तिच्या शॉर्ट स्कर्ट-टी शर्टने कट्टरतावाद्यांना अस्वस्थ केलं, पण तिनं खणखणीत फटक्यांनी उत्तरं दिलं...

सानिया मिर्झा, टेनिस, मिक्स्ड डबल्स, वूमन्स डबल

फोटो स्रोत, @MIRZASANIA

फोटो कॅप्शन, सानिया मिर्झा
    • Author, शारदा उगरा
    • Role, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाला तिच्या करिअरच्या शेवटच्या टूर्नामेंटमध्ये पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.

दुबईतल्या ड्युटी फ्री टेनिस चँपियनशिपमध्ये यूएसच्या मेडिसन कीज सोबत महिला डबल्स इव्हेंटमध्ये कोर्टावर उतरलेल्या सानिया मिर्झाचा पराभव झाला. कुदरमेतोवा आणि सॅमसोनोवा जोडीने सानिया-मेजिसनला 6-4, 6-0 असं सलग सेटमध्ये पराभूत केलं.

या पराभवासोबतच सानिर्या मिर्झाची टेनिसमधली जवळपास दोन दशकांची कारकिर्द संपुष्टात आली. त्याआधी सानिया या वर्षी जानेवारी महिन्यात रोहन बोपण्णाच्या साथीने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी झाली होती. अंतिम फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

सानियाने याच वर्षी 13 जानेवारीला सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. तिने म्हटलं होतं की, डोळ्यांत अश्रू आणि मन भरून आलं आहे. मी माझ्या प्रोफेशनल करिअरमला निरोप देताना फेअरवेल नोट लिहितीये.

सानिया मिर्झा- टेनिस सुपरस्टार जिने रुढीपरंपरांना मोडत रचला इतिहास

सानिया मिर्झा रोहन बोपण्णा

फोटो स्रोत, Getty Images

शुक्रवारी (13 जानेवारी) टेनिसपटू सानिया मिर्झाने भावुक पोस्ट लिहून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचं स्पष्ट केलं.

सानियाने लिहिलं, 'डोळ्यात अश्रू आहेत आणि मनात प्रेम भरुन आलंय.'

गेल्या वर्षी जानेवारीत सानियाने 2022 वर्ष खेळाडू म्हणून शेवटचं वर्ष असेल असं म्हटलं होतं पण स्नायूपेशींना झालेल्या दुखापतीमुळे सानियाला अमेरिकन ओपन स्पर्धेत सहभागी होता आलं नव्हतं.

यामुळे सानियाची निवृत्ती काही महिने लांबणीवर पडली. सानियाने ऑस्ट्रेलियन ओपननंतर निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे. पहिली ग्रँड स्लॅम खेळल्यानंतर 18 वर्षानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या माध्यमातून मी निवृत्त होणार आहे असं सानियाने सांगितलं.

ऑस्ट्रेलियन ओपननंतर सानिया 19 ते 15 फेब्रुवारीदरम्यान दुबई ड्युटी फ्री स्पर्धेतही खेळणार आहे. मेलबर्न आणि दुबई ही आंतरराष्ट्रीय टेनिसची दोन मोठी केंद्र आहेत. गेल्या तीन दशकभराच्या काळात सानियाच्या कारकीर्दीतीलही ही प्रमुख शहरं आहेत.

सानियाला आपण सगळ्यांनी 18 वर्षांपूर्वी मेलबर्नमध्ये पाहिलं तेव्हा ती 18 वर्षांची होती आणि आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये स्वत:ची जागा निर्माण करण्याचा तिचा प्रयत्न होता. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सेरेना विल्यम्ससारख्या मातब्बर खेळाडूला ती खणखणीत फटक्याद्वारे उत्तर देत होती.

सानियाची कमाल

सानिया मिर्झा, टेनिस, मिक्स्ड डबल्स, वूमन्स डबल

फोटो स्रोत, MIRZASANIA

फोटो कॅप्शन, सानियाने कारकीर्दीत असंख्य जेतेपदांवर नाव कोरलं.

तेव्हाही तिचा खेळ पाहताना हे जाणवलं की कोणत्याही भारतीय महिला खेळाडूंच्या तुलनेत फोरहँडचा फटका जास्त आक्रमक होता.

इस्लामोफोबियाच्या त्या काळात या युवा मुस्लीम खेळाडूला तिची ताकद काय हे माहिती होतं. टेनिस कोर्टवर खेळताना काय परिधान करायचं हेही तिला कळत होतं.

शॉर्ट स्कर्ट आणि बोल्ड संदेश लिहिलेले टीशर्ट यांनी कट्टरतावाद्यांना अस्वस्थ केलं. सानिया आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस खेळत होती.

विजय अमृतराज (सर्वाधिक रँकिंग 18), रमेश कृष्णन (सर्वाधिक रँकिंग 23) यांच्यानंतर सर्वोच्च रँकिंग गाठण्याचा पराक्रम सानियाने केला होता.

रमेश कृष्णन यांच्यानंतर 22 वर्षांनंतर सानियाने जागतिक क्रमवारीत अव्वल 30 खेळाडूंमध्ये स्थान पटकावलं. या विक्रमाला 16 वर्ष झाली आहेत आणि सानिया अजूनही खेळते आहे.

27 ऑगस्ट 2007 मध्ये सानिया जागतिक क्रमवारीत 27व्या स्थानी होती. तिने हैदराबाद इथे आयोजित डब्ल्यूटीए स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडकही मारली होती.

पुढची चार वर्ष सानिया जागतिक क्रमवारीत अव्वल 35 खेळाडूंमध्ये होती. पुढची चार वर्ष सानिया जगातल्या सर्वोत्तम 100 खेळाडूंमध्ये तिच्या नावाचा समावेश होता. पण पायाचा घोटा आणि मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे तिच्या सिंगल्सच्या कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला. पण याने खचून न जाता सानियाने दुहेरी प्रकारावर लक्ष केंद्रित केलं.

पटकावली अनेक जेतेपदं

सानिया मिर्झा, टेनिस, मिक्स्ड डबल्स, वूमन्स डबल

फोटो स्रोत, @MIRZASANIA

फोटो कॅप्शन, सानिया मिर्झा

डबल्स प्रकारात सानियाने डब्ल्यूटीए स्पर्धेची 43 जेतेपदं पटकावली. 2015 मध्ये सानियाने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली. सानियाने सहावेळा ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा केला.

सानियाने तीन ग्रँड स्लॅम जेतेपदं मिक्स्ड डबल्स प्रकारात पटकावलं. मार्टिना हिंगिसच्या साथीने तिने विम्बल्डन, अमेरिकन ओपन आणि ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.

43 डब्ल्यूटीए स्पर्धेच्या जेतेपदांच्या बरोबरीने सानियाने 23वेळा डब्ल्यूटीए डबल्सच्या अंतिम फेरीत धडक मारली. 2022 मध्ये सानिया चेक प्रजासत्ताकच्या लुसी हार्डेकाच्या बरोबरीने क्ले कोर्टवर दोन डब्ल्यूटीए स्पर्धेत खेळली.

सानिया कारकीर्दीतला शेवटचा सामना दुबईत खेळणार आहे, जिथे ती पती आणि मुलासह राहते. मेलबर्न ते दुबई हा प्रवास वरकरणी सरळसोट दिसत असला तर सानियाच्या व्यक्तिमत्वाशी परस्पर विपरीत ठरला आहे. कारण कारकीर्दीत अनेकदा सानियाने सातत्याने वादविवादांचा सामना केला आहे.

भारतीय टेनिसची पहिली सुपरस्टार

सानिया मिर्झा, टेनिस, मिक्स्ड डबल्स, वूमन्स डबल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सानिया मिर्झा
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सानियाला 'भारतीय महिला टेनिस सुपरस्टार' असं म्हटलं जातं. पण वास्तव हे आहे की सायना नेहवालच्या बरोबरीने सानिया मिर्झा या दोघी महिला सुपरस्टार आहेत. पण टेनिस अधिक देशांमध्ये खेळला जाणारा आणि ग्लॅमरमय खेळ असल्याने सायनाच्या तुलनेत सानियाच्या लोकप्रियतेत वाढ झाली.

दोन दशकांपूर्वी सानिया तत्कालीन भारतीय महिला खेळाडूंच्या तुलनेत वेगळी होती. तिला संकोच नव्हता, ती घाबरायची नाही. नव्या सहस्रकाच्या नव्या पिढीची ती शिलेदार होती. तिच्यात प्रचंड आत्मविश्वास होता. आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडणं ही तिची खासियत होती. ती बिनधास्त आणि बेडरपणे बोलायची.

2005 मध्ये इंडिया टुडे मासिकाने पहिल्यांदा तिची मुलाखत घेतली होती.

त्यावेळी ती म्हणाली होती, "काही माणसं म्हणतात की मुस्लीम मुलींनी मिनी स्कर्ट परिधान करायला नको. दुसरीकडे काही लोक म्हणतात की तुम्ही मुस्लीम समाजासाठी अभिमानास्पद आहे. मला आशा आहे की आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात अल्लाह मला माफ करेल. आपल्याला कारकीर्दीत जे करायचं असतं ते करावंच लागतं".

सानिया जे बोलली ते तिने सलग दोन दशकं केलं. सानियाचे फोरहँडचे वेगवान फटके टेनिस चाहत्यांच्या प्रदीर्घ काळ स्मरणात राहतील.

वादविवादांच्या भोवऱ्यात

सानिया मिर्झा, टेनिस, मिक्स्ड डबल्स, वूमन्स डबल

फोटो स्रोत, @MIRZASANIA

फोटो कॅप्शन, सानिया आणि मार्टिना हिंगिस

भारतीय टेनिसच्या इतिहासात सानियाने खेळलेले अविस्मरणीय फटके कायमस्वरुपी आनंद देत राहतील. सानिया मिर्झाला आपण सोसायटी सारख्या मासिकाच्या मुखपृष्ठावरही पाहिलं. कारण टेनिस खेळण्याच्या बरोबरीने ती सुपर सेलिब्रेटीही आहे.

पण सानिया ज्या गुणवैशिष्ट्यासाठी ओळखली जाते हे तिच्या निवृत्तीच्या भावुक पोस्टमध्ये जाणवतं. शुक्रवारी (13 जानेवारी) लिहिलेल्या भावनिक पोस्टमध्ये सानियाने त्याचा उल्लेख केला आहे.

सानिया जेव्हा सहा वर्षांची होती तेव्हा ती हैदराबादच्या निझाम क्लब कोर्टच्या प्रशिक्षकांशी भांडली होती. टेनिसची कौशल्यं शिकण्यासाठी तिचं वय लहान आहे, असं प्रशिक्षकांचं म्हणणं होतं.

सानिया मिर्झा, टेनिस, मिक्स्ड डबल्स, वूमन्स डबल

फोटो स्रोत, @MIRZASANIA

फोटो कॅप्शन, सानिया मिर्झा, पती शोएब मलिक आणि मुलगा

टेनिस कोर्टवर खेळताना सानिया वेगळीच भासते. मुकाबला कडवा होतो, प्रतिस्पर्ध्यांशी असलेला स्कोअरचा फरक कमी होतो, दबाव वाढतो तेव्हा सानिया आपले केस बांधते. पुढचा पॉइंट पटकावण्यासाठी तय्यार होते.

टेनिसकोर्टच्या बाहेर सानियाला अनेकदा कसं वावरायचं हे सांगितलं जातं. तिला विनाकारण वादविवादांचा सामना करायला लागला. रुढीवादी कर्मठ परंपरावाद्यांशी टक्कर देताना एक वेळ अशी होती की जेव्हा तिच्याभोवती सुरक्षारक्षकांचा गराडा असे. पण याने सानिया मागे हटली नाही आणि ती थांबलीही नाही.

त्यामुळेच सानिया जेव्हा शेवटची मॅच खेळायला उतरेल तेव्हा तिला सर्वाधिक अभिवादन आणि पाठिंबा मिळेल. कारकीर्दीदरम्यान ज्या महिला खेळाडूंनी, पुरुष खेळाडूंनी, चाहत्यांनी सानियाला खेळताना, संघर्ष करताना पाहिलं तर त्यांच्यासाठी सानियाने भारतीय खेळांच्या इतिहासातला जणू एक अध्यायच लिहिला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता..)