ॲालिंपिक 2024 साठी पॅरिस शहर सज्ज आहे का?

फोटो स्रोत, Getty Images
यंदाचं वर्ष ऑलिंपिकचं वर्ष आहे. जगातल्या सर्वात मोठ्या सोहळ्यांपैकी एक असलेल्या ऑलिंपिकचं आयोजन यंदा फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये होणार आहे. तिथेच मग पॅरालिंपिक स्पर्धाही खेळवल्या जातील.
त्यासाठी पॅरिसमध्ये जय्यत तयारी सुरू आहे, कारण आता उदघाटनासाठी जेमतेम काही महिनेच उरले आहेत.
मुळात आधुनिक ऑलिंपिक चळवळीची सुरुवात फ्रान्सच्या पियरे द कुबर्टिन यांनी केली होती. त्यामुळे फ्रान्सचं आणि त्यातही पॅरिसचं ऑलिंपिकशी जवळचं नातं आहे.
याआधी 1900 आणि 1924 साली पॅरिसमध्ये ऑलिंपिकचं आयोजन करण्यात आलं होतं.
हे शहर आता तिसऱ्यांदा ऑलिंपिकचं यजमानपद भूषवणार आहे.
पण यावेळी उदघाटन समारंभ म्हणजे ओपनिंग सेरिमनी परंपरेनुसार स्टेडियममध्ये नाही तर सीन नदीच्या काठी रंगणार आहे. जवळपास दहा हजार खेळाडू होड्यांमध्ये बसून ट्रॉकेडेरो प्लाझाला पोहोचतील जिथे उदघाटन समारंभ होणार आहे.
शहरात मोकळ्या जागी होत असल्यानं प्रेक्षकांना काही ठिकाणांहून हा सोहळा मोफतही पाहता येणार आहे. ऑलिंपिकमध्ये लोकांचा रस वाढावा यासाठी हे केलं जातंय. पण दुसरा उद्देशही त्यामागे आहे.
गेली काही वर्ष फ्रान्सला राजकीय वाद आणि आंदोलनांनी ग्रासलं आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्राँ यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात त्यांची लोकप्रियता बरीच घटली असल्याचं सर्वेक्षणांत दिसून आलं आहे.
ऑलिंपिक देशातल्या लोकांना पुन्हा एकत्र आणेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
पण खरंच पॅरिस 2024 च्या ऑलिंपिकच्या आयोजनासाठी सज्ज आहे का? नेमकी कशी तयारी सुरू आहे?
सीन नदीचं शुद्धीकरण
पॅरिस ऑलिंपिकच्या उदघाटन सोहळ्यात सीन (Seine) नदीची भूमिका महत्त्वाची आहेच, पण जलतरणातील काही स्पर्धाही या नदीत भरवण्याचा विचार आहे.
सीन नदीकाठावरच पॅरिस शहर वसलं आहे. ही नदी शहरातून 13 किलोमीटरचा प्रवास करते आणि या मार्गात तिच्यावर तीस पूल आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
नदीच्या किनाऱ्यावरून शहराची आकर्षक दृश्यं दिसतात तसंच आयफेल टॉवर आणि लूव्र संग्रहालयासारख्या ऐतिहासिक इमारतीही पाहता येतात.
पण या नदीच्या सौंदर्यात एक कमतरता आहे. प्रदूषण.
पॅरिस पसरत गेलं, तशी सीन नदी एवढी प्रदूषित झाली की गेल्या शंभर वर्षांत पॅरिसमध्ये सीन नदीत पोहण्यास मनाई होती. पॅरिसमधल्या गटारांमधून सांडपाणी या नदीत पोहोचायचं.
पण 2017 साली पॅरिसला ऑलिंपिकचं यजमानपद मिळालं, तेव्हा देशाचं प्रशासन नदी स्वच्छ करण्यासाठी कामाला लागलं.
असं ठरवलं गेलं की 2024 पर्यंत नदी एवढी स्वच्छ करायची की तिच्यात जलतरणाचं आयोजन करता येईल.
पण सीन नदीत प्रदूषणाची समस्या समजून घेण्यासाठी आधी पॅरिसच्या इतिहासात डोकावून पाहावं लागेल.

फोटो स्रोत, Getty Images
पॅरिसच्या सोबोर्न विद्यापीठात हायड्रॉलॉजीचे प्राध्यापक असलेले जाँ मरी मुशेल माहिती देतात की एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत पॅरिसमध्ये सिवेज सिस्टिम किंवा मलनिस्सारण प्रणाली म्हणजे सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नव्हती.
घराघरातलं सांडपाणी गोळा करून शहराबाहेर शेतांत सोडलं जायचं. त्या काळात घोड्यांचा वापर व्हायचा आणि या प्राण्यांची विष्ठाही रस्त्यावर पडायची.
जाँ मरी मुशेल सांगतात, “यावर उपाय म्हणून एकोणिसाव्या शतकाअखेर भूमिगत गटारं उभारण्यात आली. सगळं सांडपाणी एकाच पाईपमध्ये ओतलं जायचं. पण हे सांडपाणी पॅरिसच्या आसपास शेतजमिनीवरच सोडलं जायचं.”
अखेर 1935 मध्ये सांडपाण्यावर प्रक्रीया करणारं संयत्र, अशेर ट्रीटमेंट प्लांट बसवण्यात आला. ही सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी जगातली दुसरी सर्वात मोठी प्रणाली आहे. पण पॅरिसमध्ये पूर आला, तर या प्लांटमध्ये समस्या निर्माण होतात.

फोटो स्रोत, Getty Images
ज्यां मरी मुशेल सांगतात, “या प्लांटमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी जमा झालं तर तो ते साफ करू शकत नाही. उलट अशा परिस्थितीत प्लांट बंद पडतो. भरपूर पाऊस पडल्यावर अत्याधिक पाणी या प्लांटच्या टँकमध्ये जमा झालं, तर ते पूर्ण भरतात आणि मग हे पाणी बाहेर पडतं, तेव्हा ते ओव्हरफ्लो पाईपद्वारा सीन नदीत वाहून जातं.”
त्यावर उपाय म्हणून पॅरिस आणि आसपासच्या गावांतून पावसाचं पाणी सीन नदीत जाण्यापासून रोखण्याचा पर्याय आहे.
पण त्यासाठी सगळ्या इमारतींच्या छतावरून खाली येणारं पावसाचं पाणी गटारांत सोडणं बंद करावं लागेल. त्यासाठी प्रत्येक घराच्या छतावर काही बदल करावे लागतील.
पण यात वेळ जाईल आणि पॅरिसमध्ये अनेक इमारतींच्या बाबतीत असं करता येणार नाही.
त्यामुळे मग शहरातच पावसाचं पाणी रोखण्यासाठी जमिनीखाली एक टँक उभारण्यात आला आहे. मात्र ज्यां मरी मूशेल सांगतात की बरंच काही ऑलिंपिकच्या काळातील मोसमावर अवलंबून राहील.
जास्त पाऊस पडलाच तर या टँकमधून पाणी नदीत सोडावं लागेल आणि मग नदीच्या पाण्याचा दर्जा घसरू शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
2023 सालच्या उन्हाळ्यात इथे विक्रमी पाऊस झाला, एवढा की प्रदूषित पाणी नदीत आल्यानं ऑलिंपिक ट्रायथलॉनची टेस्ट इव्हेंट किंवा रंगीत तालीम रद्द करावी लागली.
ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकचं आयोजनही उन्हाळ्याच्या काळात म्हणजे जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे, त्या काळात पाऊस पडला आणि नदीला पूर आला तर पर्याय काय असेल हा मोठा प्रश्न आहे.
पण सीन नदीचं प्रदूषण ही पॅरिस प्रशासनासमोरची एकमेव समस्या नाही. आणखीही अनेक प्रश्न आहेत.
पायाभूत सुविधांचं काम कुठवर आलं?
ऑलिंपिकचं आयोजन ही कुठल्याही यजमान देशासाठी एक मोठी जबाबदारी असते.
या स्पर्धेची तयारी म्हणून पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतात आणि त्याचं ओझं फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेवरच नाही तर पर्यावरणावरही पडतं.
ऑलिंपिकचं आयोजन करण्यासाठी पॅरिसमध्ये सत्तरहून अधिक ठिकाणी बांधकामं सुरू आहेत.
यजमानांचा दावा आहे की यातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण लंडन किंवा रियो ऑलिंपिकच्या वेळेस बांधकामांदरम्यान झालेल्या कार्बन उत्सर्जनापेक्षा बरंच कमी असेल.
कारण आयोजनासाठी आवश्यक 95 टक्के गोष्टींची पूर्तता उपलब्ध असलेल्या इमारती आणि तात्पुरत्या इमारतींद्वारा केली जाईल.
अनेक ठिकाणी पहिल्यापासूनच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध आहे.

फ्रान्स24 साठी पत्रकार म्हणून काम करणाऱ्या फ्लोरेन्स विलेमिनो सांगतात, “टोकियो, रियो किंवा लंडन ऑलिंपिकशी तुलना केली तर पॅरिसमध्ये नव्या इमारती आणि व्हेन्यूंच्या बांधकामाचं प्रमाण फारच कमी आहे. ऑलिंपिकमुळे इतर ठिकाणी शहरांचा जसा कायापालट होतो, तसंही इथे झालेलं नाही.“
पॅरिसचं प्रसिद्ध स्टेड डी फ्रांस हे ऑलिंपिक क्रीडास्पर्धेचं मुख्य स्टेडियम असेल. हे देशातलं सर्वात मोठं स्टेडियम आहे, जिथे 80 हजार प्रेक्षक बसू शकतात.
या स्टेडियममध्ये फ्रान्सच्या राष्ट्रीय फुटबॉल आणि रग्बी टीम्सच्या मॅचेस खेळवल्या जातात. 2024 साली ऑलिंपिकमधल्या अनेक स्पर्धा याच स्टेड द फ्रान्सवर खेळवल्या जातील.
स्टेड द फ्रान्सजवळच एक नवं अॅक्वाटिक सेंटर आणि अॅथलीट्सच्या राहण्यासाठी ऑलिंपिक व्हिलेज म्हणजे क्रीडाग्राम उभारलं जातंय.

फोटो स्रोत, Getty Images
फ्लोरेन्स सांगतात, “सीन सेंटडेनी परिसरात ऑलिंपिक व्हिलेजचं बांधकाम जवळपास पूर्ण झालं आहे. ऑलिंपिक व्हिलेजमध्ये अॅथलीट्सना राहण्यासाठी बांधलेली घरं नंतर सर्वसामान्य लोकांना विकत घेता येतील. सरकारी समाजकल्याण योजनांअंतर्गत यातली अनेक घरं स्वस्तात विकली जाणार आहेत.
अर्थात ही घरं स्वस्त म्हणजे नेमकी किती स्वस्त असतील, हे काळच सांगेल.
पण ज्या सेंट डेनी परिसरात ही घरं उभारली जात आहेत, त्या परिसरात गरीब वस्ती मोठ्या प्रमाणात आहे.
प्रत्येक ऑलिंपिकविषयी दावा केला जातो की या स्पर्धेच्या आयोजनामुळे शहर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो.
पॅरिसमध्येही ऑलिंपिकच्या आयोजनामुळे अधिक घरं उपलब्ध होण्याची आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातंय.

सार्वजनिक वाहतूक हे ऑलिंपिकच्या आयोजकांसमोरचं मोठं आव्हान आहे.
पॅरिसची भुयारी रेल्वे ऑलिंपिकदरम्यान मोठ्या संख्येनं शहरात आलेल्या गर्दीचा भार पेलू शकेल का?
“अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ऑलिंपिक उन्हाळ्यात सुट्टीच्या दिवसात होत आहेत. त्यामुळे मेट्रो ट्रेनमध्ये नेहमीपेक्षा कमी लोक असतील आणि गर्दीचा काही प्रश्न निर्माण होणार नाही. पण लोकांना चिंता तर वाटते आहेच,” फ्लोरेन्स माहिती देतात.
ऑलिंपिकदरम्यान वाहतुकीसाठी आयोजक दोन मेट्रों लाइन्सवर अवलंबून आहेत. लाइन 14 आणि लाइन 16 जी अधिकृत ऑलिंपिक लाईन आहे.
ही लाईन 16 शहराच्या अशा भागातून जाते जिथे गरीब लोकवस्ती आहे. बहुतांश ऑलिंपिक आयोजनस्थळं या लाईनवरच आहेत. पण वेळेत ही लाईन सुरू होण्याची चिन्हं सध्या तरी दिसत नाहीत.
लोक या काळात बसचा तसंच सायकलसाठी खास मार्गिकांचा वापर करतील असंही सांगितलं जातं. पण ते पुरेसं ठरेल का, याविषयी काहींना शंका वाटते.
पॅरिससमोर आणखी एक मोठा प्रश्न आहे. सुरक्षा व्यवस्था.
फ्लोरेंस विलेमिनो सांगतात की ऑलिंपिकदरम्यान सुरक्षेची खात्री देण्यासाठी मोठ्या प्रमाणआत सीसीटीव्ही कॅमेरे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आहे. प्रशासनाचा दावा आहे की ऑलिंपिकचं आयोजन सुरक्षितपणे पार पडेल.

फोटो स्रोत, Getty Images
जास्तीत जास्त लोकांना स्पर्धा पाहता याव्यात असं प्रशासनाचं उद्दीष्ट आहे. पण तिकिटं एवढी महाग आहेत की अनेकजणांना ती परवडणारच नाहीत.
फ्लोरेंस माहिती देतात, “तिकिटांच्या किंमतीवर काही खेळाडूही नाराज आहेत. ते सांगतात की आम्ही आमच्या कुटुंब आणि मित्रमंडळींसाठीही तिकिटं खरेदी करू शकणार नाही. एका माजी जिमनॅस्टनं तर म्हटलं की इथली तिकिटं खरेदी करण्यापेक्षा ऑलिंपिकसाठी पात्र ठरणं सोपं आहे.
“अनेकजण निराश झाले आहेत. त्यांना वाटलं होतं की ते स्टेडियममध्ये जाऊन ऑलिंपिक सामने पाहतील. पण आता त्यांना घरीच टीव्हीवर सामने पाहावे लागतील.”
लंडन, रियो आणि टोकियो
ऑलिंपिकचं यजमानपद स्वीकारणाऱ्या देशांचं उद्दीष्ट असतं की अर्थव्यवस्थेतल्या कमजोर घटकांमध्ये यातून नवी जान ओतता येईल आणि देशात खेळांचा प्रसार होईल. पॅरिस ऑलिंपिकच्या आयोजकांनाही तसंच वाटतं.
बिल हॅनवे अमेरिकेतल्या की एईकॉम नावाच्या स्पोर्टस मॅनेजमेंट आणि कंस्ट्रक्शन कंपनीत वरिष्ठ अधिकारी आहेत. ते लंडन ऑलिंपिक आणि रिओ ऑलिंपिकच्या आयोजनातही सहभागी होते आणि 2028 साली लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिकच्या तयारीतही त्यांचा वाटा आहे.

बिल सांगतात की, कोणत्याही शहराला ऑलिंपिकचं यजमानपद मिळणं आणि प्रत्यक्ष खेळांचं आयोजन यात बराच मोठा कालावधी असतो. त्या दरम्यान गोष्टी बदलू शकतात.
उदाहरणार्थ, लंडनला 2005 साली ऑलिंपिकचं यजमानपद मिळालं. पण त्यानंतर तीन वर्षांत जगात आर्थिक मंदीचं संकट उभं राहिलं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, घरांच्या किंमती कोसळल्या.
पण ऑलिंपिक खेळांसाठी प्रकल्प उभारणीत सहभागी बांधकाम कंपन्यांना फायदा झाला, असं बिल हॅनवे सांगतात. “आर्थिक संकट सुरू झालं, तेव्हा आम्हाला कमी पैशात प्रॉपर्टी मिळाली. कमी पगारावर काम करणारे मजूर मिळाले.”
काही वर्षांनी अर्थव्यवस्था रुळावर आली तर प्रॉपर्टी डेव्हलपर्सनी भरपूर फायदा कमावला. पण लोकांना स्वस्तात घरं द्यायचं वचन कधी पूर्ण केलं गेलं नाही.
रिओ ऑलिंपिकमुळे ब्राझिलमध्ये पर्यटन व्यवसायाला काही प्रमाणात फायदा झाला, पण अनेक स्थानिक नागरिकांना दिलेली वचन पूर् झाली नसल्याची तक्रारही केली जाते.
तर कोव्हिडच्या जागतिक संकटामुळे 2020 साली टोकियोत होणारं ऑलिंपिक वर्षभरानंतर भरवण्यात आलं. तेव्हाही परदेशी पर्यटकांना येण्याची परवानगी मिळाली नाही. त्याचा फटका हॉटेल इंडस्ट्रीसारख्या स्थानिक उद्योगांना बसला.

फोटो स्रोत, Getty Images
पॅरिस यापेक्षा वेगळं ठरेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
“पॅरिस ऑलिंपिकचं आयोजन करताना पर्यावरणाचं रक्षण आणि ऑलिंपिक खेळांसोबतच या स्पर्धेच्या सामाजिक वारशावर लक्ष दिलं जातंय, आणि ही रियो, लंडन आणि टोकियोपेक्षा वेगळी गोष्ट आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत आणि कमीत कमी खर्चात क्रीडास्पर्धा भरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे,” बिल हॅनवे सांगतात.
पण ही सगळी तयारी वेळेत पूर्ण होईल का?
बिल हॅनवे सांगतात, की ऑलिंपिकआधी सगळी तयारी वेळेत पूर्ण होईल का याविषयी चिंता तर वाटतेच, पण त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
“अनेकदा अनेक गोष्टींची तयारी ऐन वेळेत पूर्ण होते. उदाहरणार्थ लंडन ऑलिंपिकदरम्यान ज्या कंपनीला सुरक्षा व्यवस्था सांभाळायचं कंत्राट मिळालं होतं, ते आपलं काम शेवटपर्यंत पूर्ण करू शकले नाहीत आणि शेवटी सैन्याची मदत घ्यावी लागली. अनेकदा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी इतर पर्यायही तयार ठेवावे लागतात.”
राजकीय वातावरण
एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फ्रान्सच्या जनतेत काय वातावरण आहे? ते देशात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या फॅन्सच्या स्वागतासाठी सज्ज आहेत की अंतर्गत राजकीय उलथापालथीत गुंतले आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
ऑलिंपिकसारख्या क्रीडास्पर्धा देशातली एकजुटता वाढवतात, असं लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातील राज्यशास्त्राच्या प्राध्यापक रेनबो मरे सांगतात.
त्या म्हणतात, “सामान्यतः फ्रेंच लोक खेळाविषयी फार उत्साहित असतात. देशाच्या राष्ट्रीय टीममध्ये अनेक नावाजलेले खेळाडू गौरवर्णीय नाहीत तर परदेशी वंशाचे आहेत. पण स्पर्धेदरम्यान देशातले वेगवेगळे गट टीमसाठी एकत्र येतात, त्यामुळे एकजूट वाढते आणि वांशिक तणाव कमी होतो.”
2018 सालापासून फ्रान्समध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राजकीय तणावाची स्थिती निर्माण होताना दिसली आहे. जून 2023 मध्ये पोलिसांनीच एका निःशस्त्र युवकाला गोळी मारली होती आणि त्यानंतर देशभर हिंसक आंदोलन पसरलं.
केवळ वर्णद्वेश हे एकच तणावाचं कारण नाही, तर आर्थिक असमानता हेही अशा आंदोलनांमागचं एक मोठं कारण आहे. कोव्हिडच्या साथीआधी 2020 मध्ये देशभरात वाढती गरिबी आणि आर्थिक असमानतेच्या मुद्यावरून आंदोलनं झाली होती आणि हे मुद्दे अनेकदा डोकं वर काढतात.
2023 साली जानेवारीत सरकारनं निवृत्तीवय 62 वरून 64 वर केलं, तेव्हा लोक पुन्हा रस्त्यावर उतरले होते. विरोध एवढा तीव्र होता, की राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्राँ यांनी प्रस्ताव मागे घेण्यास नकार दिला.

फोटो स्रोत, Getty Images
मॅक्राँ यांच्याविषयीचं लोकांचं मतही विभागलेलं आहे.
रेनबो मरे सांगतात, “मॅक्राँ राजकारणात येण्यापूर्वी बँकिंग क्षेत्रात होते. जनता त्यांच्याकडे श्रीमंतांचा प्रतिनिधी म्हणून पाहते आणि त्यांची धोरणं श्रीमंतांच्या हिताची आहेत असं लोकांना वाटतं. त्यांची छबी एका अशा बुद्धिमान नेत्याची आहे, जो जनतेशी जुळवून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही.”
मॅक्राँ यांनी 2016 साली स्थापन केलेल्या रेनेसाँ पक्षांतर्गतही अलीकडे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत.
9 जानेवारी 2023 रोजी या पक्षाच्या एलिझाबेथ बॉर्न यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि त्याजागी गॅब्रिएल अॅटल यांची नेमणूक करण्यात आली, जे फ्रान्सचे सर्वात तरूण आणि पहिले गे पंतप्रधान आहेत. पण अॅटल यांनाही संसदेत विविध मुद्द्यांवर बहुमतासाठी झगडावं लागेल असं चित्र आहे.
एकंदरीत, फ्रान्स राजकीय मुद्द्यांवर विभागला गेलेला असतानाच ऑलिंपिकचं आयोजन होणार आहे.
मग हा देश ऑलिंपिकच्या आयोजनासाठी कितपत तयार आहे?
तर मोठ्या संख्येनं बाहेरचे लोक येणं, ही पॅरिसच्या जनतेसाठी नवी गोष्ट नाही. जगभरातून सर्वाधिक पर्यटक पॅरिसलाच भेट देतात.
पण अजूनही वाहतुकीच्या सुविधांसारख्या अनेक गोष्टींची तयारी पूर्ण झालेली नही. तसंच पॅरिस ऑलिंपिकदरम्यान केवळ खेळांवर नाही तर पर्यावरण आणि सामाजिक समानतेवरही लक्ष राहील.
आपल्या एक्सपर्टसच्या मते ऑलिंपिक क्रीडास्पर्धा महत्त्वाची आहेच, पण ती एका चांगल्या समाजाच्या उभारणीची सुरुवातही आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सामाजिक सुधारणांची गरज भासेल.
(संकलन : जान्हवी मुळे, बीबीसी मराठी प्रतिनिधी)
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








