You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'पाण्यात काही चावेल म्हणून भीती वाटते आणि बाहेर पडल्यावर आमची उपासमार होते'
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Reporting from, मुंबई
“आमचा जीव जाता जाता वाचला. संपूर्ण क्रांती नगर पाण्याखाली होतं. आम्ही छतावर जाऊन थांबलो. पण आणखी अर्धा तास पाऊस सुरू पडत राहिला असता, तर आम्ही कदाचित वाचलो नसतो. आमचं सगळं सामान पाण्याखाली गेलं. घरातली सर्व कागदपत्रं गेली. आमच्याकडे आता काहीही पुरावे नाहीत. आजही खूप पाणी भरतं. गटाराचं पाणी थेट घरात येतं. दरवर्षी पावसाळा आला की, आम्हाला टेंशन आहे. मुलं घेऊन घराबाहेर जावं लागतं.”
मुंबईत मिठी नदीलगत राहणाऱ्या कुसुम गायकवाड आम्हाला सांगत होत्या. हे सांगत असताना त्या भावूक झाल्या.
13 वर्षांच्या असताना कुसुम गायकवाड उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातून मुंबईत आल्या.
“मी 13 वर्षांची असताना माझं लग्न झालं होतं. लग्न करून मी इथेच आले. 40 वर्षं होऊन गेली असावीत. कामाच्या शोधात आम्ही गावाहून मुंबईत आलो,” असं कुसुम सांगतात.
मुंबईतील कुर्ला परिसरात मिठी नदीलगत असलेल्या क्रांती नगर वसाहतीत कुसुम गायकवाड राहतात. त्यांच्याप्रमाणाचे हजारहून अधिक लोक या वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात पावासाचा जोर वाढला की इथल्या रहिवाशांची चिंताही वाढते. कारण मिठी नदीचं दुषित पाणी थेट इथल्या शेकडो घरांमध्ये घुसतं.
आम्ही क्रांती नगर परिसरात पोहचलो त्यावेळी दूरवर नजर पोहचेल तिथपर्यंत मिठ नदीचं काळं कुट्ट पाणी दिसत होतं. नदीत आणि परिसरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य आणि असह्य होणारी दुर्गंधी होती. आणि याच ठिकाणी क्रांती नगरचे रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे.
पावसाळा सुरू झाला की खोलगट भागातील क्रांतीनगर वसाहतीत लगेच पाणी शिरतं. मिठी नदीच्या दुषित पाण्यामुळे रोगराई सुद्धा पसरते.
18 वर्ष उलटली तरी रहिवासी घराच्या प्रतिक्षेत
26 जुलै 2005 रोजी मुंबईत आलेल्या महापुरात शेकडो नागरिकांचा जीव गेला. त्यावेळी मिठी नदीच्या किनाऱ्यावरच राहणाऱ्या क्रांती नगरमध्येही अनेकांचा मृत्यू झाला तर मोठ्या संख्येने लोक पाण्यात अडकले. ‘त्या’ दिवशीची आठवण सांगताना आजही इथल्या लोकांचा थरकाप उडतो.
कुसुम गायकवाड सांगतात, “घराच्या छतापर्यंत पाणी भरलं होतं. जीव वाचवण्यासाठी लोक कसेबसे बाहेर पडले. आम्ही छतावर थांबलो होतो. पण अजून अर्धा तास जरी पाऊस आला असता तरी आम्ही वाचलो नसतो. आता माझ्या पतीचंही निधन झालं. मी आणि दोन मुलं एवढंच कुटुंब आहे.”
मुंबईवर महापुराची वेळ पुन्हा येऊ नये, पुन्हा 26 जुलै 2005 ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मिठी नदीचं संवर्धन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मिठी नदीतला गाळ काढायचं ठरलं आणि नदीचं सौंदर्यकरण करायचंही ठरलं. तसंच क्रांती नगरच्या स्थानिकांचं पुनर्वसन केलं जाईल असंही आश्वासन वेळोवेळी राजकीय नेत्यांनी दिलं.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीजवळ क्रांतीनगर ही वसाहत आहे. सखल भागात शेकडो घरं असल्याने मिठी नदीतील पात्राचं पाणी बाहेर गेलं की इथल्या घरांमध्ये दुषित पाणी भरतं. या वस्तीतील सांडपाणी नदीत जात असल्याचं दिसतं. मिठी नदीभोवती मोठी संरक्षक भींत बांधण्यात आली आहे. परंतु ती शेवटच्या टोकापर्यंत न बांधल्याने किंवा खुली राहिल्याने पाणी बाहेर येतं असं रहिवासी सांगतात.
निवडणुकांमध्येही स्थानिक लोकप्रतिनिधिंनी प्रचारादरम्यान क्रांती नगरच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिले. परंतु 18 वर्ष उलटली तरी इथले रहिवासी पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत.
सुनीता सुतार गेल्या 40 वर्षांपासून क्रांती नगरमध्ये राहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून सुतार काम करण्यासाठी वसंत सुतार आणि त्यांच्या पत्नी सुनीता सुतार आपल्या दोन मुलींसह क्रांती नगरमध्ये आल्या. साधारण दहा बाय दहाच्या खोलीत राहून त्यांनी आपल्या संसाराचा गाढा हाकला. आपल्या तीन मुलींना शिकवलं. पण आजही पावसाळा आला की मनात धाकधूक सुरू होते असं त्या सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, “थंडी ताप सर्दी इथे सुरूच असतं. सतत आजारपण आहे. पाऊस आला की दरवर्षी आमचं नुकसान आहे. आमचे पाय सुद्धा सडतात. पाण्यामुळे खूप त्रास होतो. खारं पाणी असल्याने त्रास होतो.”
“असे अनेक गणेशोत्सव, दिवाळी होऊन गेली पण अजून काही घरं मिळाली नाहीत. घराची चावी देणार असं नुसतंच आश्वासन दिलं जातं,” असंही सुनीता सुतार सांगतात.
मुंबईची 17.8 किलोमीटर लांबीची मिठी नदी बोरिवलीच्या विहार लेकपासून वाकोला, साकीनाका, पवई, धारावी, कुर्ला आणि तिथून पुढे माहीम खाडीतून अरबी समुद्रापर्यंत वाहते. याच भागांमध्ये अनेक ठिकाणी मिठी नदीच्या तिरावर रहिवासी इमारती, झोपड्या आणि औद्योगिक वसाहती आहेत. या भागांमधलं सांडपाणी, रासायनिक कचरा, प्लॅस्टिक असा सगळाच कचरा मिठी नदीत सोडला जातो. यामुळे मुंबईत मुसळधार पावसात मिठी नदीचं पाणी पात्राबाहेर जातं आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचतं.
क्रांती नगरमध्ये राहणारी 17 वर्षांची निकीता सुतार सांगते की, मिठी नदी स्वच्छ होणार हे ऐकतच मी लहानाची मोठी झाले. पण परिस्थिती आजही तशीच आहे.
निकीता सुतार सांगते, “थोडा जरी पाऊस आला तरी घरात खूप पाणी येतं. पाणी दुषित असल्याने घराबाहेरही जाऊ वाटत नाही. पण सुरक्षेसाठी आम्हाला जावं लागतं. दुसऱ्या दिवशीही कमी पाणी आलं तरच घरी परततो. पण अन्नाची कुठलीही सोय नसते. काळ्या पाण्यात काही चावलं तरी भीती वाटते. पुन्हा संध्याकाळी पाणी भरलं तर बाहेरच रहावं लागतं. अन्नाची उपासमार होते.”
“आपण इथे का राहतो? किती घाण असते. आपण घरी आलो तरी दुसऱ्या दिवशी आजारामुळे ताप, सर्दी, खोकला आणि बाकीचे आजार होतात. एवढ्या वर्षात आमचं शिक्षणाचंही खूप नुकसान झालं आहे. पावसाळ्यात सगळीच अडचण असते. आधी शाळा आणि आता कॉलेज. अभ्यासावर परिणाम होतो,” असंही ती सांगते.
नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात क्रांती नगरच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी, पुनर्वसनाबाबत लवकरच निर्देश दिले जातील अशी माहिती दिली.
‘मुंबईत येणारे पूर मिठी नदीमुळेच’
मुंबईत येणाऱ्या पुराला मिठी नदी जबाबदार असल्याचं महाराष्ट् प्रदुषण नियंत्रण मंडळाने आपल्या 2019 च्या अहवालात म्हटलं आहे. यासाठी आपात्कालीन व्यवस्थापन केलं पाहिजे असंही त्यांनी प्रशासनाला सुचवलं आहे.
अतिप्रदुषित झाल्याचंही महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने आपल्या एका अहवालात म्हटलं आहे.
तसंच 2019 सालच्या मिठी नदी (Action Plan) या अहवालानुसार, मिठी नदीत मुख्यत्वे रहिवासी आणि औदोगिक भागातून सांडपाणी, औद्योगिक कचरा, प्लॅस्टिक आणि इतर कचरा सर्रास टाकला जातोय.
मिठी नदी भोवती अनेक छोटे-मोठे उद्योग सुरू आहेत. यात हॉटेल्स, खाद्यपदार्थाचे स्टॉल्स, ड्रम वॉशींग, MIDC, कार वॉशींग सेंटर्स, आरएमसी युनीट्स,अॅनीमल फार्म्स तसंच रहिवासी वसाहतदेखील मोठ्या प्रमाणात आहे.
रहिवासी आणि हॉटेलमधलं सांडपाणी नदीत सोडलं जात आहे. तसंच औद्योगिक भागातून ब्लिच, तेल आणि ग्रीस, केमिकल इंडस्ट्रिमधून टॉक्सिक, मेटल प्लांटिंग क्लस्टर्समधून मेटल्स आण अॅसीड थेट मिठी नदीत जात आहे.
वनशक्ती या स्वयंसेवी संस्थेने मिठी नदीच्या संवर्धनासाठी सर्वोच्च न्यायालय आणि हरीत लवादामध्ये दोन याचिका दाखल केल्या आहेत. या संस्थेचे प्रमुख स्टॅलीन सांगतात, “मिठी नदी सीझनल आहे. यात सांडपाणी 80 टक्के आहे. गाळ, केमिकल कंटॅमिनेशन, इंडस्ट्रिअल कचरा आहे. मिठी नदीत फक्त 20 टक्के पाणी आहे. बाकी नदी प्रदुषित आहे. नदीत आता मासे दिसत नाहीत हा पुरावा आहे.”
“सर्वोच्च न्यायालय आणि हरीत लवादामध्ये आमच्या दोन याचिका आहेत. स्वच्छ पाणी यायला पाहिजे. सगळीकडून नाल्यात घाण पाणी येतं. प्लॅस्टिकचा कचरा थांबला पाहिजे. आम्ही महानगरपालिकेकडे अनेक मागण्या केल्या आहेत. नदीवर जाळी बसवली पाहिजे. फ्लोटींग प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करण्याची आमची मागणी आहे. हे फक्त पाण्यावर फ्लोटींग होत राहणार आणि स्वच्छ राहणार, या करता येण्यासारख्या उपाययोजना आहेत,” असंही ते सांगतात.
मिठी नदीच्या कामात भ्रष्टाचार?
26 जुलै 2005 रोजी मुंबईत महापूर आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेला खडबडून जाग आली आणि मिठी नदीचं संवर्धन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला. यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आलं. मुख्यमंत्री या प्राधिकरणाचे अध्यक्ष होते.
यानंतर दोन टप्प्यात काम करण्याचा निर्णय आयआयटी बॉम्बे आणि चितळे समिती यांनी सर्वेक्षण करून घेतला. यापैकी 11.84 किलोमिटरचं काम बीएमसी आणि 6 किलोमिटर लांबीचं काम एमएमआडीएच्या माध्यमातून करण्याचं ठरलं.
परंतु गेल्या 18 वर्षात मिठी नदीच्या कामाच्या नावाखाली भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पावसाळी अधिवेशनादरम्यान करण्यात आला. या कामासाठी कंत्राटदार कोण होते, काम किती साली झालं, अधिकारी कोण होते? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
या आरोपांनंतर राज्य सरकार याची एसआयटीमार्फत चौकशी करेल असंही मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत माहिती सांगताना म्हटलं, 2005 ते 2013 एमएमआरडीएने मिठी नदीच्या रुंदीकरणाचं काम केलं. आतापर्यंत 1160 कोटी रुपयांचं काम झाल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. तसंच 40 टक्के कामे पूर्ण झाल्याचंही ते म्हणाले. उर्वरित कामांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे.
मिठी नदी स्वच्छ होण्यास विलंब का होत आहे?
यासंदर्भात आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याशीही बोललो. ते म्हणाले, 2006 ते 2013 पर्यंत नदीचं रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भींत बांधणं आणि सर्व्हीस रोड बांधणं या चार कामांना गती देण्यात आली. दरम्यानच्या काळात नदीजवळ झालेले अतिक्रमण, जमीन हस्तांतरण प्रक्रिया, न्यायप्रविष्ठ प्रकरणं यामुळे अनेक ठिकाणी कामं रखडली.
यानंतर 2013 मध्ये राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीशीनंतर नदीचं प्रदुषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झाली. 2015 मध्ये अनेक लोकांनी दावे केले मिठी नदीच्या रुंदीकरणात त्यांची जमीन गेली आणि यासाठी मोठी भरपाई त्यांनी मागितली. अशा अनेक तांत्रिक बाबींमुळे कामाला उशीर होत गेला.
2015 नंतर मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते असा शासन निर्णय जारी करण्यात आला. मुंबईत सात एसटीपी (सीवेज ट्रिटमेंट प्लांट) बसवले आहेत. नदीमध्ये येणारे जे आऊटफॉल आहेत त्यांना इंटरसेप्टरमधून सीवर लाईनमध्ये डायव्हर्ट करण्याचं काम सुरू आहे. यात 45 टक्के कामं झालं आहे.
हे ही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotifyआणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)