जेव्हा 'रामायणातील सीता' खासदार व्हावी म्हणून नरेंद्र मोदींनी प्रचार केला होता

रामायण मालिकेतील दृश्य

फोटो स्रोत, RAMANAND SAGAR PRODUCTIONS

    • Author, जयदीप वसंत
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राजकारण, व्यवसाय, चित्रपट आणि टेलिव्हिजन जगतातील मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती.

या सगळ्यात अरुण गोविल, सुनील लहरी आणि दीपिका चिखलिया आकर्षणाचे केंद्र ठरले होते. दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या 'रामायण' या मालिकेत त्यांनी राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या भूमिका साकारल्या होत्या.

या सगळ्यांमध्ये दीपिका चिखलिया यांनी मात्र राजकीय फायदा उठवला होता. जेव्हा राम मंदिर आंदोलन शिखरावर होतं, तेव्हा त्यांनी निवडणुकीत उभं राहत बडोद्याच्या राजघराण्यातील सदस्याचा पराभव केला होता. त्यावेळी भाजपच्या एका दिग्गज नेत्याने दीपिका यांचा प्रचार केला होता.

पुढील काही वर्षांत बडोद्याची ही जागा अपवाद वगळता भाजपसाठी 'सुरक्षित जागा' ठरली.

या लोकसभा निवडणुकीत भाजपने रंजनबहेन भट्ट यांना याठिकाणाहून तिकीट दिलंय.

बडोदा आणि भाजप

लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर बडोदा मतदारसंघावर कायम राजघराण्याचंच वर्चस्व राहिलंय. सुमारे दहा निवडणुकांमध्ये 'गायकवाड' घराण्यातील सदस्य काँग्रेसच्या तिकिटावर लढले आहेत.

1980 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भारतीय जनसंघाने राजकीय पटलावर वेगळी ओळख निर्माण केली. आणि भाजप नावाचा नवीन राजकीय पक्ष उदयास आला.

बडोद्याच्या लोकसभेच्या जागेवर राजघराण्यातील रणजितसिंह गायकवाड काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. त्यांच्या विरोधात भाजपने माजी आयपीएस अधिकारी जसपाल सिंह यांना तिकीट दिलं.

1983 साली गुजरातमध्ये अमरसिंह चौधरी यांचं सरकार सत्तेवर होतं. त्यावेळी बडोद्याच्या वार्षिक नरसिंहजी मिरवणुकीला पारंपारिक मार्गाने जाण्याची परवानगी द्यायची की नाही या संभ्रमात सरकार होतं. त्यावेळी जसपाल सिंग यांनी यात्रेला नियमित मार्गावरून नेण्यास परवानगी दिली आणि काही गोंधळ होणार नाही याची खात्री केली.

रातोरात जसपाल सिंग बडोदावासीयांसाठी 'सिंघम' बनले. पण सरकारने त्यांची बदली केली. यावर जसपाल सिंग यांनी राजीनामा दिला. पुढे भाजपच्या तिकिटावर त्यांनी राजघराण्यातील व्यक्ती विरोधात निवडणूक लढवली.

1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभरात काँग्रेस विषयी सहानुभूतीची लाट आली. त्यावेळीच भाजपने पहिली निवडणूक लढवली आणि जसपाल सिंग यांचा पराभव झाला.

नलिन भट्ट मायावतींसाठी प्रचार करताना

फोटो स्रोत, GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, नलिन भट्ट मायावतींसाठी प्रचार करताना
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1989 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काही महत्त्वाच्या घटना घडल्या. भाजपमध्ये संघटनेचे सरचिटणीस म्हणून नरेंद्र मोदींची नियुक्ती करण्यात आली. अहमदाबाद महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या आधारे भाजपला मतांच्या ध्रुवीकरणाचं महत्त्व कळलं. याशिवाय भाजपने राममंदिर उभारणीचा मुद्दा उपस्थित केला.

भाजप आणि चिमणभाई पटेल यांच्या जनता दलाने एकत्र निवडणूक लढवल्या आणि दोघांनाही अनुक्रमे 12 आणि 14 जागा मिळाल्या. युतीने भावनगर, दाहोद आणि मांडवी वगळता सर्व 23 जागा जिंकल्या. भाजपचा स्ट्राइक रेट 100 टक्के होता.

काशीराम राणा (सुरत), चंद्रेश पटेल (जामनगर), सोमाभाई गंडाभाई पटेल (सुरेंद्रनगर), गाभाजी ठाकोर (कपडवंज), शंकरसिंह वाघेला (गांधीनगर), हरिन पाठक (अहमदाबाद) आणि रतीलाल वर्मा (धंडुका-एससी) नेते निवडून आले.

ठरल्यानुसार, बडोद्याची जागा जनता दलाकडे गेली. या जागेवरून प्रकाशभाई ब्रह्मभट यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या समर्थकांमध्ये ते 'कोको' म्हणून प्रसिद्ध होते. मतदान संपण्यापूर्वी त्यांनी बडोद्यातील जवळपास सर्वच भागाततून रॅली काढली, ज्याचा परिणाम निवडणूक निकालांवरही दिसून आला.

रणजित सिंह यांचा पराभव झाला. त्यांना दोन लाख 93 हजार 499 मते मिळाली, तर ब्रह्मभट यांनी 52 हजार 898 मतांची आघाडी मिळवत तीन लाख 46 हजार 397 मतं घेतली.

संस्कारनगरीच्या रणांगणातील 'सीता'

1991 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्तरावर ज्या घटना घडल्या त्याचा परिणाम बडोद्याच्या जागेवरही झाला. तत्कालीन केंद्र सरकारने 'रामायण' आणि 'महाभारत' सारख्या हिंदू-केंद्रित मालिका राज्य प्रसारक दूरदर्शनवर प्रसारित करण्यास परवानगी दिली.

असं म्हणतात की, या मालिका टीव्हीवर सुरू झाल्या की, सगळीकडे

कर्फ्यू लागलाय असं वातावरण निर्माण व्हायचं. बरीच वर्ष सरल्यानंतर जेव्हा 2020 मध्ये देशव्यापी लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हा लोकांच्या मनोरंजनासाठी या मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आल्या.

काही तज्ज्ञांच्या मते, या मालिकांमुळे भाजपच्या रथयात्रेची मुहूर्तमेढ रोवली गेली. गुजरातमधील सोमनाथ येथून सुरू झालेली राम मंदिर रथयात्रा ऑक्टोबर 1990 मध्ये बिहारमधील समस्तीपूर जवळ येऊन थांबली. त्यानंतर भाजपने केंद्रातील व्ही.पी सिंग सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. पुढे चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं, पण तेही कोसळलं.

दीपिका चिखलिया लालकृष्ण आडवाणी आणि नरेंद्र मोदींसोबत

फोटो स्रोत, DIPIKA CHIKHLIYA TOPIWALA/X

फोटो कॅप्शन, दीपिका चिखलिया लालकृष्ण आडवाणी आणि नरेंद्र मोदींसोबत

बडोद्यातील भाजपचे नेते जसपाल सिंग यांनी 1985 ते 1991 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्ष सोडला. त्यांनी अपक्ष राहून स्वत:च्या स्थानिक पक्षाच्या माध्यमातून शहरापुरतं मर्यादित राजकारण करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी नलीन भट्ट या जागेसाठी प्रबळ दावेदार मानले जात होते.

याच दरम्यान भाजपने रामायणातील वेगवेगळ्या पात्रांशी संपर्क साधला आणि त्यांना निवडणूक लढवण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून मालिकेतील पात्राची लोकप्रियता आणि रथयात्रेचे एकत्रित फळ निवडणुकीच्या निकालात मिळू शकेल.

रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या मूळ गुजराती अभिनेत्री दीपिका चिखलिया यांना आता बडोद्यातून उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. नलीन भट्ट यांनी आनंदाने ती जागा सोडली, आणि इतकंच नाही तर त्यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारीही घेतली.

'सेलिंग पॉलिटिक्स' (पृष्ठ 162-167) मध्ये लॉरेन्स रीस लिहितात, 'राजीव गांधींना वाटत होतं की रामायण प्रसारित केल्याने त्यांच्या पक्षाला फायदा होईल. पण झालं उलटंच, याचा फायदा भाजपला झाला.'

रामायणात रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी म्हणाले होते की, त्यांनी रामायणात भूमिका केली नसती तर त्यांना निवडणूक जिंकता आली नसती.

दीपिका म्हणाल्या होत्या की, "अरविंद त्रिवेदी यांनी जेव्हा भाजपच्या तिकिटावर साबरकांठा मतदारसंघातून निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी निवडणूक फॉर्ममध्ये त्यांचं टोपणनाव 'लंकेश' लिहिलं होतं."

दीपिका चिखलिया यांच्यासोबत झालेल्या संभाषणाचा हवाला देताना लॉरेन्स लिहितात, 'जेव्हा भाजपचे नेते त्यांच्याशी संपर्क साधत होते, तेव्हा 26 वर्षीय दीपिका यांना राजकारणाबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांची निवड का झाली याचीही त्यांना त्याला कल्पना नव्हती. त्यानंतर, जेव्हा त्या बडोद्याला पोहोचल्या तेव्हा सीतेच्या भूमिकेमुळे त्यांची लोकांवर छाप पडू लागली.

एका मुलाखतीत दीपिका चिखलिया टोपीवाला यांनी सांगितलं होतं की, 'माझे वडील चार्टर्ड अकाउंटंट होते. कुटुंबातील इतर सदस्य सीए, फार्मासिस्ट किंवा डॉक्टर होते. चित्रपट कारकिर्दीमुळे माझं शिक्षण थांबलं. माझ्या वडिलांना वाटायचं की मी माझ्या सौंदर्याने स्वतःला सिद्ध केलंय. आता मी माझ्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध केलं पाहिजे आणि खासदार होऊन मला ती संधी मिळेल.'

'मला चित्रपटांमध्ये स्टिरियोटाइप भूमिकांची ऑफर दिली जात होती, म्हणून मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी लग्न पुढे ढकलावं लागलं तरी चालेल अशी माझ्या वडिलांची भूमिका होती. पण माझं लवकर लग्न व्हावं असं माझ्या आईला वाटत होतं.'

आणि मोदींनी त्यांचा प्रचार केला...

रथयात्रेला सुरुवात करणारे लालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी असे दोघेही दीपिका चिखलिया यांच्या प्रचारासाठी बडोद्यात आले होते. दीपिका यांनी सांगितल्याप्रमाणे, एक अभिनेत्री म्हणून तुमच्या डोक्यावर स्पॉटबॉयची छत्री असते, तुमचा स्वतःचा स्टाफ आणि मोजकेच लोक असतात. याउलट उमेदवार म्हणून अनोळखी व्यक्तींना भेटून त्यांच्याकडे मतं मागायची असतात.

'सीते'च्या दर्शनासाठी लोकांची मोठ्या संख्येने झुंबड उडाली होती. यात विशेष म्हणजे महिलांची संख्या जास्त होती असं सांगितलं जातं. महिलांनी आरतीची ताटं घेऊन त्यांचं स्वागत केलं तर काहींनी भावूक होऊन त्यांच्या पायांना स्पर्श केला. दीपिका यांनीही आपल्या भाषणात 'जय श्री राम' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या.

अडवाणींच्या रथयात्रेदरम्यान मोदी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अडवाणींच्या रथयात्रेदरम्यान मोदी

एका मुलाखतीत दीपिका म्हणाल्या होत्या की, "एप्रिल-1990 मध्ये भाजपचा झेंडा हाती घेण्यापूर्वी माझे हेमंत टोपीवाला यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही लग्न केलं आणि दिल्लीतील संसदेत हजेरी लावल्यानंतर हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला गेलो.

खासदार असताना मला मुलगी देखील झाली. बरीच वर्ष काम केल्यानंतर, गृहिणी आणि आई म्हणून माझ्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी जाणीवपूर्वक सक्रिय राजकारण आणि टेलिव्हिजनमधील करिअर सोडण्याचा निर्णय घेतला."

दीपिका या 34 हजार 188 मतांनी विजयी झाल्या होत्या. रणजितसिंह गायकवाड यांना 2 लाख 41 हजार 850 मतं मिळाली, तर दीपिका यांना 2 लाख 76 हजार 38 मतं मिळाली होती.

त्या निवडणुकीत दीपिका चिखलिया यांच्या व्यतिरिक्त भावनाबेन चिखलिया देखील होत्या. त्या नंतर केंद्र सरकारमध्ये मंत्री बनल्या.

बडोदा आता वडोदरा बनलं होतं...

1996 मध्ये काँग्रेसने सत्यजितसिंह गायकवाड यांना तिकीट दिलं. यावर रणजित सिंह यांच्या पत्नी शुभांगीराजे गायकवाड यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. या विरोधासाठी 'राजवाड्यामधील राजकारण'ही कारणीभूत ठरलं होतं.

भाजपने जितूभाई सुखडिया यांना तिकीट दिलं होतं, पण पक्षातील एक गट त्यांच्या उमेदवारीवर नाराज होता. त्यामुळे तो गट अनायसे शुभांगीराजे यांच्याकडे झुकला. निवडणुकीत याचा परिणाम दिसून आला. सुखडिया यांचा अवघ्या 17 मतांनी पराभव झाला आणि सत्यजित सिंग विजयी झाले. तर शुभांगीराजे यांना एक लाख 678 मतं मिळाली.

1998 च्या लोकसभेच्या निवडणुकीत तीन पक्ष महत्वाचे होते. एक म्हणजे भाजप, दुसरा शंकरसिंह वाघेला यांचा राजप आणि तिसरा काँग्रेस. काँग्रेसने समरजित सिंह यांना तिकीट दिलं होतं, तर भाजपने जयाबहेन ठक्कर यांना तिकीट दिलं होतं.

राजवाड्यातील राजकारण लोकांना यावेळी पुन्हा पाहायला मिळालं.

यावेळी देवयानीदेवी अशोकराजे गायकवाड यांनी राजपच्या तिकिटावर रिंगणात उडी घेतली. ठक्कर यांचा सुमारे 52 हजार 417 मतांनी विजय झाला, तर देवयानीदेवी गायकवाड यांना 52 हजार 909 मतं मिळाली. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ही जागा भाजपचा बालेकिल्ला ठरली.

19 महिन्यांनंतर केंद्रात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि लोकसभेच्या निवडणुका पुन्हा लागल्या. भाजपने जयाबहेन ठक्कर यांना तिकीट दिलं. त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्या पत्नी उर्मिलाबेन यांना तिकीट देण्यात आलं होतं. पण या निवडणुकीत ठक्कर यांना 92 हजार 649 मतं मिळाली आणि त्या विजयी झाल्या.

बडोद्याचं राजघराणं

फोटो स्रोत, Getty Images

भाजपने 2004 साली सलग तिसऱ्यांदा जयाबहेन ठक्कर यांना तिकीट दिलं आणि त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. त्या सहा हजार 603 मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी सत्यजितसिंह गायकवाड यांना तीन लाख नऊ हजार 486 मतं मिळाली.

या निवडणुकीत शुभांगीराजे यांनी भाजपच्या तिकिटावर खेडा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे दिनशा पटेल होत्या. या निवडणुकीत शुभांगीराजे यांचा 56 हजार 749 मतांनी पराभव झाला.

सीमांकनानंतर 2009 मध्ये पहिली निवडणूक झाली आणि बडोद्याची जागा आता वडोदरा झाली. काँग्रेसने सत्यजित सिंह यांना तिकीट दिलं, तर भाजपने ‘बालूभाई’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या बालकृष्ण शुक्ला यांना तिकीट दिलं. बालूभाईंना 4 लाख 28 हजार 833 मतं मिळाली, तर गायकवाड यांना 2 लाख 92 हजार 805 मतं मिळाली.

काळाचं चक्र आता पूर्ण झालं...

2001 मध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर माजी मंत्री नलीन भट्ट यांनी मोदींवर हुकूमशाह असल्याचा आरोप करत भाजपला रामराम ठोकला. 2002 मध्ये त्यांचं तिकीट कापण्यात आलं.

त्यानंतर नलीन भट्ट बसपा आणि केशुभाई पटेल यांनी स्थापन केलेल्या गुजरात प्युरिटन पार्टीमध्ये सामील झाले. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये 2012 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये परतले. त्यावेळी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाची चर्चा होती.

सप्टेंबर 2013 मध्ये मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून औपचारिक घोषणा होण्यापूर्वी एक आठवडा आधी भट्ट यांचं निधन झालं. त्यांनी मोदींना सौराष्ट्र किंवा दक्षिण गुजरातमधील एका जागेवरून निवडणूक लढविण्याऐवजी बडोद्यामधून लोकसभा निवडणूक लढवावी, असा सल्ला दिल्याची चर्चा होती. जेणेकरून गुजरात आणि मध्यप्रदेशच्या आसपासच्या जागांवर 'रिपल इफेक्ट' निर्माण करता येईल.

पण मोदींनी बडोद्यासोबतच वाराणसीतूनही निवडणूक लढवली, जेणेकरून बिहारमधील पूर्वांचल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागांवर 'रिपल इफेक्ट' निर्माण होईल. मोदींनी त्यावेळी 57 हजार 128 मतांच्या विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसचे उमेदवार मधुसूदन मिस्त्री यांना 2 लाख 75 हजार 336 मते मिळाली.

भाजप

फोटो स्रोत, Getty Images

एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी ज्या मतदारसंघात प्रचार केला होता, त्याच जागेवरून ते पंतप्रधान बनले. अशा प्रकारे काळाचं एक चक्र पूर्ण झालं.

मोदींनी बडोदा आणि वाराणसी मतदारसंघातून तीन लाख 71 हजार 784 मतांची आघाडी घेतली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. नियमानुसार नरेंद्र मोदी दोनपैकी केवळ एका जागेचं प्रतिनिधित्व करू शकत होते. त्यामुळे त्यांनी बडोद्याची जागा सोडली. इथे झालेल्या पोटनिवडणुकीत रंजनबहेन भट्ट यांनी विजय मिळवला.

2019 च्या निवडणुकीत त्यांनी टिकूभाई म्हणून प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पटेल यांचा पाच लाख 89 हजार 177 मतांनी पराभव केला. रंजनबहेन यांना 8 लाख 83 हजार 719 मते मिळाली, तर टिकूभाई यांना 2 लाख 94 हजार 542 मते मिळाली.

रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल भाजपमध्ये दाखल झाले असून निवडणूक लढवण्यापेक्षा प्रचार करण्याची त्यांची योजना आहे. दीपिकाही प्रचारासाठी तयार आहेत. पण या दोघांपैकी कोणालाही निवडणूक लढविण्यात रस नाही.

गायकवाडांची ताकद

1962 च्या निवडणुकीत बडोदा जागा अस्तित्वात येण्यापूर्वी ती बडोदा-पश्चिम जागा म्हणून ओळखली जात होती.

पुढच्या निवडणुकीत काँग्रेसने राजघराण्याचे वारसदार फतेहसिंगराव गायकवाड यांना उमेदवारी दिली. भारत सरकारने फतेह सिंह यांचे वडील प्रतापसिंह राव गायकवाड यांना महाराजाच्या पदावरून हटवून त्यांच्या जागी फतेह सिंह राव यांची नियुक्ती केली.

1957 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार पाशाभाई पटेल यांचा सहज पराभव केला. गायकवाड आणि पटेल यांना अनुक्रमे 63.30 आणि 36.70 टक्के मते मिळाली.

1962 च्या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा एकदा फतेहसिंहराव गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यांची मतपेढी जवळपास 73 टक्के मतांपर्यंत वाढली.

1967 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पाशाभाई पटेल यांनी काँग्रेसचे प्रतिस्पर्धी एन. डी. चोक्सी यांचा सुमारे 22,500 मतांच्या फरकाने पराभव केला. पटेल आणि चोक्सी यांना अनुक्रमे एक लाख 52 हजार 903 (52.86%) आणि एक लाख 30 हजार 586 (45.15%) मते मिळाली.

सलमान खान प्रचारयात्रा

फोटो स्रोत, Getty Images

1971 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विभागली गेली. फतेहसिंह गायकवाड यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि एनसीओच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यापूर्वी, इंदिरा सरकारने माजी राजघराण्यांचे वार्षिक वेतन रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे गायकवाड यांच्या निर्णयावर त्याचा परिणाम झाला असावा.

त्या निवडणुकीत गायकवाड यांना 62.79 टक्के (एक लाख 69 हजार 382) मते मिळाली, तर प्रजा सोशालिस्ट पार्टीचे सनत मेहता यांना 97 हजार 418 मते मिळाली.