'आजचं काम संपलं, आता घरी जा' - ऑफिसची वेळ संपल्यावर असा मेसेज झळकतो तेव्हा

    • Author, शेरिलन मोलान
    • Role, बीबीसी न्यूज

21 वर्षांची तन्वी खंडेलवाल आपल्या कंपनीत काम करत असताना एक रंगाीबेरंगी सूचना कम्प्युटर स्क्रीनवर आल्यामुळे आश्चर्यचकित झाली.

ही सूचना स्क्रीनवर झळकत होती, 'तुमचं शिफ्ट टाइमिंग संपलं आहे. तुमची ऑफिसची सिस्टम 10 मिनिटात बंद होईल. कृपया घरी जा...'

तन्वी काही दिवसांपूर्वीच या कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागात रूजू झाली होती. तिला हे समजलं की कंपनीकडून हा मेसेज सादर करण्यात आला आहे. वेळ संपल्यावर घरी जाण्यासाठी अशी सूचना देण्यात आली होती.

तन्वी मध्य प्रदेशातील इंदौर या ठिकाणी सॉफ्ट ग्रिड कम्प्युटर्स या स्टार्ट-अप मध्ये काम करते. सॉफ्ट ग्रिडची 40 जणांच्या टीमपैकी ती एक आहे. शिफ्ट संपायच्या बरोबर 10 मिनिटं आधी कम्प्युटर स्क्रीनवर एक मेसेज झळकतो. हा मेसेज शिफ्ट संपवण्यासंबंधी असतो. आणि समजा तुम्ही तुमचं काम आटोपलं नाही तर 10 मिनिटानंतर ती सिस्टम आपोआप बंद होते. त्यामुळे तुम्हाला वेळेहून अधिक थांबताच येत नाही.

थोडं आश्चर्य वाटलं ना असं का होतं म्हणून...

पण यामागचं कारण या कंपनीच्या सह-संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता शुक्ला यांनी सांगितले. श्वेता सांगतात की कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि कार्यालयीन आयुष्यात संतुलन राहावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

'कोरोनाच्या काळात बिघडलं वर्क-लाइफ बॅलन्स'

त्या पुढे सांगतात की "कोरोनाच्या काळात आपल्या कार्यालयीन कामाचं आणि वैयक्तिक आयुष्याचं संतुलन बिघडलं होतं. त्या काळात मी माझ्या बाळासाठी देखील वेळ काढू शकत नव्हते."

श्वेता यांच्या व्यावसायिक भागीदारांना देखील या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी असे सॉफ्टवेअर तयार केले ज्यामध्ये कामाची वेळ संपत आली असताना एक मेसेज येईल आणि वेळ पूर्ण झाल्यावर सिस्टम बंद पडेल.

सहा महिन्यांखाली सर्व सिस्टम्समध्ये हे सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यात आले होते.

"आम्ही हे वीकएंडला करून पाहिलं. आम्हाला पाहायचं होतं की कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर काय भाव उमटतात. पण बऱ्याच जणांना असं वाटलं की हा एखादा प्रॅंकच आहे. तर काहींना वाटलं की त्यांचे कम्प्युटर कुणीतरी हॅक केले," श्वेता सांगतात.

त्या सांगतात की बोरिंग मेमो किंवा इमेल पाठवण्यापेक्षा हे पॉप-अप मला छान वाटतं.

काम संपवून घरी जाण्याची आठवण हा मेसेज करून देतो.

'अशा वातावरणात काम करणं आनंददायी'

तन्वी सांगते की गेल्या कंपनीच्या तुलनेत हा अनुभव वेगळा आहे. कारण वेळेवर निघालं किंवा थोडं वेळेआधी निघालं तरी वेगळ्याच नजरेनी पाहिलं जात होतं.

पण इथं तर वेळेत घरी जा सांगितलं जातं हा चांगला अनुभव आहे.

तन्वीने या नव्या उपक्रमाबद्दल आपल्या लिंकडिन अकाउंटवर टाकलं होतं तेव्हा तिने म्हटलं होतं की 'अशा वातावरणात काम केलं की उत्साह सहज येतो, मंडे मोटिव्हेशन किंवा फन फ्रायडे सारख्या गोष्टींची गरजच नाही. तुमचा मुड आपोआप छान राहतो,' तन्वीची पोस्ट व्हायरल झाली.

आतापर्यंत 4 लाखांहून अधिक जणांनी त्याला लाइक केले आणि 7,000 हून अधिक जणांनी त्यावर कंमेट्स केल्या.

अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. पण काही जणांनी मात्र हे कितपत व्यवहार्य आहे याबद्दल प्रश्न देखील विचारले आहेत.

काही जण म्हणतात की यामुळे काम डेडलाईन आधी पूर्ण करण्याचं प्रेशर येऊ शकतं. कामाच्या या काटेकोर धोरणामुळे वीकएंडला देखील काम करावे लागण्याची शक्यता आहे. काहींनी हे विचारलं की समजा काम बाकी आहे आणि जर त्या कर्मचाऱ्याला लॉग ऑफच करता आलं नाही तर?

या सर्वांवर श्वेता यांनी एक उत्तर दिलं. त्या म्हणतात की तुम्ही तुमची सिस्टम रिस्टार्ट करा आणि तुमचं काम पूर्ण करा.

त्या सांगतात हा मेसेज कुणावर सक्तीसाठी नाहीये. केवळ सहकाऱ्यांना हे सांगण्यासाठी आहे की तुमचं आजचं काम संपलं आहे आणि आता तुम्ही घरी जाऊ शकता.

श्वेता सांगतात यामुळे आमचे काही क्लाएंट्स नाराज आहेत, पण आम्ही आमच्या धोरणावर ठाम आहोत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)