सना जावेद कोण आहे, जिचं सानिया मिर्झाच्या नवऱ्यासोबत लग्न झालं?

फोटो स्रोत, X/Shoaib Malik
सानिया मिर्झाशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने दुसऱ्या लग्नाचे फोटो पोस्ट करत सर्वांना धक्का दिला आहे.
त्याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं असून या लग्नाचे फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
शोएब मलिकने 2010 साली भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत लग्न केलं होतं. हे लग्न हैदराबादमध्ये पार पडलं होतं.
शोएब मलिकसोबत लग्न करण्यापूर्वी सानिया मिर्झाने तिचा बालपणीचा मित्र सोहराब मिर्झाशी साखरपुडा केला होता.
मात्र काही कारणांमुळे सोहराब-सानियाचा हा साखरपुडा मोडला आणि त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शोएब आणि सानिया मिर्झामध्ये घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत होत्या.
सानिया आणि शोएबला पाच वर्षांचा मुलगाही आहे.
गेल्या बुधवारी सानिया मिर्झाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्न आणि घटस्फोट या विषयावर एक पोस्ट टाकली होती.

फोटो स्रोत, X/RealShoaibMalik
सानियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, लग्न आणि घटस्फोट या खूप कठीण गोष्टी असतात. पण आपल्याला नेहमीच कठीण गोष्टी निवडावी लागते.

फोटो स्रोत, Instagram
ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी सोशल मीडियावर चर्चा करायला सुरुवात केली की, शोएब आणि सानियाचं नातं बिघडलं असावं आणि दोघांचा घटस्फोट झाला असावा.
कोण आहे सना जावेद?
सना जावेद ही पाकिस्तानी अभिनेत्री आहे.
उर्दू टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलंय. 2012 मध्ये शहर-ए-जात या चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
खनी या रोमँटिक ड्रामामध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर तिला ओळख मिळाली.
हिंदुस्तान टाईम्सने म्हटल्याप्रमाणे, या भूमिकेसाठी तिला लक्स स्टाईल अवॉर्ड्समध्येही नामांकन मिळालं आहे.

फोटो स्रोत, Instagram/SanaJaved
तिच्या रुसवाई आणि डंक या चित्रपटांनाही चित्रपट रसिकांकडून दाद मिळाली.
तिने 2020 मध्ये पाकिस्तानी अभिनेता, गायक-गीतकार उमेर जसवालशी लग्न केलं होतं. पण काही दिवसांनी त्यांचा घटस्फोट झाल्याचं सियासत या वृत्तपत्रात म्हटलंय.
हिंदुस्तान टाईम्सने म्हटल्याप्रमाणे, सना आणि उमेरने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांचे फोटो हटवले आहेत.
सोशल मीडियावर टीका
सोशल मीडियावर काही नेटिझन्सने शोएबला दुसऱ्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, तर अनेक लोकांनी त्याच्यावर टीका केली आहे.

फोटो स्रोत, Instagram
अजीजिया नावाच्या एका युजरने शोएबच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, "त्या महिलेने संपूर्ण देशाच्या विरोधात जाऊन तुझ्याशी लग्न केलं. लोकांनी तिच्या राष्ट्रीयत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण, तू तिची फसवणूक केलीस. वाह यार.. वाह"
हिबा अरमान नामक युजरने म्हटलंय की, "हे आश्चर्यकारक आहे.. जे घडलंय त्यावर माझा विश्वास बसत नाहीये!!"
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर, #ShoaibMalik, #Divorce, #SaniaMirza हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








