चार चेंडूत चार विकेट; गुजरातसाठी मोहित शर्मा किमयागार

फोटो स्रोत, Getty Images
शेवटच्या षटकात 12 धावांचा बचाव करायची जबाबदारी गुजरात टायटन्सच्या मोहित शर्माच्या खांद्यावर होती. मोहितने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट पटकावली. चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर रनआऊट झाले आणि गुजरातने 136 धावांचा यशस्वीपणे बचाव केला. मोहित शर्माने शेवटच्या षटकात केवळ 4 धावा देत संघाला थरारक विजय मिळवून दिला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
शेवटच्या षटकात संपूर्ण इनिंग्ज पाहिलेला राहुल असल्याने लखनौला अपेक्षा होत्या. राहुलने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. मात्र दुसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याचा त्याचा प्रयत्न जयंत यादवच्या हातात गेला. राहुलने 61 चेंडूत 68 धावांची खेळी केली. मार्कस स्टॉइनसने आल्या आल्या षटकार लगावण्याचा प्रयत्न केला मात्र डेव्हिड मिलरने अफलातून झेल घेत त्याला माघारी धाडलं. तिसऱ्या चेंडूवर दीपक हुड्डाने मोहितला हॅट्ट्रिक होऊ दिली नाही. चेंडू तटवून काढत एक धाव घेतली. मात्र आणखी एक धाव घेण्याचा प्रयत्नात आयुश बदोनी धावचीत झाला. पाचव्या चेंडूवर दीपक हुड्डाने एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वृद्धिमान साहाने यशस्वी होऊ दिला नाही आणि तो धावचीत झाला. चार चेंडूत चार विकेटसह लखनौच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. शेवटचा चेंडू निर्धाव टाकत मोहितने गुजरातच्या संस्मरणीय विजयावर शिक्कामोर्तब केलं.
लखनौ इथल्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर झालेल्या लो स्कोअरिंग थ्रिलरमध्ये गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. संथ आणि धीम्या खेळपट्टीमुळे गुजरातच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागला. कर्णधार हार्दिक पंड्याने तिसऱ्या क्रमांकावर येत 50 चेंडूत 66 धावांची खेळी केली. त्याने 2 चौकार आणि 4 षटकार लगावले. सलामीवीर वृद्धिमान साहाने 47 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता गुजरातच्या एकाही फलंदाजाला आत्मविश्वासाने खेळता आलं नाही. गुजरातला 135 धावांत रोखत लखनौनं अर्धी बाजी आपल्या बाजूने केली होती. लखनौतर्फे कृणाल पंड्या आणि मार्कस स्टॉइनस यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

फोटो स्रोत, Getty Images
संथ खेळपट्टीवर या धावांचा पाठलाग कठीण होऊ शकतो असं भाकीत समालोचकांनी व्यक्त केलं होतं. काईल मायर्स आणि के.एल.राहुल जोडीने 55 धावांची सलामी दिली. रशीद खानने ही जोडी फोडली. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या कृणाल पंड्याने कर्णधाराला साथ देत दुसऱ्या विकेटसाठी.. धावांची भागीदारी केली. डावखुरा फिरकीपटू नूर अहमदने कृणालला बाद केलं. धोकादायक फलंदाजीसाठी प्रसिद्ध निकोलस पूरन नूर अहमदचीच शिकार ठरला.
स्पर्धेत स्ट्राईकरेटच्या मुद्यावरून राहुलवर सातत्याने टीका होत असते. कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करणं ट्वेन्टी20 प्रकारात महत्त्वाचं असतं. राहुलने या सामन्यात जवळपास 20 षटकं म्हणजे अख्खी इनिंग्ज फलंदाजी केली पण तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
“काय झालं ते मलाही माहिती नाही. सगळं अगदी झटपट झालं. आम्ही सामना नेमका कुठे गमावला असं सांगता येणार नाही. आम्ही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षणही चांगलं केलं. 135 ही या मैदानावरची सरासरी धावसंख्या आहे. आम्ही गोलंदाजी करताना परिस्थितीनुरुप खेळ केला. फलंदाजीत आम्ही अतिशय चांगली सुरुवात केली. नक्की काय झालं मला सांगता येणार नाही. आम्ही सातपैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे पण हा पराभव पचनी पडायला वेळ लागेल. आम्ही प्रतिस्पर्धी संघापेक्षा पुढे होतो. सामना शेवटपर्यंत न्यायचा असा काही माझा विचार नव्हता. काही गोलंदाजांवर आक्रमण करायचं असं माझं धोरण होतं. नूर आणि जयंतने अतिशय उत्तम गोलंदाजी केली. आम्ही काही क्षणी अधिक धोका पत्करत धावा करायला हव्या होत्या. खेळपट्टीवर नुकतंच आगमन झालेल्या फलंदाजांसाठी ही खेळपट्टी सोपी नव्हती. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या फलंदाजाने सामना जिंकून देणं आवश्यक होतं. शेवटच्या षटकांमध्ये चौकार-षटकारांच्या संधी वाया दडवल्या”, असं लखनौचा कर्णधार के.एल.राहुलने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
“दोन सामने गमावल्यानंतर देवाने आम्हाला सांगितलं की मी दरवेळी असं करणार नाही. त्यानेच आम्हाला जिंकायची संधी दिली. आम्ही विकेट घेत गेलो त्यावेळी वातावरण बदललं. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत असा पराभव तुमचं मनोबल खच्ची करतो. पण असा विजय तुमचं मनोधैर्य प्रचंड वाढवतं. आम्ही 10 धावा आणखी काढू शकलो असतो. खेळपट्टी अशा स्वरुपाची होती. स्ट्रॅटेजिक टाईमआऊटवेळी आम्ही हेच बोललो की खेळपट्टीवर स्थिरावलेला फलंदाज शेवटपर्यंत खेळणार कारण नव्या फलंदाजाला लगेच आक्रमण करता येणार नाही. 30 धावांत 30 धावा हव्या असताना ते आघाडीवर होते. 4 षटकात 27 धावा असं समीकरण झाल्यावर आम्हाला आशा वाटू लागली. एखादी चूक त्यांना महागात पडू शकते याचा आम्हाला अंदाज आला. तिथेच सामन्याचं पारडं फिरलं. मोहित शर्मा अतिशय अनुभवी खेळाडू आहे. कारकीर्दीत असंख्यवेळा दडपणात त्याने गोलंदाजी केली आहे. त्यामुळे मला त्याला काहीही सांगावं लागलं नाही. त्याच्या विचारातली स्पष्टता, नियोजन आणि अंमलबजावणी हे सगळं तंतोतंत झालं. हा एक संस्मरणीय विजय आहे. शमीने शानदार गोलंदाजी केली. जयंत खूप काळानंतर संघात होता. त्यानेही उत्तम गोलंदाजी केली. नूरचा उल्लेख करणं आवश्यक आहे. तो विलक्षण प्रतिभावान खेळाडू आहे”, असं गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








