघडेल असं मला वाटलं नाही. तिची प्रकृती आता ठीक दिसत नाहीये.”

आता भारतात परत कसं आणणार?

तेलंगणा तेलुगू असोसिएशनसह अनेक संस्था मिनाज झैदीला भारतात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

तिचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर होतोय आणि व्हॉट्सअपवर फिरतोय. स्वयंसेवी संस्था तिच्याबद्दल कोणतीही माहिती असणाऱ्याला संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत.

“तिला भारतात आणण्यात काहीच अडचण नाहीये पण तिचा पासपोर्ट खराब झाला आहे. भारतीय दुतावासाने सांगितलं की ते तिच्यासाठी नवीन पासपोर्ट एका तासाच्या आत बनवू शकतात. पण तिला परत आणण्याइतकी तिची प्रकृती चांगली नाहीये. तिला काऊन्सिलिंगची गरज आहे. जर ती कोणाला दिसली तर मला कळवा,” अख्तर म्हणतात.

परराष्ट्र मंत्रालयाला पत्र

मिनाजची परिस्थिती पाहून तिच्या आई, फातिमा यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहिलं आहे.

त्या पत्रात फातिमा यांनी लिहिलं की, ‘त्यांच्या मुलीची, मिनाजची शिकागोच्या रस्त्यांवर उपासमार होतेय. त्यांचा गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या मुलीशी संपर्क होऊ शकलेला नाही. दोन हैदराबादी तरुणांनी तिला रस्त्यावर पाहिल्यानंतर तिला ओळखलं आणि फातिमा यांना कळवलं.’

फातिमा यांनी पत्रात म्हटलंय की मिनाज जवळच्या सर्व चीजवस्तू चोरीला गेल्यात. ती अतिताणामुळे डिप्रेशनमध्ये गेलीये.

त्यांनी भारतीय दुतावासाला विनंती केली की मिनाजच्या प्रकरणात लक्ष घालावं.

त्यांनी म्हटलं की, “परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या प्रकरणी लक्ष घालून त्यांच्या मुलीला परत आणावं. त्याप्रकरणी अमेरिकेतले स्वयंसेवक मोहम्मद अख्तर मदत करण्यास तयार आहेत.”

पण दुतावासाला तिचा छडा लावता येत नाहीये कारण तिच्याजवळ तिचा फोन नाहीये.

फातिमा यांनी म्हटलंय की त्यांच्या मुलीला योग्य ते उपचार देण्यात यावेत आणि भारतात परत आणवं. जर तिची परिस्थिती भारतात परत आणण्यासारखी नसेल तर मग तिला अमेरिकेचा व्हीसा देऊन तिथेच राहू द्यावं.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)