'माझ्या मुलाला ढेकूण दिसले, त्याने सगळा बिछाना फेकून दिला, रंगरंगोटी केली; पण...'

ढेकूण
    • Author, ह्यू स्कोफिल्ड
    • Role, बीबीसी न्यूज, पॅरिस

पॅरिस आणि फ्रान्समधल्या इतर काही शहरांमध्ये ढेकणांचा प्रादुर्भाव वाढलाय.

पुढच्या वर्षी फ्रान्समध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिकस्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ढेकणांची दहशत पसरल्याने, तिथल्या आरोग्यव्यवस्थेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

वेगवेगळ्या फ्रेंच आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी ढेकणांचा प्रादुर्भाव वाढल्याची मोठ्या प्रमाणात दखल घेतलेली आहे

काही भागात हा प्रादुर्भाव वाढलेला असला तरी उर्वरित भागांमध्ये ढेकूण आढळलेले नाहीत.

मूळ प्रकरण असं आहे की मागच्या काही आठवड्यांपासून या शहरात ढेकूण आढळून येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, मात्र दरवर्षीच या काळात ढेकणांची पैदास वाढत असल्याचं दिसतंय.

मार्सेलच्या मुख्य रुग्णालयातील एक कीटकशास्त्रज्ञ जीन-मिशेल बेरेंजर म्हणतात की, "प्रत्येक उन्हाळ्याच्या शेवटी ढेकणांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते."

"याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यात बरेच लोक इथे प्रवास आणि इतर कारणांसाठी येतात मात्र ते येताना ते त्यांच्या सामानासोबत ढेकूणही घेऊन येतात आणि दरवर्षी ढेकणांची संख्या वाढतच चाललेली आहे."

पॅरिसमध्ये राहणाऱ्या फ्लॅटमालकांना ढेकणांची भीती अनेक दिवसांपासून सतावत आहे. फ्रान्स सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार प्रत्येक 10 फ्लॅट मालकांपैकी एकाला ढेकणांचा प्रादुर्भाव सहन करावा लागलेला आहे. यामुळे संतापात भर पडली आहे.

अलीकडच्या काळात चित्रपटगृहांमध्ये ढेकूण आढळल्याच्या बातम्या आलेल्या होत्या, यांची सत्यता सिद्ध झालेली नसली तरी हे प्रकरण मात्र गांभीर्याने घेतलं गेलं आहे.

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांना ढेकणाने चावा घेतल्याचेही दावे करण्यात आलेले आहेत.

फ्रांसमध्ये राहणारे लोक ढेकणांवर उपाय करण्यासाठी खूप पैसे खर्च करत आहेत

फोटो स्रोत, REUTERS

फोटो कॅप्शन, फ्रांसमध्ये राहणारे लोक ढेकणांवर उपाय करण्यासाठी खूप पैसे खर्च करत आहेत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आता पॅरिस सिटी हॉल आणि अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे सरकार यावर कारवाई करण्याचं आवाहन करत आहेत.

2024 च्या ऑलिम्पिक स्पर्धा तोंडावर असताना जगभरातली पॅरिसची प्रतिमा जपण्यासाठी सरकार किती गंभीर आहे हे यावरूनच कळतं. अजूनतरी ढेकणांच्या प्रादुर्भावाची बातमी केवळ सोशल मीडियावरील ट्रेंड आहे म्हणून नाकारण्यात आलेली नाही.

कारण सोशल मीडियादेखील यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावत आहे.

सोशल मीडियावर ढेकणांच्या दहशतीची ही गोष्ट सध्या एवढ्या वेगाने पसरत आहे की एखाद्या सामान्य समस्येला फ्रान्समध्ये राष्ट्रीय आणीबाणीचं स्वरूप आलंय की काय असा प्रश्न एखाद्या व्यक्तीला पडू शकेल.

चित्रपटगृहांच्या सीटवर फिरणाऱ्या या अनोळखी किड्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे, चित्रपट बघायला येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे आणि परिणामी चित्रपटगृह चालवणाऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झालेली आहे.

मेट्रोतून प्रवास करणाऱ्या लोकांनी आता ते ज्या सीटवर बसले आहेत ती सीट पुन्हा पुन्हा तपासायला सुरुवात केलीय. ढेकणांची दहशत एवढी आहे की काही लोक उभे राहून प्रवास करणंच पसंत करत आहेत.

ढेकूण

फोटो स्रोत, Getty Images

बेरेंजर म्हणतात की, "यावर्षी ढेकणांच्या संकटात एक नवीन पैलू तयार झालाय. लोकांना या ढेकणांची भीती वाटायला लागलीय, त्यांच्या मानसिकतेवर याचा परिणाम झालाय.

एकाअर्थी ही चांगलीच गोष्ट आहे यामुळे लोक अधिक काळजी घेऊ लागतील. या समस्येबाबतची जागरूकता वाढेल कारण, ढेकणांचा नायनाट करण्यासाठी जेवढ्या लवकर उपाय केले जातील तेवढं चांगलं असतं. पण अनेक समस्या सांगताना अतिशयोक्तीचा वापर केला जातो आहे."

मात्र या प्रकरणाचं वास्तव हे आहे की ढेकूण दरवर्षी नवीन जोमाने पुनरागमन करत आहेत. मागील 20 ते 30 वर्षांपासून ढेकणांच्या समस्येचा सामना करावा लागतो आहे आणि केवळ फ्रान्समध्येच नाही तर जगभर ढेकूण समस्या ठरत आहेत.

ढेकणांचा प्रादूर्भाव वाढण्यामागे जागतिकीकरण हेदेखील एक कारण असू शकतं.

जगभरात कंटेनरची वाहतूक वाढली आहे, पर्यटन आणि स्थलांतरामध्ये वाढ झालीय. ढेकणांची पैदास वाढण्यामागे ही सगळ्यात महत्वाची कारणं असू शकतात.

हवामान बदलाचा आणि ढेकणांच्या प्रादूर्भावाचा फारसा संबंध नाही. कारण ढेकूण हा प्रामुख्याने घरात आढळणारा कीटक आहे. लॅटिन भाषेत ढेकणांना 'सिमेक्स लेक्युलेरियस' असं म्हणतात.

माणूस जिथेजिथे जातो ढेकूण त्याच्या पाठीमागे जातो असं म्हणतात त्यामुळे त्याला हवामान बदलाचा काही फरक पडत नाही.

दुसऱ्या महायुद्धानंतर डीडीटी (डायक्लोरो-डिफेनिल-ट्रायक्लोरोइथेन) या आधुनिक कीटकनाशकाचा वापर वाढल्यामुळे ढेकूण आणि त्यासारख्या अनेक कीटकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झालं.

मात्र कालांतराने डीडीटी सारख्या रसायनांचा माणसावर वाईट परिणाम होत असल्याने अशा रसायनांचा वापर थांबवण्यात आला आणि ढेकणांचा पुन्हा एकदा जागतिक पटलावर उदय झाला.

दरम्यान पर्यायी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून ढेकणांसारख्या कीटकांची एकूण संख्या नियंत्रणात ठेवण्यात माणसाला यश मिळालं.

डीडीटीच्या आक्रमणातून बचावलेल्या ढेकणांना आजच्या ढेकणांचे पूर्वज असं म्हणता येईल त्यामुळेच आजची ढेकणं ही पूर्वीपेक्षा अधिक टिकावू आणि कणखर बनली आहेत.

स्वच्छतेबाबत जागरूकता वाढल्याने झुरळांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येते.

मात्र ढेकणांची पैदास वाढण्यामागे हेसुद्धा एक कारण असू शकतं. कारण झुरळांना ढेकणांचे शिकारी म्हणून ओळखलं जातं. पण घाबरू नका, ढेकणांचा बिमोड करायला तुमच्या घरातल्या झुरळांची संख्या वाढवण्याचा आग्रह तुम्हाला कुणीही करणार नाही.

झुरळ

फोटो स्रोत, Getty Images

जीन-मिशेल बेरेंजर म्हणतात की, "विकसित जगात राहणाऱ्या लोकांच्या मनात ढेकणांची भीती निर्माण झालीय कारण आपण आपली सामूहिक स्मरणशक्ती गमावून बसलो आहोत.

कारण युरोपाव्यतिरिक्त उर्वरित जगात लोकांना ढेकणांची सवय असते आणि त्यांनी त्यांच्यासोबत जगणंही शिकून घेतलेलं आहे. "

सत्य हेच आहे की ढेकूण हा एक धोका आहे. मात्र शारीरिक धोक्यापेक्षा तो मानसिक पातळीवर अधिक जाणवतो एवढंच.

सिमेक्स लेक्युलेरियस म्हणजेच ढेकणांनी सध्या धुमाकूळ घातलेला असला तरी ते कोणत्याही प्रकारच्या रोगाचा मात्र प्रसार करत नाहीत. ढेकणांचा दंश झोंबत असला तरी त्याचा परिणाम फारकाळ टिकत नाही.

ढेकणं ज्या ठिकाणावरून जातात तिथे ते काळ्या ठिपक्यांच्या स्वरूपात विष्ठा सोडतात, माणसाचा सुगंध आला की ढेकणांना आनंद होतो आणि विशेष म्हणजे त्यांना काहीही खायला मिळालं नाही तरीही ढेकणं किमान एक वर्षतरी आरामात जगू शकतात. तर ढेकणांची दहशत वाढवण्यासाठी एवढी कारणं पुरेशी आहेत, नाही का?

मार्सिले हॉस्पिटलमधील डिस्प्ले स्क्रीनवर दाखवलेली ढेकणं
फोटो कॅप्शन, मार्सिले हॉस्पिटलमधील डिस्प्ले स्क्रीनवर दाखवलेली ढेकणं

असं असलं तरी ढेकूण चावलेल्या व्यक्तिच्या मानसिकतेवर परिणाम होतो.

एक वर्षापूर्वी, माझ्या 29 वर्षांच्या मुलाला त्याच्या फ्लॅटमध्ये काही ढेकणं दिसली. ते बघून त्याने त्याचा संपूर्ण बिछानाच फेकून दिला, त्याने त्याचे सगळे कपडे धुतले, त्याचा फ्लॅट त्याने नखशिखांत धुवून काढला. एवढं करूनही त्याला तिथे झोपच लागेना. त्याच्या शरीरावरुन ढेकूण रेंगाळत जात असल्याचा भास त्याला होऊ लागला.

केवळ एका कीटकनाशक कंपनीने त्याच्या फ्लॅटमध्ये महागडी स्टीम-ट्रीटमेंट केल्यानंतरच तो तिथे श्वास घेऊ लागला. काही कंपन्या ढेकणांचा बिमोड करण्यासाठी कुत्र्यांचाही वापर करतात.

बेरेंजर म्हणतात की, "अर्थात ढेकणांची समस्या ही हसण्यावर नेण्यासारखी नाही. पण हे खरंय की ढेकणांचा प्रसार कसा होतो याबाबतच्या अनेक कहाण्या रंगवून सांगितल्या जातात.

माझ्या मते ढेकणं नष्ट करण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे प्रत्येकाच्या पाठीमागे न लागता ज्यांच्याकडून ढेकणांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होतो अशा लोकांना लक्ष्य केलं पाहिजे."

ढेकणांचा प्रसार करणारे लोक कमी प्रमाणात असले तरी त्यांच्याकडूनच ढेकणं मोठ्या प्रमाणात इकडून तिकडे प्रवास करत असतात.

हे बहुतांश लोक गरीब असतात, लोक आजारी असतात आणि त्यांना सरकारी सुविधांचा लाभ मिळत नसतो.

बेरेंजर आणि त्यांच्या टीमला अशाच एका व्यक्तीच्या घरी ढेकणांवर उपाय करण्यासाठी पाचारण करण्यात आलं होतं. तेंव्हा त्यांना अनेक डोकं चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी तिथे दिसल्या.

त्या घरात शेकडो ढेकणं फार होती, कपडे, फरशी, भिंतीवर लावलेल्या तसबिरी या सगळ्यांमध्ये ढेकूण होते. एवढंच काय तर त्या ढेकणांची अंडीही घरभर पसरली होती.

"अशा घरात राहणारी माणसं बाहेर पडतात तेंव्हा त्यांच्या अंगाखांद्यावरून ढेकणं सगळीकडे पसरतात, त्यामुळे अशा व्यक्तींना मदत करण्याची नितांत आवश्यकता आहे."

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)