पलक कोहली ते अवनी लेखरा : भारतातील विकलांग महिला खेळाडूंची झेप

फोटो स्रोत, Getty Images
- Author, वंदना
- Role, टीव्ही एडिटर, भारतीय बाषा
पहिल्यांदाच पाहात असाल तर पलक कोहली एखाद्या सामान्य तरुणीसारखी दिसते. चंचल, उत्साही, सोशल मीडियावर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीसारखी स्क्रीन स्क्रोल करारी वाटते.
पण हे सगळं तुम्ही तिला बॅडमिंटन कोर्टवर खेळताना पाहण्यापूर्वीचं असेल.
(बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयरसाठीचे मतदान संपले आहे. त्याचे निकाल 28 मार्च रोजी जाहीर करण्यात येतील).
बँडमिंटन कोर्टवर पलकला पाहाणं, तिचा फोरहँड, बॅकहँड, रिलिज पाहाणं एखाद्या सुंदर दृश्यापेक्षा वेगळं नसतं. निमिषमात्र वेळात पलक एका वेगळ्याच व्यक्तिमत्वात जाते. बॅडमिंटन कोर्टवर पलक ती आधीची चंचल तरुणी वगैरे वाटणारी पलक राहात नाही.
पाहाणाऱ्याला हा बदल स्वीकारायला थोडा वेळच जातो.
पलकच्या शरीराची एक बाजू पूर्णपणे विकसित जालेली नाही. ती फक्त एका अंगाच्याच मदतीने खेळते. टोकियो ऑलिंपिकमध्ये तीन वर्गांत खेळणारी 19 वर्षिय पलक भारताची एकमेव पॅराबॅडमिंटन खेळाडू होती.
इतक्या कमी वयात पॅरालिपिंकमध्ये पोहोचणं हा पलकसाठी मोठाच पल्ला होता. ही संधी मोठी असली तरी तसा संघर्षही तीव्र होताच.
विकलांग लोकांच्या या पॅरास्पोर्ट्सची लोकांना फारच कमी माहिती असते. 2016 पर्यंत पलकच्या आई-वडिलांनीही हा शब्द ऐकला नव्हता.
तेव्हा ते जालंधर शहरात राहात होते. पलकला एकदा एका अनोळखी व्यक्तीने रस्त्यात थांबवून तू पॅराबॅडमिंटन का खेळत नाहीस असा प्रश्न विचारला तेव्हा तिला म्हणजे 2016 साली पॅराबॅडमिंटनची माहिती मिळाली.
2017 साली तिनं रॅकेट हातात घेतली आणि खेळ सुरू केला. ती अनोळखी व्यक्ती म्हणजेच गौरव खन्ना तिचे कोच झाले आणि दोन वर्षांमध्येच ती जागतिक स्तरावर स्पर्धा जिंकू लागली.
पलक सांगते, प्रत्येकजण स्वतःच्या अपंगत्वावरच भर देतो. लहानपणी मला तुझी एक बाजू अशी का आहे असं कोणी विचारलं की मी ते जन्मतःच तसं आहे असं उत्तर द्यायचे. जन्मतःच असं असणे याचा अर्थ मला माहिती नव्हता. पण मी आपलं ते पाठ केलेलं उत्तर ठोकून द्यायचे.
सुरुवातीला मी खेळात भाग घ्यायचा विचार केला नव्हता. कारण प्रत्येकजण मला तू विकलांग आहेस, हे तुझ्यासाठी नाही असं म्हणायचे.
पलक सांगते लोकांची नकारात्मक भूमिका माहिती असूनही केवळ स्वतःला आव्हान देण्याचा तिनं निश्चय केला.
आपल्या डिसेबलिटीचं रुपांतर मी सुपर अबिलिटीमध्ये केलं. पॅराबॅडमिंटनने तर माझं आयुष्यच बदलून टाकलं.
पलकसारख्या अनेक विकलांग मुली खेळात आपलं नाव कमावत आहेत.
इतकंच नाही तर त्या नवा इतिहास लिहित आहेत, पदकं जिंकत आहेत. यासगळ्याशिवाय त्या आजूबाजूच्या लोकांना अपंगत्वाबद्दल आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रेरित करत आहेत, तसा बदल घडायला भाग पाडत आहेत.
भारतात आजही अनेक खेळाडूंना आपल्याच घरातील, कुटुंबीयातील, समाजातील लोकांचा विरोध सहन करावा लागतो. गरीबी आणि अपंगत्वाबद्दल लोकांच्या दृष्टिकोनामुळे त्यांची वाट अधिकच खडतर होत जाते.
जर ती व्यक्ती महिला खेळाडू असेल तर अडथळे दुप्पट होतात.
23 वर्षांची सिमरन ही पहिली भारतीय महिला अथलिट आहे, जी टोकियो पॅरालिंपिक्ससाठी 100 मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी पात्र झाली.
गर्भात असताना पूर्ण वाढ होण्याआधीच तिचा जन्म झाला होता, तिच्या डोळ्यांमध्ये आधीपासूनच दोष होता.
टोकियो स्पर्धेआधी झालेल्या संवादात सिमरन म्हणाली होती, माझे डोळे नीट नाहीत, म्हणजेच मी एका विशिष्ट गोष्टीवर लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. यामुळे माझे स्वतःचे नातेवाईक मला लहानपणी चिडवत असत. ही मुलगी पाहाते एकीकडे आणि बोलते दुसरीकडेच असं मला म्हणायचे. तेव्हा मला फार वाईट वाटायचं.
ती लहानपणापासूनच धावपटू होती हे तिचं वैशिष्ट्य आहे. तिच्या आई-वडिलांकडे पैसे नव्हते. तिचं 18 व्या वर्षीच लग्न लावून देण्यात आलं होतं.
लग्नानंतर तिला मिळालेल्या मार्गदर्शनामुळे तिला आपलं स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली. तिचे पतीच तिचे प्रशिक्षक होते. या प्रशिक्षणामुळे तिच्या सासरच्या गावात मोठा गोंधळही माजला होता. एक नवी नवरी घर-संसार चालवण्याऐवजी सकाळीच धावतेय या दृश्यामुळे तो गोंधळ उडालेला होता.
परंतु सिमरन आणि तिच्या पतीने याची पर्वा केली नाही. 2019 आणि 2021 साली वर्ल्ड पॅराअथलिटिक्स ग्रां पीमध्ये तिनं सुवर्ण पदक मिळवलं.
जे लोक तिच्या अपंगत्वाबद्दल चिडवायचे तेच आता तिचं कौतुक करतात.
हळूहळू का होईना महिला पॅराखेळाडूंनी आपलं स्वतःचं स्थान तयार करायला सुरुवात केली आहे.
पॅराशूटर अवनी लेखाराबद्दल तर आता सर्वचजणांना माहिती आहे. ती 19 वर्षांची आहे. पॅरालिपिंक्समध्ये गोल्ड मेडल मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमेन ऑफ द ईयर 2021 चं नामांकनही तिला मिळालंय.

फोटो स्रोत, Getty Images
ती 10 वर्षांची असताना तिला अपघात झाला होता. तेव्हापासून ती व्हीलचेअरवर आहे. पॅलाशूटिंगने तिला नवं जीवनच मिळालं आहे.
तिने खेळायला सुरुवात केली तेव्हा शूटिंग रेंजवर रँपही नसायचा तिने स्वतः रँप लावला आणि खेळ सुरू केला.
पॅराशूटर्ससाठी कोणती उपकरणं हवीत याची माहिती तिच्या पालकांना नव्हती. ती कोठे मिळतात हेसुद्धा त्यांना सुरुवातीला माहिती नव्हतं.
व्हीलचेअरमुळे तिच्या चालण्या-फिरण्यावर बंधनं आली असली तरी तिच्या स्वप्नांची झेप कोणीच रोखू शकलं नाही.
जयपूर शूटिंग रेंजवर तिला पाहायची मला संधी मला मिळाली आहे. पॅराशूटिंगमध्ये ती टॉपर का आहे हे तिला पाहायला मिळाल्यावर समजलं.
कमालीची एकाग्रता, परिपूर्ण होण्याची सततची आस यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी ठरते.
अवनी म्हणते, "विकलांग खेळाडूंना कोणाचीही सहानुभूती नकोय. लोकांना वाटतं की आम्ही व्हीलचेअरवर बसून खेळतो म्हणजे आमच्यासाठी सोपं असेल. पण इतर सामान्य खेळाडूंप्रमाणेच आम्हालाही मेहनत करावी लागते. आम्हालाही समान संधी मिळाली पाहिजे."
काही वर्षेआधी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला खेळ केला तरी विकलांग खेळाडू त्यातही महिलांना माध्यमांमध्ये फारसं स्थान मिळत नसे.
मात्र आता त्यात हळूहळू बदल होत आहे. गुजरातची पारुल परमार वर्ल्ड पॅराबॅडमिंटन चॅम्पियन झाल्यानंतर थोडा बदल दिसू लागला.
2019 साली पी. व्ही. सिंधूने पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली त्याचवेळेस पॅराबॅडमिंटनपटू मानसी जोशी विश्वविजेती झाली. त्यानंतर लोकांमध्ये विकलांग खेळाडूंवर चर्चा सुरू झाली.
एका रस्ते अपघातात मानसीचा पाय कापावा लागला होता.

फोटो स्रोत, Getty Images
माहितीच्या अभावामुळे, महिलांशी होणाऱ्या भेदभावामुळे, विकलांग खेळाडूंसाठीच्या मैदानांची कमतरता यामुळे लहान शहरांमधील महिला पॅराखेळाडू मागे राहातात.
चांगले प्रशिक्षक न मिळणे हे देखिल एक कारण असतं.
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत मानसी जोशीचे प्रशिक्षक गोपिचंद म्हणाले होते, "मला भरपूर व्हीडिओ पाहावे लागले होते. विकलांग खेळाडूला प्रशिक्षण देण्यासाठी काय करावं लागतं हे समजण्यासाठी तसं करावं लागलं. तसेच मी स्वतः एका पायावर खेळण्याचा प्रयत्न केला जेणेकरुन मला त्यासाठी काय करावं लागतं ते समजेल. त्यानंतर मी माझ्या स्टाफच्या मदतीने मानसीसाठी एक विशेष प्रशिक्षण मोड्युल तयार केलं. "
समस्या अनेक आहेत परंतु जर योग्य संधी आणि सुविधा मिळाल्या तर आपण कोणापेक्षाही कमी नाही हे भारतीय विकलांग महिला खेळाडूंनी दाखवून दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पॅरालिंपिक कमिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा दीपा मलिक आहेत. त्या पॅरालिंपिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू आहेत. त्यांनी 2016 साली रौप्य पदक जिंकलं होतं.
2021 पर्यंत या महिलांनी रौप्य ते सुवर्ण असा प्रवास केला आहे.
34 वर्षिय भाविना हसमुखभाई पटेल ही टोकियो ऑलिंपिकमध्ये टेबल टेनिस खेळात पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.

फोटो स्रोत, Getty Images
तिचे प्रशिक्षक लल्लनभाई दोशी सांगतात, "भाविना 13 वर्षांपासून टेबल टेनिस खेळतेय. या काळात ती नोकरीही करत होती, लग्नानंतर घरही सांभाळत होती."
विकलांग खेळाडूंप्रती नकारात्मक विचार असतात पण आता त्यात बदल होत आहेत.
व्हीलचेअरवर बसून खेळणाऱ्या भाविनाला तिचे यजमान आणि वडील या दोघांची मदत मिळाली.
रुबिनाची गोष्टही वेगळी नाही. तिचे वडील जबलपूरमध्ये मेकॅनिक होते तर आई नर्स.
गेल्या वर्षी रुबिनाने पॅराशूटिंग वर्ल्डकपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं.
रुबिना सांगते, "पैशाची कमतरता आणि जागरुकता नसणे यामुळे लहानपणी माझ्यावर उपचार झाले नाहीत. यामुळे मी कायमची विकलांग झाले. आमची आर्थिक स्थिती चांगली नसूनही माझे वडील मला राजकुमारीसारखं वागवतात. पॅराशूटिंगमध्ये अधिक प्रगती करण्याचं माझं स्वप्नं हेच त्यांचं सर्वस्व आहे. शूटिंगने माझं आयुष्य बदलून गेलं आहे."
बकौल सिमरन सांगते, "पॅरास्पोर्ट्सने माझा जीव वाचवला आहे. मला वेगळी ओळख दिली आहे. एक विकलांग व्यक्ती आणि महिला असूनही या पुरुषप्रधान समाजात सन्मान मिळवून दिला आहे. "
गेल्यावर्षी टोकियो पॅरालिपिंकमध्ये महिला खेळाडूंची संख्या कमी होती.

फोटो स्रोत, Getty Images
याबद्दल अवनी लेखारा सांगते, "एक महिला खेळाडू होणं थोडं कठीण असतं. काळजीपोटी मुलींना एकटं सोडलं जात नाही. तसंच यामुळे खर्चही वाढतो. त्यामुळे महिला खेळाडूंना कमी संधी मिळत आहे. पण जिंकण्याची संधीही मिळत आहे. भारतीय महिला खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यात विकलांग खेळाडूंचाही समावेश आहे."
"तुम्ही पाहा, येत्या काळात पुरुष आणि महिला समान पदकं जिकून आणतील. पल्ला लांबचा आहे, पण आम्ही योग्य वाटेवर आहोत."
अवनीचं हे बोलणं मनात एक नवी उमेद जागवतं.
पलक म्हणते, "तुम्ही एखादी गोष्ट मिळवू शकत नाही असं जग म्हणालं तरी जगात सर्वकाही शक्य आहे असं उत्तर द्या. मी करू शकते, तर तुम्ही करू शकता."

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








