डेव्हिस कपसाठी भारतीय संघ 60 वर्षांनंतर पाकिस्तानात, 'या' बंधनांमुळे पिंजऱ्यात अडकण्याची वेळ

फोटो स्रोत, Getty Images
प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय टेनिस संघ पाकिस्तानात पोहोचला आहे. येत्या 3 आणि 4 जानेवारी रोजी इस्लामाबादमध्ये डेव्हिस कपचे सामने होणार आहेत.
याआधी डेव्हिस कपसाठी भारतीय संघ 1964 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानच्या भूमीवर गेला होता. तेव्हा अख्तर अली हे संघाचा एक महत्त्वाचा भाग होते.
आज 60 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघ पुन्हा एकदा इस्लामाबादमध्ये पोहोचला आहे.
संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे, अख्तर अलींचा मुलगा जीशान अली. हा एक योगायोग म्हणावा लागेल.
एका बाजूला जीशान अलीसाठी ही गोष्ट नक्कीच भावनिक असेल, तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान टेनिस फेडरेशन आणि पाकिस्तानी खेळाडू भारतीय संघाच्या आगमनानं खूश आहेत.
भारतीय संघानं पाकिस्तानात येणं, हे तेथील टेनिसला नक्कीच चालना देईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
2019 सालासारखंच यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव, भारतीय संघ पाकिस्तानात जाण्यास कचरत होता.
मात्र आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघानं भारतीय टेनिस संघटनेचं अपील फेटाळून लावल्यामुळं भारतीय खेळाडूंना इस्लामाबादला जाणं भाग पडलं.
सामान्यतः पाकिस्तानचे टेनिसप्रेमी आणि प्रसारमाध्यमांनी भारतीय संघासमोर गर्दी करणं, भारतीय खेळाडूंना पाकिस्तानचं यजमानपद उपभोगता येणं हे जरी अपेक्षित असलं, तरी यावेळी भारतीय खेळाडू मात्र पक्ष्यांप्रमाणं पिंजऱ्यात अडकून पडले आहेत.
भारतीय टेनिस संघटनेसाठी संघाच्या सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार भारतीय खेळाडूंना सुरक्षा पुरवण्यात कसलीही कसर सोडत नाहीये.
हॉटेलहून स्पोर्ट्स कॉप्लेक्सपर्यंत जाण्यासाठी 2 एस्कॉर्ट गाड्या खेळाडूंच्या बसच्या मागं-पुढं चालत असतात.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय खेळाडूंवर अशी आहेत बंधनं
भारतीय खेळाडूंना कोणासोबतही बोलण्याची परवानगी नाही.
संघ इस्लामाबादला पोहोचून पाच दिवस झालेत, परंतु त्यांना कुठेही जाण्याची परवानगी नाहीये.
शहर बघण्यासाठी आणि काही खरेदी करण्यासाठीही सुरक्षा यंत्रणांनी खेळाडूंना परवानगी दिली नाहीये.
पाकिस्तानचा खेळाडू अकील खानला भारतीय खेळाडूंना चहासाठी आमंत्रित करायचं आहे, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव तेही अद्याप शक्य झालेलं नाहीये.
मात्र बुधवारी (31 जानेवारी) रात्री भारतीय उच्चायुक्तालयाचं बोलावणं आल्यानंतर त्यांना कडक बंदोबस्तात जाण्याची परवानगी देण्यात आली.
लो प्रोफाइल राहणार भारत-पाकिस्तान सामने
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने भारत-पाकिस्तानचा सामना लो प्रोफाईल ठेवण्यास सांगितलं आहे.
त्यामुळं टेनिस फेडरेशनचे अधिकारीही भारत-पाकिस्तान सामन्याचा फारसा प्रचार करू शकलेले नाहीत.
त्याचाच परिणाम म्हणून इस्लामाबादमध्ये या सामन्याविषयीचं एकही पोस्टर दिसत नाहीये.
पाकिस्तान टेनिस फेडरेशन आणि पाकिस्तानचे खेळाडू डेव्हिस कपसाठीची ही लढत इतिहासातील आजवरची सर्वांत महत्त्वाची लढत मानत आहेत.

पाकिस्तान टेनिस फेडरेशननं केवळ निवडक 500 व्यक्तींनाच या सामन्यासाठी बोलावलं आहे. इतरांना मात्र हा सामना प्रत्यक्षात स्टेडिअममध्ये जाऊन पाहता येणार नाही.
भारतीय खेळाडूंनी वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानात प्रवेश करावा आणि तिथे त्यांचं भव्य स्वागत व्हावं, अशी पाकिस्तान टेनिस फेडरेशनच्या अधिकाऱ्यांची इच्छा होती.
त्यासोबतच भारतीय संघाला इस्लामाबाद आणि लाहौर शहर दाखवता आलं असतं, विविध चाहते आणि मान्यवरांच्या त्यांच्यासोबत भेटीगाठी झाल्या असत्या, जेणेकरून पाकिस्तानातून जाताना भारतीय संघ चांगल्या आठवणी घेऊन जाऊ शकला असता, अशीदेखील त्यांची इच्छा होती.
मात्र सुरक्षेच्या कारणास्तव असं काहीही घडणार नसल्यानं काहीसा नाराजीचा सूर उमटत आहे.
याला भारतीय टेनिस संघटना कारणीभूत असल्याचं पाकिस्तान टेनिस फेडरेशनचे असीम शफीकी यांनी सांगितलं.
भारतीय टेनिस संघटनेनं ‘फुल-प्रूफ’ सुरक्षेची मागणी केल्यानं आता त्यांना प्रोटोकॉल्स पाळणं भाग आहे, असं ते म्हणाले.
सामना कधी खेळला जाणार आणि या सामन्याचं काय महत्त्व आहे?
3 आणि 4 फेब्रुवारीला वर्ल्ड ग्रुप-1 प्ले ऑफमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांस भिडतील.
पाकिस्ताननं या सामन्यांसाठी ग्रास कोर्टची निवड केली आहे.
ऐसाम-उल-हक कुरेशी आणि अकील खान या दोघांचाही खेळ गवतावर चांगला बहरतो, म्हणून भारताला टक्कर देण्यासाठी ग्रास कोर्ट योग्य आहे, असं त्यांना वाटतं.
मात्र भारतीय भूमीत याच ग्रास कोर्टवर खेळताना डेन्मार्कला भारतानं पराभूत केले होतं.
रामकुमार रामनाथनसारखा गवतावर उत्कृष्ट खेळणारा खेळाडू भारताकडं आहे. जागतिक क्रमवारीत तो 461व्या स्थानी आहे.

दुहेरीत टॉप 100मध्ये भारतीय संघातील तिघांचा समावेश आहे.
साकेत मायनेनी आणि एन श्रीराम बालाजी यांसारखे ग्रँडस्लॅम स्तरावर खेळणारे खेळाडू भारताकडं आहेत.
तर पाकिस्तानच्या संघातील ऐसाम-उल-हक कुरेशी हा एकमेव खेळाडू आहे, जो एटीपी टूरवर खेळतो.
ऐसाम-उल-हक कुरेशी आणि अकील खान घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करत असल्यानं ते भारताला टक्कर देण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील.
डेव्हिस कप : भारत आणि पाकिस्तानची कामगिरी
जो संघ हा सामना जिंकेल त्याला डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुप-1मध्ये स्थान मिळेल, तर पराभूत होणाऱ्या संघाला ग्रुप-2मध्ये जावं लागणार आहे.
डेव्हिस कपच्या इतिहासात भारताला पाकिस्तानकडून कधीही पराभव पत्करावा लागला नाही.
डेव्हिस कपमध्ये हे दोन्ही संघ आतापर्यंत सात वेळा आमनेसामने आले आहेत.
भारतानं सातही वेळा विजय मिळवला आहे. हे पाहता पाकिस्तानला हे आकडे बदलण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे, हे नक्की.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








