12 राज्यांत 239 वेळा निवडणूक लढवणाऱ्या 'इलेक्शन किंग'ची गोष्ट, आतापर्यंत कितीवेळा जिंकलेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सुभाषचंद्र बोस
- Role, बीबीसी तमिळ
भारतात ऐन सणासुदीच्या हंगामात उत्साहाला जेवढं भरतं येतं, अगदी तसंच भरतं येतं निवडणुकीच्या हंगामात. अगदी स्टार उमेदवारांपासून ते अगदी विचित्र उमेदवारांपर्यंत सगळेजण निवडणुकीच्या मैदानात उतरलेले असतात.
वाजतगाजत सुरू असलेला प्रचार, मंचावरील भाषणं, सभा, निवडणूक पत्रिका आदी गोष्टी सुरू असतातच पण सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमातून देखील प्रचार करणं सुरू असतं. थोडक्यात उमेदवारांना कशाचीही पर्वा नसते, त्यांचं फक्त एकच ध्येय असतं ते म्हणजे यश मिळवणं.
पण तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यातील मेत्तूरच्या के. पद्मराजन यांचं ध्येय काहीतरी वेगळंच आहे. त्यांनी 1988 पासून आजपर्यंत 239 निवडणुका लढवल्या आहेत आणि भारतात सर्वाधिक निवडणुका लढवण्याचा विक्रम केला आहे.
पण ही निवडणूक ते लढवतात केवळ पराभवासाठी.
पद्मराजन यांनी 12 राज्यांतील पंचायत, विधानसभा, संसदेपासून ते राष्ट्रपती निवडणुकीपर्यंत विविध मतदारसंघातील निवडणुका लढवल्या आहेत. मात्र आतापर्यंत त्यांना एकही निवडणूक जिंकता आलेली नाही.
भारतात, निवडणुकीसाठी पात्र असलेला कोणीही व्यक्ती देशभरात कुठेही निवडणूक लढवू शकतो, परंतु त्यांना शपथपत्र सादर करणं आवश्यक असतं. यात काही स्थानिक लोक उमेदवाराची हमी देतात.
पद्मराजन अगदी हसत हसत सांगतात की, "खरं सांगायचं तर आणखीन काही निवडणुकांमध्ये पराभव स्वीकारणं माझं ध्येय आहे."
कोणाचीही अशी विचित्र इच्छा असू शकते का? तुमचा विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे.
'इलेक्शन किंग पद्मराजन' या नावाने ओळखले जाणारे पद्मराजन या निवडणुकीच्या मैदानात का आणि कसे उतरले? याविषयीचे अनुभव त्यांनी बीबीसीला सांगितले.
पद्मराजन यांचं शालेय शिक्षण तसं कमीच, त्यामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात सायकल दुकानात कामगार म्हणून केली.
पुढे त्यांनी दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं आणि आज ते इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. मात्र त्यांचा मुख्य व्यवसाय म्हटलं तर आजही ते सायकलचं दुकान चालवतात.
त्यांनी आत्तापर्यंत 239 निवडणुका लढवल्या. पण यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी ते सायकलच्या दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून होते. ते दावा करतात की, त्यांनी दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नातील बचत करत निवडणुकीसाठी एक कोटीपर्यंत खर्च केला आहे.
त्यांनी निवडणुका लढवल्या ही झाली एक बाजू, पण निवडणूक लढवण्याचा विषय त्यांच्या डोक्यात कसा काय आला?

फोटो स्रोत, Getty Images
तर 1988 मध्ये त्याच सायकल दुकानातून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली, असे ते म्हणाले.
सायकलच्या दुकानात बसलेल्या मित्रांना जेव्हा त्यांनी सांगितलं की ते निवडणूक लढवणार आहेत तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांची गंमत करत विचारलं की, सायकल दुकानदार निवडणुकीत उभा राहू शकतो का? या एका वाक्यावर पद्मराजन यांनी पुढील 239 निवडणुका लढवल्या.
अगदी सहजपणे त्यांनी सांगितलं की, "मला माहीत आहे की मी निवडणूक जिंकणार नाही. त्यामुळे पराभवच स्वीकारायचा असेल तर सर्वाधिक पराभव का स्वीकारू नये? त्यामुळेच मी प्रत्येक निवडणूक लढवतो."
मग तुमच्या घरात तुम्हाला कोणी यासाठी आडकाठी केली नाही का? यावर ते सांगतात, घरोघरी मातीच्या चुली. माझ्या घरी देखील यासाठी विरोध झाला पण शेवटी त्यांना माझं म्हणणं समजलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांचा मुलगा आणि एमबीए पदवीधर श्रीजेश यानेही वडिलांबद्दल हेच मत व्यक्त केलं. श्रीजेश सांगतो, "मी शिकत असताना मला माझ्या वडिलांचा राग यायचा. ते हे कशासाठी करतात असा प्रश्न पडायचा."
"पण आता समजू लागलंय की माझ्या वडिलांचं ध्येय नेमकं काय आहे. एखादा सामान्य व्यक्तीही निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा राहू शकतो हे लोकांना समजावं यासाठी ते धडपडत आहेत. त्यानंतर मी त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ लागलो."
निवडणुकीत उभं राहण्यासाठी 'इलेक्शन किंग पद्मराजन' यांचा पैसा तर खर्च झालाच पण बऱ्याचदा त्यांना भीतीही दाखवली गेली.
1991 मध्ये आंध्रप्रदेशातील नंद्याल मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. यावेळी पी. व्ही. नरसिंह राव यांनी या जागेसाठी उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी त्यांच्या विरोधात उभं राहणाऱ्या पद्मराजन यांचं अपहरण करण्यात आल्याचा दावा खुद्द पद्मराजन यांनी केला आहे.
तिथून ते कसेबसे निसटले मात्र निवडणुकीत उभं राहण्याची त्यांची इच्छा काही कमी झाली नाही. त्यानंतर, त्यांनी तामिळनाडूपासून भारतातील महत्त्वाच्या मतदारसंघांपर्यंत 230 हून अधिक निवडणुका लढवल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (वडोदरा 2014) यांच्या पासून ते माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (आसाम 2007, 2013), अटलबिहारी वाजपेयी (लखनौ 2004) आणि पी.व्ही. नरसिंह राव (नंद्याल 1996) यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आहे.
त्याचप्रमाणे त्यांनी माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन, अब्दुल कलाम, प्रतिभाताई पाटील, प्रणव मुखर्जी, राम नाथ कोविंद यांच्यापासून ते आजच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूपर्यंत, विरोधात निवडणूक अर्ज दाखल केले आहेत.
याशिवाय तमिळनाडूतील नेते करुणानिधी, जे. जयललिता, एम. के. स्टालिन, इडाप्पाडी पलानीस्वामी, सिद्धरामय्या, बसवराज टॉमी, कुमारस्वामी, कर्नाटकात येडियुरप्पा, केरळमध्ये पिनाराई विजयन, तेलंगणात चंद्रशेखर राव यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे.
एवढ्या राज्यांत उमेदवारी अर्ज भरल्यावर तिकडे जाऊन प्रचार करता का? या प्रश्नावर पद्मराजन म्हणतात, "तिथे गेल्यावरही मी कोणाकडून मतं मागत नाही."
ते सांगतात की, मी फक्त निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मतदारसंघात जातो. त्यांनी 2019 मध्ये वायनाड मतदारसंघात राहुल गांधींविरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यांना 1887 मते मिळाली.
पण हेच त्यांनी त्यांच्याच मतदारसंघात, मेत्तूरमध्ये निवडणूक लढवली असता त्यांना एकही मत मिळालं नाही. त्यांना आतापर्यंत सर्वाधिक 6273 मतं मिळाली आहेत. 2011 च्या मेत्तूर विधानसभा निवडणुकीत ही मतं त्यांना मिळाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी प्रचार करून लोकांकडून मतं गोळा केली का? या प्रश्नावर ते म्हणतात, ही मतं मला कळत नकळत नोटाऐवजी देण्यात आली असावीत. मात्र मी स्वत: काहीही सांगून मतं मागितली नाहीत.
माझं धोरण निवडणूक हरण्याचं आहे असं ते सांगतात. कारण निवडणुकीत खूप लोक उभे असतात. प्रमुख पक्ष त्यावर करोडो रुपये खर्च करतो. पण तरीही एकच उमेदवार जिंकतो. त्यामुळे मी माझी जिंकण्याची मानसिकता बदलली. अपयश हा एकमेव कायमस्वरूपी विजय असल्याचं ते म्हणतात.
इतकी वर्षं, इतक्या निवडणुका लढवून त्यांनी काही गोष्टी साध्य केल्या आहेत.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या यादीत 'सर्वाधिक निवडणुकीत पराभूत' असा विक्रम त्यांच्या नावावर आहे. तसेच पद्मराजन यांना काही विक्रमी यादीतही स्थान मिळालं आहे.
सर्वाधिक निवडणुका लढवल्याचा विक्रम नावावर करणं हे त्यांचं ध्येय आहे. त्यांनी यासाठी एकदा प्रयत्न केला होता पण तो विक्रम त्यांच्या नावावर झाला नाही.
पण त्यांनी खचून न जाता यावेळी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी धर्मपुरी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. आणि 'इलेक्शन किंग' यावेळीही अपयशी ठरणार याची त्यांना खात्री आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)











