'ऑपरेशन सिंदूर'वर पंतप्रधान मोदींचे दोन तास भाषण, तरीही मिळाली नाही 'या' प्रश्नांची थेट उत्तरे

फोटो स्रोत, SANSAD TV
- Author, अंशुल सिंह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मंगळवारचा (29 जुलै) दिवस संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी वादळी ठरला. 'ऑपरेशन सिंदूर'वरील चर्चेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधक आमनेसामने आले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक सदस्यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. विरोधकांच्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदी यांनी सुमारे दोन तास भाषण केलं.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाच्या वेळी शस्त्रसंधीबाबत 'मध्यस्थी' केल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे.
संसदेत 'ऑपरेशन सिंदूर'वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भारताने कधीही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी स्वीकारलेली नाही आणि पुढेही कधी मान्य करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.
ट्रम्प यांनी अनेक वेळा 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीमध्ये त्यांनी भूमिका बजावली असल्याचं म्हटलं आहे.
केंद्र सरकारने यापूर्वीही ट्रम्प यांचे दावे फेटाळले होते, आणि आता पंतप्रधान मोदींनीही संसदेत ट्रम्प यांचं नाव न घेता हे दावे निराधार असल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सुमारे दोन तास भाषण केलं. त्यांच्या भाषणादरम्यान विरोधी पक्षाचे खासदार वारंवार त्यांना प्रश्न विचारत होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान 9 मेच्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "9 मेच्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष एक तासापासून माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. नंतर मी त्यांना फोन केला आणि सांगितलं की, तुमचा तीन-चार वेळा कॉल आला होता.
तेव्हा ते म्हणाले की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यावर मी त्यांना स्पष्ट सांगितलं, जर पाकिस्तानने असा काही प्रयत्न केला, तर त्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. आम्ही त्याहून मोठा हल्ला करू आणि योग्य ते प्रत्युत्तर देऊ."
विरोधकांचे आरोप अन् मोदींची उत्तरं
विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'मध्यस्थी'च्या दाव्यालाही पंतप्रधान मोदी यांनी प्रत्युत्तर दिलं.
"जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यास सांगितलेलं नाही," असं ते म्हणाले.
याआधी लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्रम्प यांच्या शस्त्रसंधीच्या दाव्यांवर सरकारला घेरलं होतं आणि यावर संसदेत उत्तर देण्याचं आव्हान दिलं होतं.
राहुल गांधी म्हणाले होते, "ट्रम्प यांनी 29 वेळा शस्त्रसंधी घडवून आणल्याचा दावा केला आहे. जर ते खोटं बोलत असतील, तर पंतप्रधान मोदींमध्ये इंदिरा गांधींच्या तुलनेत फक्त 50 टक्के धाडस जरी असेल, तरी सांगावं की, असं काही नव्हतं. जर पंतप्रधानांमध्ये दम असेल, तर त्यांनी ठामपणे सांगावं की ट्रम्प खोटं बोलत आहेत."
ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी म्हणतात की, पंतप्रधान मोदींनी संसदेत आपली बाजू मांडली खरी, पण अजूनही अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं अद्याप तरी मिळालेली नाहीत.
विजय त्रिवेदी सांगतात, "पंतप्रधान मोदींच्या भाषणातून काही प्रश्नांची उत्तरं मिळाली, पण अनेक प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी उलट प्रश्न विचारले गेले.
सरकारकडून याचं समाधानकारक उत्तर मिळालं नाही की, शस्त्रसंधी का करण्यात आली?
पहलगामपासून पुलवामापर्यंत सुरक्षेत ज्या चुका किंवा त्रुटी राहिल्या, त्यावर ना संरक्षण मंत्र्यांकडून, ना गृहमंत्र्यांकडून आणि ना पंतप्रधानांकडून स्पष्ट उत्तर मिळालं."

भारत आणि पाकिस्तानमध्ये 'शस्त्रसंधी' झाल्याची पहिली माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर एक पोस्ट करत भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी दावा केला की, 'रात्रभर सुरू असलेल्या चर्चेमध्ये अमेरिकेने मध्यस्थाची भूमिका बजावली.'
तेव्हापासून ट्रम्प अनेक वेळा म्हणाले आहेत की, त्यांनी भारत-पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडवून आणली.
सोमवारी (28 जुलै) स्कॉटलंडमध्ये ब्रिटिश पंतप्रधान किएर स्टार्मर यांच्याशी भेटीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानसह जगभरात सहा मोठी युद्ध थांबवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असं सांगितलं होतं.
यावर मोदी सरकारने मौन का पाळलं आणि ट्रम्प यांचा हा दावा खरा की खोटा?, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख का नाही?
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात ना अमेरिकेचं नाव घेतलं, ना ट्रम्प यांचा उल्लेख केला.
ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी म्हणतात, "मुत्सद्देगिरीत थेट एखाद्या नेत्याचं नाव घेऊन सरकार बोलत नाही. ट्रम्प हे जगातील सगळ्यात शक्तिशाली देशाचे अध्यक्ष आहेत.
या संपूर्ण चर्चेत सरकारनं चीनचंही नाव घेतलेलं नाही, जो पाकिस्तानच्या बाजूनं युद्ध लढत होता. जेव्हा चीनवर ते काही बोलत नसतील, तर ट्रम्प यांच्यावर कसं बोलतील?"

तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यासाठी सांगितलं नाही. 9 तारखेला रात्री अमेरिकेचे उपाध्यक्ष मला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते.
ते एक तास सतत प्रयत्न करत होते, परंतु मी त्या वेळी लष्कराच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होतो, म्हणून फोन घेऊ शकलो नाही. नंतर मी त्यांना कॉल केला. ते म्हणाले की पाकिस्तान मोठा हल्ला करणार आहे.
मी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की, जर पाकिस्तानचा असा काही विचार असेल, तर त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल."
मोदी सरकार ट्रम्प यांचं नाव घेणं का टाळत आहेत?
कनिका राखरा या कौटिल्य स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्या म्हणतात की, "आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या भारत अनेक अडचणींना सामोरा जात आहे. अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. अशा वेळी ट्रम्प यांच्यासारख्या व्यक्तीचं नाव घेतल्यास भारताची भूमिका कमकुवत होऊ शकते.
परंतु, याचा अर्थ असा नाही की, केंद्र सरकार ट्रम्प यांना योग्य मानत आहे. सध्या भारताला फक्त विनाकारण अडचणी वाढवायच्या नाहीत."
भारताची किती लढाऊ विमानं पाडली?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिन्यात असा दावा केला होता की, मे महिन्यात भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षात 'पाच लढाऊ विमाने पाडण्यात आली होती'.
परंतु, त्यांनी ही विमानं कोणत्या देशाची होती, हे स्पष्ट केलं नव्हतं.
यापूर्वी पाकिस्ताननेही भारताचे 'पाच लढाऊ विमानं पाडल्याचा' दावा केला आहे. भारताने त्यांचा हा दावा फेटाळला आहे.

फोटो स्रोत, Dassault Rafale
ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत प्रश्न विचारले. काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, "अमेरिकेच्या अध्यक्षांनी 26 वेळा सांगितलं आहे की, त्यांनी युद्ध थांबवलं. ट्रम्प म्हणाले की पाच-सहा विमानं पाडली गेली. तुम्ही सांगा, नक्की किती विमानं पाडली?"
लोकसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रश्नावर उत्तर देताना भारतीय लष्कराचं कौतुक केलं आणि म्हणाले, "काही विरोधी सदस्य विचारत आहेत की किती विमानं पाडली गेली. मला वाटतं की, हा प्रश्न राष्ट्रीय भावनेनुसार नाही. त्यांनी हे विचारलं नाही की, आपण शत्रूंची किती विमानं पाडली."
काँग्रेसने याआधीही केंद्र सरकारकडे 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताची किती लढाऊ विमानं पडली होती, हे स्पष्ट करण्याची मागणी केली होती. परंतु, आजवर पंतप्रधान मोदी किंवा केंद्र सरकारने या प्रश्नाचं थेट उत्तर दिलेलं नाही.
भारतापेक्षा पाकिस्तानच्या बाजूने अधिक देश का आहेत?
भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात तुर्कस्थान, अझरबैजान आणि चीन यांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. याउलट, भारताच्या बाजूने केवळ इस्रायल स्पष्टपणे उभा राहिला. इतकंच नाही तर, रशियानेही भारताला उघड पाठिंबा दिला नाही.
यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "जगातील कोणत्याही देशाने भारताला स्वतःच्या सुरक्षेसाठी केलेली कारवाई थांबवण्यापासून रोखलं नाही किंवा थांबण्यास सांगितलं नाही.
संयुक्त राष्ट्रांत 193 देश आहेत आणि त्यापैकी फक्त तीन देशांनी ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या समर्थनात वक्तव्य केलं. क्वाड, ब्रिक्स, फ्रान्स, रशिया आणि जर्मनी तुम्ही कुठल्याही देशाचं नाव घ्या, भारताला जगभरातून पाठिंबा मिळाला होता."
या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (28 जुलै) संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.
ते म्हणाले, "परराष्ट्रमंत्र्यांनी भाषणात असं सांगितलं की, सर्व देशांनी दहशतवादाचा निषेध केला, हे अगदी बरोबर आहे. पण त्यांनी हे सांगितलं नाही की, पहलगाम हल्ल्यानंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध का नाही केला. याचा अर्थ काय?
याचा अर्थ असा आहे की, जग आपल्याला आणि पाकिस्तानला एकाच रांगेत ठेवत आहे. जेव्हा यूपीए सरकार होतं, तेव्हा वेगवेगळ्या देशांनी पाकिस्तानवर दहशतवादाच्या मुद्द्यावरून टीका केली होती.
पहलगाम हल्ल्यामागे ज्याचा हात होता ते जनरल मुनीर ट्रम्प यांच्यासोबत लंच करत आहे. आपले पंतप्रधान तिथं जाऊ शकत नाहीत, पण जनरल मुनीर लंच करत आहेत."
या संदर्भात कनिका राखरा म्हणतात, "प्रत्येक देश आपल्या हिताचा विचार करूनच भारताला पाठिंबा देईल, कारण त्यांनाही जागतिक व्यवस्थेचा विचार करावा लागतो.
बऱ्याच देशांनी भारतावर टीका किंवा निषेध केलेला नाही, आणि हाच भारताला अप्रत्यक्षपणे मिळालेला पाठिंबा किंवा समर्थन समजावं. ही खूप मोठी गोष्ट आहे."
पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळावं का?
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) नेते असदुद्दीन ओवैसी यांनी संसदेत 'ऑपरेशन सिंदूर'वर खास चर्चे दरम्यान प्रश्न उपस्थित केला की, पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली होती, तर मग आता 14 सप्टेंबरला आशिया कपमध्ये भारताची टीम पाकिस्तानविरुद्ध कशी खेळेल?
ओवैसी म्हणाले, "पाकिस्तानसोबत व्यापार बंद आहे. त्यांच्या विमानांना भारतात येण्याची परवानगी नाही. त्यांची जहाजं आपल्या जलक्षेत्रात येऊ शकत नाहीत. मग तुमचा विवेक का जागा होत नाही? अशा परिस्थितीत तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट कसा खेळू शकता?"

भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आशियाई क्रिकेट परिषदेने (एसीसी) नुकताच आशिया कप 2025 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे.
दोन्ही संघांमधील पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. जर हे दोन्ही संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचले, तर आणखी दोन सामने होऊ शकतात.
ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी यांनीही या विषयावर प्रश्न उपस्थित केला.
त्यांनी म्हटलं की, "दोन देशातील संबंध थांबवले असताना आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळतोय? आपण म्हणतो व्यापार आणि दहशतवाद एकत्र नाही चालणार, चर्चा आणि व्यापार एकत्र नाही चालणार, रक्त आणि पाणी एकत्र नाही वाहणार. मग खेळ आणि रक्त एकत्र कसं चालणार? सरकार यावर अजून स्पष्ट उत्तर का देत नाही?", असा सवालही त्यांनी केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)













