You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ठाणे मनपा रुग्णालयात एका रात्रीत 18 मृत्यू, आरोग्यमंत्री म्हणतात, 'अहवाल मागवलाय'
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
अपुऱ्या सोयीसुविधा आणि रुग्णसंख्येत अचानक झालेली वाढ ही कारणं या मृत्यूंमागे असल्याचा आरोप आहे.
या वृत्तानंतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी रुग्णालयाच्या दिशेनं धाव घेतली आणि रुग्णालयाच्या प्रशासनाला जाब विचारला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला.
रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि डॉक्टर यांच्याशी या नेत्यांची शाब्दिक बाचाबाचीही झाली.
राष्ट्रवादीचे ठाण्यातील नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हेही रुग्णालयात पोहोचले.
आव्हांनी म्हटलं की, “आज (13 ऑगस्ट) सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं.”
“या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घेऊन, संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे,” अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली.
ठाण्यातील घटना हृदयद्रावक - शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ठाण्यातील घटनेची दखल घेतली आहे.
शरद पवारांनी ट्वीट करत म्हटलं की, "ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल रात्रभरात 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
"गेल्या काही दिवसांपूर्वीच 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली."
अहवाल आल्यानंतर कारवाई करू – तानाजी सावंत
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “हे हॉस्पिटल माझ्या विभागाच्या अंतर्गत येत नाही. पूर्वी 5 मृत्यू झाले ते वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत आणि आताचे मृत्यू नागरी विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात झाले. तरी हे मृत्यू कशामुळे झाले, याचा अहवाल मागवून, त्यानंतर उचित कारवाई करेन.”
“तातडीनं समिती तयार करून अहवाल मागवला आहे. दोन दिवसात अहवाल येईल. यानंतर कारवाई करेन,” असं तानाजी सावंत म्हणाले.
तसंच, राजकीय आरोपांवर बोलताना सावंत म्हणाले की, “या क्षणी राजकीय भाष्य करणं मला योग्य वाटत नाही.”
'मुख्यमंत्र्यांच्या दारात आरोग्य सुविधांचा अभाव'
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय की, “ठाणे महानगरपालिका क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये रात्रभरात तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. 'शासन आपल्या दारी' म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारात मात्र आरोग्य सुविधांचा अभाव आहे.
“हॉस्पिटलमध्ये पुरेशा आरोग्याच्या सुविधा नाहीत, डॉक्टर्स नाहीत, स्टाफ नाही त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी साहजिकच मर्यादा येतात. त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतोय. लोकांचे नाहक जीव जात आहेत. शासनाने यात गांभीर्याने लक्ष घालावे.”
अधिष्ठात्यांनी काय माहिती दिली?
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनीही माध्यमांशी बोलताना या घटनेतील मृतांपैकी काही मृत्यू कसे झाले, हे सांगितले. तसंच, रुग्णालयातील सध्याच्या सुविधांबाबतही माहिती दिली.
ते म्हणाले की, “रात्री मृत्यू झालेल्यांमधील पाच रुग्णांना ताप आणि दम लागत होता. त्यांच्या फुफ्फुसात जखमा झाल्या होत्या. एका रुग्णाच्या प्लेटलेट्स सहा हजारावर आल्या होत्या. एक रुग्ण केरेसीन प्यायला होता. एक अनोळखी रुग्ण होता, त्याला हेड एन्जुरी झाली होती. एकाला ब्रेन ट्रॉमा होता. चार रुग्णांचे मल्टिऑर्गन फेल्युअर झालं होतं.”
तसंच, यावेळी अधिष्ठात्यांनी हॉस्पिटलच्या सध्याच्या सुविधांबद्दल माहिती देताना सांगितलं की, “छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 500 बेड आहेत. मात्र, आम्ही 600 रुग्ण भरती करून घेतले होते. आम्ही यथाशक्ती काम करतोय .इथे गरीब आदिवासी येतात. अत्यवस्थ अवस्थेत येतात. तरी आम्ही भरती करून घेऊन त्यांच्यावर उपचार करतो.”
“सध्या आमच्याकडे 124 मेडिकल टीचर, जवळपास 150 निवासी डॉक्टर आहेत. हे डॉक्टर 500 बेडसाठी पुरेसे आहेत. मात्र, अतिरिक्त रुग्ण आल्यानं भार वाढला. किंबहुना, अतिरिक्त रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागाही नाही. एवढे रुग्ण कधी आले नाहीत. हे अचानक वाढले,” अशीही माहिती अधिष्ठात्यांनी दिली.
10 ऑगस्टला एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू
तीन दिवसांपूर्वी म्हणजे 10 ऑगस्टला एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता.
त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते. आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे
त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला होता. आव्हाड म्हणाले होते की, “या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे. बिल वाढवून लावली जात आहेत, डॉक्टर वेळेवर कामाला येत नाहीत. इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत.”
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे. यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच, अशी खंतही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली होती.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं होमग्राऊंड असलेल्या ठाण्यातच ही घटना घडल्यानं खळबळ उडालीय. त्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे ठाणे महापालिकेअंतर्गत येतं. या महापालिकेवर गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असून, ठाण्यातल्या शिवसेनेचं नेतृत्त्वही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपरस्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन केलं होतं. शिवाय, जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. पण या सगळ्यात आता रुग्ण ज्या रुग्णालायता येतात, त्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झालंय का, असा प्रश्न सर्वसामान्य लोक विचारत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)