इस्रायलला गाझामधून हमासचा पूर्णपणे नायनाट करता येईल का?

    • Author, डालिया हैदर आणि नताली मेरजोगुई
    • Role, बीबीसी अरबी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलंय की, गाझामधील हमासचं प्रशासन आणि लष्करी क्षमता नष्ट करणं हा इस्रायलचा उद्देश आहे.

नेतन्याहू वेळोवेळी हमासला संपवण्याच्या आपल्या ध्येयाचा पुनरुच्चार केला आहे.

गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पाच महिन्यांच्या युद्धात सुमारे 30,000 पॅलेस्टिनी मारले गेलेत.

इस्रायलने गाझामध्ये महत्त्वपूर्ण यश मिळवलं असून संपूर्ण विजय मिळविण्यासाठी ते आता मार्गक्रमण करतील असं म्हटलं जातंय.

पण हमासकडे लष्करी क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक क्षमता आहे. हमास ही एक राजकीय, वैचारिक आणि सामाजिक चळवळही आहे. अशा स्थितीत हमासला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं इस्रायलचं ध्येय शक्य आहे का?

प्रत्यक्षात काय सुरू आहे?

गाझामधील 24 पैकी 18 हमास बटालियन संपवल्या आहेत असा दावा इस्रायलने केला आहे.

त्यांनी दावा करताना म्हटलंय की, उत्तर गाझा पट्टीतील हमासच्या लष्करी संरचनांचा पूर्णपणे विनाश झाला आहे.

, हमासने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला तेव्हा त्यांच्याकडे सुमारे 30,000 सैनिक होते. या हल्ल्यात सुमारे 1,200 इस्रायली मारले गेले आणि हमासने 250 लोकांना बंदी बनवलं अशी माहिती आयडीएफ ने दिली आहे.

आयडीएफने 13,000 सैनिक मारल्याचा दावा केला आहे. नेतन्याहू यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीला सांगितलं होतं की, इस्रायली सैन्याने 20,000 हून अधिक अतिरेक्यांना संपवलं आहे.

ही संख्या हमासच्या लढवय्यांच्या संख्येपेक्षा निम्म्याहून अधिक आहे. बीबीसीला या आकडेवारीची खातरजमा करता आलेली नाही. आयडीएफकडे तपशीलाची विनंती केली असता, त्यांनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

त्यामुळे इस्त्रायल आणि गाझा यांच्या आकडेवारीत विरोधाभास असल्याचं स्पष्ट आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मरण पावलेल्यांपैकी सुमारे 9,000 पुरुष होते.

बीबीसीशी बोलताना हमासच्या राजकीय कार्यालयाने इस्रायलचे दावे फेटाळले. ते म्हणाले की त्यांची लष्करी शाखा गाझामधील सर्व क्षेत्रात काम करत आहे.

दरम्यान, इस्रायली वृत्तपत्र ''हारेत्ज' मधील वृत्तानुसार, हमासने आपल्या काही बटालियनची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली आहे.

जेन्स डिफेन्स विकलीचे मिडल इस्ट संपादक जेरेमी बिन्नी म्हणतात, "हमासला नवीन लढवय्ये भरती करणं सहज शक्य आहे."

इस्रायली लष्कराच्या निवृत्त कर्नल, मिरी आयसिन या इस्रायलच्या रीचमन विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी संस्थेत शिकवतात. त्या सांगतात की, इस्रायली सुरक्षा दलांनी हमासचे अनेक कमांडर ठार केलेत. त्यांचा शस्त्रास्त्रांचा साठा शोधून उध्वस्त केलाय.

बिन्नी यांचं म्हणणं आहे की, हमासची बोगदा प्रणाली पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप मोठी आहे. आणि इस्त्रायलींना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण याठिकाणी अनेकांना ओलीस ठेवलं असण्याची शक्यता आह

उत्तर गाझामधील इस्रायलची मोहीम ही दडपशाहीची खुली प्रक्रिया असल्याचं त्या सांगतात.

इस्रायलवर आंतरराष्ट्रीय कायदा मोडल्याचा आरोप होतोय. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने देखील या नरसंहाराच्या आरोपांचा विचार केलाय.

मात्र इतकं असूनही, इस्रायलने आपली मोहीम सुरू ठेवावी आणि हमासच्या उर्वरित बटालियनशी सामना करावा, असं नेतान्याहू यांचं म्हणणं आहे.

तुम्ही विचारधारा मिटवू शकता का?

पश्चिमेकडील बहुतेक देश हमासला अतिरेकी गट मानतात. तर हमासचे नेते अजूनही इस्रायलचा नाश करण्याचं आवाहन करताना दिसतात असं अनेकांचं म्हणणं आहे.

पण अरब जगतातील काही भागात याकडे प्रतिकार चळवळ म्हणून पाहिले जाते.

2006 मध्ये निवडणुका जिंकल्यानंतर आणि प्रतिस्पर्धी फताहला राजकारणातून हिंसकपणे बेदखल केल्यानंतर 2007 पासून हमासने गाझा पट्टीवर राज्य करायला सुरुवात केली.

त्यानंतर इस्रायल आणि काही प्रमाणात इजिप्तनेही गाझा पट्टीची नाकेबंदी केली. आम्ही हे सुरक्षेसाठी करत असल्याचं दोन्ही देशांनी म्हटलं होतं.

गेल्या दोन दशकांमध्ये पॅलेस्टिनी गटांनी गाझामधून इस्रायलवर हजारो

क्षेपणास्त्रे डागली. काहीवेळा वेस्ट बँक किंवा पूर्व जेरुसलेममध्ये इस्रायली सुरक्षा दलांनी हिंसाचार केल्यावर प्रतिसाद म्हणून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली.

युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सचे ज्येष्ठ फेलो आणि मध्यपूर्वेतील तज्ज्ञ ह्यू लोव्हेट म्हणतात की, "ही केवळ लष्करी चळवळ किंवा एक राजकीय चळवळ नाहीये, ती एक विचारधारा आहे."

"ती विचारधारा नष्ट होऊ शकत नाही, इस्रायली शस्त्रांनी तर नाहीच नाही."

डॉ. अमजद अबू एल एज हे वेस्ट बँक येथील अरब अमेरिकन विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक आहेत. ते सांगतात की, बरेच पॅलेस्टिनी हमासचे समर्थन करतात कारण त्यांना स्वतःचे भविष्य दिसत नाही.

पंतप्रधान नेतन्याहू यांनी आपल्या कारकिर्दीचा बहुतांश काळ पॅलेस्टिनी राज्याच्या निर्मितीला विरोध करण्यात घालवला आहे. या परिस्थितीसाठी त्यांनी सुरक्षा आणि हमासने इस्रायलला मान्यता न देणं या दोन गोष्टींना जबाबदार धरलं आहे. परंतु त्यांच्या पक्षातील लिकुड आणि त्यांच्या सरकारमधील त्यांच्या अति-उजव्या मित्र पक्षातील अनेकांचा असा विश्वास आहे की, वेस्ट बँक आणि गाझा पट्टी इस्रायलची आहे.

इस्रायली कार्यकर्ता गट पीस नाऊच्या मते, गेल्या वर्षी इस्रायली सरकारने वेस्ट बँकमधील इस्रायली वसाहतींसाठी विक्रमी संख्येने घरं बांधणीला मंजूरी दिली.

2023 मध्ये, इस्रायली सैन्य आणि इस्रायली स्थायिकांनी वेस्ट बँकमध्ये किमान 507 पॅलेस्टिनींना ठार केलं. मृतांमध्ये सुमारे 81 मुलांचा समावेश होता.

युनायटेड नेशन्स ऑफिस फॉर द कोऑर्डिनेशन ऑफ ह्युमॅनिटेरियन अफेअर्सने 2005 पासून या मृत्यूची नोंद ठेवण्यास सुरुवात केली.

यातील 2023 हे वर्ष पॅलेस्टिनींसाठी सर्वात घातक वर्ष ठरलंय.

वेस्ट बँकमधून जे पॅलेस्टिनी हल्ले झाले त्यात 36 इस्रायली लोकांच्या मृत्यूची नोंद आहे.

पॅलेस्टिनी प्राधिकरणावर (पीए) देखील फतहचे वर्चस्व आहे. वेस्ट बँकेच्या काही भागांवर यांचं राज्य आहे. अनेक पॅलेस्टिनी लोक पीएला भ्रष्ट आणि कमकुवत मानतात.

डॉ. अबू एल एज सांगतात की, 7 ऑक्टोबरपूर्वी गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनींना ते एका मोठ्या तुरुंगात राहत असल्यासारखं वाटत होतं.

त्यांचं म्हणणं होतं की, वेस्ट बँकमध्ये राहणारे लोक ज्यू लोकांचे हल्ले, जमिनीवर कब्जा आणि नोकऱ्यांचा अभाव यामुळे संतप्त होते.

पॅलेस्टिनी समाजात तरुणांचे प्रमाण जास्त असून या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी इतर पक्षांकडे काहीच नसल्याचं ते सांगतात.

ते सांगतात, "जोपर्यंत दडपशाही सुरू आहे, जोपर्यंत हत्या होत आहेत, तोपर्यंत बरेच लोक हमासचं सगळं ऐकतील. कारण ते एका आशेच्या शोधात आहेत."

हमासला मिळणारा पाठिंबा कमी होतोय की वाढतोय?

7 ऑक्टोबरच्या घटनेनंतर गाझामधील पॅलेस्टिनींना मोठी किंमत मोजावी लागली.

2023 च्या शेवटी केलेल्या सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की पॅलेस्टिनी लोकांनी हमासला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे.

वेस्ट बँकमधील 750 पॅलेस्टिनी आणि गाझामधील 481 पॅलेस्टिनी यांच्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार, वेस्ट बँकमधून हमासला मिळणारा पाठिंबा सप्टेंबरमध्ये 12 टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये 42 टक्क्यांवर पोहोचला.

वेस्ट बँक-आधारित पॅलेस्टाईन सेंटर फॉर पॉलिसी अँड सर्व्हे रिसर्चचे डॉ. खलील शिकाकी सांगतात की, सामान्यतः लढाई दरम्यान हमासला मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढ होते , परंतु ही वाढ 'नाट्यमय' होती.

नोव्हेंबरमध्ये जेव्हा सर्वेक्षण सुरू झालं तेव्हा हमास आणि इस्रायलमधील युद्धविरामादरम्यान पॅलेस्टिनी महिला आणि मुलांना इस्रायली तुरुंगातून सोडण्यात येत होतं.

ते सांगतात की, काहींनी याकडे पाहताना, पॅलेस्टिनी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हमासच्या हिंसाचाराचा अत्यंत प्रभावी वापर म्हणून पाहिलं.

डॉ. शिकाकी म्हणतात की, इस्रायली नागरिकांवरील हल्ल्यांमुळे आणि युद्धाला पीएचा जो प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे देखील हमासला पाठिंबा मिळाला

मात्र, गाझा मधील चित्र वेगळंच होतं. तिथे हमासच्या समर्थनात 38 टक्क्यांवरून 42 टक्क्यांपर्यंत इतकी थोडीशीच वाढ झाली.

हमासचा 7 ऑक्टोबरचा हल्ला योग्य होता असं गाझामधील फारच कमी लोकांना वाटतं. 57 टक्के लोकांनी या हल्ल्याचे समर्थन केलं, तर वेस्ट बँकमध्ये हीच संख्या 82 टक्के होती.

डॉ. शिकाकी म्हणतात, "यावरून हे स्पष्टपणे दिसून येतं की, हमासच्या निर्णयांमुळे जे लोक युद्धाला सामोरे गेले तेच हमासचे मोठे टीकाकार होते."

बीबीसीच्या पत्रकारांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत गाझामधून वार्तांकन केलं होतं. अलीकडच्या काही महिन्यांत हमासबद्दल वाढता असंतोष आणि निराशा दिसून आली आहे.

या पत्रकारांनी गाझातील काही लोकांशी संवाद साधला. यात त्यांनी आपल्या प्रियजनांचा मृत्यू, इस्रायली सुरक्षा दलांनी घरांची केलेली नासधूस आणि उपासमार अशा गोष्टी सांगितल्या. आणि हीच हमासविरुद्धच्या संतापाची कारणं होती.

शिवाय हमासवर जाहीरपणे टीका केल्याने देखील चिंतेत भर पडत असल्याचं त्यांनी सांगितलं.

सैनिकांची नवीन पिढी

डॉ. अबू एल एज यांच्या मते, गाझामधील अनेक तरुणांमध्ये आता इस्रायल विरोधात द्वेष भरलेला आहे.

ते सांगतात, "मला वाटतं की भविष्यातील पिढ्या बदला घेण्यासाठी या संघटनांमध्ये सामील होतील, कारण त्यांनी त्यांचं कुटुंब गमावलं आहे, त्यांनी त्यांची मुले, त्यांच्या माता आणि त्यांचे पुत्र गमावलेत."

परंतु कर्नल आयसिन म्हणतात की, हमाससाठी समर्थन निर्माण करताना लष्करी उद्दिष्ट कमी होऊ नयेत.

7 ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वात मोठ्या, सर्वात भयानक आणि क्रूर हल्ल्याची आठवण करून देताना त्या सांगतात की, "ते आधीपासूनच कट्टरपंथी आहेत."

"त्यामुळे त्यांची विचारधारा वाईट नाही तर आधीपासूनच वाईट आहे."

मात्र, डॉ. शिकाकी म्हणतात, "मात्र एखाद्या मोठ्या युद्धामुळे तरुण शस्त्र उचलतील असं नाही. कदाचित येणाऱ्या काळात शांतताही निर्माण होईल."

उद्या नंतर काय ?

नेतान्याहू यांनी युद्धोत्तर योजना आखली आहे. यानुसार गाझाचा जो भाग हमासकडून काढून घेण्यात आलाय त्यावर इस्रायल अनिश्चित काळासाठी नियंत्रण ठेवणार आहे.

या योजनेनुसार, असे पॅलेस्टिनी ज्यांचा इस्रायलशी शत्रुत्व असलेल्या गटांशी संबंध नाही ते लोक या क्षेत्रावर नियंत्रण ठेवतील.

कर्नल आयसिन सांगतात की, हमासचं नेहमीच काहीतरी सुरू असतं. पण इस्रायल त्यांच्यापैकी बहुतेकांकडून निर्माण होणारा धोका नष्ट करू शकेल.

लोव्हेट म्हणतात की, "जर एखाद्याला खरोखरच हमासला शक्तिहीन करायचं असेल तर व्यवहार्य राजकीय मार्ग तयार करणं हा एकच मार्ग आहे."

परंतु द्विराष्ट्रीय समाधानाची शक्यता अजूनही अंध:कारमय आहे.

नेतन्याहू यांनी अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटलंय की, आता जॉर्डनच्या पश्चिमेकडे असणाऱ्या संपूर्ण क्षेत्रावर इस्रायली सुरक्षा नियंत्रण राहील. याबाबत आम्ही अजिबात तडजोड करणार नाही.

आणि इस्रायलचं हे म्हणणं त्याच्या मुख्य सहयोगी अमेरिकेच्या तत्वाच्या अगदी विरोधी आहे. कारण अमेरिकेचं म्हणणं आहे की, इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्षावर कायमस्वरुपी तोडगा केवळ प्रादेशिक दृष्टिकोनातूनच निघू शकतो. आणि यात पॅलेस्टाईन राज्याचा देखील समावेश आहे.

इस्रायलने गाझावर अनिश्चित काळासाठी ताबा ठेवू नये यावर जो बायडन प्रशासनाने भर दिला आहे. यथास्थिती टिकवून ठेवण्यासाठी हा पर्याय असला तरी भविष्यात यामुळे हिंसाचार वाढण्याचा धोका आहे.

बिन्नी म्हणतात, "मला इस्रायलींसाठी कोणताही विजय दिसत नाही."

ते म्हणतात, "तुम्ही भलेही हमासला मोठ्या प्रमाणावर बदनाम करु शकता, पण यानंतरही हमासचा जो उदय होतोय त्याला तुम्ही कसं रोखणार?"

हेही वाचलंत का?