समोर इस्रायली सैन्याचा रणगाडा, वाहनात मृतदेह; 6 वर्षांची चिमुकली मागत होती मदत

    • Author, लुसी विल्यमसन
    • Role, बीबीसी न्यूज

गाझा शहरावर इस्रायली सैन्याने मोठा हल्ला चढवला होता. यात एक सहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्यामुळे गाझामधील मानवतावादी संकटाबाबत चर्चेला उधाण आलं.

ही मुलगी बेपत्ता होण्यापूर्वी तिने पॅलेस्टाईनमधील रेड क्रेसेंटच्या मदत केंद्राला फोन केला होता.

ती सहा वर्षांची मुलगी घाबरलेल्या स्वरात म्हणाली, "माझ्या शेजारी लष्कराचा टँक आहे आणि तो हलतोय."

मदत केंद्रावर असलेल्या राणाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवत शांतपणे विचारलं, "तो खूप जवळ आहे का?"

मुलगी म्हणाली, "खूप जवळ आहे. मला खूप भीती वाटते. तू येऊन मला वाचवशील का?"

फोनवरचं संभाषण लांबवण्याशिवाय राणा काहीच करू शकत नव्हता.

सहा वर्षांची हिंद रजब इस्रायलने गाझा शहरावर केलेल्या हल्ल्यात अडकली होती.

तिच्या काकांच्या गाडीत नातेवाईकांच्या निष्प्राण देहासमोर ती मदतीची याचना करत होती.

इस्रायली सैन्याच्या गराड्यात अडकलेलं कुटुंब

इस्रायली सैन्याने गाझा शहराच्या पश्चिम भागातील लोकांना किनारपट्टीच्या रस्त्याने दक्षिणेकडे जाण्याचे आदेश दिल्यानंतर हिंद रजबने आपल्या काका, काकू आणि त्यांच्या पाच मुलांसह गाझा शहरातून पळ काढला.

हिंदची आई विसम यांनी त्यांच्या भागात झालेल्या क्रूर हल्ल्यांविषयी सांगितलं, "आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला तिथून कसं तरी बाहेर पडायचं होतं."

इस्रायलचे हवाई हल्ले टाळण्यासाठी ते एका भागातून दुसऱ्या भागात जात असल्याचे त्यांनी सांगितलं.

त्यांनी गाझा शहराच्या पूर्वेकडील अहली रुग्णालयात आश्रय घेण्याचा निर्णय घेतला.

विसम आणि त्यांच्या मोठ्या मुलांनी चालत जायचं ठरवलं. हिंद रजबला तिच्या काकांच्या गाडीतून पुढे पाठवायचं ठरलं.

विसम सांगतात, "त्या दिवशीही थंडी होती. पाऊस पडला होता म्हणून मी हिंदला गाडीतून जायला सांगितलं."

पण गाडी पुढे जाताच त्याच दिशेने जोरदार गोळीबाराचा आवाज आला.

हिंदच्या काकांची गाडी शहरातील प्रसिद्ध अल-अजहर विद्यापीठाच्या दिशेने निघाली. पण, चुकून ते इस्रायली रणगाड्याच्या हल्ल्यात अडकले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी जवळच्या पेट्रोल स्टेशनवर धाव घेतली, पण तिथेही आग लागली होती.

'मला भीती वाटते, कोणीतरी येऊन मला घेऊन जाईल'

कुटुंबीयांनी इतर नातेवाईकांना मदतीसाठी बोलावलं. त्यांच्यापैकी एकाने वेस्ट बँकमध्ये 50 मैल दूर पॅलेस्टिनी रेड क्रिसेंटच्या मुख्यालयातील आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला.

स्थानिक वेळेनुसार पहाटे 2.30 च्या सुमारास रामल्ला येथील रेड क्रेसेंट कॉल सेंटरने हिंदच्या काकांच्या मोबाईलवर फोन केला. त्यांची 15 वर्षांची मुलगी लयान हिने तो फोन उचलला.

रेकॉर्ड झालेल्या फोन कॉलमध्ये लयान रेड क्रेसेंटला सांगत होती की, तिच्या आई-वडिलांचा आणि भावंडांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या गाडीच्या शेजारी एक टँकर असल्याचं तिने सांगितलं. ती बोलत असतानाच जोरदार गोळीबार सुरू झाला.

रेड क्रेसेंटच्या सदस्यांनी त्या फोन नंबरवर पुन्हा फोन केला असता हिंदने फोन उचलला. तिचा आवाज ऐकू येत नव्हता. पण ती घाबरली असल्याचं तिच्या आवाजावरून स्पष्ट समजत होतं.

तिने फोनवर सांगितलं की ती एकटीच वाचली आहे. ती फोनवर बोलत असताना देखील गोळीबार सुरूच होता.

राणाने तिला सांगितलं की, "तू गाडीच्या सीटखाली लपून रहा म्हणजे तुला कोणी पाहणार नाही."

राणा फोनवर बोलून हिंदला प्रोत्साहन देत होता. त्यावेळी रेड क्रेसेंटच्या सदस्यांनी इस्रायली सैन्याला त्यांच्या रुग्णवाहिकेला या भागात जाण्यास परवानगी द्या म्हणून सांगितलं.

"हिंद घाबरली होती, तिला वेदना होत होत्या. ती मदतीची याचना करत होती.'' राणाला हिंदसोबत केलेलं सर्व संभाषण आठवलं.

ती सांगत होती की, "तिचे सर्व नातेवाईक मरण पावले आहेत."

पण तिला धीर देण्यासाठी राणाने तिला सांगितलं की ते सगळे झोपले आहेत. त्यांना उठवू नकोस, त्यांना झोपू दे.

ती म्हणत होती, "कोणीतरी येऊन मला घेऊन जा. इथे अंधार पडू लागलाय. मला भीती वाटते आहे. आमचं घर अजून किती लांब आहे?"

राणाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मी हतबल होतो, मला काहीच करता येत नव्हतं."

फोन ठेवल्यानंतर तीन तासांनी एक रुग्णवाहिका हिंदला वाचवण्यासाठी रवाना करण्यात आली.

त्याचवेळी रेड क्रेसेंटची टीम हिंदच्या आई विसम यांच्याकडे पोहोचली आणि त्यांनी हिंदशी फोन जोडून दिला. आईचा आवाज ऐकताच हिंद मोठमोठ्याने रडू लागली.

रुग्णवाहिका मदतीला गेली, पण हिंद बेपत्ता होती...

विसम यांनी बीबीसीला सांगितलं की, "हिंद मला सांगत होती की आई फोन ठेऊ नकोस. मी तिच्यासोबत कुराण वाचून तिला भीतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही एकत्र प्रार्थना केली. हिंदने मी सांगितलेल्या प्रत्येक शब्दाची पुनरावृत्ती केली."

रुग्णवाहिका कर्मचारी युसूफ आणि अहमद त्याठिकाणी पोहोचले तेव्हा अंधार पडला होता. हिंद ज्याठिकाणी होती तिथेच जवळ ते पोहोचले होते.

इस्त्रायली सैन्याने या भागात प्रवेश करण्यासाठी मनाई केली होती.

त्यानंतर त्यांनी सहा वर्षाच्या हिंदकडे पोहोचल्यावर फोन ठेवला.

हिंदचे आजोबा बहा हमदा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "हिंदची आई काही तास तिच्याशी बोलत होती. त्यानंतर तिला गाडी उघडण्याचा आवाज आला. यावेळी हिंदने सांगितलं की तिच्यापासून काही अंतरावर एक रुग्णवाहिका थांबली आहे."

हिंदची आई सांगत होती, "माझं हृदय प्रत्येक सेकंदाला तुटत होतं."

"जेव्हा जेव्हा मी रुग्णवाहिकेचा आवाज ऐकते तेव्हा मला वाटतं हिंद आली आहे. जेव्हा एखादा बॉम्ब, बंदुकीची गोळी, क्षेपणास्त्र डागण्याचा आवाज येतो तेव्हा मला वाटतं हे माझ्या मुलीकडे तर जात नाहीये ना?"

गाझामधील रेड क्रेसेंटचे सदस्य किंवा हिंदचे कुटुंब इस्त्रायली सैन्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या सक्रिय लढाऊ क्षेत्रापर्यंत पोहोचलेले नाहीत.

कॉल ऑपरेटर राणा सांगतो, "ती अतिशय भयाण रात्र होती. मला सतत हिंदचा आवाज ऐकू येत होता. मला कोणीतरी घेऊन जा ही तिची विनवणी ऐकू येत होती."

राणाने सांगितलं की,"आम्ही इस्रायली सैन्याला त्या दिवशी केलेल्या कारवाईचा तपशील विचारला. तिला सोडवण्यासाठी पाठवलेल्या रुग्णवाहिकेबद्दल आणि हिंदच्या बेपत्ता होण्याबद्दल विचारपूस केली. 24 तासांनंतर पुन्हा चौकशी केली. त्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही अजूनही तपास करत आहोत."

हिंदची आई विसम विचारते की, "आता आंतरराष्ट्रीय न्यायालये कुठे आहेत? त्यांनी अजून न्याय का दिला नाही? देशांचे राष्ट्राध्यक्ष खुर्च्यांवर बसून काय करत आहेत?"

मुलगी बेपत्ता झाल्यापासून विसम अहली रुग्णालयात येत आहे. आपली मुलगी कोणत्याही क्षणी येऊ शकते या आशेने ती दाराकडे डोळे लावून बसली आहे.