'माझा लष्करप्रमुख फील्ड मार्शल झाला, आपण जिंकलो' ; भारतीय लष्करप्रमुखांच्या या वक्तव्याची चर्चा का?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाबद्दल भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

फोटो स्रोत, MONEY SHARMA/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाबद्दल भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे 2025 मध्ये झालेल्या संघर्षाबद्दल भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सविस्तर भाष्य केलं आहे.

4 ऑगस्टला आयआयटी मद्रासमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर: दहशतवादाविरुद्ध भारताच्या लढाईतील एक नवे प्रकरण' या विषयावर भाषण केले.

यावेळी त्यांनी 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तराची रणनिती कशी आखली याचीही माहिती दिली.

या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हीडिओ भारतीय लष्कराच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर शनिवारी अपलोड करण्यात आला.

दरम्यान, याआधी शनिवारी (9 ऑगस्ट) भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी भारत–पाकिस्तान संघर्षात भारतीय वायुसेनेने पाकिस्तानचे 'पाच लढाऊ विमानं आणि एक मोठे विमान' पाडले होते, असा दावा केला होता.

दुसरीकडे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी "एकही पाकिस्तानी विमान लक्ष्य केले गेले नाही आणि पाडले गेले नाही," असं म्हणत हा दावा फेटाळला.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सांगितले होते की, 6–7 मेच्या रात्री भारतीय लष्करानं पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. त्यानंतर दोन्ही देशांत संघर्षाला सुरुवात झाली होती.

10 मे रोजी युद्धविरामाच्या सहमतीनंतर दोन्ही देशांमधील गोळीबार थांबला. त्यावेळी पाकिस्तानने भारताची 'पाच लढाऊ विमानं पाडली' असा दावा केला होता. हा दावा भारताने पूर्णपणे फेटाळला होता.

लष्करप्रमुखांनी सांगितली पहलगाम हल्ल्यानंतरची टाईमलाईन

भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूर'वर याआधीही टीव्हीवर आणि संसदेत चर्चा झाली आहे, पण तंत्रज्ञानाचा वापर आणि याबाबतचा घटनाक्रम समजून घेणेही गरजेचे आहे.

22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी 23 एप्रिलला संरक्षणमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही लष्करप्रमुखांची बैठक झाली, असं त्यांनी सांगितलं.

23 एप्रिलला संरक्षणमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही लष्करप्रमुखांची बैठक झाली.

फोटो स्रोत, @SPOKESPERSONMOD/X

फोटो कॅप्शन, 23 एप्रिलला संरक्षणमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही लष्करप्रमुखांची बैठक झाली.

ते पुढे म्हणाले, "हे पहिल्यांदाच झालं की, संरक्षण मंत्री 'आता पुरे झाले' म्हटले. तिन्ही लष्करप्रमुखांना काहीतरी करणे आवश्यक आहे हे स्पष्ट होते आणि आम्हाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले गेले. म्हणजे, काय करायचे ते तुम्ही ठरवा. हीच ती राजकीय दिशा आणि स्पष्टता होती जी आम्ही पहिल्यांदा पाहिली. त्यानं फरक घडवून आणला."

25 एप्रिलला नॉर्दर्न कमांडमध्ये योजना अंतिम केल्या गेल्या आणि 9 पैकी 7 ठिकाणं नष्ट केले गेले.

'ऑपरेशन सिंदूर' नावाची गोष्ट

जनरल द्विवेदी म्हणाले, "जेव्हा मला सांगितले गेले की ऑपरेशनचे नाव 'सिंधु' असेल, तेव्हा मला वाटलं की, सिंधू नदीबद्दल आहे. मी म्हटलं, उत्तम आहे. त्यांनी सांगितले, नाही. हे 'ऑपरेशन सिंदूर' आहे. पाहा, केवळ या नावानेच संपूर्ण देश एकत्र आला."

मागील सैन्य कारवायांच्या तुलनेत यावेळी हल्ला पूर्वीपेक्षा 'जास्त व्यापक' होता.

लष्करप्रमुखांच्या मते, "हे पहिल्यांदाच झाले की आम्ही त्यांच्या 'हार्टलँड'वर प्रहार केला आणि आमचे लक्ष्य होते 'नर्सरी' आणि तिचे प्रमुख. असे याआधी कधीच झाले नव्हते आणि पाकिस्तानलाही अपेक्षा नव्हती की, त्यांच्या 'हार्टलँड'वर हल्ला होईल. हे त्यांच्यासाठी धक्कादायक होते."

'माझा लष्करप्रमुख फील्ड मार्शल झाला आहे'

ते म्हणाले, "नॅरेटिव्ह मॅनेजमेंट ही गोष्ट आम्ही मोठ्या प्रमाणावर समजून घेतली. कारण विजय हा मनात असतो, कायम मनात राहतो. जर तुम्ही एखाद्या पाकिस्तानीला विचारले की, तुम्ही जिंकलात की हरलात, तर तो म्हणेल 'माझा लष्करप्रमुख फील्ड मार्शल झाला आहे. आपण जिंकलो आहोत, म्हणूनच तो फील्ड मार्शल झाला'."

हे वक्तव्य त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या फील्ड मार्शल पदावर नियुक्तीच्या संदर्भात केलं. भारत–पाकिस्तान संघर्षाच्या काहीच दिवसांनी पाकिस्तान सरकारने त्यांना बढती दिली होती.

भारताने आपली गोष्ट आपल्या पद्धतीने मांडली, असंही द्विवेदी यांनी नमूद केलं.

पाकिस्तानने त्यांचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर नियुक्ती केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानने त्यांचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर नियुक्ती केली आहे.

ते म्हणाले, "हा रणनितीवर आधारित संदेश होता, तो खूप महत्त्वाचा होता. त्यामुळेच आम्ही पहिला संदेश दिला ओके, जस्टिस डन. ऑपरेशन सिंदूर'. याचा सर्वाधिक परिणाम झाला."

6–7 मेच्या रात्री जेव्हा भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील कट्टरतावाद्यांच्या तळांना लक्ष्य केले, तेव्हा लगेच भारतीय लष्कराच्या एडीजीपीआयच्या अधिकृत एक्स हँडलवरून एक पोस्ट करून या हल्ल्याची पहिली माहिती देण्यात आली होती. त्या पोस्टचा उल्लेख जनरल द्विवेदी यांनी केला.

'ग्रे झोन'मधली बुद्धिबळ

जनरल द्विवेदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर'च्या रणनीतीची तुलना बुद्धिबळाच्या खेळाशी करत सांगितलं की, या काळात दोन्ही बाजू एकमेकांच्या चाली ओळखून त्याविरोधात काम सुरू होतं. या ऑपरेशननं त्यांना 'ग्रे झोन'चं महत्त्व नीट पटवून दिलं.

ते म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही बुद्धिबळ खेळलो. याचा अर्थ असा की, आम्हाला माहीत नव्हतं की, शत्रू पुढे काय करणार आणि आम्ही काय करणार. यालाच आम्ही 'ग्रे झोन' म्हणतो."

भारत–पाकिस्तान संघर्षाच्या काळात अनेक दावे समोर आले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारत–पाकिस्तान संघर्षाच्या काळात अनेक दावे समोर आले.

"दोन्ही बाजू बुद्धिबळाच्या चाली खेळत होत्या. कुठे आम्ही त्यांना चेकमेट देत होतो, कुठे आम्ही स्वतःचं नुकसान होण्याचा धोका असतानाही त्यांना मारण्यासाठी पुढे सरकत होतो. पण आयुष्याचा खेळ असाच असतो," असंही त्यांनी नमूद केलं.

भारत–पाकिस्तान संघर्षाचे दावे

7 ते 10 मे दरम्यान झालेल्या भारत–पाकिस्तान संघर्षाच्या काळात अनेक दावे समोर आले.

पाकिस्तानने दावा केला होता की, या संघर्षात भारताची "पाच लढाऊ विमानं पाडली" गेली.

31 मे रोजी भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांना पाकिस्तानच्या या दाव्याबद्दल विचारले असता त्यांनी म्हटले, 'हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.'

ते पुढे म्हणाले, "पण ही माहिती अजिबात महत्त्वाची नाही. महत्त्वाचे हे आहे की, जेट का पडले आणि त्यानंतर आपण काय केले. हेच आपल्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे."

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही दावा केला होता की, भारत–पाकिस्तान संघर्षात "पाच लढाऊ विमानं पाडली गेली".

मात्र, ट्रम्प यांनी कोणत्या देशाची किती विमानं पडली हे सांगितलं नव्हतं.

ट्रम्प अनेकदा सांगत होते की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन आण्विक शस्त्रसज्ज देशांमधील संघर्ष थांबवला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत–पाकिस्तान संघर्षाच्या वेळी 'मध्यस्थी'चा दावा संसदेत फेटाळून लावला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)